चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ मार्च २०२१

Date : 22 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ममतांना पराभव दिसू लागला - मोदी :
  • निवडणुकीत पराभव होणार याचा अंदाज आल्यामुळेच, दहा वर्षांपूर्वी सत्ता मिळवून देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) आधीच शंका घेणे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सुरू केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.

  • राज्याच्या विकासासाठी आणि युवकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ‘असोल परिवर्तन’ (खरे परिवर्तन) बंगालमध्ये येत आहे. आता भ्रष्टाचाराचा खेळ चालणार नाही (खेला होबे ना) असेही मोदी म्हणाले.

  • ‘आपला पराभव होणार अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे दीदींनी ईव्हीएमवर आधीच शंका घेणे सुरू केले आहे. प्रत्यक्षात याच ईव्हीएममुळे १० वर्षांपूर्वी त्या सत्तेवर आल्या होत्या’, असे मोदी यांनी एका भरगच्च निवडणूक प्रचार सभेत सांगितले.

  • ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते अशी भीती व्यक्त करून, या यंत्रांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन ममता बॅनर्जी पक्ष कार्यकर्त्यांना करत आहेत.

  • ममता बॅनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर लाथ मारत असल्याचे दाखवणाऱ्या तृणमूलच्या पोस्टर्सचा मोदी यांनी उल्लेख केला. ‘देशातील १३० कोटी लोकांच्या सेवेत माझे शिर नेहमीच झुकलेले असते. दीदी माझ्या डोक्यावर पाय ठेवून लाथ मारू शकतात, पण मी त्यांना बंगालच्या लोकांच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही’, असे मोदी म्हणाले.

  • आयुष्मान भारत, पीएम- किसान आणि लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण (डीबीटी) योजनांमध्ये घोटाळे करता आले नाहीत, म्हणून येथील तृणमूल सरकारने राज्यात या योजना राबवल्या नाहीत, असा दावा मोदी यांनी केला. ‘‘भाजप ‘योजनांवर’ (स्कीम्स) चालतो, तर तृणमूल काँग्रेस ‘घोटाळ्यांवर’ (स्कॅम्स) चालतो’’, असा टोला त्यांनी हाणला.

राज्यसेवा परीक्षेत ३० टक्के उमेदवार अनुपस्थित :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेला अनुपस्थित उमेदवारांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत १० ते २० टक्के उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहतात. मात्र रविवारी झालेल्या परीक्षेला ३० ते ३५ टक्के  उमेदवार अनुपस्थित होते.

  • राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी राज्यभरातील केंद्रांवर  झाली. २०१९ ची ही परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव, एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेली अंतरिम स्थगिती अशा कारणांमुळे चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. १४ मार्चला होणारी परीक्षा आयत्यावेळी पुढे ढकलल्याने राज्यभरात उमेदवारांनी आंदोलन केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांत परीक्षा घेण्यात येईल असे उमेदवारांना आश्वस्त केले होते. त्यामुळे एमपीएससीकडून २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार रविवारी राज्यभरात परीक्षा झाली.

  • करोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे आयोगाने परीक्षा केंद्रावर उमेदवारांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती निश्चित केला होती. त्याप्रमाणेच ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी २ लाख ६२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३० ते ३५ टक्के  उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.

  • ५० उमेदवारांची पीपीई किट वापरून परीक्षा - करोना सदृश लक्षणे असलेल्या उमेदवारांना स्वसंरक्षण साहित्य (पीपीई किट) घालून परीक्षा देण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली होती. मात्र या पीपीई किटचा विशेष वापर झाला नाही. राज्यभरात पीपीई किट घालून परीक्षा दिलेले उमेदवार ५० पेक्षा जास्त नसल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली.

 

 

आनंदी देशांमध्ये भारत १३९ व्या क्रमांकावर : 
  • यंदाचा (२०२१)  जागतिक आनंद निर्देशांक अहवाल जाहीर करण्यात आला असून फिनलंडने लागोपाठ चौथ्या वर्षी पहिला क्रमांक मिळवला आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संस्थेने हा अहवाल जाहीर केला असून त्यात १४९ देशांत भारताचा १३९ वा क्रमांक लागला आहे.

