चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ फेब्रुवारी २०२१

Date : 22 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मंगळावर पाय ठेवण्याआधी :
  • मंगळ ग्रह हा पृथ्वीचा सहोदर मानला जातो, म्हणजे जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली तेव्हापासून या ग्रहाशी पृथ्वीचे जवळचे नाते आहे. पत्रिकेत जरी मंगळ त्रासदायक वाटत असला तरी तो लोभसवाणा आहे. या ग्रहावर पूर्वी सूक्ष्म जीव असावेत या शक्यतेतून तेथे सातत्याने शोध घेतला जात आहे.

  • संभाव्य अवकाश थांब्यावर पहिला सेल्फी - सध्या संयुक्त अरब अमिरात (होप), चीन (तियानवेन १) यांची मंगळयाने मंगळाच्या कक्षेत आहेत, तर अमेरिकेच्या नासा व युरोपीय अवकाश संस्थेची परसिव्हिरन्स ही बग्गीसारखी गाडी तेथे उतरण्यात यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गाडी आहे. मंगळ हा इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी थांबा (स्टॉप) ठरू शकतो अशीही एक कल्पना आहे. मंगळावर मानवी वसाहतींची कल्पनाचित्रेही तयार आहेत.

  • अमेरिकेसाठी रोव्हर गाडी मंगळावर उतरवणे हे फार अवघड काम नाही हे खरे असले तरी, ही सर्वात मोठी गाडी असून तिच्या मदतीने तेथील विवरातील खडक गोळा करून ते पृथ्वीवर आणले जाणार आहेत, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय त्यावरील कॅमेरे प्रथमच रंगीत छायाचित्रे घेत असून रोव्हर गाडीने मंगळावरचा सेल्फीही काढून पाठवला आहे.

नोव्हाक जोकोव्हिचनं ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरलं :
  • नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.

  • चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती पुन्हा एकदा हुलकावणी दिली. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

  • अव्वल खेळाडूंविरुद्ध सहज विजय मिळवणाऱ्या मेदवेदेवने विजयाची मालिका अखंड राखली आहे. लंडनमध्ये मलाही त्याने सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. दमदार सव्‍‌र्हिस तसेच ताकदवान फोरहँड व बॅकहँड असलेल्या मेदवेदेने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली आहे. 

राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्र सरकारची सूचना :
  • महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्याप अनेक आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.

  • राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे. काही राज्यांनी आठवड्यातून दोन दिवस  लसीकरण सुरू ठेवले असून काही राज्यांत चार दिवस लसीकरणाचे काम केले जात आहे. कोविन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे.

  • १९  फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे यात आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या असून लसीकरण वाढवण्याची गरज त्यातून दिसून आली आहे. वयस्कर लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे.  मार्च २०२१ पासून सहआजार असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल.

  •  २१ फेब्रुवारीअखेर ११०८५१७३ लस मात्रा २३०८८८ सत्रात देण्यात आल्या असून त्यात ६३९१५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा दिली आहे तर ९६०६४२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांत ३७३२९८७ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

नवं संकट - सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण; जगातील पहिलीच घटना :
  • आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) माणसालाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांपासून बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना असून, या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे. त्यामुळे करोना पाठोपाठ आणखी एक नवं संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • गेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लू’चा (एच५एन८) उद्रेक झाला आहे. मात्र, केवळ पोल्ट्री कोंबड्यांना या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता माणसालाही याचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. रशियात पहिल्यादाच बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. ग्राहक आरोग्य वॉचडॉक रोस्पोट्रेबनाडझोरचे प्रमुख अॅना पोपोवा यांनी रोशिया २४ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.

  • “अनेक दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या निष्कर्षांबद्दल निश्चित झालो होतो. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता नाहीत. मात्र, बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत वा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्यानं संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे,” असं पोपोवा म्हणाल्या.

केंद्र-राज्ये एकत्रित प्रयत्नांचे पंतप्रधानांचे आवाहन :
  • जुनाट व कालबाह्य कायदे मोडीत काढून आम्ही उद्योगस्नेही वातावरण देशात तयार केले, त्यामुळे आता केंद्र व राज्ये यांनी एकत्र येऊन आर्थिक विकासाची गती वाढवली पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

  • निती आयोगाच्या संचालक मंडळ बैठकीत त्यांनी सांगितले, की खासगी क्षेत्राला यात पूर्ण संधी असून सरकारच्या आत्मनिर्भर  योजनेत त्यांनी सहभागी व्हावे. केंद्र व राज्य सरकारे यांनी एकत्र काम केले तरच देशाची प्रगती होणार आहे. सरकारला आर्थिक प्रगतीचे श्रेय खासगी क्षेत्रालाही द्यावे लागणार आहे कारण त्यांचे प्रतिनिधित्वही यात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून देशाला विकासात प्रगतिपथावर नेण्याची गरज आहे.

  • शेती क्षेत्राबाबत त्यांनी सांगितले, की खाद्यतेल उत्पादनात भारत कमी पडत आहे. खाद्यतेलाची आयात कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तेलबियांची लागवड करण्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे. राज्यांनी तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर काही नियम कमी केले पाहिजेत, कारण काही नियम व कायदे आता कालबाह्य झाले आहेत.

हॉट स्प्रिंग, गोग्रा, देपसांगमधून माघारीचाही भारताचा आग्रह :
  • भारत व चीन यांच्यात शनिवारी लष्करी पातळीवरील दहाव्या फेरीची चर्चा सुरू झाली असून हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा, देपसांग, या पूर्व लडाख भागातील माघारीबाबत यात विचार करण्यात येणार आहे.  दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी या चर्चेचा लाभ होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  • दहाव्या कोअर कमांडर पातळीवरील चर्चा ही भारत व चीन यांच्या लष्करादरम्यान पँगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण बाजूकडील सैन्य माघारीनंतर घेण्यात आली. त्यात सैन्य माघारीबरोबरच शस्त्रसामग्री व तंबूही काढण्यात आले.

  • चर्चेची दहावी फेरी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीतील मोल्दो येथे सुरू झाली.  हॉट स्प्रिंग, गोग्रा व देपसांग भागातून लवकर माघारीचा भारताचा आग्रह असून त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास मदत होणार आहे.

  • चर्चेचा भर हा सैन्य माघारीवरच असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ११ फेब्रुवारीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत  जाहीर केले होते, की भारत-चीन यांच्यात पँगॉग सरोवराच्या उत्तर व दक्षिण भागातून सैन्य माघारीचा करार झाला असून दोन्ही देशांनी आघाडीच्या छावण्यातील सैन्य टप्प्याटप्प्याने माघारी घेण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर आठ भागापर्यंत चिनी सैन्य माघारी जाणे अपेक्षित आहे.

२२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.