चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 जून 2023

Date : 22 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
उदयोन्मुख महिला आशिया चषक - भारताला जेतेपद, अंतिम फेरीत बांगलादेशवर मात
  • कनिका अहुजाची अष्टपैलू कामगिरी आणि तिला श्रेयंका पाटील व मन्नत कश्यप या फिरकी गोलंदाजांची साथ यामुळे भारताच्या २३ वर्षांखालील संघाने बांगलादेशला ३१ धावांनी नमवत उदयोन्मुख महिला आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळताना प्रभावी कामगिरी करणाऱ्या कनिकाने बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात अप्रतिम खेळ केला. डावखुऱ्या कनिकाने २३ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने नाबाद ३० धावांचे योगदान दिले. यानंतर तिने ऑफ-स्पिन गोलंदाजी करताना २३ धावांत २ बळी मिळवले. तसेच ऑफ-स्पिनर श्रेयंका पाटील (१३ धावांत ४ बळी) आणि डावखुरी फिरकी गोलंदाज मन्नत कश्यप (२० धावांत ३ बळी) यांनीही अचूक टप्प्यावर मारा करताना भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
  • हाँगकाँग येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १२७ अशी धावसंख्या केली. कर्णधार श्वेता सेहरावत (१३), उमा छेत्री (२२) आणि दिनेश वृंदा (३६) यांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी केल्यानंतर भारतीय संघ मधल्या षटकांत अडचणीत सापडला. मात्र, कनिकाने अखेरीस फटकेबाजी करत भारताला १२५ धावांचा टप्पा ओलांडून दिला. प्रत्युत्तरात बांगलादेशने सुरुवातीपासूनच ठरावीक अंतराने गडी गमावले. त्यांची एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकली नाही. अखेरीस बांगलादेशचा डाव १९.२ षटकांत ९६ धावांतच संपुष्टात आला आणि भारताने स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

अंतिम फेरीपूर्वी केवळ एक सामना

  • हाँगकाँग येथे झालेल्या या स्पर्धेत पावसाने सातत्याने व्यत्यय आणला. या स्पर्धेतील एकूण १५ पैकी आठ सामने पावसामुळे रद्द करावे लागले. विशेष म्हणजे भारताने अंतिम फेरीपूर्वी केवळ एक सामना खेळला. त्यांनी सलामीच्या लढतीत यजमान हाँगकाँगच्या संघाला नमवले होते. त्यानंतर नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्धचे साखळी सामने, तर श्रीलंकेविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अ-गटाच्या गुणतालिकेत अग्रस्थानी राहिल्याने भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव
  • अनुभवी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. रोनाल्डोने २० जून रोजी पोर्तुगालसाठी २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आइसलँडविरुद्धच्या सामन्यात हा खास टप्पा गाठणाऱ्या रोनाल्डोने विजयी गोल करत हा आनंद खास पद्धतीने साजरा केला. या युरोपियन चॅम्पियनशिप पात्रता सामन्यात पोर्तुगालच्या संघाने १-० असा विजय मिळवला.
  • ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही या सामन्यापूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने गौरव केला. रोनाल्डोने यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कुवेतच्या बद्र अल-मुतावाचा १९६ सामन्यांचा विक्रम मोडला. आइसलँडविरुद्धच्या या सामन्यात रोनाल्डोनेही ८९व्या मिनिटाला गोल नोंदवून आपल्या शैलीत हा दुहेरी आनंद साजरा केला.
  • ३८ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने पदार्पणानंतर जवळपास २० वर्षांनी २०० आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर रोनाल्डोच्या नावावर १२३ आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले गेले आहेत. रोनाल्डोने त्याच्या २०० व्या सामन्यासंदर्भात यूईएफए वेबसाइटला दिलेल्या निवेदनात ही एक अविश्वसनीय कामगिरी असल्याचे म्हटले आहे.
  • आपल्या २०० व्या सामन्याबाबत ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका निवेदनात म्हटले आहे की, मला या टप्प्यावर पोहोचून खूप आनंद होत आहे. हा असा क्षण आहे ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणे ही खरोखरच अविश्वसनीय कामगिरी आहे. या सामन्यात विजयी गोल करणे संघासाठी अतिशय संस्मरणीय ठरले. आम्ही यापेक्षा चांगले खेळू शकलो नसतो. पण हे खेळात घडते. हा विजय माझ्यासाठी खूप संस्मरणीय राहिल.
जगभरात योगसाधनेचा उत्साह
  • International Day of Yoga 2023 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतासह जगभरात अनेकांनी उत्साहाने योगासने केली. शहरे आणि गावांमध्ये सामूहिक योगासनांचे आयोजन करण्यात आले होते. लडाखमधील उंच भागात, केरळमध्ये पाण्याखाली, आयएनएस विक्रांतवर, वंदे भारत आणि मुंबईच्या लोकल, खुली मैदाने ते बंदिस्त सभागृहांमध्ये सामूहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह विविध मंत्र्यांनीही यामध्ये सहभाग घेतला. अमेरिका, ब्रिटन, नेपाळ, दक्षिण कोरिया इत्यादी देशांमध्येही लोकांनी उत्साहाने योगदिनामध्ये सहभाग घेतला.

