चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ जुलै २०२१

Updated On : Jul 23, 2021 | Category : Current Affairs


पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय :
 • सध्या संपूर्ण जगभरात पेगॅसस प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे. इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करत जगातील एकूण १२ राष्ट्रपमुखांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. याशिवाय काही माजी पंतप्रधान आणि एका राजाचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्षांच्या यादीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करत असते.

 • दरम्यान पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपला मोबाइल आणि मोबाइल क्रमांक बदलला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पेगॅसस प्रकरणविरोधात फ्रान्स सरकारकडून घेण्यात आलेला हा पहिला मोठा निर्णय आहे.

 • “त्यांच्याकडे अनेक मोबाइल नंबर आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर पाळत ठेवली नाही असा नाही. हा फक्त अतिरिक्त सुरक्षेचा भाग आहे,” असं अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं आहे. सरकारचे प्रवक्ते गॅब्रियल यांनी पेगॅसस प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचं म्हटलं आहे.

देशाचे नुकसान रोखण्यासाठी निवृत्तिवेतन नियमांत बदल :
 • सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित मजकूर प्रकाशित केल्यास ‘देशाचे होणारे नुकसान’ रोखण्यासाठी निवृत्तिवेतन नियमांमध्ये अलीकडे बदल करण्यात आले आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी राज्यसभेत सांगितले.

 • कार्मिक मंत्रालयाने या वर्षी मे महिन्यात अधिसूचित केलेल्या सुधारित निवृत्तिवेतन नियमांनुसार, निवडक गुप्तचर किंवा सुरक्षाविषयक संस्थांमध्ये काम केलेल्या सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना कुठलाही मजकूर प्रकाशित करायचा असल्यास त्यांच्या संस्थेच्या प्रमुखांकडून पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 • ‘या सुधारणेपूर्वी, प्रकाशित मजकूर हा निर्धारित केलेल्या प्रतिबंधित श्रेणींमध्ये येतो की नाही हे ठरवणे त्या अधिकाऱ्यावर अवलंबून होते’, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले.

ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश : 
 • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी राष्ट्रे शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात स्त्री-पुरुष समानता आणि वांशिक न्याय या सामाजिक विषयांना आपला पाठिंबा दर्शवतील. पुरुष आणि महिला दोघांनाही समान स्थान देणारे हे पहिलेच ऑलिम्पिक असेल. त्यामुळे प्रत्येक देशाकडून एक पुरुष आणि एक महिला असे दोन ध्वजवाहक नेमण्यात आले आहेत.

 • टोक्यो शहरामधील शिंजुकू भागातील न्यू नॅशनल स्टेडियमवर एक वर्ष आणि एक दिवस उशिराने यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेचा प्रारंभ शुक्रवारी शानदार उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमी वर सर्वाच्या अपेक्षेपेक्षा यंदाचे ऑलिम्पिक वेगळे असेल.

 • महिन्याभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना ऑलिम्पिकसाठी बंदी घातली, तर आठवडय़ाआधी जपानमध्ये आणीबाणी लागू करून स्थानिक प्रेक्षकांनाही मज्जाव करण्यात आला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक देशाचे मर्यादित क्रीडापटू या सोहळ्याला हजर राहतील. करोनाचे आव्हान आणि पुढील दिवशीची स्पर्धा यामुळे प्रत्येक देशाचे मर्यादित क्रीडापटू संचलनात सहभागी होती.

शिवसेनेतर्फे राज्यस्तरीय संपर्क अभियान : 
 • राज्य सरकार स्थिर आहे, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्ये सुरू असतानाच शिवसेनेने शिवसंपर्क अभियान नव्याने सुरू केले आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नसेल त्या मतदारसंघात स्वबळाची चाचपणी नव्याने सुरू करण्यात आली आहे.

 • औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री आणि शहरातील औरंगाबाद पूर्व या तीन मतदारसंघात आमचे जे आहे ते राखून ठेवू यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. एका बाजूला शिवसंपर्क मोहीम सुरू असताना  चंद्रकांत खैरे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आणि दौरे करू लागले आहेत. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेच्या पाश्र्वाभूमीवर ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 • महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीमध्येही सेनेत दोन गट निर्माण झालेच होते. त्या दोन गटांना पुन्हा एकत्रित आणणे, गावस्तरावर होणारी विकासकामे आणि झालेली विकासकामे याची उजळणी करणे असे शिवसंपर्क मोहिमेचे उद्दिष्ट असून शहरी आणि ग्रामीण दोन्ही मतदारसंघात पुनर्बांधणीचे प्रयोग सुरू झाले आहे.

देशात ३५ हजार ३४२ नवीन रुग्णांची नोंद, ४८३ जणांचा मृत्यू : 
 • देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार होतांना दिसत आहे. सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर रुग्णसंख्या घटली आहे. देशभरात गेल्या चोवीस तासांत करोनाच्या ३५ हजार ३४२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४८३ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात ४ लाख ०५ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३५ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली. तर ३८ हजार ७४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या देशात ४ लाख ०५ हजार ५५३ रुग्णांवर उपचास सुरु आहेत.

 • आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ९३ हजार ०६२ करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख ६८ हजार ०७९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख १९ हजार ४७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लसीकरणाने देखील देशात जोर पकडला आहे. देशात ४२ कोटी ३४ लाख १७ हजार ०३० लसीचे डोस देण्यात आले आहेत.

२३ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)