भारतातील आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, संरक्षण, कृषी व विमा क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-भारत व्यापार मंडळाच्या ‘इंडिया आयडीयाज समिट’ कार्यक्रमात केले. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत ते म्हणाले की, भारतात खुलेपणा, चांगले प्रशासन, संधींची विपुलता आणि गुंतवणुकीचे पर्याय अनेक आहेत.
उत्पादकता वाढ, अर्थव्यवस्थेची स्थिती व आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदल या गोष्टीतून आपण आवश्यक आर्थिक लवचीकता मिळवू शकतो. भारत हा वाढत्या संधींचा देश आहे. खुल्या बाजारपेठा म्हणजे जास्त संधी असे समीकरणच आहे. आमच्या सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात आम्ही भारतीय व्यवस्था खुली व सुधारणाभिमुख केली आहे. त्यामुळे सकारात्मक बदल घडून आले, असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी याच बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी बीजभाषणात सांगितले की, भारत हा अमेरिकेचा मोठा संरक्षण व सुरक्षा भागीदार आहे. पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचे चीनचे वर्तन अस्वीकार्य असल्याचे सांगून सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षच या प्रक्षोभक कारवायांना जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारताचे वीस सैनिक चीनच्या हिंसाचारात मारले गेले यामुळे अमेरिका व्यथित असल्याचे सांगून त्यांनी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करून हितसंबंध जपू शकतात असे स्पष्ट केले. चीनची ५९ उपयोजने(अॅप) हद्दपार करण्याच्या भारताच्या निर्णयाचे त्यांनी पुन्हा एकदा स्वागत केले. टिकटॉकसह ही सर्व उपयोजने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले. या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता थोडेच टप्पे बाकी आहेत.
लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्डशी करार केला होता. त्यामुळे ही लस पुण्यातील प्रकल्पात उत्पादित करण्यात येणार आहे. या लशीची खरेदी बहुतांश सरकारकडून केली जाण्याची शक्यता असून लसीकरण कार्यक्रमात ती सरकारकडून मोफत दिली जाईल.
लशीच्या किमतीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांना लस देणार आहोत. त्यामुळे त्या लशीची किंमत एका डोसला एक हजार रुपये ठेवली जाईल. या लशीच्या मानवी चाचण्या भारतात घेण्याची जबाबदारी सीरम इन्स्टिटय़ूटवर टाकण्यात आली आहे. सीरमकडून ४ ते ५ हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये केल्या जाणार आहेत.
अयोध्येत भव्य दिव्य असं राम मंदिर उभारलं जाणार असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भानही यादरम्यान ठेवण्यात येईल. या कार्यक्रमात १५० निमंत्रितांसह एकूण २०० पेक्षा अधिक जण सहभागी होणार नाहीत,” अशी माहितीही स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली.
“शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे,” असंही स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले.
पाचवेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स बुद्धिबळ स्पर्धेत सलामीला रशियाच्या पीटर स्विडलरकडून १.५-२.५ पराभव स्वीकारावा लागला. विश्वविजेत्या नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आयोजित ऑनलाइन स्पर्धेत आनंद प्रथमच सहभागी झाला आहे.
मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीत स्विडलरविरुद्धच्या पहिल्या तीन डावांमध्ये आनंदला बरोबरी साधता आली होती. मात्र अखेरच्या डावात आनंद पराभूत झाला आणि त्याने पहिली फेरीही गमावली. मे महिन्यानंतर आनंद प्रथमच ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला आहे. स्विडलरविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावापासून दोघांमध्ये चुरस रंगली होती. मात्र चौथ्या आणि अखेरच्या डावात आनंदला पराभव पत्करावा लागला.
अन्य खेळाडूंमध्ये बोरिस गेलफंडने लक्ष वेधून घेतले. त्याने तिसरा मानांकित चीनच्या डिंग लिरेनवर ३-१ असा धक्कादायक विजय मिळवला. अग्रमानांकित कार्लसनने हॉलंडच्या अनिश गिरीला ३-१ असे सहज नमवले. रशियाचा इयान नेपोमनियाचीने व्लादिमिर क्रॅमनिकला ३-२ आणि आणि हंगेरीचा पीटर लेकोने व्हॅसिल इवानचुकला ३-२ नमवत विजयी सलामी दिली. कार्लसन आयोजित या स्पर्धेत स्वत: कार्लसन, लिरेन, नेपोमनियाची आणि गिरी यांना थेट प्रवेश मिळाला. कारण या चौघांनी याआधीच्या चेसेबल मास्टर्स या कार्लसन आयोजित स्पर्धेतच उपांत्य फेरी गाठली होती.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.