देशभरातील सर्व टोलनाके वर्षभरात काढून टाकण्यात येणार असून, ‘जीपीएस’च्या आधारे टोल आकारणी आणि वसुली केली जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते-वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात टोलनाक्यांचा प्रश्न विचारण्यात आला होता. बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी उत्तर प्रदेशमधील टोलवसुलीसंदर्भात उपप्रश्न विचारून शहराच्या हद्दीत ६० किमीऐवजी ४० किमी अंतरात टोल घेतला जात असल्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर गडकरी म्हणाले की, ‘‘काही शहरांच्या हद्दीत टोलनाके उभे करून टोलवसुली केली जाते. अशा पद्धतीने टोलवसुली करणे गैर व अन्यायकारक आहे पण, ही टोलवसुली रद्द केली तर, कंत्राटदारांना नुकसानभरपाई द्यावी लागेल. पण, वर्षभराच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके काढून टाकले जातील’’.
टोलनाक्यांवरील गर्दी व वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ‘फास्टॅग’ यंत्रणा लागू केली असून, आता देशात ९३ टक्के टोलवसुली ‘फास्टॅग’द्वारे होते. लोकांच्या लपवाछपवीच्या प्रवृत्तीमुळे उर्वरित ७ टक्के टोलवसुली प्रत्यक्षपणे करावी लागते. हे वाहनधारक दुप्पट टोल भरायलाही तयार असतात. या लोकांना जीएसटी वा अन्य कर चुकवायचे असतात, त्यांची सरकारदरबारी नोंद होऊ नये अशी त्यांची धडपड असते.
अशा लोकांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याची माहिती गडकरी यांनी दिली. फास्टॅगमुळे वाहनधारकांना प्रत्यक्ष टोल भरावा लागत नाही तर, नोंदणीकृत बँक खात्यातून शुल्क परस्पर वळते करून घेतले जाते.
टीएमसीचा अर्थ ट्रान्सफर माय कमिशन असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरुलिया येथील रॅलीला संबोधित करताना मोदींनी टीएमसी तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. टीएमसीने बंगालमध्ये माओवाद्यांची नवी जात निर्माण केल्याचंही ते म्हणाले आहेत.
“ही भूमी प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या वनवासाची साक्षीदार आहे. या भूमीवर सीताकुंड आहे. जेव्हा सीतामाता तहानेने व्याकुळ होती तेव्हा प्रभू श्रीरामांनी जमिनीवर बाण मारुन पाणी काढलं होतं अशी कथा आहे. आणि याच पुरुलियामध्ये पाण्याची समस्या असणं विडंबना आहे,” असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
नरेंद्र मोदींनी यावेळी ममता बॅनर्जींचं सरकार पुरुलियाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. “आधी डावे आणि नंतर टीएमसी सरकारने पुरुलियामध्ये उद्योग येऊ दिले नाहीत. सिंचनासाठी ज्या पद्दतीचं काम व्हायला हवं होतं तसं काम झालं नाही. पाण्याची कमतरता असल्याने रोज ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याची मला कल्पना आहे. टीएमसी सरकार आपल्या खेळात व्यस्त असून शेतीकडे दुर्लक्ष करत आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
पुढे ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमधील जनता इतकी वर्ष चुकीच्या पद्धतीने सरकार चालवल्याची ममता बॅनर्जी यांना शिक्षा देईल. दीदी म्हणतात ‘खेला होबे’, पण भाजपा म्हणतं ‘विकास होबे’, ‘शिक्षा होबे’. टीएमसीने नवे माओवादी निर्माण केले आहेत ज्याचं काम जनतेचा पैसा लुटणं इतकंच आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.
देशात गेल्या एक दिवसात आणखी ३५ हजार ८७१ जणांना करोनाची लागण झाली असून हा गेल्या १०० दिवसांमधील उच्चांक आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एक कोटी, १४ लाख ७४ हजार ६०५ वर पोहोचली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
देशात सलग आठव्या दिवशी करोनाची लागण होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले असून सध्या एकूण दोन लाख ५२ हजार ३६४ उपचाराधीन रुग्ण आहेत, हे प्रमाण एकूण बाधितांच्या २.२० टक्के इतके आहे.
करोनातून बरे होण्याचे प्रमाण कमी झाले असून सध्या ते ९६.४१ टक्क्यांवर गेले आहे. देशात गेल्या २४ तासांत आणखी १७२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ५९ हजार २१६ वर पोहोचली आहे.
करोनातून आतापर्यंत एक कोटी १० लाख ६३ हजार ०२५ जण बरे झाले आहेत. तर मृत्युदर १.३९ टक्के इतका आहे.
