चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० सप्टेंबर २०२१

Date : 20 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर :
  • सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ तमिळ भाषेतील हे पुस्तक फ्रँचसह अन्य चार भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तर, मंजुषा कुलकर्णी यांना प्रकाशवाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • सोनाली प्रकाश नवांगुळ, (मूळ गाव- बत्तीस शिराळा) वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या त्यांनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर २००० साली त्या कोल्हापुरात आल्या. हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. २००७ साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन त्या संस्थेतून बाहेर पडल्या.

  • सोनाली नवांगुळ या भारतातल्या ‘स्पर्शज्ञान’ नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून ‘रिलायन्स दृष्टी’ या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात; मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात. अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद’ हे पुस्तक ‘मेनका प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.

विराटनं चाहत्यांना दिला अजून एक धक्का; टीम मॅनेंजमेंटला कळवला ‘हा’ निर्णय :
  • टीम इंडियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विराटने आपल्या चाहत्यांना अजून एक धक्का दिला आहे. विराट कोहलीने आयपीएल २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंचायझीने रविवारी याची माहिती केली. याआधी त्याने टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आयपीएलच्या या हंगामात आरसीबीची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. संघाने ७ पैकी ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहे.

  • आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली. विराट म्हणाला, ”आज संध्याकाळी मी संघाशी बोललो, की कर्णधार म्हणून ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा असेल. मी संघ व्यवस्थापनालाही याबाबत माहिती दिली आहे. हे माझ्या मनात बराच काळ चालले होते. अलीकडेच मी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. जेणेकरून मी कामाचा ताण व्यवस्थापित करू शकेन.”

  • विराट म्हणाला, ”गेली काही वर्षे मी खूप क्रिकेट खेळत होतो. मला स्वतःला ताजेतवाने करायचे होते. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. मी आरसीबी व्यवस्थापनाला हे कळवले आहे की मी संघाशी संबंधित असेल. माझा संघासह ९ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आहे. मी या फ्रेंचायझीसाठी खेळत राहीन. सर्व चाहत्यांचे आभार. हा एक छोटासा स्टॉप आहे. हा प्रवास यापुढेही सुरू राहील. आरसीबी एका बदलातून जात आहे. कारण पुढच्या वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे. मी व्यवस्थापनाला सांगितले आहे, की मी आरसीबी व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघात असण्याचा विचारही करू शकत नाही.”

राज्यभरातील अकृषी विद्यापीठे, महाविद्यालयात ‘NCC Studies’ या वैकल्पिक विषयाला मान्यता :
  • विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत ज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

  • “नागरी सेवा, सैन्य दल, पोलीस आणि इतर संरक्षण दलात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासह त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय म्हणून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.” असं ट्विट राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

  • नागरी सेवा, सैन्य दल, पोलीस आणि इतर संरक्षण दलात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासह त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय म्हणून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • “विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची जाणीव आणि शिस्तबध्दता निर्माण होण्याच्या दृष्टीने तसेच लष्करी सेवेबाबत आकर्षण निर्माण होण्याच्या दृष्टीने सदरचा अभ्यासक्रम उपयुक्त असून, विद्यार्थ्यांना सैन्य दलाचे प्राथमिक प्रशिक्षण या माध्यमातून मिळणार आहे. जय हिंद.” असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री; काँग्रेस हायकमांडचा निर्णय :
  • काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा हरीश रावत यांनी केली आहे. तसेच चन्नी हे संध्याकाळी साडे सहा वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असतील.

  • पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

  • दरम्यान, चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवडीनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले सुखजिंदर सिंग रंधावा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा हायकमांडचा निर्णय असून मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही,” असं त्यांनी म्हटलंय.

लंडनमधील रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची होणार विक्री; ममता बॅनर्जींनी दर्शवली खरेदीची तयारी :
  • लंडनमध्ये ज्या घरात रवींद्रनाथ टागोर राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या या इमारतीची किंमत २,६९९,५०० डॉलर म्हणजेच २७.३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत मालमत्तेच्या किंमती आणि लंडनमध्ये घर ज्या ठिकाणी आहे, ते पाहून फार कमी असल्याचं म्हटलं जातंय.

  • १९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत राहिले होते. दरम्यान, २०१५ मध्ये लंडन दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

  • २०१५ मध्ये लंडनच्या पहिल्या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “टागोर ज्या घरी राहत होते, ते घर खरेदी करण्यास आमचे सरकार उत्सुक आहे. टागोर हे आमचा अभिमान आहेत. ही एक खासगी मालमत्ता आहे म्हणून, मी माझे उच्चायुक्त (त्या वेळी रंजन मथाई) यांना विचारले होते की आपण या इमारतीसाठी सौदा करू शकतो का. त्यावेळी ही मालमत्ता विकली जाणार नव्हती, पण आता त्याची किंमत ठरवण्यात आली आहे.”

  • या घरावर निळ्या रंगाचा फलक लावण्यात आलेला असून प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहत असत, असं त्यावर लिहिलेलं आहे. हा फलक लंडन कंट्री कौन्सिलने लावली होता. दम्यान, आता या घराची जबाबदारी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टवर आहे. टागोर वगळता इतर काही भारतीयांची नावे असलेले निळे फलकही लंडनमध्ये लावण्यात आले आहेत. ज्यात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, अरबिंदो, बाळ गंगाधर टिळक, व्ही.डी. सावरकर आणि व्ही. कृष्णा मेनन यांचा समावेश आहे. “भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर, १८६१-१९४१ आणि १९१२ मध्ये इथे राहिले होते,” असं त्या फलकावर लिहिलेलं आहे.

२० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.