चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 जुलै 2023

Date : 25 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

स्टंपवर बॅट फेकून मारणे कर्णधार हरमनप्रीत कौरला पडले महागात, आयसीसीने ठोठावला ‘हा’ दंड

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला गैरवर्तन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. स्टंपवर बॅट फेकून मारणे कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगलेच महागात पडले आहे. अंपायरशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिला आयसीसीने सक्त ताकीदही दिली आहे. आयसीसीचा नियम काय सांगतो ते, जाणून घ्या.
  • हरमनप्रीत कौरच्या बाबतीत दिलेला पायचीतचा निर्णय हा वादाचा विषय ठरला आहे. भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना खूप वादग्रस्त ठरला. फलंदाजीदरम्यान बाद झाल्यावर हरमनप्रीत कौर भडकली. अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. त्यानंतर तिने सामन्याच्या शेवटी प्रेझेंटेशन दरम्यान वादग्रस्त विधानही केले. त्यानंतर आयसीसीने तिला दंड ठोठावला आहे. हरमनप्रीत कौरला तिच्या मॅच फीच्या ७५ टक्के दंड भरावा लागेल. यासोबतच दोन गुणही कापले जातील.
  • भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेश दरम्यानच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयी होऊ शकला नाही, दोन्ही संघात सामना टाय झाला. भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्यात अपयश आले. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हमरनप्रीत कौर नाराज झाली होती. अंपायरने आऊट दिल्यानंतर हरमनप्रीतने बॅट स्टंपला आदळली. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर तिने प्रेझेंटेशन दरम्यान एक विधानही केले की, “पुढच्या वेळी बांगलादेशला येण्यापूर्वी संघालाही अशा अंपायरिंगला सामोरे जावे लागेल हे आम्ही लक्षात ठेवू आणि त्याची मानसिक तयारी करू.”
कौटुंबिक हिंसाचारात पुणे पहिल्या स्थानावर; मुंबईचा क्रमांक दुसरा
  • राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात होत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई आहे. नागपूर तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. 
  • पुणे शहरात गेल्या सहा महिन्यांत कौटुंबिक हिंसाचाराच्या २९६ घटना घडल्या. मुंबईत २७६, तर नागपुरात २६० गुन्हे दाखल झाले. या तीन शहरांच्या तुलनेत अन्य शहरांत कमी गुन्हे दाखल आहेत. कुटुंब समुपदेशन केंद्र किंवा भरोसा सेलच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पतीचे मद्यप्राशन, अनैतिक संबंधांबाबत संशय, सासू-सासऱ्यांची देखभाल किंवा संसारात जास्त हस्तक्षेप, वैयक्तिक स्वातंत्र्य न मिळणे, अशी काही कारणे या गुन्ह्यांमागे  आहेत.  

शहर गुन्ह्यांची संख्या

  • २९६ पुणे
  • २७६ मुंबई
  • २६० नागपूर
पाकिस्तानचे अर्थमंत्री होणार हंगामी पंतप्रधान?
  • पाकिस्तानच्या हंगामी पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज गट) सध्याचे अर्थमंत्री इशाक दार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी रविवारी दिले.
  • मात्र, यासंबंधीचा अंतिम निर्णय आघाडी सरकारमधील अन्य पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल.
  • शाहबाज शरीफ सरकार पाकिस्तानचा निवडणूक कायदा, २०१७ यामध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार हंगामी सरकारला घटनात्मक अधिकारांच्या मर्यादेपलीकडे निर्णय घेता येतील.
चार्ली चॅप्लिन यांची मुलगी जोसेफिनचं निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • आपल्या विनोदाची भुरळ सगळ्या जगावर पाडणारे महान कलावंत म्हणजे चार्ली चॅप्लिन. आपण चार्ली यांचं नाव घेतलं तरीही आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. अत्यंत हलाखीत बालपण काढलेला आणि परिस्थितीचे चटके न चुकलेला हा माणूस पडद्यावर यायचा तेव्हा फक्त आनंद फुलवायचा. याच चार्ली चॅप्लिन यांच्या मुलीचं जोसेफिनच चॅप्लीन यांचं निधन झालं आहे. जोसेफिन चॅप्लिन ही हॉलिवूड अभिनेत्रीही होती.
  • अमेरिकेतल्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जोसेफिन चॅप्लिन यांचा मृत्यू १३ जुलै रोजी पॅरीस या ठिकाणी झाला. त्यांच्या कुटुंबातर्फे तशी माहिती देण्यात आली. जोसेफिन चॅप्लिन यांचा जन्म २८ मार्च १९४९ रोजी सांता मोनिका, कॅलिफोर्निया या ठिकाणी झाला. जोसेफिन चॅप्लिन या चार्ली चॅप्लिन यांचं तिसरं अपत्य होत्या. जोसेफिनने चार्ली चॅप्लिन यांच्यासह म्हणजेच आपल्या वडिलांसह १९५२ ला आलेल्या सिनेमात काम केलं होतं. ‘लाइमलाइट’ असं या सिनेमाचं नाव होतं. त्यावेळी जोसेफिन यांचं वय अवघं तीन वर्षे होतं. जोसेफिन यांनीही मोठेपणी सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करणं हेच करिअर निवडलं.
  • जोसेफिन चॅप्लिन यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे त्यांची तीन मुलं आणि भावंडं असा परिवार आहे. जोसेफिन यांच्या तीन मुलांची नावं चार्ली, ऑर्थर, ज्युलियन रोनेट अशी आहेत. तसंच जोसेफिन यांची भावंडं मायकल, गेराल्डिन, व्हिक्टोरिया जेन, युजीन आणि ख्रिस्तोफर यांनीही जोसेफिन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
  • जोसेफिन चॅप्लिन यांनी हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘द कँटरबरी टेल्स’ हा त्यांचा सिनेमा हिट ठरला होता. ‘द बे बॉय’ हा सिनेमाही चर्चेत होता. त्यानंतर टेलिव्हिजनची मिनी सीरिज हेमिंग्वे यामध्येही जोसेफिन यांनी काम केलं होतं.