  • गेल्यावर्षीच्या तुलनेत  भारताची स्थिती थोडीशी सुधारली आहे. गेल्या वर्षी भारताचा १४० वा क्रमांक होता. पहिल्या दहा देशात नऊ युरोपातील आहेत.

  • फिनलंड खालोखाल डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आइसलँड, नेदरलँडस, नॉर्वे, स्वीडन, लक्झेमबर्ग व ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. एकूण देशांतर्गत उत्पन्न, सामाजिक पाठबळ, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार पातळी या निकषांवर सुखी देशांची ही यादी ठरवली जात असते. यावर्षी  कोविड १९ आव्हानाच्या काळात हा अहवाल कसा तयार करायचा हे आव्हान होते कारण जगातील सर्वच देशांना या विषाणूने जेरीस आणले आहे. अहवालाच्या लेखकांपैकी एक असलेले जेफ्री सॅख यांनी म्हटले आहे, की करोनाच्या साथीने आपल्याला जागतिक पर्यावरणाच्या धोक्यांची जाणीव करून दिली. दी वल्र्ड हॅपिनेस रिपोर्ट २०२१ या अहवालात आपल्याला केवळ  संपत्तीपेक्षा लोकांच्या सुखसमाधानाचा वेध घेतलेला दिसेल. शाश्वत विकासाची आव्हाने आपण स्वीकारली नाहीत तर आपल्याला वाईट अवस्थेस तोंड द्यावे लागू शकते असाच एक संदेश यातून दिला आहे.

  • करोनाची साथ जगात थैमान घालत असताना यावर्षीच्या अहवालात दोन वेगळ्या वर्गवाऱ्या दिसतात, त्यात तीन वर्षातील पाहणीची सरासरी हा एक घटक विचारात घेतला आहे. दुसरा घटक हा कोविडमुळे लोकांच्या जीवनावर काय परिणाम झाला हा आहे.

  • विश्वास हे मोजमाप - या अहवालाच्या लेखकांनी म्हटले आहे, की विश्वास हा कुठल्याही देशाच्या आनंद निर्देशांकात महत्त्वाचे मोजमाप असते. ज्या देशात नागरिकांची तेथील संस्थांवर श्रद्धा व विश्वास होता व ज्या देशात उत्पन्न समानता जास्त होती त्या देशांनी करोना साथीला चांगल्या पद्धतीने तोंड दिले.

अ‍ॅस्ट्राझेनेका लशीचा वादव :
  • लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार झाल्याचे काही प्रकार समोर आल्यानंतर युरोपमधील बऱ्याच देशांनी आता अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड लशीचा वापर तात्पुरता थांबविला आहे. काही देशांमध्ये लशीचा वापर थांबवण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. या लशीबाबत अधिक चिकित्सा सुरू असतानाच करोनाला प्रतिबंधित करण्याचे या लशीचे फायदे हे दुष्परिणामांच्या जोखमीपेक्षा जास्त असल्याचे युरोपच्या नियामक मंडळाने म्हटले आहे.

  • कोणत्या देशांनी लशीचा वापर तात्पुरता थांबवला होता - फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, नॉर्वे, आइसलँड, ऑस्ट्रिया, एस्टोनिया, बल्गेरिया, रोमानिया, एस्टोनिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग आणि लॅटव्हिया या देशांनी अ‍ॅस्ट्राझेनेका लशीचा वापर तात्पुरता थांबवला होता. युरोपियन मेडिसिन एजन्सी (ईएमए)च्या तज्ज्ञांनी लशीच्या वापरास दिलेली तात्पुरती स्थगिती ही ‘सावधगिरीचा उपाय’ असून त्यासंदर्भात आणखी पडताळणी केली जात असल्याचे या देशांनी म्हटले होते.