योग प्रसार, प्रचारावरून श्रेयवाद; काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार जुंपली

  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ‘संयुक्त राष्ट्रां’मध्ये विश्वयोग दिन साजरा करत असताना, योग प्रसार-प्रचाराचे श्रेय लाटण्यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार जुंपली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग लोकप्रिय केल्याचा दावा काँग्रेसने केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने, गांधी कुटुंबासाठी मोदींचे योगदान नाकारण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली.
  • ’योगाला लोकप्रिय करण्यात पं. नेहरूंचा मोलाचा वाटा होता, त्यांनीच योगाला राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही नेहरूंचे आभार मानतो.. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये प्राचीन कला आणि तत्त्वज्ञानाचे महत्त्व जाणून घेऊया आणि आपल्या जीवनात त्याचा अंतर्भाव करूया, असे ट्वीट काँग्रेसने केले. या ट्वीटसोबत  पं. नेहरूंच्या योगाभ्यासाचे छायाचित्रही ट्वीट केले.
  • ’पण काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी काँग्रेसच्या ट्वीटचे कौतुक करताना योगप्रसार करणाऱ्या प्रत्येक सरकारचे अभिनंदन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. थरूर यांनी ट्वीटमधून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींची तरफदारी केल्यामुळे काँग्रेसच्या श्रेयवादाच्या ट्वीटमधील हवा काढून घेतली गेली. योग हा जगभरातील आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’चा महत्त्वाचा भाग असल्याचा युक्तिवाद मी अनेक वर्षे केला असून तो ओळखला जात असल्याचे पाहून खूप आनंद झाला, असे ट्वीट थरूर यांनी केले.
  • ’योगाची थट्टा (राहुल गांधींचे ट्वीट) करण्यापासून ते आता गांधी कुटुंबासाठी श्रेय लाटण्याचा काँग्रेसचा प्रयत्न पाहता काँग्रेसने एक वर्तुळ पूर्ण केले आहे. २०१५ पासून जागतिक स्तरावर योगाला ओळख मिळू लागली असून त्याबद्दल काँग्रेसने देशवासीयांचे किमान आभार तरी मानले पाहिजे, असे ताशेरे भाजपचे प्रवक्ता शेहजाद पूनावाला यांनी ओढले.
मोदींच्या अमेरिका भेटीत ‘या विषयांवर होणार चर्चा, परराष्ट्र सचिवांनी दिली माहिती
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल (२० जून) ते अमेरिकेसाठी रवाना झाले. या भेटीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत किमान तीन बैठका घेणार आहेत. यामध्ये एक खासगी बैठक तर, एक डिनर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही जाणार आहेत. तसंच, युएस काँग्रेसच्या नेत्यांकडूनही मोदींचं स्वागत केलं जाणार आहे.
  • परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पंतप्रधानांच्या आगामी राज्य दौऱ्याची माहिती देताना सांगितले की, “आमच्या नात्यातील हा एक मैलाचा दगड आहे. ही एक अतिशय महत्त्वाची भेट आहे. २०१४ पासून मोदींनी सहा वेळा अमेरिकेला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान, सह-उत्पादन, सह-विकास आणि पुरवठा बदल राखण्यासाठी संरक्षण उद्योगांमध्ये जवळून भागीदारी करण्यासाठी दोन्ही बाजू एक रोडमॅपवर काम करत आहेत.
  • दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मोदींच्या या भेटीमुळे दूरसंचार, अंतराळ आणि उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान क्षेत्रात सखोल संबंध निर्माण होणार आहेत. परराष्ट्र सचिव क्वात्रा म्हणाले की, संरक्षण औद्योगिक सहकार्य रोडमॅप हा पंतप्रधान मोदींच्या यूएस दौऱ्याचा एक महत्त्वाचा परिणाम असेल अशी अपेक्षा आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंधांचा मुख्य स्तंभ म्हणजे संरक्षण सहकार्य आहे, असंही क्वात्रा म्हणाले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डीसीला जातील. तिथे ते राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांना भेटणार आहेत. २२ जून रोजी मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत केले जाईल, त्यानंतर बिडेन यांच्यासोबत औपचारिक द्विपक्षीय बैठक होईल.राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन गुरुवारी संध्याकाळी मोदींच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचेही आयोजन केले आहे.
अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? हिंदू सणाच्या पवित्र दिनी मुहूर्त? पंतप्रधानांनाही पाठवले निमंत्रण
  • अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी केव्हा खुले होणार, याकडे अवघ्या राम भक्तांचं लक्ष लागून राहिलं आहे. राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू असून येथे जाऊन दर्शन घेण्यास रामभक्त आतुर आहेत. दरम्यान, २०२४ पर्यंत राम मंदिर दर्शनसाठी खुलं होणार असल्याचं याआधीही सांगण्यात आलं होतं. आता त्याही पुढे जाऊन एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
  • राम मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार, याबाबतची माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार १४ किंवा १५ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त गाभाऱ्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
  • २०२० मध्ये सुरू झालेल्या मंदिराच्या बांधकामावर ट्रस्ट देखरेख करत आहे. ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितले की मूर्तीची स्थापना डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता नाही. “डिसेंबरमध्ये मूर्ती स्थापनेसाठी कोणताही शुभ दिवस नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, जेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जातो तेव्हाच मकर संक्रांतीपासून प्राणप्रतिष्ठेचे विधी होऊ शकतो. १४ किंवा १५ जानेवारीला होणारी मकर संक्रांती हा रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेचा सर्वात शुभ दिवस आहे”, ट्रस्टच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
  • ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी जानेवारी महिन्यात सांगितले होते की, “२०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळा होऊ शकतो.”

