चालू घडामोडी आणि दिनविशेष - 17 जून 2023

Date : 17 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी मिळताहेत ५० हजारांचे आर्थिक सहाय्य!
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले अशा उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे. अर्ज केलेल्यांना हा लाभ मिळेल.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी, अनुसूचित जातीचा व मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा अशा अटी आहेत. योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त तीनच वेळा घेता येईल. ज्यांनी यापूर्वी योजनेचा लाभ तीन वेळा घेतला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. बार्टी संस्थेने दिलेल्या लिंकवर उपलब्ध अर्जाची प्रिंट काढून अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे.
दिव्यांगासाठी खुशखबर! अधिकारीच येणार दारी, काय आहे योजना?
  • राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
  • यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.
  • दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेकजण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा! दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज शुक्रवारपर्यंत होती. ती आता २१ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
  • आता नियमित शुल्कासह २१ जून, तर विलंब शुल्कसह २२ ते २५ जून या कालावधीत अर्ज भरता येतील. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या नाहीत; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
  • तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो, ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केली.
  • यासंदर्भात ग्रामविकास विभाग, शक्षक संघटना यांच्याशी चर्चा झाली असून पुढील काही दिवसांत याबाबत तसा आदेश जारी केला जाईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. शालेय वयात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करीत असतात. दर तीन वर्षांनी शिक्षकाची बदली झाली तर यात खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याच्या निर्णयापर्यंत शालेय शिक्षण खाते आले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
  • राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळातील शिक्षकांच्या अथवा शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील शाळांमधील शिक्षकांची तीन वर्षांनंतर नियमित म्हणजे प्रशासकीय बदली होते. त्या कालावधीपूर्वी बदली केली तर त्यास विनंती बदली म्हणतात.

३० हजार शिक्षकांची पदभरती पूर्ण

  • राज्यात ३० हजार शिक्षकांची पदभरती पूर्ण झाली आहे. मात्र याबाबत न्यायालयात खटला असल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. यासाठी आवश्यक असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल लागल्यानंतर लगेच भरती प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचेही केसरकर म्हणाले.
जो रुटने झळकावले शानदार शतक, इंग्लडने ९४ वर्षांनंतर केला ‘हा’ खास कारनामा
  • वर्षातील सर्वात हाय व्होल्टेज अॅशेस मालिका सुरू झाली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमानांनी डाव घोषित करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कसोटी क्रिकेटमध्ये हे क्वचितच पाहायला मिळते, तर अॅशेसमध्ये हे दृश्य ९४ वर्षांनंतर पाहायला मिळाले. या सामन्यात ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अॅशेसमध्ये शतक झळकावणारा इंग्लंडचा फलंदाज जो रूटसाठी पहिला दिवस खूप खास होता.

इंग्लंडने पहिल्या दिवशीच घोषित केला डाव -

  • इंग्लंडने पहिल्या दिवशी ७८ षटकांनंतर आपला डाव घोषित केला. त्यावेळी जो रूट ११८ आणि ऑली रॉबिसन १७ धावांवर खेळत होते. इंग्लंडच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. १९३७ नंतर पहिल्यांदाच एखाद्या संघाने अॅशेसच्या पहिल्या दिवशी डाव घोषित केला आहे. १९३७ साली मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ षटके खेळून डाव घोषित केला होता. त्यावेळी एका षटकात ८ चेंडू असायचे.
  • इंग्लंडच्या या निर्णयावर क्रिकेट चाहते दोन भागात विभागले आहेत. एकीकडे काही चाहत्यांनी या निर्णयाला नव्या क्रिकेटचा उदय म्हटले आहे, तर दुसरीकडे काहींनी हा मूर्खपणाचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. तसे, जर आपण सर्वात कमी धावसंख्येवर डाव घोषित करण्याबद्दल बोलायचे, तर हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे ज्याने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५९/९ धावांवर डाव घोषित केला होता.

जो रूटने झळकावले शतक -

  • इंग्लंडने पहिल्या डावात जो रूटच्या शतकासह ३९३ धावा केल्या. या ३२ वर्षीय खेळाडूने नाबाद ११८ (१५१) धावा केल्या. २०१५ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो रूटचे हे पहिले शतक आहे. रुटने ३० व्या शतकासह मोठा विक्रमही केला. त्याने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या शिव नारायण चंद्रपॉलची बरोबरी केली आहे.

