चालू घडामोडी आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2023

Date : 19 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
Aditya L1 आणि ISRO चं चॅटिंग सुरु; पृथ्वीपासून ५०,००० किमी दुरून पाठवतोय डेटा, ज्यामुळे..
  • भारताची पहिली वहिली सौर मोहीम आदित्य एल- १ ने आता वैज्ञानिक डेटा (माहिती) गोळा करण्यास सुरुवात केल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि Ions आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांविषयी विश्लेषण करण्यास मदत करतो, असे इस्रोने सोमवारी सांगितले आहे. १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर STEPS सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पट पेक्षा जास्त आहे.

  • इस्रोच्या माहितीनुसार, स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून ५०,००० किमी पुढे जाईपर्यंत डेटा गोळा करणे चालूच होते. स्टेप्सचे प्रत्येक युनिट सामान्य पॅरामीटर्समध्ये कार्यरत आहे असेही इस्रोने सांगितले आहे.

STEPS म्हणजे काय?

  • स्टेप्स हे सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, जे आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोडचा एक भाग आहे. स्टेप्स मध्ये सहा सेन्सर्स आहेत, प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतो आणि सुप्रा-थर्मल आणि आयन मोजतो. कमी आणि उच्च-ऊर्जा कण स्पेक्ट्रोमीटर वापरून हे मोजमाप केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेदरम्यान गोळा केलेला डेटा शास्त्रज्ञांना मदत करणार आहे.”
  • फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) द्वारे इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एसएसी) च्या समर्थनासह स्टेप्स विकसित करण्यात आले आहे. अंतराळयान त्याच्या कक्षेत निश्चित ठिकाणी स्थिरावल्यावर स्टेप्सचे सेन्सर चालू असतील. L1 च्या आसपास गोळा केलेला डेटा अवकाशातील हवामानाविषयी, सौर वारा आणि अॅनिसोट्रॉपी (दिशांनुसार बदलणारे वस्तुमान) याबद्दल माहिती देईल.
गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले…
  • मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचं आगमन कालपासूनच (१८ सप्टेंबर) सुरू झालं आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा लोकांच्या घरोघरी विराजमान झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
  • “सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!” असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोदेखील मोदी यांनी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी काढलेला फोटो मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
  • गणेशोत्सव हा जगभर साजरा केला जाणारा सण असला तरी हा महाराष्ट्राचा आणि मराठी बांधवांचा प्रमुख सण आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरादेखील याच महाराष्ट्राने देशाला दिली आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेत ट्वीट करत देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. इतर राज्यांमधील सणांच्या वेळी पंतप्रधान मोदी त्या-त्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेत शुभेच्छा देत असतात.
  • दरम्यान, देशभरात बॉलिवूड सेलिब्रेटी, कलाकार, खेळाडू आणि राजकीय नेत्यांच्या घरीदेखील लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या घरी काल रात्रीच गणरायाचं आगमन झालं. या दोन्ही कलाकारांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पृथ्वीपेक्षा चौपट मोठा ग्रह नेपच्यूनची १९ सप्‍टेंबरला प्रतियुती; अवकाशात नेमकं काय घडणारं, मानवी जीवनावर काय परिणाम होणार?
  • सूर्यमालेतील सर्वांत दूरचा व पृथ्वीपेक्षा चौपट मोठा असलेल्या नेपच्यून ग्रहाची प्रतियुती १९ सप्टेंबर रोजी होत आहे. प्रतियुतीवेळी पृथ्वीच्या एका बाजूस ग्रह व विरुद्ध बाजूस सूर्य असतो. प्रतियुतीच्या दिवशी ग्रह पूर्वेस सूर्यास्तास उगवतो व रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळतो. तसेच यावेळी तो पृथ्वीजवळ आल्याने मोठा व तेजस्वी दिसतो. या निळसर रंगाच्या ग्रहाला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागणार आहे.
  • जेव्‍हा ग्रह आणि सूर्य पृथ्‍वीच्‍या विरुद्ध दिशेला आणि पृथ्‍वीजवळ असतो, तेव्‍हा त्‍याला प्रतियुती असे म्‍हणतात. या ग्रहाचे निरीक्षण केले असता फिकट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो. १९ सप्टेंबरला हा ग्रह पूर्व क्षितीजावर उगावेल व पश्चिमेकडे मावळेल. रात्रभर आकाशात हा ग्रह दिसेल. मात्र साध्या डोळ्यांनी हा ग्रह पाहता येणार नाही तर यासाठी शक्तिशाली दुर्बिनची आवश्यकता असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी सांगितले.
  • पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहाला १६५ वर्षे लागतात व स्वत:भोवती एक फेरी तो १६ तासांत पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लव्हेरिया यांनी लावला. या ग्रहाला १३ चंद्र आहेत. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन असल्याने हा ग्रह निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८६०० किमी आहे व भुपृष्ठाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सिअस आहे.
