चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 सप्टेंबर 2023

Date : 20 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जेईई, नीट, नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; निकाल असे लागणार
  • एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीने पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांबाबत देशभरातील विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहलेली असते. देशातील आयआयटी प्रवेशासाठी जे ई ई परीक्षा सर्वात महत्वाची असते. या परीक्षेचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी तर दुसरा टप्पा १ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
  • ५ मे रोजी नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी परीक्षा होणार आहे. देशातील केंद्रीय विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा १५ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत. तर पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी  ११ ते २८ मार्च या कालावधीत होईल. युजीसी नेट ही परीक्षा १० ते २१ जून दरम्यान होत आहे.
  • सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना दिल्या जाणार आहे. या सर्व संगणक आधारित परीक्षांचे निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील तीन आठवड्यात जाहीर होतील. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
अमृता शेरगिल यांच्या कलाकृतीला विक्रमी मूल्य; ६१.८ कोटींना चित्राची विक्री
  • सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ या तैलचित्राला ‘सॅफ्रॉनआर्ट’च्या लिलावामध्ये ६१.८ कोटी रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. शेरगिल यांनी १९३७ साली रेखाटलेल्या या चित्राला मिळालेली ही किंमत कोणत्याही भारतीय कलाकाराच्या कलाकृतीला जगभरात मिळालेली सर्वोच्च किंमत आहे.
  • यापूर्वी सय्यद हैदर रझा यांच्या १९८९च्या ‘गेस्टेशन’ या चित्राला गेल्याच महिन्यात पुंडोलेंच्या लिलावात ५१.७५ कोटी रुपये किंमत मिळाली होती. सॅफ्रॉनआर्ट येथे शनिवारी झालेल्या लिलावामध्ये एम एफ हुसैन, वासुदेव गायतोंडे, जामिनी रॉय आणि एफ एस सौझा यासारख्या ७० नामवंत कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश होता.
  • अमृता शेरगिल यांचे ‘द स्टोरी टेलर’ हे चित्र एक मैलाचा दगड आहे. त्यातून त्यांचे कौशल्य आणि अमर वारशाची साक्ष मिळते अशी प्रतिक्रिया ‘सॅफ्रॉनआर्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वझिरानी यांनी व्यक्त केली.अमृता शेरगिल यांची आवडती कलाकृती खुद्द अमृता शेरगिल यांनी ‘द स्टोरी टेलर’ ही आपल्या सर्वोत्तम १२ कलाकृतींपैकी असल्याचे सांगितले होते. हे चित्र त्यांच्या सर्वात प्रामाणिक आणि अभिव्यक्तीपूर्ण रचनांपैकी एक मानले जाते. हे चित्र सर्वात प्रथम नोव्हेंबर १९३७ मध्ये लाहोरच्या फालेती हॉटेल येथे झालेल्या अमृत शेरगिल यांच्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.
भारतासमोर चीनचे आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांना आजपासून सुरुवात
  • अखेरच्या क्षणी संघाची निवड झाल्यामुळे भारतीय फुटबॉल संघ सराव सत्र व पुरेशा विश्रांतीशिवाय मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या साखळी फेरीत चीनचा सामना करेल. इंडियन सुपर लीगच्या काही संघांनी आपल्या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग होण्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे भारताने शुक्रवारी आपल्या अंतिम संघाची घोषणा केली. संघ रविवारी चीनला रवाना झाला, ज्यामध्ये खेळाडूंना एकत्र सराव करण्याची संधी मिळाली नाही.
  • भारताच्या २२ सदस्यीय संघातील दोन खेळाडू बचावपटू कोन्सम चिंगलेनसाना सिंह व लालचुंगनुंगा यांना ‘व्हिसा’ तयार नसल्याने ते नंतर संघासोबत येतील. हे दोघेही चीनविरुद्ध होणाऱ्या सामन्यात उपलब्ध नसतील. त्यामुळे भारताला फटका बसण्याची शक्यता आहे. अनुभवी बचावपटू संदेश झिंगन आणि तारांकित आघाडीपटू सुनील छेत्री पहिल्या सामन्यात खेळणार नाही. कारण संघ व्यवस्थापन त्यांना पुढील दोन सामन्यांत उतरवण्याच्या विचारात आहे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी सांगितले. भारताकडे बांगलादेश (२१ सप्टेंबर) व म्यानमार (२४ सप्टेंबर) संघांविरुद्ध विजयाची संधी जास्त आहे. चीन मजबूत संघ आहे आणि भारतीय संघ पुरेसा सराव व विश्रांतीशिवाय या सामन्यात खेळेल. या सर्व परिस्थितीकडे पाहता मुख्य प्रशिक्षकांना आपली रणनीती आखावी लागली.