 

चिराग-सात्विक जोडीने पटकावले विजेतेपद, अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीतील अव्वल जोडीचा केला पराभव
  • सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष जोडीने बीडब्ल्यूएफ ५०० टूर्नामेंट कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले. त्यांनी इंडोनेशियाच्या फजर अॅलन आणि मोहम्मद रियान या जगातील नंबर वन जोडीचा पराभव केला. हा सामना ६२ मिनिटे चालला, ज्यात १७-२१, २१-१३, २१-१४ असा भारतीय पुरुष जोडीने विजय मिळवला. या सामन्यापूर्वी इंडोनेशियन जोडीविरुद्धचा विक्रम २-२ असा बरोबरीत होता.
  • सात्विक-चिराग जोडीने सलग दुसरे विजेतेपद पटकावले -
  • सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी इंडोनेशिया सुपर १००० आणि स्विस ओपन सुपर ५०० विजेतेपद पटकावले आहेत. जूनमध्ये इंडोनेशिया ओपन ही शेवटची स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय जोडीचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. त्याच वेळी, हे त्यांचे तिसरे बीडबल्यएफ ५०० विजेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये थायलंड ओपन आणि गेल्या वर्षी इंडिया ओपन जिंकली होती.
  • सात्विक आणि चिराग यांनी त्यांची जोडी बनल्यापासून अनेक विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, थॉमस चषक सुवर्णपदक, जागतिक स्पर्धेत कांस्य पदक तसेच सुपर ३०० (सय्यद मोदी आणि स्विस ओपन), सुपर ५०० (थायलंड आणि इंडिया ओपन), सुपर ७५० (फ्रेंच ओपन) आणि इंडोनेशिया ओपन सुपर १००० यांचा समावेश आहे.

 

ब्रिटन पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत लिझ ट्रस आघाडीवर :
  • ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी मूळ भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर २८ मतांनी आघाडी मिळवली आहे. विदा विश्लेषण संस्था ‘योगोव्ह’च्या ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली.

  • बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी सत्ताधारी  हुजूर (काँझव्‍‌र्हेटिव्ह) पक्षाच्या इच्छुक ११ उमेदवारांमधून काही निवडफेऱ्यांनंतर संसदीय हुजूर पक्षाच्या सदस्यांनी सुनक आणि ट्रस या दोघांचीही पक्षाचे नेतृत्वपद व पंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेतील अंतिम टप्प्यासाठी मतदानाद्वारे निवड केली.  ‘योगोव्ह’च्या सर्वेक्षणानुसार, ४ ऑगस्ट ते सप्टेंबरच्या प्रारंभापर्यंत ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे सर्वसाधारण सदस्य यापैकी एकाची निवड करतील.  

  • या आठवडय़ाच्या सुरुवातीच्या आकडेवारीवरून असे दिसते, की ४६ वर्षीय ट्रस, हे ४२ वर्षीय सुनक यांच्यापेक्षा सुमारे १९ गुणांची आघाडी घेतील, अशी अपेक्षा आहे. बुधवार आणि गुरुवारी ७३०  पक्ष सदस्यांपैकी ६२ टक्के सदस्यांनी ट्रस यांच्या नावाला, तर  ३८ टक्के सदस्यांनी सुनक यांना पसंती दिली.

