चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ नोव्हेंबर २०२२

Date : 21 November, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इक्वेडोरने कतारला हरवून ९२ वर्षांनंतर मोडला ‘हा’ मोठा विक्रम; घ्या जाणून :
  • इक्वेडोर संघाने फिफा विश्वचषक २०२२ चा पहिला सामना जिंकला आहे. अ गटात यजमान कतारविरुद्ध २-० असा विजय मिळवून दक्षिण अमेरिकन राष्ट्राने स्पर्धेतील पहिले गुण मिळवले. इक्वेडोरचा फॉरवर्ड एनर व्हॅलेन्सियाने सामन्यातील दोन्ही गोल केले. यासह कतार हा यजमान म्हणून पहिला सामना गमावणारा फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला देश ठरला आहे. स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देशाला सलामीचा सामना गमवावा लागला आहे.

  • सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला इक्वेडोरने कतारच्या पोस्टमध्ये गोल केला, पण व्हीएआरने तो फेटाळला. यानंतर १६व्या मिनिटाला एनर व्हॅलेन्सियाने पेनल्टीद्वारे स्पर्धेतील पहिला गोल केला. ३१व्या मिनिटाला व्हॅलेन्सियाने आणखी एक गोल करून इक्वेडोरला विजय मिळवून दिला. अ गटात नेदरलँड आणि सेनेगल या संघांचाही समावेश आहे. या विजयासह इक्वेडोरला अंतिम १६ मध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे.

  • कतार आपला पहिला विश्वचषक खेळत असताना दुसरीकडे इक्वेडोरचा संघही विश्वचषकात फारसा जुना नाही. संघाने मागील फुटबॉल विश्वचषकासाठी प्रथमच पात्रता मिळवली आणि मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले आणि नंतर गट टप्प्यातच बाहेर पडले. २००६ च्या विश्वचषकात, संघ केवळ पात्र ठरला नाही तर गट टप्प्यात पोलंड आणि कोस्टा रिकासारख्या संघांना पराभूत करून बाद फेरीत प्रवेश केला. विश्वचषकाच्या इतिहासात इक्वेडोरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यानंतर इंग्लंडकडून १-० ने पराभूत झाल्यानंतर इक्वेडोरला राऊंड ऑफ १६ मधून बाहेर केले.

“पैसे जपून खर्च करा”, जेफ बेझोस यांचा सल्ला, आर्थिक मंदीचा दिला इशारा :
  • मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा यांच्यासारख्या काही जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे. त्यानंतर अ‍ॅमेझॉन ही कंपनीदेखील वेगवेगळ्या विभागांतून तब्बल १० हजार कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे.

  • उलाढाल मंदावल्यामुळे तसेच महसुलात घट होत असल्यामुळे कंपन्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच अ‍ॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष तसेच जगतील अब्जाधीशांच्या यादीत समावेश असलेले जेफ बेझोस यांनी लोकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. लवकरच आर्थिक मंदी येण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच बेझोस यांनी केले आहे. आपल्या खिशात सध्या पैसे राखून ठेवा. मोठ्या वस्तुंची घरेदी करण्याचे टाळा, असे बेझोस म्हणाले आहेत.

  • सीएनएन या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना बेझोस यांनी वरील विधान केले आहे. “सध्या कोणतीही जोखीम पत्करू नका. तुमच्याकडील पैसे राखून ठेवा. थोडीजरी जोखीम टळली तरी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही सध्या मोठ्या स्क्रीनचा टीव्ही, शितकपाट, किंवा नवे महागडे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आणखी थोडी वाट पाहा. तुमचे पैसे सध्यातरी राखून ठेवा. सध्या अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत नाही. सध्या अनेक क्षेत्रांमधील कंपन्या नोकरपात करत आहे. उलाढाल मंदावली आहे,” असे सूचक विधान जेफ बेझोस यांनी केले आहे.

  • याच मुलाखतीत बोलताना काही संपत्ती दान करणार असल्याचे बेझोस यांनी सांगितले. जे लोक मानवतेसाठी काम करत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या संपत्तीतील काही भाग दान करणार आहे, असे बेझोस म्हणाले आहेत.

भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका: सूर्यकुमारच्या शतकामुळे भारताचा विजय :
  • सूर्यकुमार यादवचे (५१ चेंडूंत नाबाद १११ धावा) आक्रमक शतक आणि दीपक हुडाच्या (१० धावांत ४ बळी) प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ६५ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

  • सूर्यकुमारने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध करताना आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९१ अशी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १८.५ षटकांत १२६ धावांत आटोपला. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर फिन अॅलन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉन्वे (२५) आणि कर्णधार केन विल्यम्सनने (६१) यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. हे दोघे माघारी परतल्यानंतर इतर फलंदाजाना चमक दाखवता आली नाही. भारताकडून मोहम्मद सिराज (२/२४) आणि यजुर्वेद्र चहल (२/२६) यांनीही चांगली गोलंदाजी केली.

