चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 डिसेंबर 2023

Date : 20 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘जन मन’ जाणून घेण्याचा प्रयत्न, नमो अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू
  • लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जागा वाटपासह खासदारांच्या पाच वर्षांतील कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. तसंच नव्याने उमेदवारी देण्याकरताही चाचपणी सुरू आहे. या दरम्यान, भाजपानेही आता एक सर्वेक्षण सुरू केले आहे. यानुसार ते खासदारांच्या कामकाजाबाबत मतदारांकडूनच माहिती घेत आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जन मन सर्वेक्षण सुरू केले. नमो अॅपवर हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं असून या माध्यमातून खासदारांच्या कामगिरीबद्दल लोकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. खासदारांनी केलेली विकासकामे, केंद्रीय योजना याचा आढावाही या माध्यमातून घेतला जात आहे.
  • ‘जन मन सर्वेक्षणानुसार लोकांचा प्रतिसाद जाणून घेण्यात येत आहे. तसंच, लोकांच्या प्रश्नांमध्ये केंद्रीय स्तरावरील विकास आणि मतदारसंघाशी संबंधित तपशील यांचा समावेश या सर्वेक्षणात असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली असल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे.
  • भाजपच्या सूत्रांनी सांगितले की हे एक अभिनव सर्वेक्षण आहे. ज्याचा उद्देश ‘जन मन’ जाणून घेण्याचा आहे. गेमिफाइड इंटरफेसद्वारे नागरिकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
१४१ खासदारांचे निलंबन केल्यानंतर विरोधकांचे किती खासदार संसदेत उरले?
  • संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. कथितरित्या आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवून मंगळवारी लोकसभेतून आणखी ४९ खासदारांचे निलंबन केल्यामुळे दोन्ही सभागृहातील एकूण निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. मंगळवारी निलंबित केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, मनिष तिवारी आणि कार्ती चिदंबरम अशा नेत्यांचा सहभाग आहे.
  • मागच्या आठवड्यापासून खासदारांचे निलंबन करण्याचे चक्र सुरू झाल्यानंतर आता लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधकांची संख्या कमालीने घटली आहे. दोन्ही सभागृहात विरोधकांचे किती खासदार उरले आहेत. त्यावर टाकलेली ही नजर.

लोकसभेत किती खासदार उरले?

  • लोकसभेतील एकूण खासदारांची संख्या ५४३ एवढी आहे. त्यापैकी विविध कारणांमुळे २१ जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे सध्या लोकसभेचे एकूण संख्याबळ ५२२ एवढे आहे. भाजपा आणि सहकारी पक्षांचे मिळून ३२३ खासदार सभागृहात आहेत. तर विरोधी पक्षांचे १४२ खासदार आहेत. मागच्या आठवड्यात पहिल्यांदा १३ त्यानंतर या आठवड्यात सोमवारी ३३ आणि मंगळवारी ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले. यामुळे लोकसभेतील निलंबित खासदारांची संख्या ९५ एवढी झाली आहे.
  • लोकसभेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी विरोधकांमधील जवळपास दोन तृतीयांश खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहात आता केवळ ४७ खासदार उरले आहेत.

राज्यसभेत किती खासदार उरले?

  • राज्यसभेचे एकूण संख्याबळ २५० इतके आहे. मात्र काही जागा रिकाम्या असल्यामुळे सध्या राज्यसभेत २३८ खासदार आहेत. त्यापैकी ९३ खासदार एकट्या भाजपाचे आहेत. निलंबनाच्या कारवाईत विरोधकांच्या ४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. उर्वरित हिवाळी अधिवेशनासाठी या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यसभेत विरोधकांचे १०० हून कमी खासदार उरले आहेत. राज्यसभेतून विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन झाल्यानंतर संसदेच्या आवारात खासदारांनी निषेध आंदोलन केले.
करोनाच्या ‘जेएन.१’ उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ गटात वर्गीकरण; जाणून घ्या आरोग्यासाठी किती धोकादायक?
  • जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या जेएन.१ या नव्या उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात वर्गीकरण केले आहे. मात्र हा विषाणू लोकांच्या आरोग्यासाठी फार जोखीम निर्माण करणारा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार, जेएन.१ आरोग्यासाठी फार धोकादायक नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या लशी या विषाणूचा प्रतिकार करत असून रुग्णांना आरोग्याच्या धोक्यापासून वाचवत आहेत, असे निवेदन जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. याआधी जेएन.१ विषाणूचा मूळ वंश बीए.२.८६ ला ही ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात टाकण्यात आले होते.