 

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, हार्दिक पांड्या कर्णधार :
  • बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संघात आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदरबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, संजू सॅमसन अशा दिग्गज युवा खेळाडूंचादेखील या संघात सावेश करण्यात आला आहे.

  • येत्या २६ आणि २८ जून रोजी भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने एकूण १७ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स या संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या नेतृत्वात त्याने संघाच्या पदार्पणातच जेतेपद पटकावले होते. तसेच या स्पर्धेत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात दिमाखदार कामगिरी करुन दाखलेली होती. याच कारणामुळे बीसीसीआयने त्याच्यावर आता भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकली आहे.

  • आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी पटेल. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

ईशान किशनची हनुमान उडी! आयसीसीने जाहीर केली टी २० क्रमवारी :
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी २० मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर ईशान किशनने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. तीन सामन्यांमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. या कामगिरीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी ट्वेंटी क्रमवारीत ६८ स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीच्या टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत ईशान सध्या सातव्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा टी २० आणि एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत ईशान किशनने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये १६४ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो टी २० फलंदाजांच्या यादीत पहिल्या १०जणांच्या यादीमध्ये प्रवेश करू शकला. पहिल्या १० फलंदाजांमध्ये किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल १४व्या स्थानावर आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे १६व्या आणि १७व्या स्थानावर आहेत. माजी कर्णधार विराट कोहली दोन स्थानांनी घसरून २१व्या स्थानावर पोहोचला आहे.

  • गोलंदाजी क्रमवारीमध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची सात स्थानांनी सुधारणा झाली आहे. तो सध्या ११व्या स्थानावर पोहचला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलने चार स्थानांनी प्रगती करत २६वे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने टी २० गोलंदाजी पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे.

अमेरिकेत पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरीची शक्यता :
  • अमेरिकेत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या लसीकरण सल्लागारांनी यासाठी फायझर आणि मॉडर्ना यांच्या लशींना त्यासाठी संमती दिली आहे.

  • पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लशीच्या एका मात्रेचा परिणाम हा करोनाचा धोका कमी करतो, असे मत तज्ज्ञांनी सर्वानुमते व्यक्त केले. अमेरिकेत या वयोगटातील एक कोटी १८ लाख मुले आहेत. या देशात लसीकरणासाठी मंजुरी मिळवणारा हा अंतिम गट आहे. संबंधित सर्व शासकीय विभागांनी मंजुरी दिली तर पुढील आठवडय़ात हे लसीकरण सुरू होईल.

  • कॅन्सस येथील मुलांच्या रुग्णालयातील जे. पोर्टनॉय यांनी सांगितले की, या वयोगटातील मुलांना दीर्घकाळापासून लशीची प्रतीक्षा आहे. अनेक आई-वडील हे त्यांच्या मुलांच्या लसीकरणासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना हा पर्याय देणे आवश्यक आहे. फायझरची करोना प्रतिबंधक लस ही सहा महिन्यांपासून चार वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. तर मॉडर्नाची लसी ही सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे.

कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा डेल्टा, ओमायक्रॉनवर प्रभावी :
  • कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा करोनाच्या डेल्टा उत्प्रेरित रूपावर प्रभावी ठरत असून ओमायक्रॉनच्या बीए १.१ आणि बीए २ या उपप्रकारांपासून संरक्षण देते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेकच्या आभ्यासात हे स्पष्ट झाले.

  • सीरियन हॅमस्टर मॉडेलनुसार (मानवाशी संबंधित आजारांचा आभ्यास करणारे पशू मॉडेल) डेल्टाविरोधात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन किंवा तीन मात्राच्या क्षमतेचा आणि ओमिक्रॉनच्या उपप्रकारांविरोधातील प्रभावाचा अभ्यास करण्यात आला. त्याची माहिती मंगळवारी ‘बायोआरक्सिव’मध्ये प्रकाशित करण्यात आली.

  • डेल्टा संसर्गाच्या आभ्यासात लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मात्रेदरम्यानचा अभ्यास केला. त्यावेळी वर्धक मात्रेची उपयुक्तता लक्षात आली, असे आयसीएमआर आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले. लशीच्या तिसऱ्या मात्रेनंतर फुप्फुसाच्या आजाराची तीव्रता कमी होती, असेही सांगितले.

