चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ फेब्रुवारी २०२१

Date : 23 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इराकमध्ये रॉकेट हल्ला; अमेरिकन दुतावास होतं मुख्य टार्गेट :
  • बगदादमध्ये जोरदार तटबंदी असणाऱ्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट हल्ला करण्यात आल्याची माहिती इराकच्या लष्कराने दिली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन दुतावासाला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन झोनवर तीन रॉकेटच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. यामधील एक रॉकेट अमेरिकन दुतावासाच्या कॉम्प्लेक्समध्ये पडलं होतं. लष्कराने या हल्ल्यानंतर निवेदन प्रसिद्ध केलं असून हल्ल्यात कोणतीही हानी झालेली नसून तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. हल्ल्यात संपत्तीचं तसंच काही वाहनांचं नुकसान झालं आहे. ग्रीन झोनमध्ये अनेक देशांचे दुतावास आहेत.

  • इराकमध्ये अमेरिकेला टार्गेट करत करण्यात आलेला हा एका आठवड्यातील तिसरा हल्ला आहे. गेल्या मंगळवारी इरबील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात एक कंत्राटदार आणि काही स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी अमेरिकेच्या सुरक्षा कंपनीसाठी काम करणारे कर्मचारी रॉकेट हल्ल्यात जखमी झाले होते.

‘ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा :
  • ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.

  • भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवनातील ब्रिक्स सचिवालयात भारताचे ब्रिक्स २०२१ संकेतस्थळ सुरू केले.

  • यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताने स्वीकारण्याचे ठरविले आहे त्या बाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी, भारताने ब्रिक्सचे यजमानपद स्वीकारण्यास चीनचा पाठिंबा असल्याचे, सांगितले.

  • ब्रिक्स हा आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक शक्ती आहे, असे ते म्हणाले. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती राहणार आहेत का, त्याबाबत वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध :
  • भारताला पूर्वीच्या काळापासून शस्त्रे व लष्करी साधने बनवण्याचा अनुभव होता. स्वातंत्र्यानंतर देशाला ही क्षमता वाढवता आली नाही. परंतु आता आम्ही संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींची योग्य अंमलबजावणी करण्याबाबतच्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. सरकारला देश संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे शस्त्रे व लष्करी सामग्री निर्मितीच्या क्षमता होत्या.

  • जागतिक महायुद्धांमध्येही भारताने मोठय़ा प्रमाणात शस्त्रांची निर्यात केली होती, पण स्वातंत्र्यानंतर अनेक कारणांनी संरक्षण उत्पादन क्षमतेत भारत मागे पडत गेला. आपल्याला अगदी लहान शस्त्रेही परदेशांकडून विकत घेण्याची वेळ आली. भारत हा शस्त्रांचा मोठा आयातदार देश बनला, पण ही अभिमानाची बाब नाही. भारतातील लोकांकडे संरक्षण उत्पादनाची क्षमता नाही असा भाग नाही, ते वाढवता येऊ शकते पण आधीच्या काळात शस्त्रांची आयात करण्यात आली.

  • भारतात आता परिस्थिती बदलत असून संरक्षण सामग्री उत्पादन वाढवण्यास सरकार वचनबद्ध आहे. निर्यात उत्तेजन, परदेशी गुंतवणूक उदारीकरण याच्या माध्यमातून सरकारने संरक्षण उत्पादन वाढीस चालना दिली आहे. संरक्षणप्रमुख पद निर्माण करून भारताने संरक्षण उत्पादन खरेदी प्रक्रियेत समन्वय साधला आहे. त्यामुळे आता नवीन संरक्षण शस्त्र सामुग्रीची निर्मिती शक्य झाली आहे.

जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी महत्त्वाची :
  • महान अष्टपैलू कपिलदेव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचा अद्याप विचारही केला नसून सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचविण्याचे एकमेव ध्येय माझ्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केली.

  • मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. इशांतच्या कारकीर्दीतील हा १००वा कसोटी सामना असणार आहे.

  • कपिल यांच्यानंतर १०० कसोटी खेळणारा इशांत हा भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्याशिवाय कपिल यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचीही संधी इशांतला आहे. याविषयी इशांत म्हणाला, ‘‘कपिल यांच्या विक्रमाविषयी मी अद्याप विचारही केलेला नाही. भारतासाठी १००वी कसोटी खेळण्याची संधी मिळणे, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सध्या मी ३२ वर्षांचा असून एकाच प्रकारात भारतासाठी खेळत असल्याने तंदुरुस्ती टिकवण्याबरोबरच जोपर्यंत स्वत:चे १०० टक्के योगदान देऊ शकेन, तोपर्यंत निवृत्तीचाही विचार करणार नाही.’’

  • ‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वपूर्ण असल्याने मी सध्या भारताला कशाप्रकारे जिंकवता येईल, याचाच विचार करत आहे. कारकीर्दीत मी एकदाही विश्वचषक खेळलो नाही. त्यामुळे आम्ही जर जागतिक स्पर्धा जिंकली, तर अन्य खेळाडू ज्याप्रमाणे विश्वचषक विजयाचा जल्लोष करतात त्याचप्रमाणे मीसुद्धा या जेतेपदाचा आनंद साजरा करेन,’’ असेही इशांतने सांगितले.

देशात करोनाची दुसरी लाट?; आठवडाभरात देशात ३१ टक्के, तर महाराष्ट्रात ८१ टक्के रुग्णवाढ :
  • भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये करोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील करोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटी १० लाखांच्या वर गेलाय. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • दिवसोंदिवस करोनाबाधितांची आकडेवारी वाढत असून त्यामुळे करोनाची दुसरी लाट अली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरु असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधित रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झालीय.

  • रविवारी करोनामुळे देशभरामध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या एक लाख ५६ हजार ३८५ वर गेली आहे. करोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ९७.२२ पर्यंत गेलीय. म्हणजेच करोनावर आतापर्यंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१० जणांनी मात केलीय. असं असलं तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे. मागील पाच आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच सात दिवसांचा विचार केल्यास देशातील करोनाबाधितांच्या संख्येत एक लाख रुग्णांची भर पडली आहे.

  • फेब्रुवारी २१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारतामध्ये करोनाचे एक लाख ९९० हजार रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या ७७ हजार २८४ इतकी होती. म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये देशातील करोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

२३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.