प्रात्याक्षिक परीक्षेचं स्वरूप
४८ उमेदवार झाले उत्तीर्ण!
कॅनडातील व्हिसा सेवा बंद
नेमकं प्रकरण काय
भारताच्या कॅनडातील भारतीयांना मार्गदर्शक सूचना
तरतूद काय?
थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये राज्य गुप्तचर विभागामध्ये सांगली कार्यालयामध्ये उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या. याशिवाय त्या स्पर्धेतील उत्कृष्ट व्यक्तिमत्व गटामध्येही उपविजेत्या ठरल्या.थायलंड मधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती .
१६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. झालेल्या स्पर्धेत सांगली सीआयडी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सौ. आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या ग्लॅमन मिसेस इंडिया ठरल्या. मुल्ला यांनी या स्पर्धेसाठी पुणे येथे चाचणी दिली होती. फिल्मफेअर मिडल इस्ट च्या ग्लॅमन या कंपनी तर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आपत्कालीन पंतप्रधान नागरिक मदत निधीच्या (पीएम केअर्स फंड) विश्वस्तपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवनियुक्त विश्वस्त मंडळासह बैठक घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी या निधीत भरघोस मदत दिल्याबद्दल देशवासीयांना धन्यवाद दिले. पंतप्रधान कार्यालयातर्फे बुधवारी प्रसृत केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.
या बैठकीत भारताचे माजी नियंत्रक व महालेखापाल राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि इंडी कॉर्प आणि पिरामल फाउंडेशनचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद शहा यांना ‘पीएम केअर्स फंड’च्या सल्लागार मंडळात नियुक्त करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन हेही उपस्थित होते.
बैठकीत करोनामुळे आपले आई-वडील गमावलेल्या चार हजार ३४५ मुलांना मदत करण्यासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ या उपक्रमासह ‘पीएम केअर’द्वारे घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल सादरीकरण करण्यात आले. कोविड काळात या ‘पीएम केअर’ने बजावलेल्या भूमिकेचे विश्वस्तांनी गौरवोद्गार काढले. पंतप्रधानांनी ‘पीएम केअर’मध्ये दिलेल्या उदार योगदानाबद्दल देशवासीयांची प्रशंसा केली. या वेळी झालेल्या चर्चेत ‘पीएम केअर’ची आपत्कालीन, संकट परिस्थितीत साहाय्याचीच नव्हे तर आणीबाणी, संकटाला प्रभावीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. नवीन विश्वस्त व सल्लागारांच्या सहभागामुळे ‘पीएम केअर’ निधीच्या कामकाजास सर्वसमावेशक दृष्टिकोन लाभेल. या मान्यवरांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ सार्वजनिक गरजा भागवताना निश्चित होईल. त्यामुळे उत्तरदायित्व वाढेल व संकट निर्मूलनासाठी प्रभावी प्रतिसाद देता येईल.
प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी दहा वाजून २० मिनिटांनी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. चित्रपटक्षेत्रात कारकीर्द सुरू केल्यानंतर एकपात्री विनोदी कलाकार (स्टँडअप कॉमेडियन) म्हणून तसेच नकलाकार (मिमिक्री आर्टिस्ट) म्हणून त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. अलीकडे ते राजकारणात सक्रिय झाले होते. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) गेले ४० दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष होते. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
श्रीवास्तव यांनी २०१४ मध्ये समाजवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना त्यांना १० ऑगस्टला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने ‘एम्स’ रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र ते शुद्धीवर आले नव्हते. श्रीवास्तव यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेनेही त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळले.
चित्रपट निर्माते राकेश रोशन, हृतिक रोशन, अजय देवगण, शेखर सुमन, अभिनेत्री निम्रत कौर आणि दिग्दर्शक संजय गुप्ता आदींनी श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असलेल्या राजू श्रीवास्तव यांनी २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात भाग घेतला. यात त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’ (नवीन), मैं प्रेम की दिवानी हूं आणि ‘आमदानी अठन्नी खर्चा रुपय्या’ आदी चित्रपटांत काम केले. ‘बिग बॉस’ तिसऱ्या पर्वातही ते सहभागी झाले होते.
