चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ ऑगस्ट २०२०

Date : 21 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातील ही तीन विमानतळं अदानी समूहाला देण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

  • लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचे हक्क २०१९ साली खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी उद्योग समुहाला देण्यात आले होते.

  • याच निर्णयाची अंमलबाजवणी करण्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले असून जयपूर, गुवहाटी आणि तिरुअनंतपुरममधील विमानतळाचे हक्क अदानी समुहाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहापैकी लखनौ, अहमदाबाद आणि मंगळूरू विमानतळाचे हक्क अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे असून लवकरच तेही अदानी कंपनीला देण्यात येणार आहेत. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात  भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ :
  • नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ करण्याचे संकेत क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्याला २५ लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला १५ लाख रुपयांचे बक्षीस यापुढे देण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करत आहे. अर्थातच याबाबत अधिकृत घोषणा क्रीडा मंत्रालयाने केलेली नाही.

  • सध्या खेलरत्न पुरस्कार विजेत्याला साडेसात लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला पाच लाखांचे बक्षीस क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येते. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच वाढीव बक्षीस रक्कम पुरस्कारप्राप्त खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे समजते. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण होते. मात्र यंदा करोनामुळे ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन अपेक्षित आहे.

  • ‘‘खेळाडूंनी पुरस्काराची रक्कम कमी असल्याची तक्रार सातत्याने केली आहे. हा सर्व विचार करून बक्षीस रकमेत वाढ करण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जर वाढीव बक्षीस रकमेचा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच पुरस्कारप्राप्त खेळाडूंना त्याचा फायदा होईल,’’ असे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

  • क्रीडा सचिव रवी मित्तल यांनी मात्र याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘‘मला पुरस्कार बक्षीस रक्कम वाढीसंदर्भात कोणतीही माहिती नाही,’’ अशी प्रतिक्रिया मित्तल यांनी दिली. द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या रकमेतही वाढ करून ती १० लाख रुपये करण्यात येण्याचाही विचार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी यंदा एकूण ६२ जणांची शिफारस करण्यात आली.

अपयशी नेतृत्वामुळे अमेरिकी नागरिकांचे जीवन आणि रोजगाराचे नुकसान :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दु:खद घटनांना राजकीय हत्यार बनवले आहे. त्यांच्या अपयशी नेतृत्वाने लोकांचे जीवन आणि त्यांचे रोजगार यांना नुकसान पोहोचवले आहे, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी केला.

  • उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी स्वीकार केल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी डेमोकॅट्रिक पक्षाच्या अधिवेशनात आपले मत मांडले.

  • ट्रम्प यांच्या अपयशी नेतृत्वाने लोकांचे जीवन आणि त्यांचे रोजगार यांना नुकसान पोहोचवले आहे, म्हणून आता आपल्याला अशा अध्यक्षांची निवड करायची आहे जे वेगळे, चांगले आणि महत्त्वपूर्ण काम करतील. असे राष्ट्राध्यक्ष जे आपल्या सगळ्यांना श्वेत, कृष्णवर्णी, लॅटिन, आशियायी, स्वदेशी लोकांना एकत्र आणतील. उज्ज्वल भविष्य मिळविण्याच्या सामूहिक इच्छाशक्तीसाठी आपण एकत्र येऊ, असे आवाहन हॅरिस यांनी केले.

  • हॅरिस यांनी जो बायडेन यांना निवडून देण्यासाठी या वेळी आवाहन केले. त्या म्हणाल्या, वंशभेदावर  कोणतेही ‘व्ॉक्सिन’ नाही. आपल्यालाच वंशभेद दूर करायचा आहे. आपल्या पुढील पिढीला त्यापासून दूर ठेवायचे आहे. जो बायडेन आपल्याला सर्वाना एकत्र आणून अर्थव्यवस्था उभी करताना कोणी मागे राहाणार नाही याची काळजी घेतील. तसेच या महासाथीचाही एकित्रतपणे सामना करतील, असा विश्वासही हॅरिस यांनी व्यक्त केला.  हॅरिस यांनी आपल्या आईच्या आठवणीही जागवल्या.

माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय समितीचे फेसबुकला समन्स :
  • माहिती तंत्रज्ञानासंबंधीच्या संसदीय स्थायी समितीसमोर येत्या दोन सप्टेंबरला हजर होण्यासाठी फेसबुकला समन्स पाठवले आहे. फेसबुकने सत्ताधारी भाजपाच्या काही नेत्यांना हेट स्पीचचा नियम लागू केला नाही असा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गैरवापरासंबंधी चर्चा होणार आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

  • इंटरनेट शटडाऊनच्या विषयावरही समितीमध्ये चर्चा होणार आहे. नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षितता, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखणे, डिजिटल विश्वात महिला सुरक्षेवर या बैठकीत विशेष भर देण्यात येईल. दरम्यान या प्रकरणावरुन जोरदार राजकारणही सुरु आहे.

  • समितीचे वरिष्ठ सदस्य आणि भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून शशी थरुर यांना समितीच्या चेअरमन पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. राजकीय अजेंडयासाठी थरुर या समितीचा वापर करत आहेत असा आरोप केला आहे.

ई-पासबाबत सरकारकडून फेरविचार :
  • एसटी बसमधून ई-पासविना प्रवासाची मुभा असताना खासगी वाहनांना मात्र हा पास बंधनकारक आहे. त्यामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या सरकारने ई-पासच्या धोरणाबाबत फेरविचार सुरू केला आहे. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांशी चर्चा के ली. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • आंतरजिल्हा एसटी बस सेवेला परवानगी देताना, त्यातून प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही, असे परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी बुधवारी जाहीर केले. मात्र खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे एसटी बस आणि खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांना वेगवेगळा न्याय का, असा सवाल करण्यात येऊ लागला. सरकारच्या या धोरणावर समाजमाध्यमांवर टीका सुरू झाली.

  • गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी बाहेर पडू नये, असेच सरकारचे धोरण असल्याची टीका भाजपने केली.

  • ई-पास धोरणाचा फे रविचार करण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस तरी ई-पासमधून सवलत देण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू आहे.

२१ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.