चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 फेब्रुवारी 2024

Date : 23 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचं अर्धच वेळापत्रक जाहीर, उर्वरित सामने कधी होणार?
  • इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १७ व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (२२ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले. २२ मार्चपासून भारतात ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने येणार आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलने अर्धच वेळापत्रक जाहीर केले आहे.
  • मे महिन्यात केंद्रातील मोदी सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याआधी भारतात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीच आयपीएलचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे आयपीएलच्या २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
  • महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल, त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागेल. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता १७ दिवसांचा कार्यक्रम समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
  • बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे की, “भारतातील आगामी लोकसभा निवडणुकांशी संबंधित सर्व आवश्यक नियम आणि सूचनांचे पालन करून बीसीसीआय सरकार आणि सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करणार आहे. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बोर्ड पहिल्या दोन आठवड्यांच्या वेळापत्रकाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करेल. यानंतर बीसीसीआय मतदानाच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित हंगामाचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करेल.”
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ( २३ फेब्रुवारी ) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
  • महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती.
  • ऑक्टोबर २०१३ च्या शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, त्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषय, त्यावर केलेली टिप्पणी यामुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले होते.
चीनमधून भारतीयांच्या माहितीवर डल्ला?
  • चीनमधील गुप्तचर यंत्रणा तसेच तेथील हॅकर्सनी ‘इमिग्रेशन’संदर्भात भारताच्या तब्बल ९५.२ गिगाबाईट विदावर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील हॅकर्सकडून अनेक परदेशी सरकारे, कंपन्यांच्या माहितीची चोरी करण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे ‘द पोस्ट’च्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्टआणि गुगलसह ॲपलच्या सॉफ्टवेअर यंत्रणाही सुरक्षित नसल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. चीन सरकारसाठी कामे करणाऱ्या एका कंपनीमधील अज्ञात स्त्रोतांनी केलेल्या दाव्यानुसार ५७० पेक्षा अधिक फाईल्स, छायाचित्रे आणि चॅट लॉगची चोरी करण्यात आली आहे. ‘आयसून’ किंवा ‘ऑक्झून’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व शांघायमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी चिनी सरकारी कार्यालये, सुरक्षा यंत्रणा तसेच सरकारी उद्याोगांना हॅक केलेल्या माहितीची विक्री करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
  • जून २०२०मध्ये गलवान येथील चकमकीनंतर केंद्र सरकारने हेरगिरीच्या संशयावरून चिनी मोबाईल ॲपविरोधात कठोर कारवाई केली होती. सुमारे ६ हजार भारतीयांवर ‘झेनहुआ डेटा’ कंपनीने पाळत ठेवल्याचेही तपासात उघड झाले होते.
उसाला आजवरची उच्चांकी एफआरपी मिळणार ? जाणून पंतप्रधान मोदींनी कारखान्यांना काय आदेश दिले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने चालू गळीत हंगामात १०.२५ टक्के साखर उतारा असलेल्या कारखान्यांना उसाला प्रति टन ३४०० रुपये रास्त आणि किफायतशीर (एफआरपी) दर देण्याचे आदेश कारखान्यांना दिले आहेत. हा उसाला मिळालेला आजवरचा उच्चांकी दर आहे.
  • केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, उसाला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे. मागील गळीत हंगामाच्या तुलनेत तो सुमारे आठ टक्क्यांनी जास्त आहे. यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या आणि १०.२५ टक्के साखर उतारा मिळालेल्या कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाला सुधारित दराने एफआरपी द्यावी लागणार आहे.
  • केंद्र सरकारने उसाला दिलेली एफआरपी अ २ अधिक एफएल किंमतीपेक्षा म्हणजे उत्पादन खर्च अधिक शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या श्रमाच्या किंमतीपेक्षा एफआरपी १०७ टक्क्यांनी जास्त असल्याचाही दावा केला आहे. हा जगात उसाला मिळणारा सर्वाधिक भाव आहे. या वाढीव एफआरपीचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही म्हटले आहे.
  • उसाला उच्चांकी दर देत असतानाच सरकार ग्राहक साखर स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहे. देशातील पाच कोटी उस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि ग्राहक, असा सर्वांचाच फायदा होणारा हा निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची दिलेली हमी पूर्ण केली आहे, असाही दावा केंद्राकडून करण्यात आला आहे.
नववी ते १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा होणार?CBSE यंदा नोव्हेंबरमध्ये करणार प्रयोग, काय बदलणार?
  • गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमातील शिफारशींनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे (CBSE) इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा (OBE) घेण्याचा विचार करत आहे. इंडियन एक्सस्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने काही शाळांमध्ये इयत्ता ९ आणि १० च्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांसाठी तर इयत्ता ११ वी व १२ वी च्या इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांच्या ओपन-बुक परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. ओपन बुक परीक्षा म्हणजे नावानुसारच अभ्यासाची सामग्री वापरण्याची मुभा असलेली परीक्षा. ही सामग्री म्हणजे नोट्स, पाठयपुस्तके, वह्या असू शकतात.

