चालू घडामोडी आणि दिनविशेष - 19 फेब्रुवारी 2024

Date : 19 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अंतिम लढतीत थायलंडवर मात, अनमोलचा पुन्हा निर्णायक विजय
  • भारतीय बॅडमिंटनचा ताजातवाना चेहरा म्हणून पसंती मिळत असलेल्या १७ वर्षीय अनमोल खरबच्या आणखी एका निर्णायक विजयाने भारतीय महिला संघाने रविवारी आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. भारताने थायलंडचा ३-२ असा पराभव केला. युवा खेळाडूंचे नेतृत्व करताना पी. व्ही. सिंधूच्या नव्या भारतीय संघाने थायलंडच्या साऱ्या अपेक्षा फोल ठरवल्या. दोन वेळच्या कांस्यपदक विजेत्या थायलंड संघाला भारताच्या युवा गुणवत्तेला आव्हान देता आले नाही.या विजयाने भारतीय महिला संघ उबेर चषकासाठी देखील पात्र ठरला. भारतीय महिला संघाचे हे पहिलेच पदक ठरले. यापूर्वी या स्पर्धेत २०१६ आणि २०२० मध्ये भारतीय पुरुष संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. 
  • टाचेच्या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी आवश्यक वेळ घेतल्याचे सिंधूने आपल्या कामगिरीने दाखवून दिले. गेल्या हंगामातील अपयशही सिंधूने खोडून काढले. सिंधूने जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या सुपानिदा काटेथाँगचा २१-१२, २१-१२ असा फडशा पाडून भारताला विजयी सुरुवात करून दिली. पाठोपाठ ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद या युवा जोडीने आपली कामगिरी उंचावताना जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असणाऱ्या जोंगकोल्फान किटिथाराकुल- रिवडा प्रा जोंगजई जोडीचे आव्हान २१-१६, १८-२१, २१-१६ असे संघर्षपूर्ण लढतीत परतवून लावले.
  • दुसऱ्या एकेरीत अश्मिता चलिहाला मात्र, बुसानन ओंगबाम्रुंगफानचे आव्हान परतवून लावता आले नाही. बुसाननने ११-२१, १४-२१ असा विजय मिळविला. दुहेरीत भारताने युवा श्रुती मिश्रा-प्रिया कोंजेंगबाम जोडीला उतरवले. पण, त्यांना बेनयापा एमसार्ड-नुन्ताकार्न एमसार्ड जोडीकडून ११-२१, ९-२१ असा पराभव पत्करावा लागला. अनमोलने निर्णायक एकेरीच्या लढतीत थायलंडच्या पॉर्नपिचा चोएकीवोंगचे आव्हान अगदी सहजपणे २१-१४, २१-९ असे परतवून लावले. 
तलाठी भरती घोटाळा : निवड यादीत टॉपर असलेल्या दोन उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल
  • लातूर येथील गुरू ऑनलाईन एक्झाम सेंटर येथे परीक्षा देणाऱ्या दोन उमेदवारांविरुद्ध धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही निवड यादीत टॉपर आहेत. तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते तर सरासरी आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहे. लातुरातील अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर आली आहे.
  • तलाठी भरतीत ४,६०० पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि टीसीएस आयओएन कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर ५ जानेवारी २०२४ रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे सामान्यकरण करून जिल्हानिहाय निवड याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. लातूर शहरातील गुरू ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा केंद्राचा मालक यात सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
  • स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीत टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत अनेक पुरावे होते, त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत विस्तृत तक्रार दिली होती. परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या कॉम्प्युटरचा एक्सेस एनी डेस्क, टीम व्ह्युअर किंवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवर देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. तलाठी भरतीत लातूर येथील परीक्षा केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारांवर कार्यवाही झाली आहे. परंतु इतर जिल्ह्यातील टॉपरसुद्धा यात सामील असल्याने त्यांची चौकशी कधी असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे. त्या शिफ्ट मधील ०.१% टॉपर उमेदवारांचे गुण सामान्यकरण प्रक्रियेत वापरले गेले होते, पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज असल्यामुळे दिलेल्या गुणांच्या आधारे तलाठ्यांना नियुक्त्या देणार तरी कशा असा सवाल उमेदवार विचारात आहेत. सदर गैरप्रकाराचा तपास न्यायालयीन चौकशी समितीव्दारे करावा म्हणून याआधीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता उच्च तंत्रज्ञानाने घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या पदभरतीचा तपास एसआयटीव्दारे करावा अशी मागणी होत आहे.
