चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ एप्रिल २०२२

Date : 23 April, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बुद्धिबळपटू गुकेशची क्रमवारीत विक्रमी झेप :
  • भारताचा १५ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने मेनोर्का खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जॉर्जियाच्या निनो बात्सिएश्विलीला पराभूत केले. या निकालानंतर गुकेशचे एलो २६५१.४ गुण झाले असून जागतिक क्रमवारीत त्याने अव्वल १०० बुद्धिबळपटूंमध्ये झेप घेतली आहे. ही कामगिरी करणारा तो सर्वात युवा भारतीय ठरला आहे.

  • जागतिक क्रमवारीत अव्वल १०० बुद्धिबळपटूंमध्ये प्रवेश मिळवणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरताना गुकेशने पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा विक्रम मोडीत काढला. आनंदने सप्टेंबर १९८७ मध्ये ही कामगिरी केली होती आणि त्या वेळी तो १७ वर्षांचा होता. जागतिक क्रमवारीत अव्वल १०० बुद्धिबळपटूंमध्ये सध्या गुकेश आणि आनंदसह एकूण सात भारतीयांचा समावेश आहे.

  • गुकेशने काही दिवसांपूर्वीच स्पेन येथे झालेल्या ४८व्या ला रोडा आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. त्यानंतर त्याने मेनोर्का स्पर्धेतही आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. तीन फेऱ्यांअंती तो अन्य दहा खेळाडूंसह संयुक्तरीत्या अग्रस्थानावर आहे.

महाराष्ट्र दिनी कोकण रेल्वेच्या दहा गाडय़ा विजेवर धावणार :
  • कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने महाराष्ट्र दिनाचे (१ मे) औचित्य साधून पहिल्या टप्प्यात दहा गाडया विजेवर चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्स्प्रेस इत्यादी प्रमुख गाडय़ांचा यामध्ये समावेश आहे. 

  •  रोहा ते ठोकूर या सुमारे ७०० किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वेचा मार्गावर विद्युतीकरणाचे काम २०१५ मध्ये हाती घेण्यात आले. सहा टप्प्यातील योजनेसाठी सुमारे १ हजार १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. रोहा ते रत्नागिरी, रत्नागिरी ते थिविम, थिविम ते वेरणा, वेरणा ते कारवार, कारवार ते बिजूर, बिजूर ते ठोकूर या सहा टप्प्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या मार्च महिन्यात या कामाची तपासणी केली. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर प्रथम मालगाडय़ा आणि नंतर प्रवासी गाडय़ा या मार्गावर सोडण्यात आल्या. त्याही चाचण्या यशस्वी झाल्यामुळे आता या मार्गावर दहा प्रमुख गाडय़ा नियमितपणे विजेवर धावू लागणार आहेत.

  • यापूर्वी विद्युतीकरण नसल्यामुळे एखाद्या पट्टयात लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावताना समस्या येत होती. मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत विद्युतीकरण असल्याने विजेवरील लोको मेल, एक्स्प्रेस गाडयांना जोडल्या जात होत्या. त्यापुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेलवरील लोको जोडून मेल, एक्स्प्रेस चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही समस्या आता दूर झाली आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते रत्नागिरीचे काम पूर्ण झाले होते. या मार्गावर प्रथम विजेचे इंजिन लावून गाडी चालवण्यात आली. त्यात कोणत्याही अडचणी आल्या नव्हत्या. त्यानंतर पुढील टप्प्यात रत्नागिरी ते मडगावचे काम पूर्ण करण्यात आले.    

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारीख जाहीर; जाणून घ्या अर्जासंदर्भातील महत्वाच्या तारखा :
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ३० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल, तर २ मेपर्यंत शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

  • राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. मात्र करोना प्रादुर्भाव आणि टीईटी गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या पोलिस तपासामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा २० जुलैला राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी पाचवी आणि आठवीची परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हेगारांचे ब्रिटनमध्ये स्वागत नाही!; कारवाईसाठी भारतात पाठविणार - बोरिस जॉन्सन :
  • भारतात आर्थिक गुन्हे केल्यानंतर येथील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ब्रिटनमध्ये आश्रय घेऊ पाहणाऱ्यांचे ब्रिटनमध्ये स्वागत केले जाणार नाही, अशी ग्वाही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी येथे बोलताना दिली. भारतातील मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले की, आम्ही हा मुद्दा खासगी आणि मैत्रिपूर्णरित्या मांडत असतो. पण भारत हा मोठा लोकशाही देश असून तेथील समाजघटकांना घटनात्मक संरक्षण आहे, असेही त्यांनी आवर्जुन नमुद केले.

