चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ एप्रिल २०२१

Date : 23 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय योजना सादर करा :
  • देशातील गंभीर करोनास्थितीची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्राणवायू आणि अन्य आवश्यक औषधांबाबत ‘राष्ट्रीय योजना’ सादर करण्याची सूचना गुरुवारी केंद्र सरकारला केली. या प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होईल.

  • सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. एल. एन. राव आणि न्या. एस.आर. भट यांच्या खंडपीठाने करोनामुळे उद्भवलेल्या गंभीर स्थितीची दखल घेत केंद्राला नोटीस बजावली. प्राणवायू, आवश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि प्रकार या मुद्द्यांबाबत आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

  • टाळेबंदी लागू करण्याचा  अधिकार आम्ही राज्यांकडेच ठेवू इच्छितो. न्यायपालिकेच्या निर्णयाद्वारे टाळेबंदी होऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

  • देशातील किमान सहा उच्च न्यायालये करोनाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी घेत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कोलकाता आणि अलाहाबाद ही किमान ६ उच्च न्यायालये करोनाशी संबंधित मुद्दे हाताळत आहेत. ती प्रामाणिकपणे त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करत आहेत. तथापि, यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होत आहे. एखाद्या गटाला प्राधान्य द्यावे असे एका उच्च न्यायालयाला वाटते; तर प्राधान्य दुसऱ्यांसाठी असल्याचे दुसऱ्या न्यायालयाचे मत असते, असे खंडपीठाने नमूद केले.

१८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी २८ एप्रिलपासून :
  • १८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी को-विन संकेतस्थळ व आरोग्य सेतू अ‍ॅपवर २८ एप्रिलपासून सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

  • लसीकरणाची प्रक्रिया आणि लस घेण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे या बाबी यापूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.

  • लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण संपूर्ण देशभरात १ मेपासून सुरू होणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केले होते.

  • ‘१८ वर्षांहून अधिक वयाच्या लाभार्थ्यांसाठी कोविन पोर्टल २४ एप्रिलपर्यंत अद्ययावत करण्यात येईल. १ मेपासून वेळ निश्चित करण्यासाठी या लाभार्थ्यांची नोंदणी २८ एप्रिल रोजी सुरू होईल’, असे ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले.

  • १ मेपासून, खासगी लसीकरण केंद्रांना सरकारकडून लशीच्या मात्रा मिळण्याची आणि त्यांनी त्यासाठी प्रत्येक मात्रेला २५० रुपये आकारण्याची सध्याची पद्धत बंद होईल आणि खासगी रुग्णालये या मात्रा थेट लस उत्पादकांकडून मिळवतील.

भारतीय महिलांचे ‘सुवर्णसप्तक’ :
  • जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी ‘सुवर्णसप्तक’ साकारले. पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी भारताकडून गितिका, अरुंधती चौधरी, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, सानामचा चानू, विन्का आणि अल्फिया पठाण या सात जणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले.

  • महिलांच्या ४८ किलो वजनी गटात गितिकाने पोलंडच्या नतालिया कुझेव्हस्कावर ५-० असा विजय मिळवला. आशियाई विजेत्या बेबीरोजिस्नाने रशियाच्या व्हॅलेरिया लिंकोव्हाला ५-० अशी धूळ चारून ५१ किलो वजनी गटाचे जेतेपद मिळवले. सानामचाने (७५) किलो) कझाकस्तानच्या दाना दिदायवर ५-० असे वर्चस्व गाजवले.

  • अरुंधतीने (६९ किलो) पोलंडच्या बार्बोरा मार्किनकोव्हस्काला ५-० असे नमवले. पूनमने फ्रान्सच्या स्टेलीन ग्रोसीवर ५-० अशी मात करून ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तर विन्काने (६० किलो) अंतिम फेरीच्या सुरुवातीलाच कझाकस्तानच्या हुल्डी शायाकमेटोव्हावर जोरदार प्रहार करून तिला सामन्यातून माघार घेण्यास भाग पाडले. अल्फियाने (८१+) मोल्डोव्हाच्या दारिया कोझोरेझला ५-० असे नामोहरम केले.

  • सात सुवर्णांसह भारताने २०१७च्या हंगामातील कामगिरीला मागे टाकले. त्यावेळी भारतीय महिलांनी तीन सुवर्णपदक मिळवले होते. शुक्रवारी पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात भारताचा सचिन सुवर्णपदकासाठी झुंजताना दिसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर  :
  • नवी दिल्ली : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. या दुर्घटनेप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.  (PM Narendra Modi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to the hospital fire in Virar, Maharashtra)

  • यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयामार्फत ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णलयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची तर जखमींच्या नातेवाईकांना  ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. 

  • आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत

भारताला लस पुरवठा करु पण…; अमेरिकेच्या ‘फायजर’ कंपनीने घातली अट :
  • भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी भारतामध्ये २४ तासांमध्ये तीन लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात निर्माण होणाऱ्या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम मागील तीन महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. असं असतानाही सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

  • अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यासंदर्भात त्यांनी एक महत्वाची अट घातली आहे.

  • रशियन बनावटीच्या स्फुटनिक लसीच्या निर्मितीला परवानगी दिल्यानंतर आता भारताची नजर अमेरिकितील फायजर कंपनीच्या लसीकडे लागली आहे. त्यातच आज फायजरने भारतामध्ये लस देण्यासंदर्भात भाष्य करत लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यावेळी त्यांनी भारतात देण्यात येणाऱ्या लसी या केवळ सरकारी पुरवठा साखळीच्या माध्यमातून दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच बायोटेकच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या अमेरिकेतील फायजर ही लस भारतामध्ये केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “करोना बाधितांची वाढती संख्या पाहून फायजर आपल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राधान्याने सरकारी यंत्रणेला लस पुरवठा करणार आहे. केवळ सरकारी कंत्राटाद्वारेच कंपनी भारतामध्ये करोना लसींचा पुरवठा करणार आहे.”

२३ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.