चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ सप्टेंबर २०२१

Date : 21 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
खेळाडूंची मानधनवाढ :
  • यंदाच्या देशांतर्गत स्थानिक क्रिकेट हंगामासाठी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच गतवर्षी रणजी करंडक रद्द करण्यात आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जाणाऱ्या क्रिकेटपटूंना ५० टक्के भरपाई देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे.

  • ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात आली. गतवर्षी मार्च महिन्यापासून देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. करोनाच्या सावटादरम्यानही सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली. मात्र प्रतिष्ठित रणजी स्पर्धा प्रथमच रद्द करावी लागली. खेळाडूंनी यासंबंधी नुकसानभरपाई मिळावी म्हणून ‘बीसीसीआय’कडे मागणी केली होती. मात्र ‘बीसीसीआय’ने त्यांच्या मानधनातही वाढ करून खेळाडूंना सुखद धक्का दिला.

  • त्यानुसार गतवर्षी विजय हजारे आणि मुश्ताक अली स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना प्रत्येकी ७० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. एका रणजी सामन्यासाठी खेळाडूला प्रत्येकी १.४० लाख रुपये मिळतात. ४० रणजी सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंच्या मानधनात एक लाख रुपयांची वाढ करून त्यांना २.४० लाख रुपये देण्यात येतील. खेळाडूंच्या सामन्यानुसार त्यांना पगारवाढ करून देण्यात आली आहे. महिला खेळाडूंनासुद्धा गेल्या हंगामातील १२,५०० रुपयांच्या तुलनेत प्रत्येक सामन्यासाठी २० हजार इतके मानधन देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार – राजेश टोपे :
  • “महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट क साठी एकूण २७४० एवढ्या जागा आपण भरत आहोत. गट ड साठी ३ हजार ५०० जागा आपण भरत आहोत.

  • एकूण जवळपास ६ हजार २०० जागा आपण भरत आहोत. या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्ज देखील आले आहेत आणि हॉल तिकीट्स पण देण्यात आले आहेत.” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, “राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही.” असं देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवलं ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

  • आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, “२५ आणि २६ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी माझं सर्व परीक्षार्थ्यांना विनंती आहे, आवाहन आहे. आपले परीक्षा केंद्र लक्षात ठेवा. परीक्षा केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पूर्णपणे पालन केले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार, त्यामुळे परीक्षा केंद्रावर कुठलही इलेक्ट्रिकल गॅझेट चालणार नाही. पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

  • राज्यभरातील पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेलं आहे की, आपल्या विभागातून उपजिल्हाधिकारी व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रांवर सतत पेट्रोलिग करून, परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल याची दक्षता घेतील अशी अपेक्षा आहे. अत्यंत पारदर्शक परीक्षा घेतल्या जाणार आहेत.”

राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी :
  • काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचं नाव जाहीर झाल्याने चर्चांना पूर्णविराम लागला आहे. या जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

  • रजनी पाटील यांचं नाव राज्यपाला नियुक्त १२ आमदारांच्या यादीत आहे. पण गेल्या वर्षभरापासून उमेदवारी रखडल्याने त्यांचं नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं आहे. यापूर्वीही विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

  • रजनी पाटील या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रभारी आहेत. याआधीही त्या राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे.

  • १९९६ साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातल्या आहेत. विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

दिलासा देणारी बातमी! उपचाराधीन रुग्णसंख्या गेल्या १८४ दिवसांतली सर्वात कमी :
  • गेल्या २४ तासांत देशात २६,११५ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९ हजार ५७५ वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे.

  • याच कालावधीत करोनामुळे २५२ जण मृत्युमुखी पडल्याने करोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,४५,३८५ इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

  • तर, एकूण ३,२७,४९,५७४ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.७५ टक्के इतके आहे. मार्च २०२ पासूनचं हे सर्वाधिक प्रमाण आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ८१ कोटी ८५ लाख १३ हजार ८२७ मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या ९६ लाख ४६ हजार ७७८ वर पोहोचली आहे.