व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय?

  • जागतिक आरोग्य संघटनेकडून करोना विषाणूच्या सर्व प्रकारांना व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट, व्हेरिएंट ऑफ कंसर्न आणि व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंग या तीन श्रेणीत वर्गीकरण केले आहे. जेव्हा एखादा विषाणूचा प्रकार अतिवेगाने अनेक देशांमध्ये पसरत असतो आणि त्या विषाणूचे त्याच्या मूळ प्रकाराहून अधिक वेगळी रुपे आढळून येतात. तेव्हा त्या विषाणूच्या उपप्रकाराला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट या गटात वर्ग केले जाते. तर व्हेरिएंट ऑफ कंसर्न या प्रकारात विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असतो, त्याचवेळी या गटातील विषाणू आरोग्यासाठी समस्या निर्माण करतात आणि रोगप्रतिकारक शक्तीलाही जुमानत नाहीत.
  • अमेरिकेच्या साथ रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ८ डिसेंबर पर्यंत जेएन.१ या उपप्रकारामुळे अमेरिकेत १५ ते २९ टक्के रुग्ण वाढले होते. तसेच सीडीसीच्या वतीने असेही सांगण्यात आले की, या उपप्रकारामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी फार मोठा धोका निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून आलेली नाही. लशीचा आणखी एखादा डोस अमेरिकन नागरिकांना या विषाणूपासून संरक्षण देऊ शकतो.
  • सीडीसीच्या माहितीनुसार जेएन.१ हा उपप्रकार पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आढळून आला होता. मागच्या महिन्यात चीनमध्ये या विषाणूचे सात रुग्ण आढळून आले होते.
‘काशी - तामीळ संगम’… उत्सव की भाजपचा राजकीय कार्यक्रम?
  • पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उत्तर विरुद्ध दक्षिण भारत अशी दरी निर्माण झाली असतानाच ‘काशी – तामीळ संगम’ या १५ दिवसांच्या उत्सवातून केंद्र सरकारने तामीळ भाषकांना उत्तर भारताची संस्कृती आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्याचा कार्यक्रम लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयोजित केला आहे. काशी तामीळ संगमला उत्सवाचे स्वरूप देण्यात येत असले तरी यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा राजकीय हेतू असल्याची चर्चा होत आहे. उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतात बस्तान बसविलेल्या भाजपला अद्यापही दक्षिण भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर तमिळनाडूत राजकीय पोकळी भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या दृष्टीनेच काशी तामीळ संगम या कार्यक्रमाकडे बघितले जात आहे.

काय आहे काशी - तामीळ संगम कार्यक्रम?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात काशी – तामीळ संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काशी आणि तामीळनाडूतील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ३१ डिसेंबरपर्यंत काशीमध्ये चालणाऱ्या या उत्सवाकरिता तमिळनाडूतून तरुण, विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यापारी व उद्योजकांना आणण्यात येणार आहे. गेल्या वर्षी काशी – तामीळ संगम कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. तेव्हा तमिळनाडूतून सुमारे अडीच हजार जणांना काशीचे मोफत दर्शन घडविण्यात आले होेते. हा मुख्यता सांस्कृतिक कार्यक्रम असून, दोन राज्यांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानेच हा कार्यक्रम आयोजित केला जातो, असा केंद्राचा दावा आहे. गेल्या वर्षी काशीनंतर असाच प्रकारचा कार्यक्रम गुजरातमध्ये झाले होता. यंदाही एप्रिलमध्ये सौराष्ट्रात अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तमिळनाडूच्या नागरिकांना काशी, अयोध्यचेे दर्शन घडविण्यात येते. द्रवीडी संस्कृतीचा पगडा असलेल्या तमिळनाडूतील तरुण पिढीमध्ये हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी जास्तीत जास्त तरुणांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत काशीमध्ये आणले जात आहे.

काशी – तामीळ संगम कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश काय आहे?

