चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ मे २०२२

Date : 21 May, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधूची उपांत्य फेरीत धडक :
  • ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने शुक्रवारी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीला तीन गेममध्ये पराभूत करत थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सहाव्या मानांकित सिंधूने जपानच्या दुसऱ्या मानांकित यामागुचीवर २१-१५, २०-२२, २१-१३ असा ५१ मिनिटे चाललेल्या लढतीत विजय मिळवला.

  • हा सिंधूचा जगज्जेत्या यामागुचीवरील १४वा विजय ठरला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन यू फेईशी होणार आहे. याआधी, आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या उभय खेळाडूंमधील लढतीत पंचांनी एक गुणाचा दंड ठोठावल्यामुळे नाराज झालेल्या सिंधूने सामना गमावला होता.

  • सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. सिंधूने काही चांगले फटके मारत यामागुचीच्या अडचणी वाढवल्या आणि पहिल्या गेमच्या मध्यांतरापर्यंत ११-९ अशी आघाडी मिळवली. यानंतर सिंधूने सलग सात गुणांची कमाई करत गेम २१-१५ असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली.

  • दुसऱ्या गेममध्ये सिंधूने चांगली सुरुवात केली असली तरीही यामागुचीने आपला खेळ उंचावत गुण मिळवले. एकवेळ १६-१६ अशा बरोबरी होती. मात्र, यामागुचीने गेम २२-२० असा जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामन्याच्या निर्णायक गेममध्ये सुरुवातीपासूनच सिंधूने यामागुचीला गुण कमावण्याची कोणतीच संधी दिली नाही. यामागुचीने काही चुका केल्या. याचा फायदा सिंधूने उचलत हा गेम २१-१३ असा जिंकत सामन्यात विजय मिळवला.

पॅन्गाँग परिसरात चीनकडून दुसऱ्या पुलाची उभारणी :
  • पॅन्गाँग सरोवर भागात चीनने कथितरीत्या पुलाची उभारणी सुरू केल्याचे वृत्त असून याबाबत भारताच्या परराष्ट्र खात्याने गुरुवारी सांगितले की, ज्या भागाबाबत ही चर्चा सुरू आहे, तो भाग काही दशके चीनच्या ताब्यात आहे, अशी आमची धारणा आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी सांगितले की, ज्या पुलाबाबत बोलले जात आहे, तो त्या भागात चीन करीत असलेले दुसरे बांधकाम आहे.

  • हा भाग भारत ज्या प्रदेश सीमेबाबत दावा करतो, त्या प्रदेशालगतच आहे, पण भारताने दावा केलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागापासून तो पूर्वेस २० किलोमीटरवर आहे.  बागची पुढे म्हणाले की, आम्ही या कथित पुलाबाबत माध्यमांत आलेले वृत्त पाहिले आहे. मला माहीत नाही, पण तो वेगळा पूल असावा. कुणी सांगते की तो दुसरा पूल आहे किंवा तो सध्याच्या पुलाचा विस्तारही असू शकतो. ज्या भागात हे सुरू आहे तो काही दशके चीनव्याप्त असल्याचे आम्ही मानतो.

  • आम्ही याबाबत लष्करी दृष्टीने टिप्पणी करू शकत नाही, पण यावर संरक्षण खाते योग्यरीत्या सांगू शकेल. या सर्व घडामोडींवर आमचे लक्ष आहे.

विरोधकांच्या सापळय़ात न अडकता राष्ट्रहित जपा!; पंतप्रधान मोदी यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना लक्ष्यनिश्चितीचे आवाहन :
  • आपल्या सरकारची आठ वर्षे सुप्रशासन आणि सामाजिक न्यायाला समर्पित होती. देशापुढील मुख्य मुद्दय़ांना बगल देऊन अन्यत्र लक्ष वेधण्याच्या विरोधकांच्या सापळय़ात न अडकता भाजप नेत्यांनी सदैव राष्ट्रहिताच्या मुद्दय़ांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.

  • जयपूर येथील भाजप पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना मोदी बोलत होते. ते म्हणाले, की देशहिताचे मुख्य मुद्दे घेऊन काम करा. त्यासाठी कमी मेहनतीत फळाची अपेक्षा ठेवणारा ‘शॉर्टकट’ न अवलंबता दीर्घकाळ आणि सातत्याने मेहनतीने आपले लक्ष्य गाठा. भाजपने आगामी २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित करून, ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.  

  • सरकारने आठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आणि वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत कथित शिविलग सापडल्याच्या मुद्दय़ांवरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, की भाजपने विकासाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य पटलावर आणला. मात्र, काही राजकीय पक्ष त्यांच्या क्षणिक फायद्यासाठी राष्ट्राच्या भवितव्याशी धोकादायक खेळ खेळत आहेत.

  • आपल्या स्वार्थासाठी काही पक्ष समाजातील कच्चे दुवे आणि छोटे ताण-तणावांचे मुद्दे हेरून विष कालवण्याचे काम करीत आहेत. जात अथवा प्रादेशिकतेच्या नावाखाली विरोधक जनतेला चिथावणी देत आहेत. अशा पक्ष आणि शक्तींपासून जनतेला सावध करत भाजपने मात्र ‘एक भारत : श्रेष्ठ भारत’ या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहावे, असे आवाहन मोदी यांनी केले. पूर्वी जनसंघ असल्यापासून भाजपचा राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित, राष्ट्रोद्धाराच्या सूत्रांवर भर राहिला आहे, असे मोदी म्हणाले.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता; ‘या’ कारणामुळे घेतला जाणार निर्णय :
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आरोग्यासंदर्भातील समस्यांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. मनसेनं यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तर राज यांच्या या दौऱ्याचं भवितव्य त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने दिलीय.

  • उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध असतानाच आता राज यांना उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे हा दौराच पुढे ढकलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राज ठाकरेंची २२ मे रोजी पुण्यामध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेनंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच राज ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र डॉक्टरांचा नकार असेल तर हा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. राज यांची तब्बेतीच्या कारणास्तव दौरा पुढे ढकलला जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अर्थात ही चर्चा फक्त शक्यतांच्या आधारे केली जात असले तरी राज हे काही दिवसांपूर्वीच पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतल्याच्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिलं जात आहे.

  • काही दिवसांपूर्वी राज अचानक पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परत आले होते. हा दौरा अर्धवट सोडून परत येण्यामागे राज यांना पायाला झालेल्या दुखापतीचं दुखण्याने पुन्हा डोकं वर काढल्याचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती.

  • या दुखापतीसंदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचार घेतले होते. मात्र आता हा त्रास त्यांना पुन्हा सुरु झालाय. अद्याप मनसेतर्फे अधिकृत कोणीही यासंदर्भात सांगितलं नसलं तरी सुत्रांनी ही शक्यता व्यक्त केली आहे.

२१ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.