  • ‘ईएमए’ कोणता तपास  करीत आहे - ऑस्ट्रियातील एका व्यक्तीला अ‍ॅस्ट्राझेनेका लस दिल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार झाल्याचे आढळून आले. या व्यक्तीचा १० दिवसांनी मृत्यू झाल्यानंतर ऑस्ट्रियाच्या औषध नियामक प्राधिकरणाने लशीचा वापर थांबवला. लसीकरणानंतर दुसऱ्या एका व्यक्तीला फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती ‘ईएमए’ने १० मार्च रोजी दिली. एकूणच, युरोपियन आर्थिक क्षेत्रातील ३० लाख जणांना अ‍ॅस्ट्राझेनेका लस देण्यात आली. त्यापैकी २२ जणांना रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याचा त्रास झाल्याचे आढळून आले आहे. युरोपियन महासंघातील १७ देशांमध्ये लशीच्या ‘एबीव्ही ५३००’ संचाचा पुरवठा करण्यात आला असून त्यात १० लाख मात्रांचा समावेश आहे. या टप्प्यावर लशीच्या गुणवत्तेत दोष आढळला नसला तरी संचाच्या गुणवत्तेची तपासणी केली जात आहे, अशी माहिती ‘ईएमए’ने दिली आहे.

  • तपासात प्रगती किती - रक्तपेशींची संख्या कमी असणाऱ्या काही लोकांना लसीकरण केल्यानंतर रक्तात गुठळ्या तयार होण्याचा त्रास झाला. मात्र ही संख्या अतिशय नगण्य असल्याचे ईएमएने १५ मार्च रोजी म्हटले आहे. युरोपीय महासंघात दरवर्षी हजारो लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास होतो. त्या तुलनेत लसीकरणानंतर हा त्रास झालेल्यांची संख्या निश्चितच कमी आहे, असे ‘ईएमए’ने अधोरेखित केले. येत्या काही दिवसांमध्ये रक्त विकारांशी संबंधित तज्ज्ञांकडून रक्ताच्या गुठळ्या होण्याबाबतच्या घटनांशी संबंधित सर्व माहितीचे अतिशय काटेकोरपणे विश्लेषण केले जाईल, असे ‘ईएमए’ने सांगितले.

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार?; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका 
  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देत पक्षाची भूमिका मांडली.

  • “परमबीर सिंह यांनी बदली झाल्यानंतर पत्र लिहिलं आहे. कुठेतरी जाणुनबुजून हा पुरावा तयार करण्यात आला असं दिसत आहे. पत्रात तारखांचा जो उल्लेख आहे त्याबद्दल बोलायचं गेल्यास अनिल देशमुख फेब्रुवारीच्या सुरुवातीला जनसंवाद यात्रेत होते. त्यानंतर करोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे १५ तारखेपर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर २७ तारखेपर्यंत क्वारंटाइन असताना कोणाला भेटले नाहीत. अनिल देशमुख वाझेंना फेब्रुवारी अखेरला भेटले असं परमबीर सिंह सांगत आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

  • पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “यासंबंधी तपास होणं गरजेचं आहे. आरोपांमध्ये सत्य किती आहे याची माहिती घेतल्याशिवाय राजीनामा द्या अशी मागणी करणं सोपं आहे. पण बिनबुडाचे आरोप कोणीही करु शकतो. त्यासाठी पक्षाने निष्पक्ष भूमिका घेतली आहे. तपास होईल, त्यानंतर सत्य समोर येईल आणि मग कारवाई केली जाईल”.

अलेक्झांडर ज्वेरेवने जिंकली मेक्सिकन ओपन स्पर्धा :
  • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेला जर्मनीचा आघाडीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यंदाच्या मेक्सिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटतकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवने ग्रीसचा टॉप सीडेड टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासला 6-4, 7-6(7-3) अशी धूळ चारली.