  • २४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर-२ हे मानवरहित यान नेपच्यून जवळून गेले होते. पृथ्‍वीपासून या ग्रहाचे अंतर ४.३ अब्‍ज किलोमीटर आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नसल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
नव्या संसद भवनाचा आज श्रीगणेशा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
  • संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज मंगळवारपासून (आज) नव्या इमारतीत होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. जुन्या संसद भवनाप्रमाणे नव्या इमारतीमध्येही नवा इतिहास घडवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
  • संसदेच्या दोन्ही सदनांमधील सदस्यांना मंगळवारी सकाळी ९ वाजता संसदेमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. जुन्या संसद भवनाच्या आवारात सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेतले जाणार आहे. त्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सर्व सदस्य एकत्र जमतील. तिथल्या स्नेहसंमेलनानंतर खऱ्या अर्थाने जुन्या संसद भवनातील अधिवेशनाचे कामकाज संपुष्टात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज नव्या इमारतीमध्ये सुरू होईल.
  • नव्या इमारतीमध्ये अधिवेशनाचे कामकाज घेण्याची तयारी पूर्ण झाली असून तेथील कर्मचारी, सुरक्षारक्षक, मार्शल या सर्वाना नवा पोषाख देण्यात आला आहे. सर्व सदस्य, पंतप्रधान, लोकसभाध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती आदींच्या प्रवेशासाठी स्वतंत्र द्वारांची सुविधा असून तेथे कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. नव्या इमारतीचे २८ मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. रविवारी नव्या इमारतीवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
  • विशेष अधिवेशनामध्ये आठ विधेयकांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडप्रक्रियेमध्ये दुरुस्ती विधेयक, प्रेस व रजिस्ट्रेशनसंदर्भातील विधेयक, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा व अनुसूचित जाती व जमातींसदर्भातील पाच विधेयके संसदेत मंजूर केली जाणार आहेत. मात्र, हीच कार्यक्रमपत्रिका अमलात येईल असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणामध्ये महिला खासदारांची संख्या व योगदान वाढत गेल्याच्या उल्लेख केला होता. त्यामुळे महिला आरक्षणाचे विधेयकही मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक संमत करण्याची मागणी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्क्ष सोनिया गांधी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रातून केली होती. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून सर्वपक्षीय बैठकीमध्येही काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.
महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मत्रिमंडळाची मंजुरी, आज लोकसभेत मांडण्याची शक्यता
  • केंद्र सरकारने बोलावलेलं संसदेचं विशेष अधिवेशन सोमवारपासून (१८ सप्टेंबर) सुरू झालं आहे. हे अधिवेशन नेमकं कशासाठी बोलावलं आहे? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. परंतु, आता या अधिवेशनाचं मुख्य कारण समोर आलं आहे. महिला आरक्षण विधेयक या अधिवेशनाचा केंद्रबिंदू असेल. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
  • या विधेयकाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना बाजूला सारत केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाच्या बहुप्रतिक्षित विधेयकाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर आता महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे. विशेष अधिवेशनातच हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत संकेत दिले होते. विशेष अधिवेशन छोटं असले तरी ऐतिहासिक निर्णय घेतले जातील, असंही ते म्हणाले होते.
  • संसदेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावरील चर्चेची सुरुवात करताना लोकसभेतील भाषणातही मोदींनी महिला आरक्षणावर भाष्य करत संसदेतील महिला खासदारांच्या योगदानाचे कौतुक केले होते. हे कामकाज संपल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या समाजमाध्यमाद्वारे दिली. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी महिला आरक्षणला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्यामुळे संसदेमध्ये या विधेयकाचा मार्ग सुकर असल्याचे मानले जात आहे.
  • दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये महिला आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्याचं पाहायला मिळालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महिला आरक्षणाच्या उल्लेखानंतर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली. काँग्रेसच्या या मागणीला इतर पक्षांकडूनही पाठिंबा मिळू लागला. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच, अन्य पक्षांच्या खासदारांनीही ही मागणी केली. विरोधी पक्षांचे खासदार ही मागणी करत असताना केंद्र सरकारने यावर भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