  • धाराशिव तहसीलदार निलेश काकडे यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात मयूर दराडे आणि प्रमोद केंद्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २९ आगस्ट २०२३ ला लातूर सेंटरवर घडला.
पूर्व आकाशात अपूर्व अनुभुती, गुरुपुष्यामृत दिनी आकाशातही अमृत योग; नेमके काय घडणार? वाचा…
  • आकाशात दरमहा प्रत्येक ग्रहाजवळ चंद्र आल्याने युती स्वरूपात ग्रह दर्शन होत असते. यापेक्षाही अधिक आनंद दोन ग्रह एकत्र बघतांना होतो. या प्रकारे शुक्र आणि मंगळ ग्रह २२ फेब्रुवारीला एकमेकांच्या अगदी जवळ बघण्याची संधी पहाटे पूर्व क्षितिजावर अनुभवता येणार आहे. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद आकाश प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन विश्वभारतीचे केंद्रप्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.
  • चंद्र रोज बारा अंश सरकून एका दिवसात एक नक्षत्र आणि एका महिन्यात पूर्ण राशीचक्र फिरतो. जेव्हा चंद्र पुष्य नक्षत्रात येईल आणि जर त्या दिवशी गुरुवार असेल तर गुरुपुष्यामृत योग जुळतो. याच दिवशी पूर्व आकाशात शुक्र व मंगळ दर्शनाचा अमृत योग घडून येत आहे. पृथ्वीला सर्वात जवळ असलेला आणि सूर्यमालेत सर्वात जास्त तेजस्वी असलेला शुक्र आणि सूर्यमालेत पृथ्वीनंतरचा लालसर रंगाचा मंगळ ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ बघता येतील. या दोन्ही ग्रहांचे स्थान मकर राशीत बाराव्या अंशावर पहाटे ५.२१ वाजता उगवतील. दोन ग्रहांच्या एकत्रित आल्याने पूर्व क्षितिजावरील हा अनोखा आकाश नजारा सकाळी ६ वाजेपर्यंत नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
  • सूर्यमालेत प्रसिद्ध असलेला शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वी यामध्ये असल्याने याचे उदयास्त पूर्व वा पश्चिम क्षितिजावर होत असतात. मंगळ ग्रहावर लोह खनिज अधिक प्रमाणात असल्याने त्याचा रंग लाल असून आपल्या ‘माउंट एव्हरेस्ट’पेक्षा सुमारे तीन पट उंच असलेले ‘ऑलिंपस्मोन’ हे सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत शिखर आहे, अशी माहिती दोड यांनी दिली.
बारावी, दहावीच्या परीक्षेचं टेन्शन आलंय? सहज आणि मोफत मदत मिळणार!
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीची परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थ्यांचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या दरम्यान होणार आहे.
  • परीक्षेच्या काळात विद्यार्थी नकारात्मक विचार, परीक्षेची भीती, नैराश्य, मानसिक दडपणाखाली असतात. त्यामुळे राज्य मंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांद्वारे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जाणार आहे. मात्र प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्र, बैठकव्यवस्थेबाबत पालक, विद्यार्थ्यांनी समुपदेशकांना प्रश्न विचारू नये अशी सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आली आहे. समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांचा मोदी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले, “सकारात्मक पाऊल उचललं नाही, तर २१ तारखेला…!”
  • गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी प्रदीर्घ असं आंदोलन केलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र झालं असून दिल्लीच्या सीमांवर पोलीस प्रशासनातं कडक सुरक्षा तैनात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता आंदोलक शेतकऱ्यांकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

