चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 मे 2023

Date : 23 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नीरज चोप्राने पुन्हा देशाची शान वाढवली, बनला जगातील नंबर वन भालाफेकपटू
  • वर्ल्ड अॅथलेटिक्सनुसार जारी केलेल्या नवीन रॅंकिंगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे. नीरज चौप्राला पहिल्यांदाच हा किताब मिळाला असून त्याने पुन्हा एकदा देशाचं नाव उज्ज्व केलं आहे.

  • नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदा ट्रॅक अॅंड फिल्ड इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) जिंकण्याची कमाल केली होती.

  • ताज्या रॅंकिंगच्या माहितीनुसार, नीरज चोप्राला १४५५ गुण मिळाले आहेत. जे आताचा वर्ल्ड चॅम्पियन एंडरसन पीटर्सच्या २२ अंकांनी जास्त आहेत. एंडरसनच्या नावावर सध्याच्या घडीला १४२२ गुण आहेत.

दोन हजारांच्या नोटा कशा बदलायच्या? तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

मागच्या आठवड्यात दोन हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर करण्याचा निर्णय झाला आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची मुदत आहे. २०१६ मध्ये नोटबंदीचा निर्णय झाला. त्यावेळी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. आता २ हजारांच्या नोटाही बदलून घ्यायच्या आहेत. दोन हजारांच्या नोटा बदलून कशा घ्यायच्या आहेत? त्याविषयीच्या नऊ प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत

  • १) २ हजार रुपयांच्या नोटा काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांप्रमाणे बाद झाल्या आहेत का?
  • उत्तर- दोन हजारांच्या नोटा या चलनातून बाद झालेल्या नाहीत तर त्या वितरणातून बाद झाल्या आहेत. दोन हजारांची नोट ही वैध असणार आहे.
  • २) २ हजार रुपयांच्या फक्त १० नोटा म्हणजे फक्त २० हजार रुपयेच बदलता येणार का?
  • उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार एका वेळी २ हजार रुपयांच्या १० नोटा बदलता येतील. एका वेळी, एका व्यक्तीला २ हजार रुपयांच्या १० नोटाच बदलता येणार आहे. समजा एखादा व्यक्ती एकाऐवजी जास्त वेळा बँकेत आला आणि नोटा बदलू लागला तर तसं करण्याला संमती आहे. रांगेत दहावेळा उभं राहून २ हजारांच्या १०० नोटाही एखादा व्यक्ती बदलू शकतो.
  • ३) दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मागच्या वेळी नोटबंदी झाल्यावर जसा फॉर्म भरावा लागला तसा भरावा लागणार?
  • उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागणार नाही. तसंच ओळखपत्रही दाखवण्याची आवश्यकता नसणार आहे.
  • ४) दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची काही सीमा आखून देण्यात आली आहे का?
  • उत्तर: दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी एका वेळी १० नोटांची मर्यादा आहे. मात्र एखादा व्यक्ती किती नोटा जमा करतोय त्याची कुठलीही सीमा आखून देण्यात आलेली नाही.
  • ५) दोन हजारांची नोट वैध आहे का? त्याद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात का?
  • उत्तर : RBI च्या घोषणेनुसार दोन हजारांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे या नोटांद्वारे व्यवहार करता येऊ शकतो.
  • ६) बँक खातं नसेल तरीही २ हजारांच्या नोटा बदलता येतील का?
  • उत्तर : होय. बँक खातं नसेल तरीही दोन हजारांच्या नोटा बदलता येणार आहेत. कुठल्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत.
  • ७) दोन हजारांच्या नोटा तुमचं खात जिथे असेल तिथेच बदलता येणार का?
  • उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचं खातं आहे तिथेच तुम्हाला नोटा बदलता येतील असं नाही. तुम्ही कुठल्याही बँकेतून तुम्ही नोटा बदलू शकता.
  • ८) ज्येष्ठ नागरिक दोन हजारांच्या १० पेक्षा जास्त नोटा बदलू शकतात का?
  • उत्तर : ज्येष्ठ नागरिकही एका वेळी १० नोटाच बदलू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना दहाच नोटा बदलता येणार आहेत. वरिष्ठ नागरिकांनाही दहा नोटा कितीहीवेळा बदलता येणार आहेत.
  • ९) दोन हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत किती आहे?
  • उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बदलून घेता येणार आहेत.

