चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० मे २०२१

Date : 20 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनाची दुसरी लाट जुलैमध्ये संपणार; सहा महिन्यांनी येणार तिसरी लाट :
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला ऑक्टोबरनंतर तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीकडून काही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

  • जुलैमध्ये दुसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी समितीन तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो याचाही अंदाज वर्तवला आहे.

  • “महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाण, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी आधीच शिखर गाठलं आहे,” असं समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं आहे. मॉडेलनुसार, तामिळनाडूत २९ मे ३१ मे दरम्यान आणि पुद्दुचेरीत १९ ते २० मे दरम्यान रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

केरळमधील पिनरायी विजयन मंत्रिमंडळ २१ सदस्यांचे :
  • केरळमधील पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) मंत्रिमंडळ २१ सदस्यांचे राहणार असून, त्यात ३ महिला असतील. प्रथमच निवडून आलेल्या काही जणांनाही मंत्री करण्यात आले आहे.

  • मुख्यमंत्री पिनरायी विजयन, तसेच यापूर्वीच्या एलडीएफ सरकारमध्ये मंत्री असलेले के. कृष्णमूर्ती (जद-एस) व ए.के. शशिंद्रन (राकाँ) हे तिघेच नव्या मंत्रिमंडळात कायम राहणार आहेत.

  • सत्ताधारी आघाडीतील महत्त्वाचे भागीदार असलेले माकप व भाकप या दोघांनीही पूर्वीच्या सरकारमधील आपल्या कुणाही मंत्र्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळात प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेल्या जद(एस) व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र पूर्वीच्या मंत्र्यांनाच पुन्हा संधी देण्याचे ठरवले आहे.

  • नव्या मंत्र्यांची खाती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. सेंट्रल स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या एका साध्या कार्यक्रमात नवे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे.

मोठा निर्णय! आता घरातच करु शकता करोना चाचणी; पुण्यातील कंपनीच्या टेस्ट किटला मान्यता :
  • करोना चाचणी करण्यासाठी आता रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातही रॅपिड अँटिजन किटच्या सहाय्याने करोना चाचणी करु शकता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएआर) घरच्या घरी करोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान याचा वापर कसा आणि कोणी करावा यासंबंधी आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहेत.

  • आयसीएमआरने निर्णय जाहीर करताना ज्यांना लक्षणं आहेत तसंच जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असं स्पष्ट केलं आहे. सरसकट चाचणी करु नका असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

  • “पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रत्येकाला ट्रू पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. लक्षंण नसणारे जे रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत त्यांनी तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

जागतिक कसोटी अंतिम सामन्याच्या नियमावलीची भारताला प्रतीक्षा :
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना अनिर्णीत राहिला किंवा बरोबरीत सुटला किंवा पावसामुळे खेळाचे नुकसान झाले, तर कोणते निकष लावले जातील, या प्रश्नांच्या उत्तरांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) प्रतीक्षा आहे.

  • साऊदम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या अंतिम सामन्याची नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर करावी, अशी मागणी ‘बीसीसीआय’ने केली होती. येत्या काही दिवसांत ‘आयसीसी’कडून ही नियमावली स्पष्ट होऊ शकेल.

  • ‘‘हा द्विराष्ट्रीय कसोटी सामना नाही. त्यामुळे नियमावली स्पष्ट होण्याची नितांत आवश्यकता आहे. सामना अनिर्णीत राहिला, बरोबरीत सुटला किंवा दोन्ही संघांचा किमान एकही डाव पूर्ण न होता पावसामुळे अधुरा राहिल्यास कोणते निकष लावण्यात येतील, हे स्पष्ट करण्याचे आवाहन ‘बीसीसीआय’ने केले आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष थांबवण्यासाठी बायडेन यांचा दबाव :
  • पॅलेस्टिनी लोकांशी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक चकमकी थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राायलवरील दबाव वाढवला आहे. दिवसअखेरपर्यंत तणाव लक्षणीयरीत्या कमी व्हावा ही आपली अपेक्षा त्यांनी बुधवारी इस्राायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादात बोलून दाखवली.

  • बायडेन यांनी नेतान्याहू यांना ‘युद्धविरामाच्या मार्गाने जाण्यास’ सांगितल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. या युद्धात दोनशेहून अधिक लोक ठार झाले असल्याने बायडेन यांच्यावर याहून अधिक काही करण्याचा दबाव आहे.

  • अमेरिकेचा मित्र असलेल्या इस्रायलला युद्धविरामासाठी थेट साकडे घालण्याचे त्यांनी बुधवारपर्यंत तरी टाळले होते. त्याऐवजी ‘शांत व सखोल’ कूटनीतीवर बायडेन प्रशासन भर देत आहे.

भारतात करोना रुग्णांत १३ टक्के घट :
  • भारतात करोना रुग्णांच्या प्रमाणात गेल्या आठवड्यात १३ टक्के घट झाली असली तरी, भारतातील करोनाचे प्रमाण अजूनही जगापेक्षा अधिक आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

  • नव्या करोना रुग्णांचे प्रमाण जगात ८६ लाख असून ८६ हजार जण गेल्या आठवड्यात जगभरात नव्याने बळी गेले आहेत, असे साथरोगशास्त्रीय माहितीच्या आधारे दिसून आले आहे. भारतात सर्वाधिक २३ लाख ८७ हजार ६६३ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये ४ लाख ३७ हजार ०७६ नवे रुग्ण असून तीन टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेत २ लाख ३५ हजार ६३८ नवे रुग्ण असून २१ टक्के घट झाली आहे. अर्जेंटिनात १ लाख ५१ हजार ३३२ रुग्ण असून  ८ टक्के वाढ झाली आहे. कोलंबियात ६ टक्के वाढ झाली असून १ लाख १५ हजार ८३४ रुग्ण आहेत. भारतात २७ हजार ९२२ बळी गेले असून ४ टक्के वाढ आहे.

  • नेपाळमध्ये १२२४ नवे बळी गेले असून २६६ टक्के वाढ आहे. इंडोनेशियात ११२५ बळी गेले असून एक लाखात ०.४ बळी आहेत त्यामुळे पाच टक्के वाढ झाली आहे. भारतात गेल्या आठवड्यात २ लाख ७३ हजार ९५७ रुग्ण वाढले असून ही पाच टक्के वाढ आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात सध्या १० लाखात २४.६८ मृत्यू असे प्रमाण असून एकूण २ लाख ७० हजार २८४ बळी गेले आहेत. आग्नेय आशियात २५ लाख रुग्ण वाढले असून तीस हजार नवीन बळी गेले आहेत. त्यामुळे रुग्णात बारा टक्के, तर मृत्यूत ७ टक्के वाढ झाली आहे. गेले नऊ आठवडे रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंतची ती अधिक संख्या आहे.

करोनामुळे आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द :
  • करोनामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. जून महिन्यात आशिया कपचं श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं. मात्र करोनाचं संकट पाहता आयोजकांनी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली. मागच्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र तेव्हाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

  • ‘करोना व्हायरसचं संकट पाहता आम्ही स्पर्धेचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन वर्ष ही स्पर्धा होणार नाही.

  • कारण आशिया कपमधील संघाचं दोन वर्षांचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे २०२३ विश्वचषकानंतर या स्पर्धेचं आयोजन होईल.’ असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी सांगितलं.

२० मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.