 

बजरंगची कांस्यकमाई ; जागतिक कुस्ती स्पर्धेतील विक्रमी चौथे पदक :
  • भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रविवारी कांस्यपदकाची कमाई केली.

  • बजरंगने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिव्हेरावर ११-९ अशी सरशी साधली. बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील चौथे पदक ठरले आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे. बजरंगने यापूर्वी २०१३मध्ये बुडापेस्ट आणि २०१९मध्ये नूर-सुलतान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य, तर २०१८मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

  • ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन दिआकोमिहालीसकडून बजरंगचा पराभव झाला. परंतु जॉनने अंतिम फेरी गाठल्याने बजरंगला रेपिचेजमधून संधी निर्माण झाली.

  • रेपिचेजमध्ये बजरंगने अर्मेनियाच्या वेझगेन तेव्हनयानवर ७-६ असा निसटता विजय मिळवत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला. मग रिव्हेराला ०-६ अशा पिछाडीनंतरही ११-९ अशा फरकाने नमवत त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली. यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे पदक ठरले. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटनेही कांस्यपदक पटकावले होते.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन :
  • आदिवासीबहुल नंदुरबार या लोकसभा मतदार संघाचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे शनिवारी सकाळी नाशिक येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. सलग नऊ वेळा ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते.  गावित यांच्या पश्चात मुलगी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, मुलगा भाजपचे नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

  • नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ माणिकरावांचे एकखांबी वर्चस्व राहिले. दादा म्हणून ते ओळखले जायचे. गांधी घराण्याशी त्यांचे अतिशय निकटचे संबंध होते. काँग्रेसचा देशातील प्रचाराचा नारळ देखील नंदुरबारमधून फुटायचा. १९६५ मध्ये नवापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.  १९८० मध्ये ते नवापूरचे आमदार झाले. वर्षभरात ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

  • १९८१ साली ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यावेळी ते ४७ वर्षांचे होते. तेव्हापासून २०१४ पर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघावर त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात माणिकराव यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. २०१४ मधील मोदी लाटेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. रविवारी सकाळी नवापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लंडनमध्ये आज अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ; राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी पूर्ण :
  • ब्रिटनच्या दिवंगत सम्राज्ञी एलिझाबेथ यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एकीकडे या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच त्याची सुरक्षा हे सर्वात मोठे आव्हान आहे. जगभरातील ५०० पेक्षा जास्त अतिमहत्त्वाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी उपस्थित असतील. त्यामुळे शहरात न भूतो असा कडेकोट बंदोबस्त आहे. 