  • तुल्यबळ टेनिसपटूंमधील हा सामना तब्बल 2 तास आणि 17 मिनिटे रंगला होता. ज्वेरेवचा हा 14वा एटीपी किताब आहे. मागील वर्षी यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवला पराभवाचा धक्का बसला होता. तर, 2019च्या एटीपी 500 स्पर्धेत त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसकडून मात खावी लागली होती.

  • विजेतेपदानंतर ज्वेरेवची प्रतिक्रिया - मेक्सिकन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर ज्वेरेव म्हणाला, ”मी पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती. त्यामुळे चांगले खेळत नसल्याचा विचार माझ्या डोक्यात येत होता. माझा मार्ग शोधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला आणि मी पहिला सेट जिंकला.”

  • “जेव्हा मला दुसर्‍या सेटमध्ये संधी मिळाली तेव्हा मी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. अव्वल खेळाडू सहसा तुम्हाला दुसरा संधी देत ​​नाहीत. मला असे वाटते की, टायब्रेकमध्ये मी चांगले काम केले. या कामगिरीमुळे मी आनंदी आहे”, असेही त्याने सांगितले.

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा -  भवानी देवीला राष्ट्रीय विजेतेपद :
  • टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी (तमिळनाडू) हिने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भवानीने नवव्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

  • दिल्ली पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भवानीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला १५-७ असे पराजित केले. उपांत्य लढतीत भवानीने के. अनिताचा १५-४ असा सहज पाडाव केला. त्याआधी, भवानीने स्पर्धेस दिमाखदार सुरुवात करताना पहिल्या गटसाखळी सामन्यात जसप्रीत कौरला (जम्मू आणि काश्मीर) १५-२ असे सहज हरवले. परंतु भवानीचा तेलंगणाच्या बेबी रेड्डीने कस पाहिला. भवानीने ही चुरशीची लढत १५-१४ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भवानीने पंजाबच्या जगमीत कौरला १५-७ असे हरवून उपांत्य फेरी गाठली होती.

  • याचप्रमाणे सेनादलच्या कुमारसन पद्म गिशो निधीने गतविजेत्या करण सिंगला (राजस्थान) हरवून पुरुषांच्या सॅबर प्रकारातील वैयक्तिक विभागात विजेतेपद जिंकले. करण सिंगने नुकत्याच बुडापेस्टला झालेल्या पुरुषांच्या ‘सॅबर वर्ल्डकप’ स्पर्धेत भारतीयांमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती. या २० वर्षीय नवोदित गुणवान तलवारबाजाने जागतिक क्रमवारीत १९व्या असलेल्या कोन्स्टन्टाईन लोखानोवला नमवून बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. पण या कामगिरीची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्पर्धेत करण सिंगला करता आली नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • अवंती राधिका प्रकाश (केरळ) हिने महिलांच्या पॉइल वैयक्तिक प्रकारातील विजेतेपद राखले. तिने गतवर्षी कांस्यपदक जिंकलेल्या मणिपूरच्या लैशराम खुशबुराणीवर मात केली. गतवर्षी दिल्लीतील स्पर्धेत उपविजेतेपद जिंकलेली थॉबी वांगलेम्बाम देवी आणि तिची मणिपूरची सहकारी फॅमडोम अनिता चानू यांनी कांस्यपदक जिंकले.

  • गोव्याच्या चिंगोखाम जेटली सिंगने एपी प्रकारात बाजी मारली. गतवर्षी सहाव्या आलेल्या चिंगोखामने निर्णायक लढतीत छत्तीसगडच्या शांथीमोल शेरजीनला हरवले. चिंगोखामने २०१७च्या आशियाई कुमार आणि कॅडेट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. गतवर्षी फॉइल प्रकारात  कांस्यपदक विजेत्या सेनादलाच्या अर्जुनने यंदा सुवर्णपदक जिंकले. त्याने अंतिम सामन्यात के. बबिशला पराभूत केले. गतवर्षीचा उपविजेता थॉकोम बिकी (सव्‍‌र्हिसेस) आणि हर्षराज (बिहार) यांना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

२२ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.