 

भारतीय वंशाच्या लिसाने रचला इतिहास, एफआयसीएच्या अध्यक्षपदी झाली नियुक्ती :
  • फुटबॉलनंतर क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट हा मुलांचा खेळ आहे, असे म्हटले जायचे. मात्र, जगभरातील काही ‘फियरलेस लेडिज’ने क्रिकेटवर फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. आयलियन अॅश, शार्लोत एडवर्ड, मिताली राज, सारा टेलर, लिसा स्थळेकर, अंजुम चोप्रा, बेट्टी विल्सन यासारख्या महिला क्रिकेटपटूंनी मुलीदेखील तितक्याच ताकदीने क्रिकेट खेळू शकतात, हे सिद्ध करून दाखवले आहे.

  • यांच्यापैकी एकीने तर आता आणखी एक इतिहास रचला आहे. भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची कमाल करून दाखवली आहे.

  • लिसा ही फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सची (एफआयसीए) पहिली महिला अध्यक्ष ठरली आहे. स्वित्झर्लंडमधील नियॉन येथे झालेल्या एफआयसीए कार्यकारी समितीच्या बैठकीत ४२ वर्षीय लिसाच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. लिसापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज बॅरी रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू जिमी अॅडम्स आणि इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांनी हे पद भूषवलेले आहे.

  • “कोविड-१९ महामारीनंतर एफआयसीएची ही पहिलीच बैठक होती. यावेळी आमच्या सदस्यांशी सल्लामसलत केल्यानंतर आम्ही लिसा स्थळेकरची पहिली महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही गोष्ट जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे,” अशी माहिती एफआयसीएचे कार्यकारी अध्यक्ष हीथ मिल्स यांनी दिली.