  • त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऋषभ पंतला सलामीला पाठवले. मात्र त्याला केवळ ७ धावाच करता आल्या. त्यानंतर सलामीवीर इशान किशन (३१ चेंडूंत ३६) आणि लयीत असलेल्या सूर्यकुमारने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. विशेषत: सूर्यकुमारने चौफेर फटकेबाजी करत सर्वाचे लक्ष वेधले. त्याने आपल्या या शतकी खेळीत ११ चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे काही काळ सामना थांबला होता, पण याचा सूर्यकुमारच्या फलंदाजीवर परिणाम झाला नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने (३/३४) हॅटट्रिक नोंदवली.

नवी दिल्ली - निधीचे भारताकडून स्वागत :
  • इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेचे (कॉप २७) वर्णन ऐतिहासिक परिषद असे भारताने रविवारी केले. कारण या परिषदेत हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे विविध राष्ट्रांत होणाऱ्या मोठय़ा नुकसानाची भरपाई करण्यासाठी निधी उभारण्याचा करार करण्यात आला. जगाने यासाठी खूप प्रतीक्षा केली, अशी प्रतिक्रियाही भारताने दिली आहे.

  • ‘कॉप २७’च्या समारोप सोहळय़ात भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, की, जगाने शेतकऱ्यांवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या (शमन) जबाबदारीचा भार टाकू नये. यजमान इजिप्तला संबोधित करताना यादव यांनी सांगितले, की आपण एका ऐतिहासिक हवामान बदल परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहात. या परिषदेतील करारात नुकसान भरपाई निधीच्या स्थापनेचा अंतर्भाव करण्याचा निर्णय झाला आहे.

  • आता या नव्या निधीची स्थापना झाली आहे. जगाने यासाठी खूप प्रतीक्षा केली. या मुद्दय़ावर सर्वसहमती विकसित करण्याच्या तुमच्या अथक प्रयत्नांबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. हवामान बदलामुळे होणाऱ्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाई निधीची भारतासह गरीब आणि विकसनशील देशांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी होती. यंदाच्या या परिषदेतील हा महत्त्वाचा मुद्दा होता.

युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पाची रशियाकडून मोठी हानी :
  • रशियाच्या लष्कराने रविवारी युक्रेनमधील झ्ॉपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर तोफांचे हल्ले चढवले. यापैकी किमान बारा वेळा या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा युक्रेनची अणुऊर्जा कंपनी एनर्गोअॅटमने केला आहे.

  • या कंपनीने टेलिग्रामवरील संदेशात म्हटले आहे की, हल्ल्यात ज्या सुविधांचे नुकसान झाले आहे, ते पाहता या प्रकल्पाचे युनिट पाच आणि सहा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांनाच लक्ष्य केले गेल्याचे स्पष्ट होत आहे. हे युनिट सुरू झाल्यास युक्रेनला आवश्यक तो वीजपुरवठा करणे शक्य होणार होते.

  • आयएईएचा इशारा - सध्या रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या झ्ॉपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर रविवारी हल्ले झाल्याची गंभीर दखल संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) घेतली असून अशा हल्ल्यांमुळे मोठी आण्विक दुर्घटना होऊ शकते, असा इशारा या संस्थेने दिला आहे. या हल्ल्यांबाबत युक्रेन आणि रशियाने परस्परांवर दोषारोपण केले आहे.

जी-२०’ जाहीरनाम्यात भारताची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेचे प्रतिपादन :
  • ‘जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षांवर ‘आजचे युग युद्धाचे नसावे’ या संदेशाचा समावेश होता. या जाहीरनाम्यासाठीच्या वाटाघाटीत भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली,’ अशी प्रशंसा अमेरिकेने केली आहे.जी-२० शिखर परिषदेचा बुधवारी समारोप झाला.

  • या परिषदेच्या जाहीरनाम्यात रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात या गटाच्या सदस्यांत मतभेद असल्याचे मान्य करण्यात आले. मात्र, या संघर्षांची झळ पोहोचत असलेल्या नागरिकांच्या संरक्षणासह आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे.

  • सप्टेंबरमध्ये समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान मोदींनी यांनी पुतिन यांना उद्देशून ‘आजचे युग युद्धाचे नाही’ हे वक्तव्य केले होते. तेच या जाहीरनाम्याच्या मसुद्यातही समाविष्ट करण्यात आले आहे.

२१ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.