चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जुलै २०२२

Date : 2 July, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स - नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी :
  • ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये गुरुवारी ८९.९४ मीटर अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत दुसरे स्थान मिळवले. मात्र, तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत त्याला ९० मीटरचा टप्पा गाठण्यात थोडक्यात अपयश आले.

  • २४ वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.९४ मीटर अंतर पार करत आपला ८९.३० मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रम मोडला. हा विक्रम त्याने पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रस्थापित केला होता. ९० मीटर अंतरापर्यंत पोहोचण्यापासून तो अवघे सहा सेंटीमीटर दूर राहिला. अखेर तीच नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. नीरजने आपल्या इतर प्रयत्नांत ८४.३७ मीटर, ८७.४६ मीटर, ८४.७७ मीटर, ८६.६७ मीटर आणि ८६.८४ मीटर अंतरावर भाला फेकला.

  • जागतिक विजेत्या आणि हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ९०.३१ मीटर अंतर भाला फेकत अग्रस्थान मिळवले. जर्मनीचा जुलिआन वेबर ८९.०८ मीटर अंतरासह तिसरा आला. तर, टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जाकुब वाद्लेचला (८८.५९ मीटर) चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

  • नीरजने या महिन्यात दोनदा अँडरसनहून सरस कामगिरी केली. टुर्कू येथे झालेल्या स्पर्धेत ग्रेनाडाचा खेळाडू तिसरा स्थानी होता, तर कुओर्टेन क्रीडा स्पर्धेत नीरजने ८६.६९ मीटर अंतरासह सुवर्ण कामगिरी केली.

मोदी यांची युक्रेनबाबत पुतिन यांच्याशी चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. रशियाने संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे युक्रेनशी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढावा, या भारताच्या   भूमिकेचा मोदींनी या वेळी पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि अन्नधान्य बाजारपेठेच्या सद्य:स्थितीसह जागतिक मुद्दय़ांवरही चर्चा केली, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे दिली आहे.

  • दोन्ही नेत्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये पुतिन यांच्या भारतभेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. द्विपक्षीय व्यापाराला विशेषत: कृषी क्षेत्रातील उत्पादने, खते आणि औषध उत्पादन क्षेत्रात अधिक प्रोत्साहन कसे देता येईल, यावर विचारविनिमय केला. या वेळी दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि द्विपक्षीय मुद्दय़ांवर नियमित संवाद सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली.

  • पुतिन यांच्याशी चर्चेच्या काही दिवस आधी, मोदींनी ‘जी-७’ सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत युक्रेन संघर्षांसंदर्भात भारत नेहमीच शांतता राखण्याचे समर्थन करेल, असे ठामपणे सांगितले होते. ते म्हणाले होते, की आम्ही सतत संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचा आग्रह धरला आहे.

भारतात आजपासून एकल वापर प्लास्टिकवर बंदी; प्लास्टिक ऐवजी ‘या’ पर्यांयांचा करा वापर :
  • Single Use Plastic Ban Item List केंद्र सरकारने १ जुलैपासून देशात एकल वापर प्लास्टिक (single use plastic) वर बंदी घातली आहे. एकल वापर प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, ज्या आपण एकदाच वापरतो, त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम १५ अंतर्गत ७ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

  • प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) ,प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड, सिगरेटचं पॅकेट, १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी) या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.

  • एकल वापर प्लास्टिकवर बंदी आणणे का आहे गरजेचे - देशात प्रदूषण पसरवण्यामागे एकल वापर प्लास्टिक हे सर्वात मोठे कारण आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात २०१८-१९ मध्ये ३०.५९ लाख टन पेक्षा जास्त एकल वापर प्लास्टिक कचरा निर्माण झाला आणि २०१९-२० मध्ये ३४ लाख टन. एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तूंची पुन:निर्मिती केली जात नाही किंवा त्या जाळल्या जाऊ शकत नाहीत, कारण जळताना त्यातून हानिकारक वायू बाहेर पडतात. अशा परिस्थितीत, पुनर्वापर करण्याशिवाय साठवणूक हा एकमेव मार्ग आहे.