ओपन बुक परीक्षा सोप्या असतात का? (Open Book Exams)

  • एक महत्त्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीच्या परीक्षा या सामान्य परीक्षांपेक्षा सोप्या आहेत असा याचा अर्थ होत नाही. कारण नियमित पद्धतीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचे परीक्षण केले जाते मात्र ओपन बुक परीक्षेत त्या विषयाची समज व संकल्पनेचे विश्लेषण करण्याची क्षमता याची परीक्षा घेतली जाते. पाठयपुस्तकातील माहिती फक्त उत्तर म्हणून पेपरमध्ये उतरवणे हे थांबवून, प्रश्नाचं उत्तर शोधून ओळखणं, हे कसब निर्माण करणं हा या परीक्षांचा हेतू असतो.
  • इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, २०२४ या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या ओपन बुक परीक्षेचा प्रयोग आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. अनुभवाच्या आधारे, मूल्यांकनाचा प्रकार सर्व शाळांमध्ये इयत्ता ९ ते १२ वीच्या इयत्तांसाठी स्वीकारावा का याविषयी बोर्ड निर्णय घेणार आहे. या प्रयोगात कौशल्य, विश्लेषण,सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतांचे मूल्यांकन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
“वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात आम्ही…”, रणजीत सावरकर यांचं महत्त्वाचं भाष्य
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी कायमच केली जाते. काही दिवसांपूर्वीच लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणे कर्पूरी ठाकूर, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या एम. एस. स्वामिनाथन यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे. या वर्षी एकूण पाच जणांना भारतरत्न जाहीर झाला आहे. यानंतरही वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसंच उद्धव ठाकरे यांनीही ही मागणी केली. मात्र वीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्कारावर रणजीत सावरकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
  • वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. रणजीत सावरकर म्हणाले की सध्याचं सरकार हे वीर सावरकरांच्या विचारावर चालणारं सरकार आहे. वीर सावरकर यांचे विचार घेऊन पुढे जातील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. तसंच भारतरत्न पुरस्कारावर त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

रणजीत सावरकर यांनी काय म्हटलं आहे?

  • सावरकर कुटुंबीयांची ही मागणी कधीच नव्हती की वीर सावरकरांना भारतरत्न मिळावं. स्वातंत्र्यवीर आणि हिंदूहृदय सम्राट या दोन पदव्या ज्या भारतीयांनी त्यांना दिल्या आहेत त्याच आम्ही महत्त्वाच्या मानतो. त्यामुळे या संबंधी आम्ही चर्चा केली नाही आणि करणारही नाही. असं रणजीत यांनी म्हटलं आहे.

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यावर राज ठाकरेंची मागणी

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपण बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारस आहोत त्या नात्याने ही मागणी करतो आहोत की बाळासाहेब ठाकरे यांना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा. अशी एक पोस्ट लिहून मागणी केली. पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

 

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा: ऐश्वर्य सिंग तोमरला सुवर्ण

  • विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी आपले वर्चस्व राखले. स्पर्धेत चौथ्या दिवशी बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने सुवर्णपदक पटकावले. भारताचे स्पर्धेतील हे सहावे पदक होते. यामध्ये चार सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकाची समावेश आहे. भारत पदकतालिकेत आघाडीवर आहे.
  • भारताच्या २२ वर्षीय ऐश्वर्यने गेल्यावर्षी देखील विश्वचषक स्पर्धेत सोनेरी यश मिळवले होते. यावेळी अंतिम लढतीत ऐश्वर्यने ऑस्ट्रियाच्या अॅलेक्झांडर श्मिर्लचा १६-६ असा पराभव केला. त्यापूर्वी, मानांकन फेरीत ४०६.४ गुणांसह ऐश्वर्यने दुसऱ्या क्रमांकाने सुवर्णपदकासाठी श्मिर्लला आव्हान दिले. श्मिर्ल ४०७.९ गुणांसह सर्वप्रथम अंतिम फेरीत दाखल झाला होता.
  • त्यापूर्वी, पात्रता फेरीत ऐश्वर्यने ५८८ गुणांसह आघाडीच्या क्रमांकाने मानांकन फेरीत प्रवेश केला होता. पात्रता फेरीत भारताचा अखिल शेरॉन ५८७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, मानांकन फेरीत अखिल आव्हान राखू शकला नाही.

MPSC विद्यार्थ्यांची भूमिका तीच माझी आणि सरकार ची; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • MPSC विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे. तीच माझी आणि सरकारची आहे. MPSC आयोगाला मी दोन वेळा सांगितलं आहे. त्या विध्यार्थ्यांना ज्या पद्धतीने परीक्षा पाहिजे, तशीच परीक्षा होणार. त्यांची मागणी पूर्ण करणार. याचं श्रेय कोणाला घ्यायचं ते घेऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अस म्हणत त्यांनी अप्रत्येक्षपणे शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवड च्या राहटणीत बोलत होते. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.
  • एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत लक्ष्मण जगतापांनी मतदारसंघाला कुटुंब समजलं. त्या कामाची पोचपावती मिळाली. रोड शो ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अश्विनी ताई लक्ष्मण भाऊंनी केलेल्या सेवेची ही समोरची जनता पोचपावती आहे.
  • दिवंगत लक्ष्मण जगतापांची रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हायला हवी होती. तशी आपली परंपरा आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरेंनी तसं मत मांडलं. आम्ही त्या विनंतीस मान दिला. पण दुर्दैवाने आज मात्र विरोधकांनी या पोटनिवडणुकीत तो प्रतिसाद दिला नाही. पण मी रोड शो मध्ये मतदारांचा कौल पाहिला. त्यातून तुम्ही मताधिक्याने निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे.
  • पुढे ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असल्यानं माझ्याकडे सगळे रिपोर्ट येतात. देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना ही सगळे रिपोर्ट कळतात. त्यात रिपोर्ट मध्ये लक्ष्मण भाऊंच काम बोलतंय. त्यातूनच तुमचा विजय निश्चित असल्याचं दिसतोय. दिवंगत लक्ष्मण जगताप दुर्धर आजारी असताना राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला रुग्णवाहिकेतून पोहचले. आपला उमेदवार निवडून येणार याची कल्पना असताना ही आपलं मत वाया जाऊ नये, ही त्यांची तळमळ होती. हे पाहून त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर वाढला. मी मुख्यमंत्री होण्यात लक्ष्मण जगतापांचा ही मोलाचा वाटा आहे.

इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चुका, विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

  • विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
  • बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. असाच प्रकार बुधवारी झालेल्या हिंदीच्या पेपरमध्ये झाला.
  • हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक १,२,१,२ असे देण्यात आले आहेत. ते १,२,३,४ असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना १,१,१,१ असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे १,२,३,४ असे असायला हवे होते. बोर्डाकडून अशी चुकी आज दुसऱ्यांदा झाल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यंदा शिक्षण मंडळाने चुकांची मालिका सुरू केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रो बुद्धिबळ लीग: विदित गुजराथीचा कार्लसनवर विजय