नवीन महाविद्यालयांना अनुदान न मागण्याच्या अटीवर मान्यता :
  • राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांना आता स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर (सेल्फ फायनान्स) नवीन महाविद्यालये सुरू करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे, भविष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुदानाची मागणी करणार नाही, असे हमीपत्र या महाविद्यालयांना १०० रुपयांच्या मुद्रांक पत्रावर लिहून द्यावे लागणार आहे.

  • कायम विनाअनुदानित संवर्गातून राज्यभरातील १४२ नवीन महाविद्यालयांना राज्य शासनाने परवानगी दिली आहे. ही महाविद्यालये रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित केली जाणार आहेत. त्यापैकी ३४ महाविद्यालये नागपूर तर ३७ महाविद्यालये अमरावती विभागातील आहेत. उर्वरित महाविद्यालये औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नांदेड आणि पनवेल या विभागातील आहेत. या महाविद्यालयांना विनाअनुदान तत्त्वावर मान्यता मिळणार आहे.

  • शासनाकडून अनुदानच मिळणार नसल्याने महाविद्यालयांकडून प्रत्येक अभ्यासक्रमासाठी  शुल्काच्या नावावर मोठी रक्कम उकळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, ग्रामीण आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयांमधील शिक्षण कितपत परवडेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अग्निपथ योजना लष्कर, तरुणांसाठी चांगली ; अजित डोवाल यांचे मत :
  • केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत देशभर आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ही योजना लष्कर आणि तरुणांसाठी चांगली असल्याचे मत व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत ही योजना मागे घेतली जाणार नाही.

  • लष्करातून निवृत्त झाल्यानंतर अग्निवीरांना रोजगारच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • ही योजना मागे घेण्याचा प्रश्नच नाही. ही योजना देशहितासाठीच असून तरुणांसाठी फायदेशीर आहे. मात्र केवळ स्वार्थ साधण्यासाठी काही जण या योजनेला विरोध करत आहेत. विरोध करणाऱ्यांना या योजनेबद्दल काहीही माहीत नाही. केवळ अज्ञानातून ते विरोध करत असून या योजनेबद्दलच्या शंका आणि आक्षेप दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे डोवाल यांनी सांगितले.

  • प्रेषित प्रकरणामुळे देशाच्या प्रतिमेला तडे - नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मत पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला तडे गेले. त्यांनी देशाला चुकीच्या पद्धतीने प्रक्षेपित केले. भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी काही देशांतील नागरिकांचे भारताबाबत झालेले मत बदलण्याची गरज आहे, असे डोवाल यांनी सांगितले.

लिसा स्थळेकर क्रिकेटपटूंच्या महासंघाची पहिली महिला अध्यक्ष :
  • दिग्गज माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकर ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या महासंघाची (एफआयसीए) पहिली महिला अध्यक्ष असणार आहे.

  • स्वित्झर्लंडच्या न्यो येथे झालेल्या ‘एफआयसीए’च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी ऑस्ट्रेलियाची ४२ वर्षीय माजी कर्णधार स्थळेकरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज बॅरी रिचर्डस, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू जिमी अ‍ॅडम्स आणि इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. ‘एफआयसीए’ आणि खेळाडूंची जागतिक संघटना यांमध्ये झालेल्या खेळाडू विकास परिषदेआधी कार्यकारिणी समितीची बैठक झाली. करोना साथीनंतर प्रथमच ही व्यक्तिश: बैठक पार पडली.

  • ‘‘सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर स्थळेकरची ‘एफआयसीए’च्या अध्यक्षपदी निवड करताना आनंद होत आहे. ती पहिली महिला अध्यक्ष आहे. लिसा या पदासाठी सर्वोत्तम उमेदवार होती. माजी खेळाडू आणि विश्लेषक म्हणूनही तिची ओळख आहे,’’असे ‘एफआयसीए’चे कार्यकारी अध्यक्ष हीथ मिल्स यांनी सांगितले.