  • भारतातून फरार झालेले नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, काही कायदेशीर मुद्दय़ांमुळे  हे कठीण बनले असले तरी ब्रिटिश सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणसाठी आदेश दिले आहेत. त्यांच्यावर भारतात कायदेशीर कारवाई होण्यासाठी त्यांना परत पाठविले पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. भारतातील प्रज्ञावंत, हुशार व्यक्तींचे आम्ही ब्रिटनमध्ये स्वागतच करतो, पण आम्ही हे स्पष्टपणे सांगत आहोत की, भारतातील कायद्याला चकवा देऊ पाहणाऱ्यांचे ब्रिटनमध्ये स्वागत केले जाणार नाही.

  • भारताचे परराष्ट्रसचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की, आर्थिक गुन्हेगारांना भारतात परत आणण्यासाठी आम्ही ब्रिटिश सरकारकडे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासंदर्भात ब्रिटिश सरकार संवेदनशीतेने काम करीत असल्याचे पंतप्रधान जॉन्सन यांनी आम्हास सांगितले आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला ‘खास दोस्त’ असे संबोधित करून यंदाच्या दिवाळीपर्यंत ब्रिटन आणि भारतात मुक्त व्यापार करार होईल, असा विश्वास व्यक्त केला. पुढील सप्ताहात उभय देशांत या संदर्भातील चर्चेची पुढील फेरी होणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत याला अंतिम स्वरूप देण्याची सूचना  वाटाघाटी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही दिल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

आशियाई कुस्ती स्पर्धा - अंशू, राधिकाला रौप्यपदके:
  • अंशू मलिकला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटात शुक्रवारी रौप्यपदक मिळाले. याचप्रमाणे राधिकाला (६५ किलो) रौप्य आणि मनीषाला (६२ किलो) कांस्यपदक मिळाले. २० वर्षीय अंशूला अंतिम फेरीत जपानच्या त्सुगुमी साकुराईने चीतपट केले.

  • त्याआधी, वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर तिने तिन्ही लढती जिंकल्या. उझबेकिस्तानच्या शोखिदा अखमेडोव्हा आणि सिंगपूरच्या डॅनिले सू चिंग लिम यांना पहिल्या दोन लढतींत नामोहरम केले. मग उपांत्य लढतीत मंगोलियाच्या बोलोटुया खुरेलखूचा पराभव केला.

  • राधिकाने कझाकस्तानच्या डारिगा अ‍ॅबेनविरुद्धच्या अंतिम लढतीत पराभव पत्करला, तर मनीषाचा कोरियाच्या हॅनबिट लीविरुद्धच्या लढतीत पराभव झाला. दरम्यान, ५३ किलो गटात स्वाती शिंदेने दोन्ही लढती गमावल्यामुळे पदकाच्या शर्यतीतून ती बाहेर पडली आहे.

देश छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यात!; ९५व्या साहित्य संमेलनाचे उदगीर येथे उद्घाटन :
  • काळ मोठा कठीण आला आहे. आपण आत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये प्रवेश केला आहे. आता पुढच्या टप्प्यात हळूहळू आपण छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यात जातोय. हे विध्वंसक आपल्या पुढील पिढीच्या हातात भिकेचा कटोरा देतील, अशा परखड शब्दात ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कांदबरीकार भारत सासणे यांनी विभाजनवादी नवसंस्कृतीवर कडाडून प्रहार केला.

  • उदगीर येथे आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी सासणे बोलत होते. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन टप्प्यांत सासणे यांनी आपली अध्यक्षीय भूमिका मांडली. ते म्हणाले, लोकांना थाळी वाजवताना बघून लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला. समाजात विभाजनवादी निर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजन वाढवणारा खेळ मांडला जात आहे. कला विभाजित झाली आहे. सर्वत्र उपद्रव आणि उन्मादाचा उच्छाद सुरू आहे.

  • विदूषकाच्या हातात अधिकार केंद्रित होत आहेत. सर्वत्र तडे बसवणारी शांतता आहे, कोणीच बोलत नाही, सर्वत्र चतुर मौन पसरले आहे. या मौनात स्वार्थ आहे, तुच्छता आहे, हिशेब आणि व्यवहारदेखील आहे. याच बरोबरीने सामान्य जनतेच्या दु:खाला चिरडणे आहे, भीती, दहशत, प्रलोभने आणि विनाशदेखील आहे, याकडे सासणे यांनी प्रकर्षांने लक्ष वेधले.

  • या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ विजेते कोकणी कथाकार दामोदर मावजो, यांच्यासह देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, उच्चशिक्षणमंत्री अमित देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, पर्यटन व सार्वजनिक बांधकाममंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर उपस्थित होते.

 

 

 

 

 

२३ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.