चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ ऑक्टोबर २०२१

Date : 19 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विनू मंकड करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुलांचे जेतेपद हुकले :
  • विनू मंकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत (१९ वर्षांखालील) महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत हरयाणाने महाराष्ट्रावर सहा गडी आणि सात चेंडू राखून मात केली.

  • प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचा डाव ५० षटकांत १७२ धावांवर आटोपला. गर्ग सांगवान आणि विवेक कुमार यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवून महाराष्ट्राची एकवेळ ७ बाद ६२ धावा अशी अवस्था केली. परंतु राजवर्धन हंगार्गेकरने ७० धावांची खेळी साकारून महाराष्ट्राला १५० धावांचा पल्ला गाठून दिला.

  • प्रत्युत्तरात, हरयाणाची सुरुवातही खराब झाली. मात्र २ बाद ६ धावांवरून मयांक शंदलिया (नाबाद ८१) आणि कर्णधार निशांत सिंधू (६४) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी रचून हरयाणाचा विजय साकारला.

सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर :
  • दहावीच्या बोर्डाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून, तर बारावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होतील, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी जाहीर केले.

  • जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक प्रमुख विषयांसाठी (मेजर सब्जेक्ट्स) असून, इतर विषयांचे वेळापत्रक शाळांना स्वतंत्रपणे पाठवले जाईल, असे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले.

  • दहावी व बारावीच्या ‘मायनर सब्जेक्ट्स’च्या परीक्षा अनुक्रमे १७ व १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. शैक्षणिक सत्राचे द्विभाजन, दोन सत्रांत परीक्षा आणि अभ्यासक्रमाचे सुसूत्रीकरण  हा २०२१-२२ या वर्षात दहावी व बारावीच्या  परीक्षांसाठी विशेष मूल्यांकन योजनेचा भाग होता.

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री पॉवेल यांचे निधन :
  • अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल यांचे करोनापश्चात प्रकृतीत उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी दिली. ते ८४ वर्षांचे होते. 

  • पॉवेल यांच्या कुटुंबियांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पॉवेल यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांचे  लसीकरणही  झाले होते, अशी माहिती  कुटुंबियांनी दिली. पॉवेल यांच्या रूपाने आम्ही एक असामान्य आणि प्रेमळ पती, वडील, आजोबा आणि महान अमेरिकी असामी गमावली आहे, असेही त्यांच्या कुटुंबियांनी  म्हटले आहे.

  • पॉवेल १९८९ मध्ये पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री आणि ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’चे अध्यक्ष होते. १९९१च्या आखाती युद्धानंतर त्यांची प्रशंसा केली गेली. पॉवेल यांच्याच कारकीर्दीत अमेरिकेने पनामावर आक्रमण केले आणि १९९१ मध्ये कुवैतमधून इराकी लष्कराला हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई केली होती.

  • परंतु २००३ मध्ये इराक युद्धाचे समर्थन करताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला त्यांनी दिलेल्या असत्य माहितीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. सद्दाम हुसैन  यांनी नरसंहारासाठी गुप्तपणे शस्त्रे सज्ज ठेवल्याच्या माहितीचा चुकीचा हवाला त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दिला होता.

स्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेकडून १ कोटीचा दंड :
  • निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सोमवारी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेसह, स्टँडर्ड चार्टर्ड बँक (स्टॅन्चार्ट) या विदेशी बँकेला दंड ठोठावला.

  • स्टेट बँकेकडून १ कोटी रुपयांचा, तर स्टॅन्चार्टकडून १ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. आर्थिक अनियमितता व फसवणुकांचे वर्गीकरण आणि त्यांचे मध्यवर्ती बँकेला नियमित विवरण सादर करण्याच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

  • नियम पालनातील कुचराईमुळे ही कारवाई करण्यात आली असून, बँकेच्या ग्राहकांसोबतच्या व्यवहारावर त्यातून कोणताही परिणाम करण्याचा हेतू नाही, अशी स्पष्टोक्तीही मध्यवर्ती बँकेने निवेदनाद्वारे केली आहे.

१९ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.