  • एकल वापर प्लास्टिकला पर्याय काय - जेव्हा एकाच वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली जाते तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे पर्याय असू शकतात. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पेंढ्यांऐवजी कागदी स्ट्रॉ. त्याचप्रमाणे बांबूपासून बनवलेल्या इअर बड्स, बांबूपासून बनवलेल्या आईस्क्रीमच्या काड्या, कागद आणि कापडापासून बनवलेले ध्वज, पारंपरिक मातीची भांडी इत्यादींचा वापर एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकऐवजी करता येईल.

शिंदे सरकार राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवीन यादी पाठवणार :
  • मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा कळीचा ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना १२ आमदारांची यादी देण्यात आली होती. ही यादी देऊन जवळपास पावणे दोन वर्षे उलटली, तरीही राज्यपालांकडून या यादीला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला होता.

  • एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळलं. पण अद्याप संबंधित १२ आमदारांच्या यादीला मंजुरी देण्यात आली नाही. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी राज्यपालांना स्मरणपत्र पाठवून संबंधित यादीला मंजुरी देण्याची आठवण करून दिली होती. पण महाविकास आघाडी सरकारने सुचवलेली नावं ही त्या-त्या क्षेत्रातील नसल्याचा आक्षेप राज्यपालांनी घेतला होता. हे कारण देत राज्यपालांनी संबंधित यादी प्रलंबित ठेवली होती.

  • यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार संबंधित १२ जागांसाठी नवीन यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. ही यादीत कोणाची वर्णी लागणार आणि राज्यपाल किती दिवसात संबंधित यादीला मंजुरी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम ठरला, ‘या’ दिवशी होणार मतदान :
  • राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सरकारने कांजूरमार्गमधील मेट्रो स्टेशन पुन्हा आरेमध्ये आणण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का दिलेला असतानाच दुसरीकडे नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनातच ही निवडणूक पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून पत्रकच जारी करण्यात आलं आहे.

  • नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालं होतं. तेव्हापासून उपाध्यक्ष नरहरी झिरवळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय अडथळे येत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परवानगी देण्यासाठी राज्यपालांना विनंती करून देखील ही परवानगी देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सूत्र वेगाने हलू लागली असून तातडीने बोलावण्यात आलेल्या अधिवेशनातच ही निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

  • यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाने पत्रक जारी केलं असून त्यानुसार ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी ही निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

“पुढील अडीच वर्ष हे सरकार नक्की चालणार, कारण…”; मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास :
  • शिवसेनेच्या ३९ बंडखोर आमदारांच्या पाठींब्यावर भाजपाने स्थापन केलेलं सरकार स्थापन केलं सरकार हे उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाचं हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल असं म्हटलं आहे. यामागील कारणाबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.

  • मुलाखतीमध्ये शिंदे यांना हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वाटतं का?, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “पुढील अडीच वर्ष हे सरकार नक्की चालणार कारण आमच्याकडे ५० आमदार आहेत. भाजपाचे ११५ ते १२० जण आहेत. आमच्याकडे एकूण १७० आमदार आहेत. ज्यांच्याकडे बहुमत असतं ते सरकार कार्यकाळ पूर्ण करतं. एक मजबूत सरकार राज्याला मिळालं आहे. हे सामान्य जनतेच्या मनातील सरकार आहे,” असं शिंदे म्हणाले.

  • पुढे बोलताना, “ही (भाजपा आणि शिंदे गट) नैसर्गिक युती आहे. आम्ही बाळासाहेबांचं हिंदूत्व, विकासाचा मुद्दा पुढे घेऊन चाललोय. जे प्रकल्प सुरु आहेत ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं आमचं लक्ष्य आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला त्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आहे,” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • काँग्रेसचं म्हणणं आहे की हे ईडीचं म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, या टीकेच्या आधारावर शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरुन प्रिक्रिया देताना शिंदेंनी, “यावर मी काही बोलू इच्छित नाही. आमचे ते ५० आमदार वेगळी भूमिका स्वीकारतात. ते सत्तेतून बाहेर जातात. सामान्यपणे कोणी सत्ता सोडू पाहत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचं कारण काय आहे? याचं सर्वांनी आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला.

०२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.