तर ही उत्तरं आहेत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची. २३ मे पासून नोटा बदलता येणार आहेत. मात्र मुळात हा फरक लक्षात घ्या की ही नोट बंद झालेली नाही. फक्त वितरणातून बाहेर गेली आहे. NDTV ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सातारा: पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव; राज्यपाल रमेश बैस
  • महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. राज्यपाल रमेश बैस यांचे साताऱ्यातील महाबळेश्वरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी वाई हेलिपॅडवर आगमन झाले.यावेळी वाई- खंडाळा – महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
  • यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी ते पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीने उभारलेल्या वाई येथील बेल एअर हॉस्पिटल ला भेट दिली.तेथे संचालक फादर टॉमी यांनी त्यांचे स्वागत केले.व्यवस्थापक जितीन जोश, डॉ. सुनील पिसे, डॉ. सिजो जॉन, डॉ. मंगला अहीवळे, डॉ. नरेंद्र तावडे, डॉ. शयाल पावसकर, डॉ. रेश्मा नदाफ यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी रुग्णालयातील विभागांची सविस्तर माहिती घेऊन शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, लॅबोरेट्री, सिटी स्कॅन, एक्सरे, जनरल वॉर्ड या विभागानं भेट देऊन पाहणी केली.
  • यावेळी फादर टॉमी यांनी रुणालयाच्या कामकाजाची माहिती दिली. या रुग्णालयाने शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने च्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपचार सुरू केले आहेत. परंतु याची परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. एवढ्या ग्रामीण भागात असे हॉस्पिटल उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेयानंतर राज्यपाल श्री बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनिता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
  • पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भवना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
२,००० च्या नोटेमुळे काळा पैसेवाल्यांनाच मदत -चिदम्बरम
  • माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दोन हजार रुपयांच्या नोटेसंबंधी घेतलेल्या निर्णयांवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आधी २०१६ मध्ये २,००० ची नोट आणण्याचा निर्णय मूर्खपणाचा होता, या नोटेमुळे काळा पैसा असणाऱ्यांना सहज पैसे साठवण्यास मदत झाली आणि आता त्यांना त्यांच्या नोटा बदलून देण्यासाठी लाल गालिचे अंथरले जात आहेत, अशी टीका चिदम्बरम यांनी ट्वीट करून केली.
  • रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी २,००० च्या नोटा मागे घेत असल्याचे जाहीर केले. बँकेतून या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यामध्ये जमा करण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
  • त्यासाठी कोणतेही ओळखपत्र, अर्ज आणि पुराव्यांची गरज नाही, असेही बँकेने जाहीर केले आहे. काळा पैसा शोधण्यासाठी या नोटा मागे घेत असल्याचा भाजपचा दावा उघडा पडला आहे, अशी टीका चिदम्बरम यांनी ट्वीटमध्ये केली.

 

सुपरबेट बुद्धिबळ स्पर्धा - आनंदला विजेतेपद :
  • माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने एक फेरी बाकी असतानाच शनिवारी सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धेतील जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

  • आनंदने सहा सामने जिंकले, तर दोन बरोबरीत सोडवत जलद प्रकारात वर्चस्व गाजवले. सहाव्या फेरीअंती पाच विजय आणि एक बरोबरी स्वीकारणाऱ्या भारताच्या आनंदने सातव्या फेरीत रोमानियाच्या डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यूला २५ चालींत नामोहरम केले. मग आठव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाशी २७ चालींत बरोबरी केली.

  • आनंदने पहिल्या फेरीत पोलंडच्या रॅडोस्लॉ वॉजटासझेकवर विजय मिळवला. नंतर दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ले सो याला आणि तिसऱ्या फेरीत युक्रेनच्या अँटन कारोबोव्हला हरवले. मग चौथ्या फेरीत किरिल शेव्हचेन्कोवर आणि पाचव्या फेरीत लेव्हॉन अरोनियनवर विजय मिळवला. आनंदची सलग पाच विजयांची मालिका सहाव्या फेरीत पोलंडच्या यान-क्रिझस्टोफ डुडाने खंडित केली. जलद बुद्धिबळ स्पर्धा नऊ फेऱ्यांची असून, त्यानंतर होणाऱ्या अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक एकमेकांशी दोनदा सामना करतील.

जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा - लाइपजिगला जेतेपद :
  • लाइपजिगने १० खेळाडूंसह खेळूनही पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत फ्रीबर्गला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभूत केले आणि जर्मन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

  • सामन्याच्या १९ व्या मिनिटाला मॅक्सिमिलियन एगस्टीनने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत संघाकडे ही आघाडी कायम होती. अशा स्थितीत ५७ व्या मिनिटाला मार्सेल हेस्टनबर्गला लाल कार्ड मिळाल्याने लाइपजिगला १० खेळाडूंसह खेळावे लागले. लाइपजिगकडून ख्रिस्तोफर एनकुंकुने (७६ वे मि.) गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. मग अतिरिक्त वेळेतही निकाल न लागल्याने सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला.