“जर तुम्हाला वेळच हवा असेल तर…”

  • यासंदर्भात शेतकरी आंदोलक अभिमन्यू कोहड यांनी पीटीआयशी बोलताना केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर नेमकी काय चर्चा झाली? याबाबत माहिती दिली आहे. “आमची सकारात्मक वातावरणात प्रदीर्घ चर्चा झाली. आम्ही सरकारला सांगितलं की तुम्हाला जर वेळ हवा असेल तर आणखी २ दिवस आम्ही देतो. जर तोपर्यंत सरकारनं त्यावर पाऊल उचललं नाही, तर २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शंभू सीमा व खनौरी सीमेवरून आम्ही शांततापूर्ण वातावरणात दिल्लीच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात करू”, असं अभिमन्यू कोहड यांनी सांगितलं.
  • “या दोन्ही सीमांवर आत्तापर्यंत १२५ आणि ७७ शेतकरी जखमी झाले आहेत. जर सरकारकडून हिंसा करण्यात आली, तरी आम्ही शांततापूर्ण मार्गाने त्याला उत्तर देऊ”, असंही कोहड यांनी नमूद केलं.

नाफेडवर आधारित संस्थेकडून शेतकऱ्यांशी कराराचा प्रस्ताव

  • दरम्यान, केंद्र सरकारकडून नाफेडवर आधारित संस्थेकडून शेतकऱ्यांशी पाच वर्षांचे करार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यातून शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळू शकेल, असंही केंद्राकडून प्रस्तावित करण्यात आलं आहे. यासंदर्भात आंदोलक शेतकऱ्यांमध्येही चर्चा होण्याची शक्यता आहे.
आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष; ‘दिवाण-ए-आम’मध्ये साजरी होणार शिवजयंती!
  • महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा उत्सव आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मान्यवर नेतेमंडळींची या सोहळ्याला हजेरी असेल. मात्र, त्याचवेळी गेल्या वर्षीपासू सुरू झालेल्या आग्र्यावरील शिवजयंती उत्सवाचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी आग्र्यामध्ये शिवरायांच्या जयंतील उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

आग्र्यात ३९४व्या जयंतीचा उत्साह!

  • गेल्या वर्षी पहिल्यांदाच आग्र्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यंदा या उत्सवाचं दुसरं वर्ष असून त्याची जोरदार तयारी आग्र्यात करण्यात येत आहे. ३९४व्या शिवजयंती उत्सवासाठी आग्रा नगरी सजली असून आज संध्याकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. रात्री साधारण १० वाजेपर्यंत या सोहळ्यात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यातील मान्यवरांची उपस्थिती

  • आग्र्यातील या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय अन्न महामंडळाचे भागभांडवल २१ हजार कोटींवर, केंद्र सरकारचा निर्णय; कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार बळ
  • केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळाचे (एफसीआय) अधिकृत भागभांडवल दहा हजार कोटी रुपयांवरून वाढवून २१ हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे हे एक धोरणात्मक पाऊल असल्याचा दावा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
  • देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्याचे काम भारतीय अन्न महामंडळ करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने (एमएसपीने) अन्नधान्यांची खरेदी करणे. अन्नधान्याच्या धोरणात्मक साठ्याची देखभाल करणे. गरजेनुसार, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्यांचे वितरण करणे. महागाई वाढल्याच्या काळात साठ्यातील अन्नधान्य बाजारात आणून महागाई आणि अन्नधान्यांच्या किमती नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
  • केंद्र सरकारने एफसीआयच्या भाग भांडवलात केलेल्या भरघोस वाढीमुळे एफसीआयची कार्यप्रणाली अधिक गतिमान आणि व्यापक होणार आहे. एफसीआयला असलेली निधीची गरज आणि निधीची उपलब्धता यातील तूट भरून निघणार आहे. यापूर्वी निधीतील ही तूट भरून काढण्यासाठी एफसीआयला रोख कर्ज, कमी मुदतीची कर्जासह विविध मार्गाचा अवलंब करावा लागत होता. आता एफसीआयला ही तारेवरची कसरत करावी लागणार नाही.

