चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 17, 2022 | Category : Current Affairs


आशियाई एअरगन स्पर्धा - भारतीयांचा सुवर्ण चौकार :
 • कोरियात दाएगू येथे सुरू असलेल्या १५व्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत भारतीयांनी सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण चौकार लगावला. स्पर्धेचे अजून दोन दिवस शिल्लक असून, भारताने आतापर्यंत २१ सुवर्णपदके मिळविली आहेत.

 • स्पर्धेत बुधवारी भारताला पहिले सुवर्णपद महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रिदम सांगवानने मिळवून दिले. याच वर्षी कैरो येथील विश्वचषक स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणाऱ्या रिदमने अंतिम फेरीत भारताच्याच पलकचा १६-८ असा पराभव केला. कुमार गटातही मुलींच्या विभागात सुवर्ण लढत भारतीय नेमबाजांमध्येच झाली. मनू भाकरने आपली सहकारी ईशा सिंगचा चुरशीच्या लढतीत १७-१५ असा पराभव केला.

 • भारताच्या पुरुष संघाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोरियाचा १६-१४ असा पराभव करून तिसरे सुवर्णपदक मिळविले. भारतीय संघात शिवा नरवाल, नवीन, वियवीर सिद्धूचा समावेश होता. कुमार गटात सागर डांगी, सम्राट राणा, वरुण तोमर या भारतीय चमूने उझबेकिस्तानवर एकतर्फी लढतीत १६-२ असा विजय नोंदवला.

अमेरिका अध्यक्षपदाच्या शर्यतीत ट्रम्प यांची पुन्हा उडी :
 • अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाच्या शर्यतीत तिसऱ्यांदा सहभागी होण्यास सिद्ध झाले आहेत. मंगळवारी याबाबत गोषणा करताना त्यांनी अमेरिकेतील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्जही दाखल केला.

 • मात्र डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराविरोधात दोन हात करण्यापूर्वी त्यांना आपल्या रिपब्लिकन पक्षातून निवडून यावे लागेल. पाम बीच येथील मार-ए-लागो क्लबमध्ये ३० अमेरिकन राष्ट्रध्वज आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणांफलकांच्या पार्श्वभूमीवर उभे राहून, ७६ वर्षीय ट्रम्प यांनी त्यांचे हजारो समर्थक, क्लब सदस्यांना संबोधित केले. त्यानंतर निवडणूक आयोगात कागदपत्रे दिली.

 • अमेरिकेला तिचे महानपद पुन्हा मिळवून देण्यासाठी मी पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन २०२४ मध्ये पुन्हा निवडून येणार नाहीत हे मी निश्चित करेन.

‘नासा’ची पुन्हा चंद्रावर स्वारी; अजस्त्र प्रक्षेपणास्त्र ‘अर्टेमिस’चे यशस्वी उड्डाण :
 • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, नासाने ‘अपोलो’ मोहिमेच्या यशानंतर ५० वर्षांनी पुन्हा चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून मानवरहित मोहीम बुधवारपासून सुरू झाली. ‘अर्टेमिस’ हे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रक्षेपणास्त्र मानवी कुपी (कॅप्सूल) घेऊन चंद्राकडे झेपावले.

 • तांत्रिक बिघाड, वादळे यामुळे या मोहिमेला अनेक वर्षांचा विलंब झाला आहे. त्यामुळे खर्च काही अब्ज डॉलरनी वाढला असला तरी ‘नासा’ने ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. अर्टेमिस प्रक्षेपणास्त्रावर ‘ओरिऑन’ हे अंतराळ यान असून त्यामध्ये पृथ्वीवर सुरक्षितरित्या परतण्यासाठी कुपी बसवण्यात आली आहे.

 • हे अंतराळ यान चंद्राभोवती प्रदक्षिणा करेल आणि कुपी पृथ्वीकडे परत पाठवेल. अर्थात, यामध्ये सध्या अंतराळवीर नसून तीन पुतळे चंद्राकडे पाठवण्यात आले आहेत. साधारणत: तीन आठवडय़ांनंतर ही कुपी प्रशांत महासागरामध्ये उतरण्याचे नियोजन आहे. ही कुपी आणि आतमध्ये असलेले पुतळे सुरक्षितरित्या पृथ्वीवर आल्यास भविष्यात मानवी मोहीम आखली जाणार आहे.

 • पुन्हा ‘अपोलो’ - ‘अपोलो ११’ मोहिमेंतर्गत निल आर्मस्ट्राँगने २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर आतापर्यंत एकही मानव चंद्रावर गेलेला नाही. आता तब्बल ५० वर्षांनी ‘नासा’ने पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आगामी काळात चंद्रावर आणि त्यानंतर मंगळावर मानव पाठवून तिथे मानवी वसाहती उभारण्याची योजना नासाने आखली आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! फोन आल्यावर आता Unknown Number नाही थेट फोन करणाऱ्याचं नाव दिसणार :
 • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (TRAI) आता लवकरच एक महत्वाची सेवा सुरु केली जाणार आहे. त्याद्वारे तुमची अनोळखी मोबाईल नंबरपासून सुटका होणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक वेळा अनोळखी नंबरवरुन आलेले कॉल उचलण्याचा कंटाळा येतो.

 • तर काहीना अनोळखी नंबरची भीती देखील वाटते. मात्र, आता सरकारकडून एक अशी सुविधा अमंलात आणली जाणार आहे. त्यामुळे तुमची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. कारण, आता जो व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्याचं नाव मोबाईल फोनमध्ये सेव केलेलं नसले तरीही ते तुम्हाला दिसणार आहे.

 • या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

आयओए’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर :
 • भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या चर्चेत राहिलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी उमेश सिन्हांनी अधिकृतरीत्या जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्देश आणि मंजूर करण्यात आलेल्या ‘आयओए’च्या नव्या घटनेनुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

 • ‘आयओए’च्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या अर्जाची छाननी २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. कार्यक्रमात अर्ज माघार घेण्यासाठी या वेळी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नव्या घटनेतील तरतुदीनुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

 • अर्ज माघार घेण्यासाठी १, २ आणि ३ डिसेंबर असे तीन दिवस देण्यात आले आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीच्या शर्यतीत राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर १० डिसेंबरला निवडणूक पार पडेल आणि त्याच दिवशी निवडणुकीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

१७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)