चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ नोव्हेंबर २०२१

Date : 17 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुढील दशकभरात भारतात तीन विश्वचषक :
  • भारताला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६चा ट्वेन्टी२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जागतिक स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. भारतात २०२९ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल.

  • तसेच पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून २०२५च्या चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषवण्याची त्यांना संधी मिळेल.

  • पाकिस्तानाने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरीत्या १९९६चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता. तसेच अमेरिका, वेस्ट इंडिजला संयुक्तरीत्या २०२४ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाची संधी लाभणार आहे.

२४ तासांत कामावर हजर व्हा - रोजंदारीवरील ३५० एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस :
  • विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सामिल झालेल्या रोजंदारीवरील ३५० हून अधिक एसटी कामगारांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २४ तासांत कर्तव्यावर रुजू न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

  • राज्यात आतापर्यंत ७ हजार ६२३ एसटी कामगार पुन्हा कामावर परतले असून ८४ हजार ६४३ कर्मचारी प्रत्यक्षात संपात सामिल झाले आहेत. कामावर परतलेल्यांमध्ये प्रशासकीय, कार्यशाळा कर्मचाऱ्यांबरोबरच २९५ चालक आणि १३६ वाहक आहेत. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अद्याप  कमीच असून निलंबनाची कारवाईही केली जात आहे.

  • या संपात रोजंदारीवरील कर्मचारी असून त्यांनाही कामावर परतण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. हे कर्मचारी न परतल्याने त्यांच्यावर सेवा समाप्तीच्या कारवाई करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्यात सध्या सुमारे २ हजार रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक, वाहकही आहेत.  

  • सेवा समाप्तीची कारवाई करण्यापूर्वी मंगळवारी राज्यातील ३५० हून अधिक रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. बेकायदेशीररित्या संपात सहभागी झाला असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाचेही आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे.

‘बोईंग’सोबत ९०० कोटींचं मोठं डील; राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरने विकत घेतली ७२ विमानं :
  • काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसबोत एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला होता. त्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा चुरगळलेला शर्ट घातला होता. त्या फोटोत दिसणारी व्यक्ती कोणी सामान्य माणूस नसून व्यावसायिक राकेश झुनझुनवाला होते. त्यांच्या अकासा एअर या कंपनीने बोईंग या विमान उत्पादक कंपनीशी मोठा करार केला आहे.

  • इंधन बचत करणाऱ्या ७२ विमानांच्या या व्यवहाराची किंमत साधारणपणे ९ अब्ज डॉलर्स इतकी आहे. रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास साधारण ९०० कोटींच्या आसपास हा व्यवहार होत आहे.

  • दुबईमधल्या एका कार्यक्रमात बोलताना या अकासा एअर कंपनीचे कार्यकारी संचालक विनय दुबे यांनी सांगितलं, आम्हाला आनंद होत आहे की आम्ही आमचा विमानाचा पहिला व्यवहार बोईंग या कंपनीसोबत करत आहोत. आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. किफायतशीर, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक विमानसेवा देण्याच्या आमच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी ही नवी ७३७ मॅक्स विमानं फायदेशीर ठरतील.

  • दुबे पुढे म्हणाले, विमानउद्योगात भारत आता जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. अकासा एअर या कंपनीला भारताच्या विकासाला हातभार लावायचा आहे, तसंच समाजातल्या सर्व गटातल्या लोकांसाठी विमानप्रवास सुखकर आणि सोयीस्कर बनवायचा आहे.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट :
  • अमेरिकेत करोना विषाणूचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तेथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत, मागील वर्षांच्या तुलनेत १३ टक्के कमी भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत गेले.

  • इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी करोना महासाथीला जबाबदार धरले आहे.

  • अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या चीनमधील आहे. ओपन डोर्स संस्थेच्या २०२१ च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

  • नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्येशी संबंधित संस्थांचे हे अहवाल सोमवारी माध्यमांसमोर प्रसिद्ध केले. ते म्हणाले की, केवळ या वर्षीच्या उन्हाळ्यात ६२ हजारांहून अधिक जणांना विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आला आहे. 

अमेरिकेच्या नागरिकांना भारतात पर्यटनाला परवानगी :
  • अमेरिकेच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेने (सीडीसी - यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन) भारतात प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी ‘स्तर- १’ करोना सूचना जारी केली आहे. यात नमूद केले आहे की  पूर्णपणे लसीकरण झाले असेल तर  संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

  • भारतातील करोना परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सीडीसी’ने सोमवारी ही नवीन प्रवास  सूचना जारी केली असून ती  सुरक्षित मानली जाते. पाकिस्तानसाठीही प्रवास आरोग्य सूचना जारी करण्यात आली आहे.  

  • भारतात जाण्यापूर्वी तुम्ही पूर्णपणे लसीकरण केले असल्याची खात्री करा. तेथील शिफारशी किंवा नियमांचे पालन करावे, असे  या सूचनेमध्ये म्हटले आहे. या वर्षांच्या सुरुवातीला, अमेरिकेने भारताला स्तर- ४ मध्ये ठेवले होते आणि अमेरिकेतील नागरिकांना भारतात प्रवास करू नये, असे सांगितले होते.

१७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.