चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ सप्टेंबर २०२०

Updated On : Sep 21, 2020 | Category : Current Affairsराज्यसभेत रणकंदन :
 • नवी दिल्ली : कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या गोंधळात, घोषणाबाजीत दोन्ही कृषीविषयक विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. या गोंधळावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

 • शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्याकडे पाठवली जातील.

 • लोकसभेत सत्ताधारी भाजपकडे बहुमत असल्याने ही विधेयके विनासायास मंजूर झाली. पण, राज्यसभेत भाजपकडे संख्याबळ नव्हते. त्यामुळे घाईघाईने आवाजी मतदानाने विधेयके मंजूर करून घेण्याचा कुटिल डाव आखला गेल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी केला.

भारतीयांच्या संशयास्पद बँक व्यवहारांवर अमेरिकेत अंकुश :
 • नवी दिल्ली, मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे २०१३मधील ‘ऑफशोर लिक्स’ प्रकरण, २०१५मधील ‘स्वीस लिक्स’ प्रकरण, २०१६मधील ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि २०१७मधील ‘पॅराडाईज पेपस’ प्रकरण यांपाठोपाठ आता ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले आणखी एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. ‘फिनकेन फाईल्स’ असे त्याचे नाव आहे.

 • हे ताजे प्रकरण उघडकीस आणताना त्यातील भारतीयांचा समावेश शोधण्यासाठी दोन हजारांहून अधिक गुप्त कागदपत्रांच्या साठय़ांची तपासणी दि इंडियन एक्स्प्रेसने केली. मनी लाँड्रिंग, दहशतवाद, अंमली पदार्थाचा व्यापार किंवा आर्थिक फसवणूक केल्याचा संशय असल्याने भारतीयांच्या या संशयास्पद बँक व्यवहारांना अमेरिकी अर्थखात्याचा ‘वॉचडॉग’ असलेल्या ‘आर्थिक गुन्हे सक्तवसुली संस्थेने’ (फिनकेन) अंकुश लावला आहे. ‘फिनकेन’ने  या कागदपत्रांना ‘सस्पीशियस अ‍ॅक्टिव्हिटी रिपोटर्स’ (सार्स) असे संबोधले आहे.

 • अशा प्रकारच्या संशयास्पद कागदपत्रांची तपासणी ‘फिनकेन’द्वारे करण्यात येते. संबंधित बँकांच्या अनुपालन अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक गुन्ह्यांचा ठपका असलेल्या व्यवहारांची किंवा त्यात सामील ग्राहकांची माहिती संकलित करण्यात येते. संबंधित बँकांनीच अशा व्यवहारांबद्दल शंका घेऊन या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करण्याचे सुचवले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानेही या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.

पाचवी वर्गाबाबतचा ‘तो’ निर्णय रद्द करा :
 • अमरावती : खासगी शाळांचे इयत्ता पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळेस जोडण्याबाबतचा शासन आदेश रद्द करावा अशी आग्रही मागणी शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.

 • राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसोबत जोडण्याबाबतचा शासन निर्णय १६ सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या शासन आदेशामुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. या शासन आदेशामुळे अनेक खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार असून संपूर्णपणे बिंदू संवर्गात बदल होणार आहे. त्याचा सर्वात मोठा फटका विनाअनुदानित तसेच अंशत अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे.

 • त्यामुळे हा शासन आदेश रद्द करण्याबाबत शिक्षक व शिक्षक  संघटनांकडून मागणी होत आहे असे आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील व आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी प्रत्यक्ष भेटीदरम्यान सांगितले. यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.

 • या शासन आदेशान्वये इयत्ता ५ वीचे वर्ग जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला  जोडले तर शाळांमध्ये पाचवीच्या वर्ग खोल्या बांधणे गरजेचे आहे त्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण शासनावर येणार आहे. तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सदर शासन आदेश तात्काळ रद्द करावा, अशी मागणी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी केली.

मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा मुंबईत शक्य :
 • मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा मुंबईत आयोजित करावी. या स्पध्रेसाठी पुरेशी मैदाने या शहरात उपलब्ध आहेत, अशी मागणी मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) कार्यकारिणी सदस्य नदीन मेमन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 • ‘‘भारतीय क्रिकेट हंगामाचा प्रारंभ मुश्ताक अली स्पध्रेने करता येईल. मुंबई या स्पध्रेची संपूर्णत: जबाबदारी उचलू शकेल. कारण मुंबईत सहा उत्तम दर्जाची क्रिकेट स्टेडियम्स आणि चांगली हॉटेल्स आहेत,’’ असे मेमन यांनी गांगुलीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 • ‘‘मुंबईत असलेल्या स्टेडियम आणि हॉटेल्सच्या सुविधांमुळे सर्व ‘बीसीसीआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची चांगली काळजी घेतली जाईल. मुंबईने फेब्रुवारी-मार्चमध्ये महिलांची अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा २० दिवसांत यशस्वीपणे आयोजित केली होती,’’ असे मेमन यांनी म्हटले आहे.

 • ‘‘उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट आहे. त्यामुळे या स्पध्रेचा सकारात्मक पद्धतीने विचार करावा. मुंबई मुश्ताक अली स्पध्रेसाठी जैव-सुरक्षित वातावरणाची निर्मिती केली जाईल,’’ असे मेमन यांनी सांगितले.

सेंट लुइस बुद्धिबळ स्पर्धा - हरिकृष्णची कार्लसनवर मात :
 • चेन्नई : भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला. मात्र दिवसभरातील अन्य चार डावांत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याची सेंट लुईस ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

 • हरिकृष्णने अतिजलद प्रकारात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लसनला ६३ चालींत पराभूत केले. त्यानंतर त्याने अर्मेनियाच्या जेफ्री झियाँग याच्यावरही विजय मिळवला. पण नंतर तीन बरोबरींसह हरिकृष्णला चार पराभव पत्करावे लागले.

 • अमेरिकेचा लेइनर डॉमिंगेझ आणि वेस्ली सो, रशियाचा अलेक्झांडर ग्रिशूक तसेच इराणचा अलिरेझा फिरौझा यांनी हरिकृष्णवर मात केली. या कामगिरीमुळे हरिकृष्णने अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तपणे सहावे स्थान प्राप्त केले आहे.

२१ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)