  • हा कार्यक्रम सांस्कृतिक देवाणघेवणीचा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात येत असले तरी तमिळनाडूत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी भाजपकडून या कार्यक्रमाचा वापर करण्यात येत असल्याची टीका करण्यात येते. दक्षिण भारतात भाजपला अजूनही बाळसे धरता आलेले नाही. कर्नाटकची सत्ता गमवावी लागली. नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला संमिश्र यश मिळाले. केरळमध्ये भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. तमिळनाडूत अण्णा द्रमुकबरोबरील युतीत फक्त चार जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकची सत्ता पक्षाने गमविली. आंध्र प्रदेशातही भाजपची ताकद मर्यादित आहे. उत्तर, पश्चिम व ईशान्य भारतात बस्तान बसविणारा भाजप अजूनही दक्षिण भारतात संधीच्या शोधात आहे. जयललिता यांच्या पश्चात तमिळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. या दृष्टीने तमिळनाडूकडे भाजपचे धुरिण बघत आहे. 
लिलावात मल्लिका सागरकडून मोठी चूक! आरसीबीला संघाला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा बसला फटका
  • आयपीएल २०२४ साठीचा मिनी लिलाव दुबईत पार पडला. या लिलावात काही रेकॉर्डब्रेक बोली पाहायला मिळाल्या. यानंतर उत्साह शिगेला पोहोचला होता. आयपीएलची लिलावकर्ता म्हणून महिला पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. मल्लिका सागर ही दुबईतील आयपीएल २०२४ची लिलावकर्ता होती. तिने आपल्या पहिल्याच लिलावात मोठी चूक केली, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मोठे नुकसान झाले. लिलावात कॅरेबियन खेळाडू अल्झारी जोसेफसाठी तीन संघ लढत असताना ही घटना घडली.
  • वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू अल्झारी जोसेफ त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अल्झारी जोसेफ आयपीएल २०२४ मध्ये एक कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह सामील झाला होता. या खेळाडूसाठी ४ संघांमध्ये रस्सीखेच पाहिला मिळाली, ज्यात सीएसके, आरसीबी, एलएसजी आणि डीसी या संघांचा समावेश होता. प्रथम चेन्नईने जोसेफवर बोली लावली आणि दिल्लीशी लढाई केली. मात्र बोली तीन कोटींवर पोहोचल्यानंतर धोनीच्या संघाने हार पत्करली. मात्र, तीन संघ ठाम राहिले. अखेर आरसीबीने जोसेफला ११.५० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. पण बोली ६.४० कोटींवर पोहोचल्यावर लिलाव करणाऱ्या मल्लिका सागरकडून चूक झाली.
  • यानंतर जेव्हा आरसीबीला बोली लावावी लागली तेव्हा मल्लिका सागरला ६.६० कोटींवरुन पुढे सुरुवात करायची होती. पण ब्रेकनंतर जेव्हा तिने बोलीला सुरुवात केली, तेव्हा तिने ६.८० कोटी रुपयांवर बोलीची सुरुवात केली. यानंतरही बोली सुरूच राहिली आणि अखेर आरसीबीने त्याला ११.५० कोटी रुपयांना विकत घेतले. मल्लिका सागरच्या या चुकीमुळे आरसीबीचे २० लाखांचे नुकसान झाले. कारण तिथे तिने ६ कोटी ६० लाख रुपयांवरुन बोलीला सुरुवात करायची होती, पण तिने ६.८० लाख पासून बोलीला सुरुवात केली.

मल्लिकाने आयपीएलमध्ये इतिहास रचला -

  • मल्लिका सागरने आयपीएल २०२४ च्या लिलावात प्रवेश करून इतिहास रचला होता. तिने ह्यू एडमीड्सची जागा घेतली, जो बर्याच काळापासून प्रक्रियेचा भाग होता. गेल्या १६-१७ वर्षात पहिल्यांदाच एका महिला लिलावकर्तीकडून लिलावात बोली लावली गेली. हा ऐतिहासिक क्षण होता, पण तिच्या २० लाखांच्या चुकीमुळे मल्लिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. हळूहळू लिलाव पुढे नेण्यासाठी, त्याच्याबद्दलचे अनेक मीम्स व्हायरल झाले.