  • २००९ मध्ये स्थापन झालेल्या लाइपजिगचे हे पहिले जेतेपद आहे. लाइपजिगने गेल्या वर्षी बोरुसिया डॉर्टमंड आणि २०१९ मध्ये बायर्न म्युनिककडून अंतिम सामन्यात पराभव पत्कारला होता.

‘२०३० पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू’ :
  • २०३० सालापर्यंत जगात हृदयविकारामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचे कुख्यात वैशिष्टय़ भारताच्या वाटय़ाला येणार असून, दर चौथा मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांमुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सी.एन. मंजुनाथ यांनी दिला.

  • या संकटाला तोंड देण्यासाठी ताण व्यवस्थापन आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी आत्मसात करण्यासह समग्र एकात्मिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन येथील ‘श्री जयदेव इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस’चे संचालक मंजुनाथ यांनी ‘एचएएल मेडिकॉन २०२२’ला संबोधित करताना केले. हिंदूस्तान एरॉनॉटिक्स लि.मधील डॉक्टरांसाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.

बायडेन-मोदी यांच्यात युक्रेन, अन्नसुरक्षेवर चर्चा अपेक्षित ; अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची स्पष्टोक्ती :
  • रशियाने युक्रेनवर केलेल्या क्रूर अतिक्रमणाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेत विधायक आणि सडेतोड चर्चा करतील, अशी माहिती रविवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिली.

  • टोक्योमध्ये २४ मे रोजी क्वाड नेत्यांची शिखर परिषद होत आहे. त्यानिमित्त बायडेन-मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 

  • भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्याबाबत सुलिव्हन यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, क्वाड परिषदेत अन्नसुरक्षा हा चर्चेचा विषय असेल.

  • मोदी आणि बायडेन यांच्यात युक्रेनवर होणारी चर्चा ही काही नवी नाही. त्यांनी आधीच यावर चर्चा सुरू केली आहे. ती पुढे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वन या विमानात ते वार्ताहरांशी बोलत होते.

  • दरम्यान, पंतप्रधान मोदी हे रविवारी क्वाड परिषदेसाठी रवाना झाले. बायडेन यांच्याशी होणाऱ्या चर्चेत भारत-अमेरिका संबंध दृढ केले जातील. क्वाड नेत्यांशी हिंद-प्रशांत क्षेत्र आणि जागतिक स्तरावरील घडामोडींची चर्चा केली जाईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

श्रीलंका - आणीबाणी मागे :
  • श्रीलंकेत दोन आठवडय़ांपासून लागू केलेली आणीबाणी  शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री हटवण्यात आली. देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्याने हा निर्णय घेण्यात आला.   देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे जीवनावश्यक वस्तू्ंच्या तीव्र टंचाईमुळे प्रचंड जनक्षोभ उसळल्याने सरकारविरोधी निदर्शने होत असल्याने आणीबाणी देशभर लागू करण्यात आली होती. अध्यक्ष गोतबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

  • वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर महिनाभरात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही आणीबाणी उठवण्यात आल्याचे अध्यक्षांच्या सचिवालयातर्फे जाहीर करण्यात आले.  काही दिवसांपासून सरकार समर्थक आणि विरोधकांत झालेल्या हिंसाचारात देशात नऊ जण मृत्युमुखी पडले असून, २०० जखमी झाले आहेत.

  • भारतातर्फे  मदत - भारताने शनिवारी श्रीलंकेला आणखी ४० हजार मेट्रिक टन डिझेल देऊ केले. ही मदत  कर्जसुविधेंतर्गत दिली गेली आहे. गेल्या महिन्यात भारताने श्रीलंकेस मदत म्हणून ५० कोटी डॉलरची अतिरिक्त कर्ज सुविधा इंधन आयातीसाठी दिली आहे.

  •  कारण परकीय गंगाजळीच्या खडखडाटामुळे श्रीलंकेला आयात शुल्क देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या चलनाचे अवमूल्यन झाले असून, महागाई भडकली आहे. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार भारताने जीवनावश्यक वस्तूंचे एक जहाज श्रीलंकेला रवाना केले आहे. त्यात ९००० मेट्रिक टन तांदूळ, २०० मेट्रिक टन दूध पावडर, २४ मेट्रिक टन जीवनावश्यक औषधे वगैरेंचा समावेश आहे. 

२३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.