  • स्थळेकरने ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही प्रकारांत मिळून १८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. २००५ व २०१३ या एकदिवसीय विश्वचषक आणि २०१० व २०१२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघातही तिचा सहभाग होता. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय प्रकारातील विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर तिने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

शिक्षिका ते राष्ट्रपतीपदाच्या दावेदार; द्रौपदी मोर्मू यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर :
  • भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीनंतर भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपाकडून द्रौपदी मोर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील रहिवासी असून त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत.

  • एनडीकडून राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असावा, यासाठी जवळपास २० नावांवर चर्चा सुरू होती. भाजपाने घटक पक्षांशी संवाद साधल्यानंतर द्रौपदी मोर्मू यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे. याबाबतची माहिती जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज यूपीएने राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार घोषित केला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.

  • संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर भाजपाने राष्ट्रपती पदाच्या उमदेवाराची घोषणा केली. भाजपा आणि इतर सर्व घटक पक्षाच्या संमतीने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार मिळावा, अशी आमची इच्छा होती. तसेच हा उमेदवार पूर्व भारतातील असावा, महिलेला स्थान मिळावं, अशीही आमची इच्छा असं जेपी नड्डा यांनी सांगितलं.

  • त्यानुसार एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. द्रौपदी मोर्मू यांनी शिक्षिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्या ओडिसा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्या. तसेच त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलं आहे. २०१५ ते २०२१ या कालावधीत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.

तमिळनाडूत तीन नव्या पालींचा शोध ; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे यश :
  • तमिळनाडूत तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी दुर्मिळ अशा तीन पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांच्या संबंधातील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.

  • या तिन्ही पाली ‘निमॉस्पीस’ प्रजातीच्या आहेत. यामध्ये ‘निमॉस्पीस अळगू’, ‘निमॉस्पीस कलकडेनसीस’ आणि ‘निमॉस्पीस मुंदाथुराईएनसीस’ या तीन पालींचा समावेश आहे. जगभरात पालींच्या १५० हून अधिक प्रजाती आढळून येतात. आत्तापर्यंत पश्चिम घाटात ‘निमॉस्पीस’ प्रजातीच्या तब्बल ४७  प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. शरीरशास्त्र आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या तिन्ही पाली वेगळय़ा असल्याची पुष्टी तज्ज्ञांनी केली आहे. त्यानंतर  २० जूनला ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ पत्रिकेतून हा शोध निबंध प्रकाशित करण्यात आला. यासंबंधातील माहिती तेजस ठाकरे यांनी समाजमाध्यमावरून काही छायाचित्रे प्रसारित करून दिली. नव्याने शोधण्यात आलेल्या या पालींमध्ये, ‘निमॉस्पीस अळगू’ हे नाव त्याच्या सौंदर्यावरून ठेवले आहे.

  • अळगू हा तामिळ शब्द असून याचा अर्थ सुंदर असा आहे. ही पाल केवळ तिरुकुरुंगुडी राखीव जंगलात आढळते. ही समुद्र सपाटीपासून २००-३०० मीटर उंचावरील शुष्कपानगळी जंगलातील दगडांवर आढळून येते. त्याच बरोबर ‘निमॉस्पीस मुंदाथुराईएनसीस’ ही पालदेखील समुद्र सपाटीपासून २००-३०० मीटर उंचावरील शुष्कपानगळी जंगलातील दगडांवर आढळून येते. ‘निमॉस्पीस कलकडेनसीस’ ही समुद्र सपाटीपासून ९००-११०० मीटर उंचावरील सदाहरित जंगलात झाडांवर सापडते. या तिन्ही दिनचर पाली असून छोटय़ा किटकांवर आपला उदरनिर्वाह करतात.

  • शरीराचा रंग, खवल्यांची संख्या, तसेच इतर शारीरिक वैशिष्टय़े आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या तिन्ही प्रजाती नवीन असल्याचे सिद्ध झाले असून तज्ज्ञांनीही याची पुष्टी केली आहे. या संशोधनामुळे पश्चिम घाटातील या प्रजातीची संख्या ४७ वर गेली आहे. मात्र, भारतात अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत असून पाली, इतर सरीसुप आणि एकूणच पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही.

22 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.