चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ ऑक्टोबर २०२२

Date : 19 October, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बेन्झिमा बॅलन डी’ओरचा मानकरी :
  • फ्रान्स आणि रेयाल माद्रिदचा आघाडीचा फुटबॉलपटू करीम बेन्झिमा प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ठरला. गतहंगामात बेन्झिमाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे रेयालने चॅम्पियन्स लीग आणि ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. या पुरस्काराचा गतविजेता लिओनेल मेसीला अव्वल २५ खेळाडूंमध्येही स्थान मिळाले नाही, तर माजी विजेता ख्रिस्टिआनो रोनाल्डो २०व्या स्थानी राहिला.

  • रेमंड कोपा, मिशेल प्लॅटिनी, जीन-पिएर पापिन आणि झिनेदिन झिदान यांच्यानंतर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावणारा बेन्झिमा हा फ्रान्सचा पाचवा खेळाडू ठरला. बेन्झिमाने गेल्या हंगामात ४६ सामने खेळताना ४४ गोल केले, यात चॅम्पियन्स लीगमधील १५ गोलचा समावेश होता. गेल्या हंगामात युएफा नेशन्स लीग जिंकणाऱ्या फ्रान्सच्या संघात बेन्झिमाचा समावेश होता. त्यामुळे सेनेगल व बायर्न म्युनिकचा सादिओ माने, तसेच बेल्जियम व मँचेस्टर सिटीचा केव्हिन डीब्रूएने यांना मागे टाकत बेन्झिमाने बॅलन डी’ओरच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.

  • फ्रान्स फुटबॉल मासिकाच्या वतीने १९५६ सालापासून सर्वोत्तम फुटबॉलपटूला बॅलन डी’ओर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा प्रथमच केवळ गतहंगामातील कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी एका वर्षांतील कामगिरी ग्राह्य धरली जात होती. बेन्झिमाने गतहंगामात सर्व स्पर्धामध्ये आपली छाप पाडली. एका अश्लिलचित्रफीतीच्या प्रकरणात अडकल्याने त्याला जवळपास पाच वर्षे फ्रान्स संघाबाहेर ठेवण्यात आले होते. चौकशीनंतर त्याच्यावरील कारवाई एक वर्षांसाठी करण्यात आली होती. या बंदीतून बाहेर आल्यावर गेल्या वर्षी बेन्झिमा युरो अजिंक्यपद स्पर्धेत खेळला आणि यंदाच्या विश्वचषकातही तो फ्रान्सचे प्रतिनिधित्व करेल.

  • या पुरस्काराचा पहिला विजेता स्टॅनले मॅथ्यूनंतर (१९५६) हा पुरस्कारा पटकावणारा बेन्झिमा दुसरा वयस्त खेळाडू ठरला. महिलांमध्ये स्पेनची अलेक्सिया पुतेयास या पुरस्काराची मानकरी ठरली.

ला नुशिया बुद्धिबळ स्पर्धा - रौनक साधवानीला जेतेपद :
  • भारताचा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने नऊपैकी आठ गुणांची कमाई करत तिसऱ्या ला नुशिया आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नऊ फेऱ्यांअंती नागपूरचा रौनक आणि दुसऱ्या स्थानावरील खेळाडूमध्ये एका गुणाचे अंतर होते.

  • अखेरच्या फेरीत रौनकने स्पेनच्या ग्रँडमास्टर डॅनिल युफाला अवघ्या २० चालींमध्ये पराभूत केले. ग्रँडमास्टर कारेन ग्रिगोरयान (अर्मेनिया) आणि आंतरराष्ट्रीय मास्टर एर्नेस्टो जे फर्नाडेझ गुइलेन (क्युबा) यांनी सात गुणांसह अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.

  • या स्पर्धेत सहभाग नोंदवणारा रौनक हा एकमेव भारतीय बुद्धिबळपटू होता आणि सलग दुसऱ्या वर्षी भारतीय खेळाडूने या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.

BCCIच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती; सचिवपदी जय शाह कायम :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (१८ ऑक्टोबर) बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण पार पडली. या सभेत बिन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिन्नी सौरव गांगुली यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे जय शाह हे सचिवपदी कायम असतील.

  • ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि माजी ‘बीसीसीआय’ अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याही नावांची चर्चा होती. श्रीनिवासन या पदासाठी पात्रही ठरत होते. मात्र, श्रीनिवास यांचे वय ७८ वर्षे असून त्यांच्या उमेदवारीला ‘बीसीसीआय’कडून पाठिंबा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. दुसरीकडे अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशातील निवडणुकीत व्यग्र असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचे नावही वगळण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • बीसीसीआयवरील अन्य नियुक्त्या : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला असतील. सचिवपदी जय शाह यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर सहसचिवपदी देवाजीत सैकिया असतील. खजिनदार म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सौरव गांगुली सलग दुसऱ्यांदा ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवण्यासाठी इच्छुक असतानाही त्याला पद सोडावे लागल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. या चर्चेला राजकीय वळणदेखील मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बिन्नी यांच्या गळ्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

राज्य शासनाच्या कर्माचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार वेतन; शिंदे सरकारचा मोठा निर्णय :
  • राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत असून त्यापूर्वी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  • यासंदर्भात राज्य सरकारने परिपत्रक जारी केले असून ऑक्टोबर महिन्याचे वेतन २१ तारखेला देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

  • राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना होईल. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भातदेखील सूचना देण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकांत म्हटले आहे.

श्रीलंकेच्या शेहान करुनातिलक यांना बुकर :
  • श्रीलंकी लेखक शेहान करुनातिलक यांना ‘सेव्हन मुन ऑफ माली अलमेडा’ या कादंबरीसाठी यंदाचे मानाचे बुकर पारितोषिक जाहीर झाले. श्रीलंकेचा हिंसक इतिहास आणि भूगोल असलेली ही कादंबरी १९८९ सालातील देशाची परिस्थिती तिरकस वर्णनांतून मांडते.

  • यंदा ज्येष्ठ ब्रिटिश बालसाहित्यिक अ‍ॅलन गार्नर (ट्रिकल वॉकर), झिम्बाब्वेमधील प्रसिद्ध लेखिका नोव्हायोलेट बुलावायो (ग्लोरी), आयरिश साहित्यिका क्लेअर किगन (स्मॉल थिंग्ज लाईक दीज), दोन अमेरिकी लेखक अनुक्रमे पर्सिवल एव्हरेट (द ट्रीज) आणि एलिझाबेथ स्ट्राऊट (ओह विल्यम) यांच्या लघुयादीत असलेल्या पुस्तकांमध्ये पुरस्कारासाठी चुरस होती.

  • करुनातिलक यांची पहिली कादंबरी ‘चायनामॅन : द लिजण्ड ऑफ प्रदीप मॅथ्यू’ ही देखील अनेक पुरस्कारांनी गौरविली गेली. दुसरी कादंबरी ‘चॅट्स विथ डेड’ या नावाने २०२० मध्ये प्रकाशित झाली. करोना काळात तिच्यात बदल करून ती ‘सेव्हन मुन ऑफ माली अलमेडा’ या नावाने त्यांनी या वर्षी ब्रिटनमध्ये प्रकाशित केली.

रेड कॉर्नर नोटीस प्रक्रिया गतिमान करावी - पंतप्रधान मोदी यांचे ‘इंटरपोल’ला आवाहन :
  • दहशतवादी, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांसाठी सुरक्षित ठरणारी आश्रयस्थाने नष्ट करण्यात मदत व्हावी, यासाठी ‘इंटरपोल’ने फरार गुन्हेगारांविरुद्धची रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) प्रक्रिया गतिमान करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दहशतवादी आणि गुन्हेगारांची सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करण्यासाठी जागतिक समुदायाने आणखी वेगाने काम करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

  • इंटरपोलच्या ९० व्या महाअधिवेशनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की,  जगाच्या विविध भागांतील गुन्हेगारांची सुरक्षित आश्रयस्थाने संपवण्यासाठी जागतिक सहकार्याची गरज आहे. या आश्रयस्थानांत भ्रष्ट लोक गुन्हेगारीतून मिळणारे पैसे सुरक्षित करण्याचा मार्ग शोधतात. ही अवैध संपत्ती बहुतेकदा जगातील काही गरीबांना लुबाडूनच उभी केली जाते व गैरकृत्यांसाठी वापरली जाते.

१९ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.