प्रौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा महत्वूपर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिला आहे.
लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्या. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे. पल्लबी सरकार (वय १९) ही तरुणी १५ सप्टेंबर २०२० पासून बेपत्ता असल्याची याचिका तिच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केली होती. दरम्यान, ७ डिसेंबर २०२० रोजी मुर्तिया पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पल्लबीने असमौल शेख नामक मुस्लिम तरुणाशी विवाह केला असून तिने इस्लाम धर्मही स्विकारला आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधीत तरुणीचा जबाबही नोंदवला असून यामध्ये तिने आपल्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी कुठलीही सक्ती केली नसल्याचं तिनं म्हटलं असून वडिलांच्या घरी परतण्याची इच्छा नसल्याचंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
भारत-अमेरिकेतील सामरिक भागीदारी पुढे नेत भारताला जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिजन ऑफ द मेरिट पुरस्कार जाहीर केला होता, हा पुरस्कार मोदी यांच्या वतीने भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी स्वीकारला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-अमेरिका भागीदारीत मोठी प्रगती करण्यात हातभार लावल्याने मोदी यांना हा पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार कुठल्याही सरकारच्या प्रमुखालाच वैशिष्टय़पूर्ण कामगिरीसाठी दिला जातो. ओब्रायन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक शक्ती म्हणून उदयास आणले तसेच भारत व अमेरिका या दोन्ही देशातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यातील भागीदारी पुढे नेली.
ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अबे यांनाही हा पुरस्कार जाहीर केला होता, तो त्या देशांच्या राजदूतांनी स्वीकारला. जपानचे माजी पंतप्रधान अॅबे यांना मुक्त हिंद-प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेतील प्रगतीसाठी हा पुरस्कार जाहीर केला होता. सामूहिक सुरक्षेची आव्हाने पेलल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे. या नवीन कायद्यानुसार टेक्सास राज्यातील एका पोस्ट ऑफिसला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव देण्यात आलं आहे. एका वर्षापूर्वी ह्यूस्टन शहरामध्ये आपले कर्तव्य बजावत असतानाच धालीवाल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले धालीवाल हे उपचारादरम्यान मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ टेक्सासमधील पोस्ट ऑफिसचे नाव बदलण्यात आलं आहे.
व्हाइट हाऊसच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्य माहितीनुसार टेक्सासमधील ह्यूस्टन येथील ३१५ एडिक्स होवेल रोडवरील पोस्ट ऑफिसचे नाव डेप्युटी संदीप सिंह धालीवाल पोस्ट ऑफिस बिल्डिंग असं करण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत कोणत्याही भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव पोस्ट ऑफिसला देण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी २००६ मध्ये दक्षिण कॅलिफॉर्नियामधील पहिले भारतीय वंशाचे खासदार दलिप सिंह सौंद यांच्या सन्मानार्थ तेथील स्थानिक पोस्ट ऑफिसचे नामकरण करण्यात आलं होतं.
टेक्सासचे खासदार टेड क्रूज यांनी सीनेटमध्ये यासंदर्भात बोलताना धालीवाल हे एक हिरो होते आणि त्यांनी आपल्या कृतीतून चांगला आदर्श निर्माण केला. त्यांच्या कामामुळे शीख समुदायाला आणि अल्पसंख्यांकाच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास टेड यांनी व्यक्त केला. २७ सप्टेंबर २०१९ रोजी ड्यूटीवर असतानाच धालीवाल यांची हत्या करण्यात आली होती. धालीवाल यांनी १० वर्ष अमेरिकन पोलीस दलात सेवा केली.
राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. निकालची प्रिंटआऊट घेता येईल. उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
ग्रँडमास्टर निहाल सरिन, ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्यासह महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी या भारताच्या तीन बुद्धिबळपटूंनी फिडे ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या गटाची अंतिम फेरी गाठली आहे.
१८ वर्षांखालील खुल्या गटात निहालने फ्रान्सेस्को सोनिस याच्यावर वर्चस्व गाजवत १.५-०.५ असा विजय साकारला. निहालने पहिला डाव बरोबरीत सोडवल्यानंतर पुढील दोन्ही डाव जिंकत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता सुवर्णपदकासाठी त्याला अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान याच्याशी लढत द्यावी लागेल.
गुकेश आणि रक्षिता यांनी अनुक्रमे मुलांच्या १४ वर्षांखालील आणि मुलींच्या १६ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुकेशने फिडेमास्टर डेनिस लॅझविक याच्यावर २-१ अशा फरकाने तर रक्षिताने महिला ग्रँडमास्टर लेया गरीफुलिना हिच्यावर १.५-०.५ अशी मात केली.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.