  • चीन आपल्या देशात खेळत असल्याचा फायदा त्यांना मिळेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत या दोन्ही देशांमधील अखेरचा सामना २००२ मध्ये कोरियाच्या बुसान येथे झाला होता. त्यावेळी भारताला ०-२ असे पराभूत व्हावे लागले होते. चीनविरुद्ध सामना जिंकण्याची भारताला कमी संधी असल्याची कल्पना स्टिमॅच यांना आहे. ‘‘चीनचा संघ बऱ्याच काळापासून एकत्र सराव करत आहे. त्यांनी मार्चमध्ये मजबूत संघांविरुद्ध चार सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना तीनमध्ये पराभव तर, एका सामन्यात विजय मिळाला. त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. आम्ही साखळी फेरीच्या पुढे आगेकूच करू शकतो. मात्र, त्यासाठी आम्हाला नशिबाचीही साथ मिळायली हवी. यासह संघातील खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीही करावी लागेल,’’ असे स्टिमॅच यांनी सांगितले. संघांची विभागणी सहा गटात करण्यात आली आहे. गटातील शीर्ष दोन संघ आणि दुसऱ्या स्थानावर असणारे चार सर्वश्रेष्ठ संघ उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच करतील.
“भारत चंद्रावर पोहोचला आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय”, नवाझ शरीफ यांचं विधान
  • गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक गर्तेत सापडला आहे. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली असून, इंधन, वीज आणि धान्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिस्थितीला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी माजी लष्करप्रमुख आणि न्यायाधीशांना जबाबदार धरलं आहे. तसेच, ‘भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय,’ असं विधान शरीफ यांनी केलं आहे.
  • लंडनस्थित असलेल्या नवाझ शरीफ यांनी सोमवारी ( १८ सप्टेंबर ) दूरदृष्शप्रणालीच्या माध्यमातून लाहोरमधील पक्षाच्या बैठकीला संबोधित केलं. शरीफ म्हणाले, “भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारताने यशस्वीरित्या जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान जगभरातून पैशांची भीक मागत आहेत. भारताने जे साध्य केलं, ते पाकिस्तान का करू शकला नाही?”
  • “भारत सरकारने १९९० साली आर्थिक सुधारणा केल्या होत्या. त्याचं पालन भारताने केलं,” असा दावा शरीफ यांनी केला आहे.
  • “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा, भारताकडे फक्त १ अब्ज डॉलर होते. पण, आता भारताकडे परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर झाला आहे. भारत आज कुठं पोहोचला आणि काही रूपयांसाठी भीक मागणारा पाकिस्तान मागे का राहिला?” असा सवाल नवाझ शरीफ यांनी उपस्थित केला आहे.
  • दरम्यान, चार वर्षापासून लंडन येथे वास्तव्यास असणारे नवाझ शरीफ पाकिस्तानात परतणार आहेत. “२१ ऑक्टोबरला नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परतणार आहेत,” असं माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितलं.
चांद्रयान-३ साठी लाँचपॅड तयार करणाऱ्या तंत्रज्ञावर इडली विकायची वेळ, व्यथा ऐकून पाणावतील डोळे
  • २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने जागतिक विक्रम केला. भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. अशी कामगिरी करणारा भारत जगातील एकमेव देश ठरला. पण चांद्रयान-३ साठी लाँचर पॅडची निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. यातील काही तंत्रज्ञांवर इडली, चहा आणि तर काहींवर मेमोज विकण्याची वेळ आली आहे.
  • ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, रांची येथील Heavy Engineering Corporation Limited (HEC)ने मागील काही वर्षांत इस्रोसाठी अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेलं लाँचर पॅडही याच कंपनीने निर्माण केल्याचा दावा केला जात आहे. पण या कंपनीच्या २८०० कर्मचाऱ्यांना मागील १८ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. यामुळे रांचीच्या धुर्वा येथील ‘हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’ (HEC) चे कर्मचारी आंदोलन करत आहेत.
  • पगार न मिळाल्याने अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला आहे. एचईसीचे तंत्रज्ञ दीपक कुमार उपरारिया हे गेल्या काही दिवसांपासून इडली विकत आहेत. रांचीच्या धुर्वा भागातील जुन्या विधानभवनासमोर त्यांचं दुकान आहे. ते दररोज सकाळी इडली विकतात आणि दुपारी ऑफिसला जातात. पुन्हा संध्याकाळी ते इडली विकतात आणि मग घरी जातात.