 

जागतिक जैवविविधता करारास मंजुरी; ‘यूएन कॉप १५’ परिषदेत भारतासह २०० देशांच्या स्वाक्षऱ्या :
  • चार वर्षांच्या भरीव वाटाघाटीनंतर भारतासह सुमारे २०० देशांनी जागतिक जैवविविधता संरक्षण व नुकसानभरपाई संबधिचा महत्त्वाचा ऐतिहासिक करार मंजूर केला. संयुक्त राष्ट्रांच्या १५ व्या ‘कॉर्पोरेशन ऑफ पार्टीज’ (यूएन कॉप १५) या जैवविविधता शिखर परिषदेतील वाटाघाटींच्या सर्वंकष विचारमंथनानंतर सोमवारी पहाटे अंतिम सत्रात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चीनच्या अध्यक्षतेखाली झालेला हा करार भूप्रदेश, व सागरी क्षेत्रातील विविध प्रजातींना प्रदूषण, ऱ्हास आणि हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून उद्देशाने करण्यात आला आहे.

  • उपस्थित प्रतिनिधींच्या जोरदार टाळय़ांच्या गजरात, शिखर परिषदेचे अध्यक्ष व चीनचे पर्यावरण मंत्री हुआंग रुनक्यु यांनी ‘कुनिमग-मॉन्ट्रियल करार’ स्वीकारल्याचे घोषित केले. कॉंगोने या करारास पाठिंबा देण्यास नकार देताना विकसनशील देशांसाठी अधिक निधीच्या मागणीची तरतूद असावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांची मागणी अमान्य करण्यात आली.

  • या परिषदेच्या समारोपाच्या एक दिवस आधी हा करार करण्यात आला. ‘कॉप १५’चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या चीनने यापूर्वी २०३० पर्यंत जैवविविधतेसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ३० टक्के भूप्रदेश व सागरी क्षेत्राचे संरक्षण-संवर्धन करण्याचे आवाहन करणारा मसुदा प्रसिद्ध केला होता. सध्या १७ टक्के भूप्रदेश व १० टक्के सागरी क्षेत्र संरक्षित करण्याची तरतूद होती. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी, हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी हे प्रयत्न पुन्हा वाढवण्याची गरज या करारात प्रतिपादित केली आहे.

  • संयुक्त राष्ट्रांच्या निसर्गसंवर्धन मोहिमेचे संचालक ब्रायन ओडोनेल यांनी सांगितले, की जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जागतिक स्तरावर एवढे मोठे लक्ष्य याआधी कधीच निश्चित केले गेले नव्हते. यामुळे आपल्याला नष्ट होत असलेली जैवविविधता रक्षणाची संधी मिळेल. तज्ज्ञांच्या मते जैवविविधतेमध्ये लक्षणीय फरक पडू शकेल, असा स्तर आपण गाठला आहे.

‘मून लायटिंग’ला कायद्याने प्रतिबंधच, सरकारचे संसदेत लेखी उत्तर :
  • कर्मचारी आपल्या मूळ नोकरीव्यतिरिक्त आपल्या मालक-व्यवस्थापनाच्या हितसंबंधांना बाधा आणणारी इतर कोणतीही अतिरिक्त नोकरी किंवा काम कायदेशीर चौकटीनुसार करू शकत नाहीत. मात्र सरकार या विषयावर कोणतेही वेगळे सर्वेक्षण किंवा अभ्यास करत नसल्याची माहिती सरकारकडून संसदेत सोमवारी देण्यात आली.

  • जेव्हा एखाद्या कंपनीचा पूर्णवेळ कर्मचारी त्याच्या मालकाच्या किंवा व्यवस्थापनाला माहिती न देता आणखी एक नोकरी पत्करतो, या प्रकारासाठी इंग्रजीत ‘मून लायटिंग’ हा शब्दप्रयोग केला जातो. विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कर्मचाऱ्यांसंदर्भात असे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडले होते. त्यांच्यापैकी अनेकांनी करोना महासाथीदरम्यान असे प्रकार केले होते.

  • कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत यासंदर्भात दिलेल्या लिखित उत्तरात नमूद केले, की १९४६ च्या औद्योगिक रोजगार कायद्याच्या स्थायी आदेशानुसार कर्मचाऱ्याने आपल्या मालकाच्या हितसंबंधांना बाधा आणणारे कोणत्याही प्रकारचे काम कोणत्याही वेळी करता येणार नाही. त्यानुसार आपल्या मूळ नोकरीव्यतिरिक्त अतिरिक्त नोकरी संबंधितांना पत्करता येणार नाही.