भांडवल वाढीचे सकारात्मक परिणाम

  • भांडवल वाढीमुळे एफसीआयला साठवण सुविधांचे आधुनिकीकरण करता येईल. वाहतुकीचे जाळे मजबूत करता येईल. आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून शेतीमालाची कापणी-पश्चात हानी कमी करून अन्नधान्यांची उपलब्धता वाढवता येईल. अन्नधान्याची वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने करता येईल. देशाची अन्नसुरक्षा अधिक मजबूत करता येईल.

 

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास भारत आपल्या बाजूने; अमेरिकेला आशा :
  • रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला बांधील असलेला भारत आपल्या बाजूने उभा राहील, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली आहे. रशियाने अलीकडच्या काही दिवसांत ७ हजार जादा सैनिक युक्रेन सीमेवर आणून ठेवले असल्याने हे आक्रमण अटळ असल्याचे बायडेन प्रशासनाचे म्हणणे आहे.

  • मेलबर्नमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘क्वाड’ देशांच्या मंत्रिपरिषदेत रशिया व युक्रेनबाबत चर्चा झाल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान व अमेरिका या देशांचे परराष्ट्रमंत्री या परिषदेत सहभागी झाले होते.

  • युक्रेन संकटावर राजनैतिक मार्गाने व शांततामय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, यावर या बैठकीत ‘ठाम सहमती’ झाल्याचे प्राईस म्हणाले.

  • ‘क्वाडच्या प्रमुख तत्त्वांपैकी एक नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था लागू करणे हे आहे. इतर कुठल्याही भागाप्रमाणे आणि युरोपमध्ये आहे त्यानुसार हिंदू- पॅसिफिक क्षेत्रातही ही नियमाधारित व्यवस्था लागू आहे. आमचा भागीदार म्हणून भारत अशा नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला बांधील असल्याची आम्हाला कल्पना आहे. या व्यवस्थेत अनेक सिद्धांत आहेत. देशांच्या सीमा बळजबरीने आखल्या जाऊ शकत नाहीत हा त्यापैकी एक आहे’, असे प्राईस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हिजाब काढायला लावल्यानं प्राध्यापिकेचा राजीनामा; म्हणाली, हा निर्णय माझ्या स्वाभिमानाला :
  • कर्नाटकमधील हिजाब प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शाळेत मुलींनी शाळेच्या गणवेशातच यावं, धार्मिक वस्त्र परिधान करू नये, असा आदेश देत हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मुलींना हिजाब काढायला लावून शाळेत प्रवेश दिला जातोय. अनेक ठिकाणी लोक न्यायालयाच्या या आदेशाचा विरोध करताना दिसून येत आहेत. दरम्यान, हिजाब काढायला लावल्यामुळे आज एका महिला शिक्षिकेनं राजीनामा दिल्याचं समोर आलंय.

  • एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगितल्यानंतर कर्नाटकातील एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिकेने आज स्वाभिमान दुखावल्यानं राजीनामा दिला. तुमाकुरू येथील जैन पीयू कॉलेजमध्ये लेक्चरर असलेल्या चांदिनीने सांगितले की, ती जवळपास तीन वर्षापासून या कॉलेजमध्ये काम करत होती. परंतु तिला पहिल्यांदाच तिचा हिजाब काढण्यास सांगण्यात आले.

  • “मी गेल्या तीन वर्षांपासून जैन पीयू कॉलेजमध्ये काम करत आहे. मला आतापर्यंत कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही. पण काल मला मुख्याध्यापकांनी सांगितले की, मी शिकवताना हिजाब किंवा कोणतेही धार्मिक चिन्ह घालू शकत नाही. पण मी गेल्या तीन वर्षांपासून हिजाब परिधान करून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. हा नवा निर्णय माझ्या स्वाभिमानाला धक्का देणारा आहे. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे चांदिनी यांनी पत्रकारांना सांगितले.

‘सीएए’ आंदोलकांवरील वसुली नोटिसा रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय :
  • नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोधी आंदोलनात झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या हानीच्या भरपाईसाठी आंदोलकांना बजावलेल्या २७४ वसुली नोटिसा सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतल्या आहेत.