 

ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंदची दमदार कामगिरी :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नामांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची दमदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्याला अमेरिकेच्या १५ वर्षीय ख्रिस्तोफर योकडून पराभव पत्करावा लागला.

  • १७ वर्षीय प्रज्ञानंदने पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे वॅसिल इव्हान्चुक, यान क्रिस्टोफ-डुडा आणि बोरिस गेलफंड या अनुभवी खेळाडूंवर मात केली. त्यामुळे आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसअखेर प्रज्ञानंद गुणतालिकेत अन्य तीन खेळाडूंसह दुसऱ्या स्थानावर होता.

  • जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने तीन सामने जिंकत आणि एक लढत बरोबरीत सोडवत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. मॅग्नसने भारताच्या अर्जुन एरिगेसीवरही मात केली. मात्र, अर्जुनने पहिल्या फेरीतील पराभवानंतर दमदार पुनरागमन करताना सलग तीन लढती जिंकल्या.

महत्त्वाची बातमी - पुढील वर्षीच्या दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या : 
  • राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा ०२ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.

  • फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अमरावती नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

  • १. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – लेखी परीक्षेचा कालावधी मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते सोमवार २० मार्च २०२३

  • २.माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा – गुरुवार ०२ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३

  •  हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

  • मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे.  अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

IRCTC ची नवरात्री निमित्त प्रवाशांना खास भेट; ट्रेनमध्येही मिळणार उपवासाची ‘स्पेशल थाळी’; पाहा कोणते पदार्थ असणार :
  • नवरात्री हा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लवकरच गरब्याचा आवाज आपल्या कानांमध्ये घुमू लागेल. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरबा खेळणाऱ्यांची संख्या जितकी मोठी आहे तितकीच उपवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या काळात लोक कडक उपवास करतात. मात्र, उपवास करत असताना आपल्याला लांबचा प्रवास करावा लागला तर? अशा प्रवासात उपवास करणाऱ्यांची खूपच पंचाईत होते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आयआरसीटीसीने (IRCTC) रेल्वे प्रवाशांना नवरात्रीची खास भेट दिली आहे.

  • भारतीय रेल्वेने नवरात्र स्पेशल मेन्यूला मंजुरी दिली आहे. यानुसार रेल्वेमध्ये उपवास करणाऱ्या प्रवाशांना फलाहाराबरोबरच उपवासात खाण्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. भारतीय रेल्वेच्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीमध्ये फलाहाराची व्यवस्था केली जात आहे. एवढेच नाही तर याची शुद्धता राखण्यासाठी नवरात्रीच्या काळात पॅन्ट्रीमध्ये मांसाहारी पदार्थ तयार केले जाणार नाहीत. आयआरसीटीसीने ‘सप्तक्रांती’ आणि ‘वैशाली सुपरफास्ट’ सारख्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीकार ऑपरेटरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

  • यंदा २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवात अनेक घरांमध्ये घटस्थापना तसेच कुलदेवतेची पूजा केली जाते. यादरम्यान शहरात राहणारे लोक आपल्या घरी जातात. अशा परिस्थितीत उपवास करणाऱ्या लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने ‘सप्तक्रांती’ आणि ‘वैशाली सुपरफास्ट’ सारख्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीकार ऑपरेटरच्या ‘नवरात्र स्पेशल मेन्यू’च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

  • सप्तक्रांती एक्स्प्रेसचे पॅंट्री कार व्यवस्थापक असगर अली सांगतात की, नवरात्रीत तयार होणारे अन्न शुद्ध आणि सात्विक असेल. उपवास करणाऱ्यांना चार प्रकारच्या थाळी दिल्या जातील. २६ सप्टेंबरपासून ही सेवा दिली जाणार आहे.

