चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ ऑक्टोबर २०२०

Date : 19 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला ७५ लाखांचा टप्पा :
  • जगभरातील थैमान घालणाऱ्या करोनाचा संसर्ग हळूहळू कमी जरी होत असला, तरी देखील देशात अद्यापही करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळत आहेत. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ७५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५५ हजार ७२२ नवे करोनाबाधित आढळले असून, ५७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५ लाख ५० हजार २७३ वर पोहचली आहे.

  • देशभरातील एकूण ७५ लाख ५० हजार २७३ करोनाबाधितांमध्ये ७ लाख ७२हजार ५५ अॅक्टिव्ह केसस, डिस्चार्ज मिळालेले ६६ लाख ६३ हजार ६०८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १४ हजार ६१० जणांच्या संख्येचा समावेश आहे.

  • देशात १८ ऑक्टोबर पर्यंत ९,५०,८३,९७६ नमूने तपासल्या गेले. ज्यापैकी ८ लाख ५९ हजार ७८६ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

  • सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले गेले तर करोनाची साथ पुढील वर्षांच्या सुरुवातीपर्यंत नियंत्रणात येऊ शकेल, असे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. आता जिल्हा किंवा राज्य पातळीवर टाळेबंदीची आवश्यकता नाही, असेही या समितीने स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा - इलाव्हेनिलला सुवर्ण, शाहू मानेचा रौप्यवेध :
  • नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारतीय नेमबाज इलाव्हेनिल वालारिवान हिने आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शाहू तुषार मानेने रौप्यपदकाची कमाई केली.

  • बांगलादेश नेमबाजी महासंघातर्फे झालेल्या या स्पर्धेत सहा देशांच्या नेमबाजांनी भाग घेतला होता. ६० वेळा वेध घेणाऱ्या या स्पर्धेत इलाव्हेनिल हिने ६२७.५ गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त के ले. शिओरी हिराटा हिने ६२२.६ गुणांसह रौप्यपदक तर इंडोनेशियाच्या विद्या तोय्यिबा हिने ६२१.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

  • पुरुषांच्या प्रकारात जपानच्या नाओया ओकाडा याने ६३०.९ गुणांनिशी सुवर्णपदकावर नाव कोरले. शाहूने ६२३.८ गुणांसह रौप्यपदक पटकावले. बांगलादेशच्या बाकी अब्दुल्ला याने ६१७.३ गुणांसह कांस्यपदक प्राप्त के ले. इलाव्हेनिल परीक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी न झाल्याने या स्पर्धेत खेळू शकली. शाहूला राष्ट्रीय क्रमवारीनुसार या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.

फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल करोनाचं संकट, शास्रज्ञांच्या समितीचा दावा :
  • फेब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता करोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल.

  • फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर या समितीने असाही दावा केला आहे की भारतात करोनाच्या केसेस या १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत.

  • सध्याच्या घडीला भारतात करोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटलं आहे.

  • सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. या समितीने आणखी एक दावा केला आहे की जर मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन लागू केला नसता तर देशभरात करोनामुळे २५ लाख लोकांचे प्राण गेले असते.

शेतकऱ्यांसाठी केंद्राची मदत आवश्यक :
  • उस्मानाबाद : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे आहे. त्यासाठी राज्य सरकार मदत करीलच, पण भरीव मदतीसाठी आपण खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.

  • पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. जनावरे दगावली आणि घरांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे. राज्य सरकार मदत करील, पण काही मर्यादा आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

  • अतिवृष्टीग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्य़ातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील शेतकऱ्यांशी पवार यांनी संवाद साधला. ‘‘भूकंपासारख्या संकटाला आपण सर्वानी मोठय़ा धीराने तोंड दिले आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानही मोठे आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करणे आवश्यक आहे. मात्र, मदत करण्यासाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी खासदारांसह पंतप्रधांनाची भेट घेण्यात येईल’’, असे पवार म्हणाले.

  • पवार यांनी तुळजापूर येथून पाहणीच्या दौऱ्याची सुरुवात केली. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, लोहारा तालुक्यातील सास्तूर या दरम्यान ठिकठिकाणी थांबून त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. रब्बीच्या पेरणीपूर्वी पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी विनंती शेतकऱ्यांनी पवार यांना केली. त्यावर पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती द्या, असे पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा - कार्लसनला विजेतेपद :
  • ओस्लो : विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अल्टिबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद एक फेरी बाकी ठेवून पटकावले. पारंपरिक (क्लासिकल) प्रकारात झालेल्या या स्पर्धेत त्याने इराणच्या १७ वर्षीय अलिरेझा फिरुझाला पराभूत के ले.

  • नॉर्वे येथील स्टॅवॅँगर शहरात पार पडलेल्या या स्पर्धेत कार्लसनने फिरुझाविरुद्ध काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना रेटी पद्धतीने खेळ सुरू केला. कार्लसनने ६९ चालींमध्ये फिरुझाला नमवले. याबरोबरच ९ फेऱ्यांअखेर १९.५ गुणांची दणदणीत आघाडी घेत कार्लसनने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. फिरुझाने मधल्या टप्प्यावर काही चालींनी कार्लसनला थोडेफार चकित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्लसनने अखेर हत्ती, घोडा या प्याद्यांचा सुरेख वापर करत विजय खेचून आणला. स्पर्धेत फिरुझा १५.५ गुणांसह दुसऱ्या, लेव्हॉन अरोनियान १४.५ गुणांसह तिसऱ्या आणि फॅबियानो कॅरुआना १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत.

  • या स्पर्धेत पाचव्या फेरीत कार्लसनची १२५ सामन्यांची अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली होती. पोलंडच्या जॅन-ख्रिस्तोफ डय़ुडाकडून कार्लसनला पाचव्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र पुढील चार सामने जिंकत कार्लसनने त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले.

१९ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.