गेल्या एक दिवसात देशात १७२ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ८४ जणांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत एक लाख ५९ हजार २१६ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ५३ हजार ०८० जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
राज्य निवडणुकीच्या काही दिवस आधी चिनी हॅकर्सने पश्चिम ऑस्ट्रेलियन संसदेवर सायबर-हल्ला केला असा आरोप करण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्टने असा निष्कर्ष काढला की हा एक्सचेंज हल्ला चीनकडून झाला असण्याची “जास्त संभाव्यता” आहे, ”असे संसदीय सेवांचे कार्यकारी व्यवस्थापक रॉब हंटर यांनी बुधवारी सांगितले.
तथापि, त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे हल्ल्याच्या स्रोताची पुष्टी करण्यासाठी कोणतीही माहिती नाही.
कोणताही डेटा गमावला नाही आणि सर्व नेटवर्क सुरक्षित आहेत असा संसदेला विश्वास आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी सेंटरने ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० नंतर मायक्रोसॉफ्ट एक्सचेंजच्या मेल सर्व्हरवर काही असामान्य गोष्टी घडल्या असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर डेटा गमावण्याचा धोका कमी करण्यासाठी एक्सचेंज सर्व्हर त्वरित बंद करण्यात आला आणि बाह्य व अंतर्गत मेल ट्रॅफिक थांबवण्यात आले गेले.
नंतर, संसदेने एक्सचेंज मेल सर्व्हरचा व्हायरस नसलेला बॅकअप पुन्हा इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया सुरू केली. सिस्टम परत ऑनलाइन येण्यास सुमारे १९ तास लागले.
इंग्लंडविरुद्ध गुरूवारी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यातून सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धडाक्यात सुरूवात केली. कारकिर्दीतील पहिलाच चेंडू त्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकला आणि त्यावर उत्तुंग षटकार खेचत सूर्यकुमारने आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली.
सहा चौकार आणि तीन षटकरांची बरसात करत आपल्या पदार्पणाच्या खेळीत त्याने ३१ चेंडूत ५७ धावा ठोकल्या. तसं बघायला गेलं तर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. पण त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तिसऱ्या सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर काल झालेल्या चौथ्या सामन्यात सूर्यकुमारला पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत त्याने दमदार अर्धशतक झळकावलं.
सूर्यकुमारच्या विस्फोटक खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडला चौथ्या टी-२० सामन्यात आठ धावांनी धुळ चारली. शानदार खेळीसाठी सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरीच्या बळावर संघात स्थान मिळवणाऱ्या सूर्यकुमारविषयी त्याच्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने २०११ मध्ये एक भविष्यवाणी केली होती.
रोहितने १० डिसेंबर, २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. काही प्रतिभावान खेळाडू येणार आहेत….भविष्यात मुंबईच्या सूर्यकुमार यादववर लक्ष ठेवावं लागेल, असं ट्विट रोहितने चेन्नईमध्ये बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यानंतर केलं होतं. रोहितची ही भविष्यवाणी सूर्यकुमारने आपल्या कालच्या खेळीने खरी ठरवली असून टीम इंडियात दणक्यात एंट्री घेतली आहे.
युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूनेही शानदार विजयासह आगेकूच केली आहे. एच. एस. प्रणॉय आणि बी. साईप्रणितचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
२०१९मध्ये पाच विजेतेपदे जिंकणाऱ्या अल्मोराच्या १९ वर्षीय लक्ष्यने फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या जपानच्या केंटो मोमोटापुढे प्रणॉयचा निभाव लागला नाही. गतवर्षी झालेल्या रस्ते अपघातानंतर डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागलेल्या मोमोटाने प्रणॉयचा ४८ मिनिटांत २१-१५, २१-१४ असा पराभव केला. डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने साईप्रणितला १५-२१, २१-१२, २१-१२ असे पराभूत केले. याचप्रमाणे महिला एकेरीत सिंधूने फक्त २५ मिनिटांत डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफरसेनचा २१-८, २१-८ असा पाडाव केला. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित अकानी यामागुचीशी गाठ पडणार आहे.
मिश्र दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पाची वाटचाल खंडित झाली. जपानच्या युकी कॅनेको आणि मिसाकी मॅटसुटोमो जोडीने पहिल्याच फेरीत सात्त्विक-अश्विनीचा २१-१९, २१-९ असा पराभव केला. डेन्मार्कच्या रासमुस ईस्परसेन आणि ख्रिस्टिन बुश जोडीने प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.