रशियामुळे भारताला ३५ हजार कोटींचा फायदा; जाणून घ्या नेमकं घडलं काय :
  • रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये कच्चं तेल विकत घेतल्याने भारताला जवळजवळ ३५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. फेब्रवारी महिन्यामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युद्धानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळेच आपला व्यापार सुरु रहावा म्हणून रशियाने भारताला स्वस्त दरामध्ये कच्चं तेल विकण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टांचा फायदा भारताला झाल्याची माहिती या विषयातील तज्ज्ञांनी दिल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

  • याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रशियन फौजांनी युक्रेनवर आक्रमण केलं. त्यावेळी जगभरामध्ये तणावपूर्ण राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच रशियाकडे अनेक वर्षांपासून तेल विकत घेणाऱ्या काही देशांनी निर्बंध लादत रशियाकडून तेल घेणं बंद केलं. या निर्बंधांमुळे रशियाला कच्च्या तेलाचे लाखो पिंप निर्यातीसाठी तयार असूनही देशाबाहेर पाठवता आले नाही.

  • त्यामुळेच रशियाने कच्च्या तेलाच्या जागतील दरांपेक्षा बऱ्याच कमी दराने इतर देशांना तेल विक्री करणं सुरु केलं. त्यावेळी भारताने अमेरिकेसहीत इतर अनेक देशांकडून दबाव टाकला जात असतानाही रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला. सवलतीमध्ये रशियाकडून मिळणारं तेल भारतामध्ये आयात करण्यात आलं.

  • रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये चीननंतर दुसरा सर्वात मोठा देश म्हणून भारताचं नाव घेतलं जाऊ लगालं. त्यावेळी भारतामधील एकूण तेल आयातीपैकी १२ टक्के तेल हे रशियाकडून आयात केलं जात होतं. पूर्वी हीच आकडेवारी एका टक्क्यांहूनही कमी होती. याच वर्षी जुलै महिन्यामध्ये रशिया भारताला तेल पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश ठरला. सौदी अरेबिया सध्या भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑगस्ट महिन्यात भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये रियाद दुसऱ्या स्थानी असून रशिया तिसऱ्या स्थानी आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.

आता भारतीयांपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेलाही परत हवाय ‘त्यांचा कोहिनूर’; जाणून घ्या ५०० कॅरेटच्या ‘या’ हिऱ्याबद्दल :
  • ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटिश साम्राज्याकडे असलेले इतर देशांमधून नेण्यात आलेले हिरे परत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्रिटनने ‘ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ हा हिरा परत करावा, अशी मागणी दक्षिण आफ्रिकेकडून करण्यात आली आहे. ‘कुलीनन’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा हिरा १९०५ साली दक्षिण आफ्रिकेत उत्खननात सापडलेल्या एका रत्नातून कापण्यात आला होता, असे वृत्त ‘सीएनएन’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादी राज्यकर्त्यांनी हा हिरा ब्रिटिश राजघराण्याकडे सुपुर्त केला होता. दक्षिण आफ्रिकेचा ग्रेट स्टार हिरा महाराणीच्या शाही राजदंडावर बसवण्यात आला आहे.

  • ५०० कॅरेटचा हा हिरा परत मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत ऑनलाईन याचिकेवर ६ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ब्रिटनने केलेल्या हानीची भरपाई करावी, दक्षिण आफ्रिकेतून चोरून नेलेले सोने, हिरे परत करावेत, अशा आशयाचे ट्वीट दक्षिण आफ्रिकेच्या संसदेचे सदस्य वुयोल्वेथू झुन्गुला यांनी केले आहे.

  • ब्रिटिशांकडे असलेल्या भारताचा ‘कोहिनूर’ हिरा मायदेशी परतावा यासाठी अनेक दशकांपासून मागणी केली जात आहे. १०५.६ कॅरेटचा ‘कोहिनूर’ हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता. त्यानंतर शतकानुशतके या हिऱ्याचे मालक बदलत गेले.

  • १८४९ साली ब्रिटिशांनी भारतातील पंजाबवर ताबा मिळवल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुकुटात सजवण्यात आला. तेव्हापासूनच हा हिरा ब्रिटनच्या राजमुकुटाचा अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक हिऱ्याच्या मालकीवरुन भारतासह चार देशांमध्ये अनेक शतकांपासून वाद सुरू आहेत. जॉर्ज सहावे यांच्या १९३७ मधील राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांच्या आई महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी प्लॅटिनम धातूच्या मुकुटामध्ये हा हिरा सजवण्यात आला होता. हा मुकुट लंडन टॉवरमध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.

२० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.