चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ सप्टेंबर २०२१

Date : 22 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एअर मार्शल व्हीआर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख; राफेल विमानांच्या खरेदीत बजावली होती महत्त्वाची भूमिका :
  • एअर मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील. व्ही आर चौधरी या महिन्याच्या अखेरीस पदभार स्वीकारतील.भारतीय हवाई दलाचे ते आता उपप्रमुख आहेत. सध्याचे हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर चौधरी त्यांची जागा घेतील. हवाई दलाचे उपप्रमुख चौधरी यांनी राफेल विमानांच्या खरेदी संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रान्समधील लढाऊ राफेल विमान प्रकल्पाच्या खरेदी प्रकल्पात लक्ष ठेवणाऱ्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते.

  • चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) विद्यार्थी आहेत. ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातून पदवीधर देखील आहेत. एअर मार्शल हरजितसिंग अरोरा यांच्यानंतर १ जुलै २०२१ रोजी ते हवाई दलाचे ४५ वे उपप्रमुख झाले. ३० सप्टेंबर २०२१ रोजी एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते हवाई दलाचे २७ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांनी यापूर्वी वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एओसी-इन-सी) म्हणूनही काम केले आहे.

  • विवेक राम चौधरी यांनी विविध प्रकारची लढाऊ विमाने हाताळण्यात प्राविण्य मिळवले आहे. ते हवाई दलाच्या काही महत्त्वाच्या मोहिमांचा भाग राहिले आहेत. ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन सफेद सागरमध्ये देखील सहभागी होते.

जागतिक आरोग्य संघटनेने मानले भारताच्या आरोग्यमंत्र्यांचे आभार :
  • जगभरात पसरलेल्या करोना विषाणूविरुद्ध सर्वच देशांनी कंबर कसली आहे. सर्वच देशांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. तर लस निर्यातीतला भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. भारताने लसनिर्मिती आणि निर्यातीमध्ये केलेल्या प्रगतीबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक करत देशाच्या आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

  • जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांचे आभार. ऑक्टोबरमध्ये भारत कोव्हॅक्सला महत्त्वपूर्ण कोविड लस शिपमेंट पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केल्याबद्दल त्यांचे आभार. वर्षाच्या अखेरीस सर्व देशांमध्ये ४०% लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याच्या लक्ष्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

  • गेल्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले होते. करोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे त्यांनी कौतुक केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले होते की, “डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने करोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष करोना डोसपासून ७५० दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.”

हँडबॉलच्या प्रसारासाठी ब्ल्यूस्पोर्टची २४० कोटींची गुंतवणूक :
  • प्रीमियर हँडबॉल लीगचे (पीएचएल) पुढील वर्षी मार्चमध्ये आयोजन करण्यात येणार असून, देशात हँडबॉल या क्रीडा प्रकाराचा प्रसार करण्याच्या हेतूने ब्ल्यूस्पोर्ट एन्टरटेन्मेन्ट कंपनीने २४० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्रीमियर हँडबॉल लीगचे अधिकृत परवानाधारक असलेल्या ब्ल्यूस्पोर्टने आपल्या हिश्शाची निर्गुंतवणूक केली असून उद्योजक विवेक लोढा आणि अभिनव बंथिया यांना धोरणात्मक गुंतवणूकदार म्हणून समाविष्ट करून घेतले आहे. भारतामध्ये पुढील पाच वर्षांत हँडबॉलचा वेगाने प्रसार व्हावा यासाठी या गुंतवणुकीचा वापर केला जाणार आहे. ब्ल्यूस्पोर्टने याआधीच प्रीमियर हँडबॉल लीगच्या आयोजनाचे हक्क मिळवले आहेत.

  • पुरुष आणि महिला गटासाठी प्रत्येकी १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करतानाच तळागाळात हँडबॉल खेळला जावा यासाठी ३५ कोटी रुपये खर्ची केले जाणार आहेत. कनिष्ठ आणि उप-कनिष्ठ गटातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा, तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

  • ‘‘हँडबॉल हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे. तसेच भारतात युवकांची मोठी संख्या असल्याने हँडबॉलची देशातील लोकप्रियता वाढत आहे,’’ असे ब्ल्यूस्पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मनू अग्रवाल यांनी सांगितले. हँडबॉल हा खेळ जगभरातील १९० देशांत खेळला जातो. भारतामध्ये सध्याच्या घडीला ८५ हजारांहून अधिक नोंदणीकृत हँडबॉलपटू आहेत.

विराट कोहलीला होती ‘गंभीर’ दुखापत, ‘या’ पुस्तकातून झाला खुलासा :
  • भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या कारकीर्दीत एक असा टप्पा होता, जेव्हा त्याला पाठदुखीचा भयंकर त्रास होत होता. पण भारताचे माजी फिटनेस प्रशिक्षक बासू शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो यातून बरा झाला. शंकर यांच्या ‘१००, २०० प्रॅक्टिकल अॅप्लिकेशन्स इन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग’ या पुस्तकाच्या अग्रलेखात, बासू यांनी वजन उचलण्यास कसे प्रेरित केले, ज्यामुळे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्यास मदत झाली, याबाबत विराटने खुलासा केला आहे.

  • विराटने लिहिले, ‘२०१४च्या शेवटच्या महिन्यांत मला पाठदुखीचा त्रास होत होता आणि ही दुखापत बरी होत नव्हती. दररोज सकाळी माझी पाठ मोकळी करण्यासाठी मला ४५ मिनिटे व्यायाम करावा लागला, पण दिवसा काही वेळा मला पाठ दुखायची. या नंतर बासू सर आणि मी वजन उचलण्याविषयी आणि माझ्या शरीराची पूर्ण शक्ती परत मिळवण्याबद्दल बोललो.”

  • २०१५ ते २०१९ या कालावधीत भारतीय संघासोबत काम करणाऱ्या शंकर यांनी कोहली आणि भारतीय संघाच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. विराट म्हणाला, ”आधी मला याबद्दल खात्री नव्हती (वजन उचलणे) पण बासू सरांनी मला फक्त विश्वास ठेव ही एकच गोष्ट सांगितली. मला त्याच्या ज्ञानावर आणि अनुभवावर पूर्ण विश्वास होता.”

अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता :
  • नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रायगडकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या वर्षीपासूनच या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. गेली नऊ वर्षे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लाल फितीत अडकला होता.

  • राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने ३१ जानेवारी २०१२ मध्ये केंद्र सरकारच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे १०० विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या संलग्न रुग्णालयाला सुरू करण्यास मान्यता दिली होती. तत्कालीन वित्त व नियोजनमंत्री सुनील तटकरे यांनी प्रयत्न करून हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले होते. मात्र नंतरच्या काळात जागेअभावी तसेच राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव लाल फितीत अडकला होता.

  • त्या वेळी अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा देण्यास काही राजकीय पक्षांनी विरोध केला होता. तसा ठरावही घेण्यात आले होते. ज्या जागा पाहण्यात आल्या  त्या महाविद्यालयासाठी योग्य नसल्याचे अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रस्तावाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळू शकली नव्हती. नंतरच्या काळात सुनील तटकरे यांना राजीनामा द्यावा लागला. राज्यातील आघाडी सरकारही गेले. त्यामुळे हा प्रस्ताव अडगळीत जाऊन पडला होता.

२२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.