आजपासून पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर, UN महासभेला करणार संबोधित :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते संयुक्त राष्ट्रांची महासभा म्हणजेच युएनजीएच्या ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच ते जगभरातील नेत्यांसोबत बैठक करणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील १०० देशांचे प्रमुख नेते अमेरिकेला जाणार आहे. यात पंतप्रधान मोदींबरोबरच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचाही समावेश आहे.

  • पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरच्या एका चर्चासत्रादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधितही करणार आहेत. यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. ही द्विपक्षीय भेट असणार आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे..

  • व्हाइट हाऊसने राष्ट्राध्यक्षांच्या आठवडाभराच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना बायडेन हे २४ सप्टेंबर रोजीच जपानी पंतप्रधान सुगा योशीहिदे यांचीही भेट घेणार आहे. बायडेन व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर मोदी, सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेट घेणार आहेत. क्वाड देशांच्या नेत्यांना पहिल्यांदाच बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून भेटणार आहेत.

  • मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करण्यासाठी बायडेन हे सोमवारी दुपारी न्यूयॉर्कला रवाना होणार आहेत. न्यूयॉर्कमधील कार्यक्रमामध्येच बायडेन हे मॉरिसन यांची भेट घेणार आहेत. न्यूयॉर्कवरुन परतल्यानंतर बायडेन हे मंगळवारी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. २४ सप्टेंबर रोजी मोदी बायडेन यांची तर २३ सप्टेंबर रोजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चन्नी :
  • गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये पक्षांतर्गत संघर्षाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने अखेर राज्यात खांदेपालट करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. चरणजितसिंग चन्नी यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले.

  • राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ. पी. सैनी या दोन उपमुख्यमंत्र्यांनाही शपथ दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यावेळी उपस्थित होते.

  • नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत विविध घोषणा करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकानुनयी राजकारणाचे संकेत दिले. लहान घरांसाठी मोफत पाणीपुरवठा, वीजदरात कपात अशा घोषणा चन्नी यांनी केल्या. तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.

  • चन्नी यांनी नव्या सरकारच्या धोरणांबाबत अधिक तपशील दिले नाहीत. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्य विरोधक असलेल्या आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या सवलतींच्या पाश्र्र्वाभूमीवर त्यांनी ही आश्वाासने दिल्याचे मानले जाते.

‘एमी’ पुरस्कारांवर ‘दी क्राऊन’, ‘टेड लासो’ची मोहोर :
  • ‘दी क्राऊन’ या नेटफ्लिक्सच्या मालिकेस सात एमी पुरस्कार मिळाले असून या मालिकेने या पुरस्कारात आपली मोहोर उमटवली आहे. उत्कृष्ट नाट्य मालिका, उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारही या मालिकेस मिळाले असून राणी एलिझाबेथ २ च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ऑलिव्हिया कोलमन हिला मिळाला आहे.

  • अ‍ॅपल  टीव्ही प्लसच्या टेड लासो मालिकेस दूरचित्रवाणी मालिकेत रविवारी रात्री दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून  त्यात जॅसन सुडेकिस यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेस एकूण चार पुरस्कार मिळाले असून केट विन्सलेट अभिनित मारी ऑफ एस्टाऊन, जीन स्मार्ट अभिनित हॅकस या एचबीओ मालिकांनी त्यापाठोपाठ बाजी मारली आहे.

  • गेल्या वर्षी या पुरस्कारांचा कार्यक्रम आभासी पद्धतीने झाला होता. या वेळी लॉस एंजलिस येथे हा कार्यक्रम एलए लाइव्ह एंटरटेनमेंट  संकुलात घेण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण सीबीएस व पॅरामाउंट यांनी केले होते. तीन तास हा कार्यक्रम चालला होता. त्याचे संचालन सेंड्रिक  यांनी केले.  ‘दी क्राऊन’ मालिकेने लेखन, दिग्दर्शन हे पुरस्कार पटकावले आहेत. पीटर मॉर्गन अँड कंपनीने तयार केलेल्या या मालिकेने अभिनयाचे सर्व पुरस्कार पटकावले. गिलियन अँडरसनला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर टोबियास मेन्झीस यांना उत्कृष्ट  सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

२१ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.