२१ जूनला सूर्य अधिकाधिक उत्तरेस असून त्याचे दक्षिणेकडे जाणे अर्थात उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. २१ जूनला उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो व रात्र सर्वात लहान असते. मंगळवारी दिवस सव्वातेरा, तर रात्र पावणेअकरा तासांची असेल, अशी माहिती विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली.
दररोज पूर्वेकडे उगवणारा सूर्य काहीसा दक्षिणोत्तर सरकल्याचा अनुभव येत आहे, याचे कारण पृथ्वीच्या अक्षाने तिच्या परिभ्रमण प्रतलाशी केलेला २३.५ अंशाचा कोन हे आहे. त्यामुळे सूर्य कर्कवृत्त ते मकरवृत्तापर्यंत फिरत असल्याचा भास होत असून यालाच उत्तरायण/दक्षिणायन म्हणतात. २१ जूनपासून सूर्य दक्षिणेकडे सरकून २२ सप्टेंबर या शरद संपातदिनी पुन्हा विषुववृत्तावर व त्यानंतर २२ डिसेंबरला अयनदिनी सूर्य मकरवृत्तावर आल्याने हा दिवस सर्वात लहान तर रात्र सर्वात मोठी असते.
उत्तरायणात सूर्य उत्तर गोलार्धात व दक्षिणायनात सूर्य दक्षिण गोलार्धात झुकलेला दिसतो. २१ जून या सर्वात मोठ्या दिवशी आपल्या भागात दिवस सव्वातेरा तासांपेक्षा अधिक व रात्र मात्र पावणेअकरा तासांची असते. याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मानवी शरीर व मनाचे संबंध अधिक दृढ करून निसर्गाच्या संवर्धनासाठी एकत्र यावे, असे आवाहन विश्वभारती विज्ञान केंद्रच्यावतीने करण्यात आले आहे.
महिंद्रा उद्योग समूहाने लष्करात चार वर्षांच्या सेवेनंतर ‘अग्निवीरांच्या’ भरतीची घोषणा केली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. यासोबतच त्यांनी अग्निवीरांना मिळालेले प्रशिक्षण विशेष असल्याचे सांगितले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, अनेक संघटनांनी सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे.
“अग्निपथ योजनेवर सुरू असलेल्या विरोधामुळे दुःखी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुनरुच्चार केला होता की अग्निवीर जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला विशेषतः रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो, असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अनेक आंदोलकांनी अग्निवीरांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीन योजनेनुसार, अग्निपथद्वारे भरती झालेल्या अग्निवीरांना चार वर्षांसाठी सैन्यात सेवा करण्याची संधी मिळेल. मात्र, या कालावधीनंतर २५ टक्के सैनिकांच्या सेवेचा विस्तार करण्याची चर्चा लष्कराने केली आहे. पूर्वी सैनिक २० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करायचे.
देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. लष्कराने सांगितले की, ‘अग्नवीर’ ही भारतीय सैन्यात एक वेगळी श्रेणी असेल आणि ते कोणत्याही रेजिमेंटमध्ये भरती केले जाऊ शकतात. लष्कराने सांगितले की, अधिकृत गुप्तता कायदा, १९२३ अंतर्गत, अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेदरम्यान मिळालेली गोपनीय माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोताकडे उघड करण्यास मनाई असेल.
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा राष्ट्रार्पण सोहळा आज, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे होणार आह़े
या रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, मडगाव आणि उडपी या तीन स्थानकांवर दुपारी २.४५ वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.
‘भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण मिशन – शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेअंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी देशातील संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील मार्ग ३८२ किलोमीटर, गोवा १६३ किमी, तर कर्नाटकातील मार्ग २९४ किलोमीटर आहे.
या विद्युतीकरण योजनेची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली आणि यंदाच्या मार्च महिन्यात ती पूर्ण झाली. योजनेचा एकूण खर्च १ हजार २८७ कोटी रुपये आहे. ठोकुर-बिजूर, बिजूर ते कारवार, कारवार ते थिविम, थिविम ते रत्नागिरी आणि रत्नागिरी-रोहा अशा पाच टप्प्यांत हे काम पूर्ण करण्यात आले. करोनाकाळातही ते चालू होत़े त्यामुळे सात वर्षांमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले.
कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि प्रतिकूल वातावरणामुळे हे काम आव्हानात्मक होते. मात्र, या परिस्थितीवर मात करत रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण केले. पावसाळय़ात पडणाऱ्या तीव्र पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली. गोव्याकडील भागांतील टप्प्याचे काम सर्वात प्रथम पूर्ण झाले. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे काम करण्यात आले.
सर्वात शेवटी रत्नागिरी ते थिविम या ९० किलोमीटर भागाचे विद्युतीकरण झाले. करबुडेसारखे मोठे बोगदे या मार्गावर असल्यामुळे त्यामध्ये विद्युतीकरणाची यंत्रणा बसवण्याचे सर्वाधिक आव्हान प्रशासनापुढे होते. ते लिलया पार पाडले आहे. सध्या मालगाडय़ा आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी विजेवर चालवली जात आहे. गोव्याकडील कामातील त्रुटी पूर्ण केल्यानंतर लवकरच सर्वच गाडय़ा विजेवर चालवण्यात येणार आहेत.
देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.
‘अग्निपथ’मध्ये भरती होताना अर्जदार तरुणांना, या योजनेच्या विरोधातील जाळपोळीत सामील नसल्याचे किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, ‘‘शिस्त हा भारतीय संरक्षण दलाचा पाया आहे. येथे जाळपोळ-तोडफोड आणि निदर्शनांना थारा नाही.
’’ अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराला या योजनेविरोधातील कोणत्याही स्वरूपाच्या आंदोलनात सामील न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. तसेच प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल. एखाद्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल असेल, तर त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल पुरी यांनी नमूद केले.
तिन्ही सशस्त्र दलांनी रविवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी एक व्यापक कार्यक्रम जाहीर केला. संरक्षण दलातील जवानांचे सरासरी वय कमी करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तिन्ही दलांनी भरती प्रक्रियेचा तपशील जाहीर केला.
भारताची उदयोन्मुख स्क्वॉशपटू अनाहत सिंगने रविवारी कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेतील मुलींच्या १५ वर्षांखालील गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
थायलंडमधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षीय अनाहतने हाँगकाँगच्या क्वोंग एनावर अंतिम सामन्यात ३-० अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच अनाहतने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही व सामना ११-७, १२-१०, ११-५ असा सरळ तीन गेममध्ये जिंकला. तिने अंतिम फेरीपर्यंतच्या आपल्या प्रवासात एकही गेम गमावला नाही. अनाहतने उपांत्य लढतीत मलेशियाच्या अग्रमानांकित इसाबेल विल्सनला ३-० असा पराभवाचा धक्का दिला होता.
अनाहतने आतापर्यंत ४६ राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या असून दोन राष्ट्रीय अजिंक्यपदे आणि दोन आंतरराष्ट्रीय जेतेपदेही तिने पटकावली आहेत. अमेरिकन आणि ब्रिटिश या कनिष्ठ गटांतील दोन स्पर्धा जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. आगामी काळात फ्रान्सच्या नॅन्सी येथे होणाऱ्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती सर्वात युवा खेळाडू ठरेल.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.