चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ फेब्रुवारी २०२१

Date : 21 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अंकिता रैनाचे पहिलेवहिले जेतेपद :
  • भारताच्या अंकिता रैना हिने रशियाची साथीदार कॅमिला राखीमोव्हा हिच्या साथीने संघर्षपूर्ण विजय मिळवत पहिल्यावहिल्या डब्ल्यूटीए जेतेपदावर नाव कोरले. अंकिता-कॅमिला जोडीने फिलिप आयलँड करंडक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाच्या जोडीवर विजय मिळवला.

  • अंकिता-कॅमिला जोडीने अ‍ॅना ब्लिंकोव्हा आणि अ‍ॅनास्तेशिया पोटापोव्हा यांच्यावर २-६, ६-४, १०-७ अशी मात केली. या कामगिरीमुळे अंकिताने महिला दुहेरीत ९४व्या स्थानी मजल मारली आहे.

  • अव्वल १०० जणींमध्ये स्थान मिळवणारी अंकिता ही सानिया मिर्झानंतरची भारताची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी अंकिताने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत मुख्य फेरीत स्थान मिळवले होते.

  • आता एकेरीत अव्वल १०० जणींमध्ये स्थान पटकावण्याचे माझे उद्दिष्ट आहे. कॅमिलासोबत मी पहिल्यांदाच खेळत होते. या स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या २० मिनिटेआधी आम्ही एकत्र आलो होतो. कॅमिला ही आक्रमक खेळाडू असून ताकदवान फटके लगावते. आता कामगिरीत सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न असेल.

केंद्र-राज्ये एकत्रित प्रयत्नांचे पंतप्रधानांचे आवाहन :
  • जुनाट व कालबाह्य कायदे मोडीत काढून आम्ही उद्योगस्नेही वातावरण देशात तयार केले, त्यामुळे आता केंद्र व राज्ये यांनी एकत्र येऊन आर्थिक विकासाची गती वाढवली पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

  • निती आयोगाच्या संचालक मंडळ बैठकीत त्यांनी सांगितले, की खासगी क्षेत्राला यात पूर्ण संधी असून सरकारच्या आत्मनिर्भर  योजनेत त्यांनी सहभागी व्हावे. केंद्र व राज्य सरकारे यांनी एकत्र काम केले तरच देशाची प्रगती होणार आहे. सरकारला आर्थिक प्रगतीचे श्रेय खासगी क्षेत्रालाही द्यावे लागणार आहे कारण त्यांचे प्रतिनिधित्वही यात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून देशाला विकासात प्रगतिपथावर नेण्याची गरज आहे.

  • शेती क्षेत्राबाबत त्यांनी सांगितले, की खाद्यतेल उत्पादनात भारत कमी पडत आहे. खाद्यतेलाची आयात कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तेलबियांची लागवड करण्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे. राज्यांनी तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर काही नियम कमी केले पाहिजेत, कारण काही नियम व कायदे आता कालबाह्य झाले आहेत.

ऑक्टोबरपासून राज्यांना जीएसटी भरपाईपोटी एक लाख कोटींचे केंद्राकडून वितरण :
  • मागील चार महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर २०२० पासून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून वस्तू व सेवा कराच्या अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे होत असलेल्या महसुली नुकसानीच्या भरपाईपोटी १ लाख कोटी रुपये वितरित केले गेले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.

  • केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी भरपाईपोटी १७ व्या साप्ताहिक हप्त्याची ५,००० रुपयांची रक्कम शनिवारी २३ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली. परिणामी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या उसनवारीच्या विशेष खिडकीमार्फत केंद्राकडून याकामी वितरित झालेली रक्कम १ लाख कोटी रुपये झाली आहे. यातून राज्यांच्या महसुली नुकसानभरपाईतील तूट जवळपास ९१ टक्के भरून निघाल्याचा केंद्राचा दावा आहे.

  • अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांना जीएसटीच्या अंमलबजावणीने होणारे नुकसान तूर्त पूर्णपणे भरून काढले गेले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

  • जीएसटीच्या अंमलबजावणीने राज्यांच्या होणाऱ्या महसुली नुकसानीच्या भरपाईतील अंदाजे १.१० लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी विशेष कर्ज उभारणीची ही खिडकी केंद्राने ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू केली होती. यातून राज्यांच्या वतीने केंद्राकडून कर्जउचल केली गेली आहे. सरासरी ४.८३ टक्के व्याजदराने ही कर्ज उभारणी तीन व पाच वर्षे मुदतीसाठी केली गेली आहे.

  • राज्यांच्या जीएसटी भरपाईतील तुटीच्या प्रमाणात हे विशेष खिडकीतून उभारलेले कर्ज त्या त्या राज्यांमध्ये विभागले जाणार आहे. आजवर या योजनेतून राज्यांना ९१,४६०.३४ कोटी रुपये, तर दिल्ली, जम्मू व काश्मीर आणि पुड्डुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशांना ८,५३९.६६ कोटी रुपये १७ साप्ताहिक हप्त्यांमध्ये वितरित केले गेले आहेत.

ओसाका चौथ्या विजेतेपदासाठी सज्ज :
  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेली जपानची नाओमी ओसाका आणि अमेरिकेची २२वी मानांकित जेनिफर ब्रॅडी यांच्यात शनिवारी दुपारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. तीन ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरलेल्या ओसाकासमोर अंतिम फेरीत कडवे आव्हान नसल्याने ती चौथ्या जेतेपदासाठी सज्ज झाली आहे.

  • अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासापर्यंत एकही अव्वल खेळाडूचा सामना करावा न लागला तरी पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी ब्रॅडी उत्सुक आहे. पाच महिन्यांपूर्वी अमेरिकन ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवणारी ओसाका ऑस्ट्रेलियन जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती.

  • अ‍ॅनास्तेशिया पाव्हलुचेंकोव्हा, कॅरोलिन गार्सिया, ओन्स जबेऊर, गार्बिन मुगुरुझा तसेच सेरेना विल्यम्स या तगडय़ा प्रतिस्पध्र्यावर मात केल्याने ओसाकाचा आत्मविश्वास उंचावला आहे. २५ वर्षीय जेनिफर ब्रॅडीने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

२१ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.