चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ जुलै २०२०

Date : 19 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी :
  • अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मूहूर्त निश्चत होत आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची शनिवारी या संदर्भात बैठक पार पडली. ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने तसे पत्र देखील पाठवण्यात आले आहे. मात्र, नेमकं कोणत्या दिवशी भूमिपूजन करायचं या संदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार आहे.

  • प्रस्तावित राममंदिराच्या मूळ आराखड्यात काही बदल करण्यात आले असल्याची माहिती, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर दिली. आराख़ड्यातील य़ा बदलानुसार मंदिरास आता पाच घुमट असणार आहेत. शिवाय, मंदिराची लांबी, रुंदी व उंची देखील वाढवण्यात आलेली आहे.

  • अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच, न्यासामध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

  • सध्या जगभरासह देशात थैमान घालत असलेल्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मंदीर निर्माण कार्यात अडथळे न उद्भवल्यास, भूमिपूजनानंत साधारण साडेतीन वर्षात मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

अमेरिकेची भारतात ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक :
  • अमेरिकेची भारतातील थेट परकीय गुंतवणूक ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे भारत केंद्री उद्योग गटाने म्हटले आहे.

  • करोना साथीनंतर अनेक अमेरिकी कंपन्यांनी भारत व त्याच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून तेथे गुंतवणूक केली आहे, असे यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश आघी यांनी म्हटले आहे.

  • या वर्षी आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच गुगलने भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून फेसबुक  ट्विटर यांनीही गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत. भारतात गुंतवणूक करण्याबाबत उद्योजकांचा विश्वास वाढला आहे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय मध्य पूर्व व अतिपूर्वेकडील देशातूनही भारतात गुंतवणूक होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

इराणमध्ये अडीच कोटी लोकांना करोनाची बाधा, राष्ट्राध्यक्ष रुहानी यांची माहिती :
  • इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. शनिवारी एका दिवसात इराणमध्ये २ लाख ७१ हजार ६०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती रुहानी यांनी टीव्हीवर दिली. एवढंच नाही तर इराणमध्ये आणखी साडेतीन कोटी लोक करोना पॉझिटिव्ह होऊ शकतात अशीही धक्कादायक शक्यता त्यांनी बोलून दाखवली. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

  • इराणच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात आत्तापर्यंत अडीच कोटी नागरिकाना करोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती रुहानी यांनी त्यांच्या भाषणात दिली. आणखी ३ ते साडेतीन कोटी लोकांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे अशीही भीती त्यांनी बोलून दाखवली. सध्याच्या घडीला २ लाख लोक रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असंही रुहानी यांनी स्पष्ट केलं.

  • तेहरानमध्ये असलेले निर्बंध एका आठवड्याने वाढवण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, बोर्डिंग स्कूल्स, हॉटेल्स, इनडोअर स्विमिंग पूल्स या सगळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. इराणच्या आरोग्य विभागाने मागील २४ तासात इराणमध्ये १८८ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या घडीला इराणमध्ये झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या १३ हजार ९७९ इतकी झाली आहे. इराणची लोकसंख्या ८ कोटी इतकी आहे. इराणच्या मध्यपूर्व भागात करोनाचा प्रभाव जास्त आहे. रविवारपासून २२ शहरांमध्ये तीन दिवसांचा कठोर लॉकडाउन असणार आहे.

अमिरातीत ‘आयपीएल’साठी दोन आव्हाने :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिराती हे सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता ‘बीसीसीआय’समोर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसंदर्भातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा निर्णय आणि केंद्र सरकारची परवानगी ही दोन महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. 

  • ‘आयपीएल’च्या हंगामाचे स्वरूप आणि कार्यक्रमपत्रिका या दोन आव्हानांवर मात केल्यानंतर निश्चित करण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

  • ‘बीसीसीआय’च्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी चार तास ऑनलाइन पद्धतीने चालली. यात ‘आयपीएल’, देशांतर्गत क्रिकेट हंगाम, राष्ट्रीय शिबिरासाठी ठिकाण, भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय हंगाम यावर प्रामुख्याने चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी सोयिस्कर आणि करोनावर उत्तम नियंत्रण यामुळे ‘आयपीएल’च्या चालू वर्षांतील हंगामासाठी अमिरातीबाबत सर्वाचे एकमत झाले.

  • आता ‘बीसीसीआय’ केंद्र सरकारशी याबाबत चर्चा करणार आहे. मात्र ‘आयसीसी’ने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच ‘आयपीएल’बाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत ठरवण्यात आले. ‘आयसीसी’च्या कार्यकारी समितीची बैठक सोमवारी होणार आहे. या बैठकीतच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा निर्णय घेण्यात येईल.

१९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.