एका बाजूला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामना सुरु असताना तिकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध सामना झाला. ऑस्ट्रेलिया प्रमाणेच तिकडेही इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी ८५ धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान, पाकिस्तानचा यष्टीरक्षक सलामीवीर मोहम्मद रिझवानने एक मैलाचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा पार करताना त्याने भारतीचा रन मशिन विराट कोहलीला मागे टाकले. याआधी त्याचा साथीदार कर्णधार बाबर आझमने देखील विराटला मागे टाकले होते.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आपल्या टी२० मधील २००० धावा पूर्ण केल्या. रिझवानने फक्त टी२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमच केला नाही, तर टी२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २००० धावा करणाऱ्यांच्या यादीत आता तो बाबर आझमसोबत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने ५२ डावात ही कामगिरी केली. बाबर आझमने देखील ५२ डावात २००० धावा पूर्ण केल्या होत्या.
याच यादीत भारताचा विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५६ टी२० डावात २००० धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर भारताचाच केएल राहुल आहे. त्याने ५८ डावात टी२० मध्ये २००० धावांचा टप्पा पार केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचने २००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी ६२ डाव घेतले होते.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना कालच्या सामन्यात ७ बाद १५८ धावा केल्या. रिझवान व बाबर आजम यांनी पहिल्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली. पण, १०व्या षटकात बाबर (३१) बाद झाला अन् पाकिस्तानचा डाव गडगडला. शेवटच्या ११.३ षटकांत पाकिस्तानने ७ फलंदाज ७५ धावांवर गमावल्याने इंग्लंडसमोर माफक लक्ष्य उभे राहिले. रिझवानने ४६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६८ धावा केल्या. इफ्तिकार अहमद २८ धावांवर बाद झाला. अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. वूडने २४ धावांत ३, तर राशिदने २७ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात फिल सॉल्ट (१०), डेविड मलान (२०) व बेन डकेट (२१) हे माघारी परतल्यानंतर सलामीवर ॲलेक्स हेल्स व हॅरी ब्रूक यांनी दमदार खेळ केला. हेल्सने ४० चेंडूंत ७ चौकारांसह ५३ धावा केल्या. ब्रूकने २५ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. इंग्लंडने १९.२ षटकांत ४ बाद १६० धावा करून विजय मिळवला.
दस्त नोंदणी करताना आकारण्यात येणारे दस्त हाताळणी शुल्क केवळ ‘एसबीआय ई-पे’ या प्रणालीद्वारे भरता येत होते. आता एसबीआयसोबतच सर्व प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे हे शुल्क भरता येणार आहे. ही सुविधा राज्यभरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली.
दस्त नोंदणी करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागायचे. अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ खरेदीदारावर येत होती. दस्तनोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रतिपान २० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे दस्तांची पाने जितकी जास्त तितके शुल्क नागरिकांना भरावे लागते. मात्र, अनेक कार्यालयात प्रतिपान शंभर रुपये शुल्क आकारून नागरिकांची लुबाडणूक होते.
या पार्श्वभूमीवर हाताळणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा सन २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात या सुविधेची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, ही सुविधा केवळ एसबीआयच्या ऑनलाइन प्रणालीपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्क भरण्यासाठी आता सर्व प्रकारची डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याची सुविधा सुरू केली आहे. याबाबत बोलताना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘वस्तू व सेवा करानंतर (जीएसटी) राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे.
करोनानंतर राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे करोनापूर्व काळाप्रमाणे सध्या राज्यात दररोज साडेनऊ ते दहा हजार दस्त नोंद होतात. मात्र, दस्त हाताळणी शुल्क भरण्याची सुविधा केवळ एसबीआयच्या प्रणालीद्वारेच भरता येत होती. सर्वच नागरिकांकडे एसबीआयची ही सुविधा असणे शक्य नसल्याने नागरिकांना त्रास होत होता. मात्र, आता सर्व प्रकारच्या डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दस्त हाताळणी शुल्क भरण्यासाठी केवळ एसबीआय गेटवेचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होता. मात्र, आता सर्व प्रकारच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार आहे. ही सुविधा सुरू करण्यात आली असून विभागाच्या वतीने जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन देण्याचा प्रयत्न आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.