  • मूळ नोकरीव्यतिरिक्त ‘अतिरिक्त नोकरी’ हे नोकरीवरून बडतर्फ करण्याचे कारण होऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर तेली यांनी दिले. या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकण्याचे (कर्मचारी कपात) प्रमाण वाढले असल्याचे सरकारचे निरीक्षण आहे का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल तेलींनी नमूद केले, की औद्योगिक आस्थापनांत नोकऱ्यांसह रोजगार व कर्मचारी कपात ही एक नियमित बाब आहे. कर्मचाऱ्यांच्या संबंधित क्षेत्रातील अतिरिक्त नोकरीमुळे कर्मचारी कपात होत आहे, असे सूचित करणारी कोणतीही विशिष्ट माहिती उपलब्ध नाही.

आज ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल! शिंदे-फडणवीस की मविआ? कोण मारणार बाजी :
  • राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. रविवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

  • पुणे जिल्ह्यासहीत अनेक ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून काही ठिकाणी सकाळी आठ पासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

  • राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडलं. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून आज कोण बाजी मारणार याबद्दल गावागावांमध्ये उत्सुकता आहे.

  • विदर्भाबरोबरच सिंधुदुर्गमधील २९३, कोल्हापूरात ४३१, सोलापूरमध्ये १४१८, नागपूरात २३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये १९६, अहमदनगरमध्ये १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकालही आज जाहीर होणार आहे.

FIFA World Cup 2022 ने भारतातील सर्व विक्रम काढले मोडीत; तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला फायनल सामना :
  • कतार फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना दमदार होता. चढ-उताराच्या सामन्याचा क्लायमॅक्स जोरदार होता आणि अखेर अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. जगभरातील चाहते या सुपरहिट सामन्याचे साक्षीदार बनले. यावेळी फिफा वर्ल्डकपने भारतात एक अप्रतिम विक्रम केला. विशेषत: अंतिम सामना पाहणाऱ्यांची संख्या हा एक विक्रम आहे.

  • रविवारी, १८ डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात मेस्सीच्या संघाने पूर्वार्धात सुरुवातीचे दोन गोल नोंदवून आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या ८०व्या आणि ८२व्या मिनिटाला एमबाप्पेने एकापाठोपाठ दोन गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. यानंतर प्रथम एमबाप्पे आणि नंतर मेस्सीने अतिरिक्त वेळेत गोल केला. स्कोअर पुन्हा बरोबरीत आल्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. येथे अर्जेंटिनाने ४-२ असा सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.

  • वायाकॉम स्पोर्ट्स18 कडे फिफा वर्ल्ड टेलिकास्ट करण्याचे अधिकार होते. सर्व सामने अतिशय जबरदस्त पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणले गेले. याशिवाय, सर्व ६४ सामने जिओ सिनेमावर भारतात लाइव्ह पाहण्यात आले. डिजिटल व्ह्यूअरशिपच्या बाबतीत, फिफा विश्वचषकादरम्यान ११० दशलक्षाहून अधिक लोकांनी सामने पाहिले.

  • चित्तथरारक फिफा विश्वचषक फायनलबद्दल बोलायचे, तर हा एकच सामना पाहणाऱ्यांच्या संख्येने विक्रम केला आहे. ज्याचे आकडे समोर आले आहेत. त्यावरून देशातील फुटबॉलच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येईल. स्पोर्ट्स18 आणि जियो सिनेमावरील अंतिम सामन्याला प्रति मिनिट ४० अब्ज दर्शक मिळाले. एवढेच नाही तर फिफा विश्वचषक पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात अॅप डाउनलोड केले.

वंदे मातरम’च्या या सादरीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेघालय, त्रिपुरा या राज्यांना रविवारी (१८ डिसेंबर, २०२२) भेट दिली. या राज्यांमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. ६,८०० कोटींचे प्रकल्प हे पंतप्रधानांच्या या दौऱ्यातील चर्चेचा विषय होता.

  • यावेळी पंतप्रधानांनी तेथील पारंपारिक पोशाख परिधान केला होता. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तिथल्या कलाकारांनी ‘वंदे मातरम’चे एका वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले

  • नरेंद्र मोदींनी हा व्हिडीओ शेअर करत ‘वंदे मातरमचे अत्यंत उत्तम सादरीकरण ऑक्टेव्ह बँडने केले’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. या सुमधुर सादरीकरणाचा व्हिडीओ अनेक भाजपा नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्वत:च राबवलेल्या सर्वेक्षणातून मस्क यांचा मुखभंग; ट्विटरच्या ‘सीईओ’पदावरून पायउतार होण्याचा बहुमताचा कौल :
  • ट्विटरचा ताबा मिळवल्यापासून सातत्याने वादात आणि चर्चेत असलेले ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांना नेटकरींनी त्यांच्याच सापळय़ात अडकवले. ‘ट्विटरच्या प्रमुखपदावरून मी पायउतार व्हावे का?’ अशी ऑनलाइन मतचाचणी राबवणाऱ्या मस्क यांना ५७.५ ‘मतदारां’नी ‘हो’चा कौल देत धक्का दिला. ‘मतचाचणीच्या निकालाशी मी बांधील राहीन,’असे सर्वेक्षणापूर्वी सांगणाऱ्या मस्क यांनी निकालानंतर मात्र, मौन बाळगले आहे.

  • ट्विटरचे प्रमुखपद स्वीकारल्यापासून मस्क वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. ट्विटरमधील उच्च पदस्थांची हकालपट्टी, नोकरकपात, खातेदार पडताळणीची ‘ब्लू टिक’ अशा निर्णयांमुळे ‘ट्विटर’बद्दल अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. अशातच रविवारी त्यांनी मतचाचणीची टूम काढली. ‘ट्विटरच्या प्रमुखपदावरून मी पायउतार व्हावे का? या मतचाचणीच्या निकालाशी मी बांधिल राहीन’, असे ट्वीट त्यांनी केले. त्यानंतर सोमवार सकाळी या मतचाचणीची मुदत संपेपर्यंत, जवळपास पावणेदोन कोटी ट्विटर वापरकर्त्यांनी या ट्विटरचाचणीत सहभाग् घेतला. त्यापैकी ५७.५ टक्के जणांनी मस्क यांच्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देत त्यांना पायउतार होण्याचा संदेश दिला.

  • ‘काळजीपूर्वक मतदान करा. तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती कदाचित पूर्ण होईल,’असे ट्वीटही मस्क यांनी रविवारी उशिरा केले होते. मात्र, तरीही ‘मतदारांनी’ त्यांच्या विरोधात कौल दिला. या चाचणीवर मस्क यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आजवर राबवलेल्या अशा मतचाचण्यांतील निकालाचे त्यांनी पालन केले आहे. त्यामुळे आता ते ट्विटरच्या प्रमुखपदावरूनही पायउतार होणार का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० डिसेंबर २०२१

 

आनंदी आनंद गडे..! टोक्यो ऑलिम्पिक अन् भारत; ‘या’ ७ पदकांमुळे देशात उसळली आनंदाची लाट :
  • टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी संस्मरणीय ठरले. जपानच्या राजधानीत झालेल्या या खेळांच्या महाकुंभमध्ये भारताने विक्रमी कामगिरी केली.

  • भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताची पदकसंख्या सातवर पोहोचली. यापूर्वी, भारताची सर्वोत्तम कामगिरी सहा पदके होती, जी त्यांनी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये केली होती. मात्र, त्यावेळी भारताला सुवर्ण जिंकता आले नव्हते.

  • टोक्योपूर्वी, २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते, जे नेमबाज अभिनव बिंद्राने जिंकले होते.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? उच्च शिक्षणमंत्र्यांचं मोठं विधान :
  • राज्यात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विचारणा होत आहे. यावर आता स्वतः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीच उत्तर दिलंय.

  • या परीक्षा कशा घ्यायच्या आहेत याचे अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील करोना संसर्गाची स्थिती पाहून तेच यावर निर्णय घेतील अशी माहिती सामंत यांनी दिली.

  • उदय सामंत म्हणाले, “परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायच्या याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.” यावेळी उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या कुलगुरू नेमणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “कुलगुरू पदाच्या नेमणुकीसाठी आम्ही केंद्र शासनाची पद्धत अवलंबली आहे. आम्ही चुकत असू तर केंद्र पण चुकत आहे.”

“अयोध्या-काशीनंतर आता मथुराही गरजेची”; हेमा मालिनींनी केली भव्य कृष्ण मंदिराची मागणी :
  • भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी रविवारी अयोध्या आणि काशीनंतर त्यांचा मतदारसंघ मथुरालाही भव्य मंदिर मिळेल, अशी आशा व्यक्त केली. त्यासाठी हेमा मालिनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या कामाचा हवाला दिला आहे. रविवारी इंदोरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर साहजिकच मथुराही खूप महत्त्वाची आहे, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.

  • एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाजपा खासदार हेमा मालिनी या इंदोरला आल्या होत्या. सोमवारी त्या काशीला जाणार आहेत असे त्यांनी सांगितले. “प्रेम आणि आपुलकीचे प्रतिक असलेल्या मथुरेच्या जन्मभूमी मथुरेच्या खासदार या नात्याने मी म्हणेन की तेथे भव्य मंदिर असावे. तेथे एक मंदिर आधीच आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांनी विकसित केलेल्या काशी-विश्वनाथ कॉरिडॉरसारखे नवीन स्वरूप दिले जाऊ शकते,” असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.

  • एका प्रश्नाच्या उत्तरात हेमा मालिनी म्हणाल्या, “अयोध्या आणि काशीनंतर मथुराही आवश्यक आहे. त्याचेही काम व्हायला हवे, ते अजून झालेले नाही. मथुरेची खासदार असल्याने मला असे म्हणायचे आहे की येथेही कृष्णाचे भव्य मंदिर असावे.”

जूनमध्ये स्वत:ला करोनामुक्त घोषित करणाऱ्या देशात ओमायक्रॉनमुळे पाचवी लाट; ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देण्याचं आवाहन :
  • इस्रायलमध्ये सध्या करोनाची पाचवी लाट आली आहे. जून महिन्यामध्ये स्वत:ला करोनामुक्त घोषित करणारा हा देश आज ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रभावामुळे पुन्हा करोनाच्या विळख्यात अडकलाय. देशाचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी देशातील नागरिकांना लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं. तसेच करोना संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होमसारख्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असंही बेनेट म्हणाले.

  • नफ्ताली बेनेट यांनी रविवारी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी देशाला संबोधित केलं. टिव्हीवरुन प्रसारीत करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये त्यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये प्रवासावर काही प्रमाणात बंधनं घालण्यात आल्याचं सांगितलं.

  • मात्र मागील महिन्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण देशात आढळल्यानंतर निर्बंध घालूनही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केलीय. इतकंच नाही तर पुढील काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या वाढणार असल्याचा अंदाजही पंतप्रधानांनी व्यक्त केला असून यासंदर्भात देशवासियांना इशारा दिलाय.

सरदार पटेल असते तर गोवा लवकर स्वतंत्र झाला असता - पंतप्रधान :
  • देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे आणखी काही काळ जगले असते, तर गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून बराच आधी स्वतंत्र झाला असता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

  • गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी बरेच आधी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी देशातील लोक ते त्या वेळी त्याचा आनंद घेऊ शकले नाहीत, कारण देशाचा एक भाग अद्यापही परदेशी राजवटीखाली असल्यामुळे ते अस्वस्थ होते, असेही मोदी म्हणाले.

  • भारताच्या सशस्त्र दलांनी १९६१ साली ज्या दिवशी गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त केले, त्यानिमित्त दरवर्षी १९ डिसेंबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. ‘सरदार वल्लभभाई पटेल हे आणखी काही काळ जगले असते, तर गोवा आधीच स्वतंत्र झाला असता,’ असे मोदी म्हणाले.

  • नेहरू मंत्रिमंडळात उपपंतप्रधान असलेले पटेल हे १५ डिसेंबर १९५० रोजी मरण पावले. महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग निझामाच्या राजवटीतून स्वतंत्र करण्याचे श्रेय त्यांना आहे. यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना गोवामुक्तीसाठी झालेल्या उशिराबद्दल दोष दिला आहे.

राहुलकडे कसोटी उपकर्णधारपद :
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचे उपकर्णधारपद सलामीवीर केएल राहुलकडे सोपवले आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी शनिवारी दिली.

  • या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; परंतु सरावाप्रसंगी डाव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे रोहितला किमान तीन ते चार आठवडय़ांची विश्रांती घ्यावी लागल्यामुळे रोहितने मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे ही तरतूद केली आहे. २९ वर्षीय राहुलने ४० कसोटी सामन्यांत ३५.१६च्या सरासरीने एकूण २३२१ धावा केल्या आहेत.

  • धावांसाठी झगडणाऱ्या रहाणेला पुन्हा उपकर्णधारपद सोपवणे कठीण मानले जात होते, तर ऋषभ पंतकडे ही जबाबदारी सोपवणे घाईचे ठरले असते. परंतु राहुल हा सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाने खेळत आहे. याशिवाय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये राहुलकडे उपकर्णधारपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

२० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.