  • ‘‘अनेक देशांचे राजे, राण्या, अनेक राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि अन्य महत्त्वाचे नेते सोमवारी लंडनच्या ‘वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे’मध्ये असतील. एवढय़ा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी असण्याची नजिकच्या काळातील हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा,’’ असे लंडनचे महापौर सादिक खान म्हणाले. राजशिष्टाचार पाळून या सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे मोठे आव्हान आहे.  वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेचा परिसर आणि अंत्ययात्रेच्या मार्गावर  हजारो नागरिक जमण्याची शक्यता आहे.

 कडेकोट बंदोबस्त

  • * १० हजार पोलीस, सैनिक तैनात
  • * ब्रिटनमधील सर्व ४३ पोलीसदलांची कुमक
  • * उंच इमारतींवर पोलिसांची गस्त
  • * थेम्स नदीमध्ये नौदल तैनात
  • * ‘ड्रोन’च्या उड्डाणास संपूर्ण बंदी
  • * हिथ्रो विमानतळावरील उड्डाणे रद्द
  • * सर्व कचरापेटय़ा तपासणी करून बंद दूरचित्रवाणीचे पडदे

नागरिकांना राणीचा अंत्यविधी बघता यावा, यासाठी लंडनमध्ये शेकडो दूरचित्रवाणी पडदे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी अंत्यसंस्कारस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रपती मुर्मू लंडनमध्ये दाखल

लंडन :  ब्रिटनच्या दिवंगत सम्राज्ञी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर सोमवारी होत असलेल्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  येथे पोहोचल्या आहेत. त्यांचा हा तीन दिवसीय दौरा आहे. त्यांनी भारत सरकारतर्फे शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. लंडनमधील लँकेस्टर हाउसमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत उच्चायुक्त सुजित घोषही उपस्थित होते. मुर्मू यांनी रविवारी  वेस्टमिन्स्टर सभागृहात ठेवलेल्या महाराणींच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नवा जागतिक विक्रम प्रस्थापित :
  • शनिवारी १७ स्प्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७२ वा वाढदिवस होता. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाने ‘रक्तदान अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. १७ स्प्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला. एका दिवसात एक लाखाहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे ट्वीट

  • याआधीही आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करून ८७ हजार लोकांनी ऐच्छिक रक्तदान करून नवा विक्रम केल्याची माहिती दिली होती. त्यांनी ट्विट केले होते की, ‘आज मला कळविण्यात आनंद होत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृतमहोत्सवाअंतर्गत आतापर्यंत ८७ हजारांहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे, जो एक नवा जागतिक विक्रम आहे. आपल्या लाडक्या प्रधान सेवकाला देशाने दिलेली ही अनमोल भेट आहे, असे ट्वीट मांडविया यांनी केले होते.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृत महोत्सवाचे आयोजन

  • खरं तर, पंतप्रधान मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त, केंद्रीय मंत्र्यांनी नागरिकांना ‘रक्तदान अमृत महोत्सवाअंतर्गत’ रक्तदान करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप किंवा ई-रक्तकोश पोर्टलवर नोंदणी करण्याची विनंती केली होती. ‘रक्तदान – महादान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या रक्तदान अमृत महोत्सवांतर्गत रक्तदान केले. मानवतेच्या या कार्यात सामील होणे खूप आनंददायी आहे. तुम्हीही या महान कार्यात सहभागी व्हा., असे ट्वीट मांडविया यांनी केले होते.

एका दिवसात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट

  • रक्तदान अमृत महोत्सवाची सुरुवात पंतप्रधानांच्या वाढदिवशी म्हणजे शनिवार १७ सप्टेंबरपासून झाली. हा महोत्सव १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट एका दिवसात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे आहे. याशिवाय लोकांना नियमित रक्तदान करण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. एक युनिट म्हणजे ३५० मिली रक्त. केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व मंत्रालये आणि विभाग, स्वयंसेवी संस्था आणि समुदाय संस्था आणि इतर भागधारकांनीही या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

19 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.