  • Pro Chess League भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने प्रो बुद्धिबळ लीगच्या सामन्यात नॉर्वेचा दिग्गज मॅग्नस कार्लसनला पराभूत करत सर्वाचे लक्ष वेधले. विदितचा कार्लसनवरील हा पहिला विजय आहे.
  • इंडियन योगीज’कडून खेळणाऱ्या गुजराथी ने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या कार्लसनकडून करण्यात आलेल्या चुकांचा फायदा उचलला. कार्लसन प्रो बुद्धिबळ लीगमध्ये ‘कॅनडा चेसब्रास’कडून खेळत आहे.
  • जगभरातील १६ संघांनी या ‘ऑनलाइन’ जलद बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. गुजरातीने काळय़ा प्याद्यांसह खेळताना आपल्या प्रतिस्पर्धीवर विजय नोंदवला. पाच जागतिक जेतेपद मिळवणाऱ्या कार्लसनला पराभूत केल्यानंतर गुजराथीने ‘ट्वीट’ केले की, ‘‘आताच जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले.’’
  • कार्लसनला पराभूत केल्यानंतर गुजराथी भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांच्या यादीत सहभागी झाला आहे. भारताच्या तिन्ही बुद्धिबळपटूंनी २०२२ मधील विविध स्पर्धामध्ये कार्लसनला नमवले होते.

टर्कीनंतर आता चीन आणि तजाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के; तीव्रता ६.८ रिश्टर स्केल

  • टर्कीनंतर आता चीन आणि तजाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूंकपाची तीव्रता अनुक्रमे ७.३ आणि ६.८ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. यूएस जिऑलिजकल सर्वेनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास हे भूकंप झाले.
  • चीनच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास चीन-तजाकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांग प्रांतात भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र चीन सीमेपासून ८२ किमी दूर होते. याबरोबरच उइगर प्रांतातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
  • चीनबरोबरच तजाकिस्तानमध्येही गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. यूएस जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

 

एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंदचे आणखी दोन विजय :
  • भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील चमकदार कामगिरी कायम राखली. प्रज्ञानंदने मंगळवारी ऑनलाइन स्वरूपातील जलद प्रकाराच्या स्पर्धेत आणखी दोन विजय नोंदवले.

  • चेन्नईच्या १६ वर्षीय प्रज्ञानंदने सोमवारी नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. मंगळवारी झालेल्या १०व्या फेरीत प्रज्ञानंदने रशियाच्या आंद्रे इसिपेन्कोला ४२ चालींत पराभूत केले. ११व्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसतारोव्हशी त्याने बरोबरी साधली.

  • मग १२व्या फेरीत अ‍ॅलेक्झांड्रा कोस्टेन्यूकवर ६३ चालींमध्ये मात करून त्याने दुसरा विजय नोंदवला. त्यापूर्वी, नवव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोम्निशीने प्रज्ञानंदला नमवले. १२व्या फेरी अखेरीस प्रज्ञानंद १५ गुणांसह १२व्या स्थानी आहे. तर नेपोम्निशी २७ गुणांसह अग्रस्थानी आहे.

भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका - भारतीय महिलांचा सलग चौथा पराभव :
  • पावसाचा फटका बसलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडकडून ६३ धावांनी पराभव पत्करला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सलग चौथा सामना भारताने गमावला.

  • पावसामुळे नाणेफेक जवळपास पाच तास लांबल्याने हा सामना २० षटकांचा खेळवण्यात आला. भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकल्यावर न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अ‍ॅमेलिया कर (नाबाद ६८) आणि सुझी बेट्स (४१) यांच्या फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १९१ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

  • प्रत्युत्तरात, आघाडीची फळी कोसळल्यामुळे भारताची ४ बाद १९ अशी केविलवाणी अवस्था झाली. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने चिवट झुंज देत सर्वाधिक ५२ धावांची (२९ चेंडूंत) खेळी साकारली. याचप्रमाणे कर्णधार मितालीने ३० धावांचे योगदान दिले. परंतु भारताचा डाव १७.५ षटकांत १२८ धावांत आटोपला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप :
  • विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी उद्या (बुधवार) आणि गुरुवार असे दोन दिवस लाक्षणिक संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य चतुर्थश्रेणी (गट ड) कर्मचारी महासंघाने या संपाची हाक दिली. राज्यात १७ लाख सरकारी आणि निमसरकारी राज्य कर्मचारी आहेत.

  • विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले होते. गेल्या वर्षी राज्यात एक दिवस संप केला होता. परंतु मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता दोन दिवसांचा लाक्षणिक संप करण्यात येत असल्याचे जालना जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस पठाण याह्या यांनी सांगितले. या संपात महसूल आणि राज्य शासनाच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसह निमसरकारी कर्मचारीही सहभागी होत असल्याची माहिती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळे यांनी दिली.

  • नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करून संबंधित जुनी योजना लागू करावी, सेवानिवृत्तींच्या किमान वेतनात केंद्र सरकारने वाढ करावी, सर्व कर्मचाऱ्यांना समान किमान वेतन द्यावे, योजना कामगारांना (अंगणवाडी, आशा वर्कर्स इत्यादी) सेवेत नियमित करावे, आरोग्य विभागास अग्रक्रम देऊन सर्व विभागातील रिक्त पदे भरावीत, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या कोणत्याही अटींशिवाय कराव्यात आदी मागण्यांसाठी हा संप आहे, असे सांगण्यात आले.

हिजाब हा धार्मिक हक्क नाही; कर्नाटक सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण :
  • हिजाब परिधान करणे हे राज्यघटनेच्या कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याचा भाग असून राज्य सरकार त्याचे उल्लंघन करत आहे, हा आरोप कर्नाटक सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात फेटाळून लावला. हिजाब परिधान करणे कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारांत मोडत नसून केवळ संस्थात्मक शिस्त म्हणून हिजाबवर शैक्षणिक संस्थांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

  • हिजाबवर शैक्षणिक संस्थांच्या आवारात बंदी नसून केवळ शिक्षण घेत असताना वर्गामध्ये बंदी घालण्यात आली आहे, असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले.

  • कर्नाटकातील हिजाब बंदीवर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश रितू राय अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. राज्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नवाडगी यांनी कर्नाटक सरकारची बाजू उच्च न्यायालयात मांडली.

  • ‘‘हिजाब परिधान करणे हे कलम १९ (१)(अ)मध्ये येते, तर कलम २५मध्ये नाही. एखाद्या महिलेची हिजाब परिधान करण्याची इच्छा असेल तर त्याला संस्थात्मक शिस्तीनुसार परिधान केला असेल तर त्याला कोणताही विरोध नाही,’’ असे नवाडगी यांनी सांगितले. कलम १९ (१) अ अतंर्गत हा ज्या अधिकारांतर्गत हा दावा करण्यात आला आहे, तो कलम १९ (२) संबंधी असून त्यानुसार सरकार संस्थात्मक प्रतिबंधानुसार योग्य प्रतिबंध लागू करू शकते, असे नवाडगी यांनी न्यायालयाला सांगितले. राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत  राज्य सरकारचा कायदा आहे. त्यानुसार हा कायदा शैक्षणिक संस्थांच्या आवारात नाही, मात्र वर्गामध्ये शिक्षण घेत असताना हिजाब परिधान करण्यास बंदी घालतो, असे नवाडगी यांनी सांगितले.

हिजाबवर बंदी नाही तर… कर्नाटक सरकारची कोर्टात माहिती :
  • कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर कर्नाटक उच्च न्यायालयात मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राज्याचे महाधिवक्ता यांनी सरकारची बाजू मांडली. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हिजाब घालण्यावर कोणतेही बंधन नाही, ते फक्त वर्गाच्या दरम्यान आहे, असे महाधिवक्त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे.

  • कर्नाटकातील हिजाब वादावर उच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ते म्हणाले की, आमच्याकडे कर्नाटक शैक्षणिक संस्था म्हणून एक कायदा (वर्गीकरण आणि नोंदणी नियम) आहे. हा नियम विशिष्ट टोपी किंवा हिजाब घालण्यास मनाई करतो.

  • कॅम्पसमध्ये हिजाब घालण्यावर कोणतेही बंधन नाही, ते फक्त वर्गासाठी आहे. धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही. जोपर्यंत विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्याक संस्थांचा संबंध आहे, आम्ही एकसमान संहितेत हस्तक्षेप करत नाही आणि ते संस्थांना ठरवायचे आहे, असे महाधिवक्ते म्हणाले.

२३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.