  • उत्तर प्रदेश सरकारतर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात नोटिसा मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यासंबंधात पुढील कारवाई नव्या कायद्यानुसार केली जाईल आणि अशा प्रकारचे नुकसान झाल्यास भरपाई कशी करून घ्यायची, याची प्रक्रिया या कायद्यात स्पष्ट केली जाईल. या कायद्यानुसार जो लवाद स्थापन केला जाईल, तो ही प्रकरणे निकालात काढील, असेही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

  • न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठाला राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता गरिमाप्रसाद यांनी ही माहिती दिली. त्याबद्दल न्यायालयाने समाधान व्यक्त केले. न्यायालयाने या नोटिसा रद्द करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने या आदेशाचे पालन न केल्यास नोटिसा रद्द करण्याचा इशाराही खंडपीठाने दिला होता. 

  • उत्तर प्रदेश सरकारच्या वसुलीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर ११ फेब्रुवारीच्या सुनावणीत न्यायालय म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाने याआधी आदेश दिल्याप्रमाणे या नोटिसा कायद्याच्या चौकटीतच द्याव्या लागतील. उत्तर प्रदेश सरकारने त्याचे पालन केले नव्हते. त्यामुळे आंदोलकांविरुद्ध सुरू केलेली वसुलीची ही प्रक्रिया मागे घ्यावी आणि त्याच राज्याने तयार केलेल्या उत्तर प्रदेश सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता हानीची भरपाई कायदा, २०२० नुसार नव्याने प्रक्रिया राबवावी, असे खंडपीठाने स्पष्ट केले होते.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा - रहाणेची शतकी दावेदारी :
  • आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणारी शतकी खेळी अजिंक्य रहाणेने गुरुवारी साकारली. रहाणे आणि सर्फराज खान यांनी नाबाद शतके करून सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट लढतीत मुंबईला पहिल्या डावात ३ बाद २६३ अशा सुस्थितीत राखले.

  • ड-गटाच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण सकाळच्या सत्रात कर्णधार पृथ्वी शॉ (१), आकर्षित गोमेल (१) आणि सचिन यादव (१९) हे तीन फलंदाज तंबूत परतल्याने मुंबईची ३ बाद ४४ अशी अवस्था झाली.

  • रहाणे आणि सर्फराज यांनी सावध फलंदाजी करीत चौथ्या गडय़ासाठी २१२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. रहाणेने ९९ धावांवर असताना डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेद्रसिंह जडेजाला षटकार खेचत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३६वे शतक साकारले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रहाणेच्या खात्यावर २५० चेंडूंत १४ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १०८ धावा जमा होत्या. सर्फराजने २१९ चेंडूंत १५ चौकार आणि दोन षटकारांनिशी नाबाद १२१ धावा काढल्या आहेत.

  • नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील सहा डावांत रहाणेने केवळ १३६ धावा काढल्या. या मालिकेआधी त्याला उपकर्णधारपदही गमवावे लागले होते.

सिंगापूरच्या पंतप्रधानांकडून पंडित नेहरुंचं कौतुक; पण ‘त्या’ एका वक्तव्यावर मोदी सरकारने घेतला आक्षेप :
  • सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी बुधवारी त्यांच्या संसदेत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख केला. लोकशाही कशी चालावी असं सांगत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांचं उदाहरण दिलं. दरम्यान यावेळी त्यांनी सध्याच्या घडील असणाऱ्या भारतीय लोकप्रतिनिधींवर दाखल गुन्ह्यांचा उल्लेख करत टीकादेखील केली. यानंतर भारताने आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सिंगापूरच्या भारतातील राजदूत सायमन वोंग यांना समन्स बजावला आहे.

  • सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सिंगापूरच्या उच्चायुक्तांकडे हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केलेली शेरेबाजी अनावश्यक आहे. आम्ही हा मुद्दा त्या देशाकडे उपस्थित केला आहे,” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

  • संसदेतील चर्चेदरम्यान बोलताना सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी लोकशाही कशी चालावी यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांचं उदाहरण दिलं. वर्कर्स पार्टीच्या माजी खासदाराविरुद्धच्या तक्रारींवरील समितीच्या अहवालावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केलं.

१९ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.