  • सदस्यांची ट्रुस व संसद सदस्यांची सुनक यांना पसंती! मतदान करणार नाही, असे सांगणारे किंवा आपले मतच न सांगणाऱ्यांचा यात समावेश नाही. ट्रुस यांनी २४ टक्के गुणांची आघाडी घेतली. दोन दिवसांपूर्वीच्या २० वाढीव गुणांपेक्षा हे जास्त आहेत. ‘स्काय न्यूज’च्या दिलेल्या वृत्तानुसार ‘ब्रेक्झिट’ला अनुकूल मतदान करणाऱ्या सर्व वयोगटांतील पुरुष आणि महिला  पक्षसदस्यांनी ट्रुस यांना पसंती दिली असून, सुनकला ट्रुसच्या पिछाडीवर आहेत. मात्र, सुनक यांना संसदीय पक्ष सदस्यांची सर्वाधिक पसंती आहे. काँझव्‍‌र्हेटिव्ह खासदारांतील मतदानात ट्रुस यांच्या ११३ मतांच्या तुलनेत सुनक यांनी १३७ मते मिळविली आहेत.

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी गुणवर्धने; मंत्रिमंडळाच्या १८ सदस्यांनाही शपथ :
  • ज्येष्ठ नेते आणि राजपक्षे कुटुंबीयांचे निकटवर्तीय दिनेश गुणवर्धने यांची शुक्रवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील १८ सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी झाला. पंतप्रधान गुणवर्धनेंशिवाय मंत्रिमंडळात इतर १७ मंत्री आहेत. पूर्वी अर्थमंत्री असलेल्या अली साबरी यांना परराष्ट्र खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. 

  • गोताबया राजपक्षे यांना जनतेच्या असंतोषाच्या उद्रेकामुळे राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांची बुधवारी संसद सदस्यांनी अध्यक्षपदी निवड केली. ७३ वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधानपद रिक्त झाले होते. गुणवर्धनेंचा ‘एमईपी’ पक्ष १९५६ मध्ये तत्कालीन सत्ताधारी आघाडीत सर्वप्रथम सहभागी झाला होता. गुणवर्धने यांनी १९८३ मध्ये कोलंबोच्या उपनगरातील महारागामा येथून विजय मिळवून संसदेत प्रवेश केला आणि त्यांनी १९९४ पर्यंत प्रमुख विरोधी नेता म्हणून काम केले. गुणवर्धने २००० मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळात सहभागी झाले. ते २०१५ पर्यंत मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. गुणवर्धने यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा संसदसदस्य आहे.

  • माजी राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या कार्यकाळात एप्रिलमध्ये ७३ वर्षीय दिनेश गुणवर्धने यांना गृहमंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. गुणवर्धने हे महाजन एकसाथ पेरामुना (एमईपी) या पक्षाचे नेते आहेत. त्यांचा पक्ष सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना (एसएलपीपी) पक्षाचा मित्रपक्ष आहे. १९४९ मध्ये जन्मलेल्या गुणवर्धने यांनी नेदरलँड्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून १९७९ मध्ये परतल्यानंतर त्यांनी वडील फिलिप गुणवर्धने यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचे नेतृत्व केले. त्यांचे वडील देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश काळात डाव्या समाजवादी चळवळीचा एक प्रमुख चेहरा होते.

सीबीएससी निकाल जाहीर; महाराष्ट्रात दहावीचा निकाल ९७.४२, तर बारावीचा ९०.२९ टक्के :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. त्यात दहावीचा निकाल ९४.४० टक्के, तर बारावीचा ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल ९७.४१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.४८ टक्के लागला. राज्याचा दहावीचा निकाल ९७.४२ टक्के आणि बारावीचा निकाल ९०.२९ टक्के लागला. देशपातळीवरील दहावीच्या निकालात २ लाख ३६ हजार ९९३ विद्यार्थ्यांना, तर बारावीच्या १ लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.

  • करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून दोन सत्रांची परीक्षा घेतली.  दरवर्षीच्या तुलनेत निकाल यंदा लांबला. या पार्श्वभूमीवर सीबीएससीचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर केला. देशपातळीवरील एकूण निकालाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत आढावा घेतला असता दहावीचा निकाल ४.६४ टक्के, तर बारावीचा निकाल जवळपास सहा टक्क्यांनी घटला आहे. विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता लक्षात घेऊन गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांना श्रेणी न देण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला. पुणे विभागामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसह दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.

  • सीबीएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत स्वतंत्रपणे घेतल्या असल्या, तरी अंतिम निकालात लेखी परीक्षेला पहिल्या सत्रात ३० टक्के आणि द्वितीय सत्राला ७० टक्के गुणभार देण्यात आला. तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दोन्ही सत्रांना समान महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सत्र परीक्षेतील गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन करून घेतल्यास पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांचे गुण वाढले असल्यास वाढीव गुण आणि गुण कमी झाले असल्यास पूर्वीचे गुण विचारात घेण्यात आले. त्यानुसार दोन्ही सत्रांचा निकालातील गुण विचारात घेऊन अंतिम निकाल तयार करण्यात आल्याचे सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नीरज प्रथमच अंतिम फेरीत; पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रोहितचीही आगेकूच :
  • ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भालाफेक करून प्रथमच जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजसह रोहित यादवनेही पदकाच्या फेरीत स्थान मिळवल्याने भारतासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.

  • स्पर्धेच्या अ-गटात समावेश असलेला भारताचा तारांकित खेळाडू नीरजने कारकीर्दीतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी साकारली. याच गटातून ८९.९१ मीटर अंतरावर भाला फेकत एकंदर अग्रस्थान मिळवणाऱ्या ग्रेनाडाच्या गतविश्वविजेत्या अँडरसन पीटर्सनंतर नीरजला दुसरा क्रमांक मिळवता आला. नीरजने पहिल्याच प्रयत्नात थेट पात्रतेचे अंतर गाठल्यामुळे उर्वरित दोन प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासली नाही. पात्रता फेरीत प्रत्येक स्पर्धकाला तीनदा भालाफेक करता येते. यापैकी सर्वोत्तम कामगिरी ही ग्राह्य धरली जाते.

  • भारताच्या रोहितने पहिल्या प्रयत्नात ८०.४२ मीटर अंतरावर भालाफेक करीत ब-गटात सहावा आणि एकंदर ११वा क्रमांक मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. त्याचा दुसरा प्रयत्न हा सदोष ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात ७७.३२ मीटर अंतर गाठता आले. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २१ वर्षीय रोहितने ८२.५४ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना रौप्यपदक जिंकले होते.

  • दोन्ही गटांतून ८३.५० मीटर अंतर गाठणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी पात्र होता आले. अंतिम फेरी रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.०५ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वेमध्ये कर्मचारी भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी :
  • करोना काळात थांबवलेली भरती प्रक्रिया कोकण रेल्वे प्रशासनाने पुन्हा चालू करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त कृती समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी या संदर्भात सांगितले की, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने यापूर्वीच जनता दरबार लावण्याची मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे. पण त्याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा महामंडळाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

  • प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेत सामावून घेण्यासाठी अन्य कोणतेही पाऊल उचललेले नाही. करोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेने कंत्राटदारामार्फत भरती करतानाही प्रकल्पग्रस्तांना डावलण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यकारी संचालक संजय गुप्ता यांना वेळोवेळी निवेदने दिली. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही.

  • कोकण रेल्वे प्रकल्प उभारणीच्या वेळी शेतक-यांच्या जमिनी घेण्यासाठी आटापिटा केला गेला. या जमिनी कवडीमोल दराने घेऊन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे.  त्याचबरोबर, मनुष्यबळाची गरज असताना कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमले जात आहेत. यापूर्वी एकाच सात-बारावरील ८ ते ९ लोक नोकरीत घेण्यात आले. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. प्रकल्पग्रस्तांना कुशल असे प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेतले पाहिजे.

  • प्रकल्पग्रस्तांना वेगळा कोटा देऊन भरती तुंबवली आहे. ती खुली करून सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी करून चव्हाण म्हणाले की, लोटे येथे रेल्वेच्या सुट्टय़ा भागांचा कारखाना उभारला जात आहे. तेथे तरी प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घेतले पाहिजे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक, लोक प्रतिनिधी, विशेष भूसंपादन कोकण रेल्वे वर्ग (२) आणि कृती समिती यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार होती. मात्र करोनाचे निमित्त करून व्यवस्थापकीय संचालकांनी ती टाळली. ही प्रक्रिया तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन :
  • केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे.

  • पहिल्या तिरंगा फोटो शेअर - या वर्षी आपण ‘आझादी का अमृत’ उत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ चळवळीला बळ देऊया. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले आहे.

  • २० कोटी लोकांच्या घरात तिरंगा फडकणार भाजपचा दावा - भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची योजना आखली आहे. या अंतर्गत सुमारे २० कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवला जाईल, असा दावा भाजपाने केला आहे. याबाबत ट्विटरवर माहिती देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या मोहिमेद्वारे देशभरातील सुमारे २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या मनात विशेषतः तरुणांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत अधिक प्रज्वलित करण्याचे काम करेल.

23 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.