  • दुसऱ्या आभ्यासानुसार ओमायक्रॉनच्या बीए १ आणि बीए २ या उपप्रकाराच्या विरोधात सुरक्षेबाबत अभ्यास करण्यात आला. ‘प्लेसीबो’ गटापेक्षा लस घेणाऱ्या गटात संसर्गाची तीव्रता कमी होती. फुप्फुस संसर्गही कमी प्रमाणात होता. त्यामुळे आताच्या अभ्यासानुसार कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा डेल्टा आणि ओमायक्रॉन उपप्रकारांसंबंधी आजाराची तीव्रता कमी करते, असेही आयसीएमआर आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले.

रस्त्यावर गाडी उभी करणाऱ्यांसाठी नवा कायदा? गडकरींच्या वक्तव्यामुळे चर्चा; म्हणाले “दंडाच्या रकमेतील…” :
  • केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रुपये देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पार्किंग ही फार मोठी समस्या असल्याचं सांगितलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य उपहासात्मकपणे होतं की खरंच गांभीर्याने विचार सुरु आहे याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.

  • गडकरी काय म्हणाले - “प्रत्येक व्यक्ती गाडी घेत आहे. माझ्या नागपुरातील घऱी स्वयंपाक करणाऱ्याकडेही दोन गाड्या आहेत. याआधी अमेरिकेत सफाई करणारी महिला गाडीतून यायची तेव्हा आपण आश्चर्याने पाहायचो. पण आता आपल्याकडेही तेच होत आहे. कुटुंबात चार माणसं आणि सहा गाड्या असतात. दिल्लीवाले तर नशिबवान आहेत, कारण आम्ही रस्ते त्यांच्या पार्किगसाठी तयार केले आहेत. कोणीही पार्किंग तयार करत नाही, सगळे रस्त्यावर गाडी उभी करतात,” अशी खंत यावेळी गडकरींनी बोलून दाखवली.

  • पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी एक कायदा आणणार आहे. रस्त्यावर जो गाडी उभी करणार त्याचा मोबाइलवरुन फोटो काढून पाठवल्यास दंडातील १००० रुपयांपैकी ५०० रुपये त्याला दिले जातील”. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

  • मोठं घर बांधल्यानंतर खाली पार्किंगसाठीही जागा बनवा असा सल्ला यावेळी गडकरींनी दिला. माझ्या नागपुरातील घरी १२ गाड्यांसाठी अंडरग्राऊंड पार्किंग आहे. मी रस्त्यावर गाडी उभी करत नाही अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.

  • नितीन गडकरी यांनी आपल्या युट्यूब अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गरजेचा असल्याचं सांगितलं.

चार वर्षांनी निवृत्त झालेल्यांपैकी ७५ टक्के अग्निवीरांना सरकारी नोकरी देणार; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा :
  • केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र असे असताना केंद्रासह अनेक राज्य सरकारांनी अग्निपथ योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या अग्नीवीरांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये अग्निवीर सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या योजनसंदर्भात आता हरिणाया सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • लष्कर, नौदल आणि हवाई दलात विशेष ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत अल्प-मुदतीच्या करारावर भरती झालेल्या ‘अग्नीवीर’ सैनिकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये प्राधान्य मिळेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी ही घोषणा केली. मंत्रालयाने सांगितले की, या योजनेंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.

  • हरियाणात अग्निवीरांना प्राधान्य - हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, मी सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की ७५ टक्के अग्निवीरांना (चार वर्षांच्या सेवेनंतर) सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे त्यांना इतर नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल.

  • योगी आदित्यनाथ सरकारची मोठी घोषणा - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी जाहीर केले की उत्तर प्रदेश सरकार पोलीस आणि संबंधित सेवांमध्ये भरतीसाठी ‘अग्निवीरांना’ प्राधान्य देईल. आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हटले की, “भारत मातेच्या सेवेनंतर उत्तर प्रदेश सरकार राज्य पोलीस आणि इतर संबंधित सेवांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देईल. युवकांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी भाजपाचे डबल इंजिन सरकार काम करेल.”

  • मध्य प्रदेशातही अग्निवीरांना प्राधान्य - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली की अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अल्प-मुदतीच्या कराराच्या आधारावर भरती झालेल्या सैनिकांना मध्य प्रदेश पोलिसांच्या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल. या योजनेचे स्वागत करताना चौहान म्हणाले, “अग्निपथ योजनेत काम केलेल्या अशा जवानांना मध्य प्रदेश पोलिसांच्या भरतीत प्राधान्य दिले जाईल.”

१७ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.