चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ फेब्रुवारी २०२१

Date : 17 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा बदलल्या; शिक्षण मंडळाची घोषणा :
  • मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालये अनेक महिने बंद ठेवण्यात आली. मात्र याच महिन्यामध्ये राज्यातील काही शहरांमधील महाविद्यालये आणि शाळा सुरु करण्यात आल्या.

  • एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे परिक्षांचा काळ जवळ येऊन लागल्याने त्यासंदर्भातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

  • करोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक बदललं आहे. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत.

  • बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत आता आठ नवीन कॅथलॅब केंद्र :
  • गेल्या दोन दशकात मृत्यूच्या वेगवेगळ्या कारणांमध्ये हृदयविकाराने अग्रक्रम मिळवला आहे. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण बनत असल्याचे लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने तब्बल ८० कोटी रुपये खर्चून आठ मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब सेंटर सुरु करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.

  • देशात तसेच महाराष्ट्रात हृदयविकाराने मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून या रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्यास त्यांना वाचवणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाने ‘स्टेमी’ नावाचा उपक्रम राबवला. यात विभागाच्या १२० रुग्णालयात ईसीजी मशिन देण्यात आले आहे.

  • हृदयविकाराची तक्रार असलेल्या रुग्णाचा ईसीजी काढून हृदयविकाराची समस्या आढळून आल्यास तात्काळ योग्य ती औषध योजना केली जाते. तसेच रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २४ तासात नजीकच्या हृदयउपचार केंद्रात हलवले जाते.

  • याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले की १९९० दशकात वेगवेगळ्या आजारांनी मरण पावणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण हे सातव्या क्रमांकावर होते, मात्र २०१६ मध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे कारण प्रथम क्रमांकाचे बनले. वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या दोन दशकात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून यावरील उपचार खर्चिक असल्याने आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले होते.

भारताची दुसऱ्या स्थानावर झेप :
  • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ३१७ धावांनी पराभूत करत परतफेड केली आहे. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्याक्रमांकावर झेप घेतली आहे.

  • पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतायी संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण पराभवाची परतफेड करत भारतीय संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपंल आव्हानं जिवंत ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटीत पराभावाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर घरसला आहे.

  • चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार न्यूझीलंडचा संघ प्रथम स्थानावर आहे.

  • न्यूझीलंड संघाची विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे.

ओटीटीवरही आता येणार बंधने :
  • सरकार नेटफ्लिक्स, अॅमझॉन प्राइम अशा ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल नियमावली तयार करण्यासाठी विचार करत आहे. केंद्राच्या या युक्तिवादाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडेबोल सुनावले.

  • वेगवेगळ्या ओटीटी, स्ट्रीमिंग आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आशयांचं निरीक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी योग्य बोर्ड, संस्था किंवा संघटना असावी अशी याचिका वकील शशांक शेखर झा आणि अपूर्व अरहटिया यांनी दाखल केली होती. या याचिकेबाबत न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे.

  • जगातला प्रत्येक जण विचार करू शकतो पण तुम्ही त्या व्यतिरिक्त काय करत आहात त्याविषयीचा अहवाल सादर करा असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराजन यांना सांगितलं. सुरुवातीला न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आपली बाजू सरकारसमोर सादर करण्यास सांगितले होते. मात्र, नंतर सरकारलाच या याचिकेला लिखित स्वरुपात उत्तर देण्यास सांगितले.

नव्या विषाणूवर परिणामाअभावी कोव्हिशिल्ड लशीची परतपाठवणी :
  • दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनावर निष्प्रभ ठरत असलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे १० लाख डोस परत घ्यावेत, असे त्या देशाने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीला कळवले आहे. फेब्रुवारीत लशीचे हे डोस पाठवण्यात आले होते. दरम्यान,आज मंगळवारी  जागतिक आरोग्य संघटनेने या लशीच्या आपत्कालीन वापरास जगातील देशांना परवानगी दिली आहे.

  • दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनावर कोविशिल्ड ही अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेली लस प्रभावी नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील या लशीच्या माध्यमातून केले जाणारे लसीकरण थांबवण्यात आले होते.

  • दरम्यान, नवकरोनासाठी सध्याच्या लशीत काही बदल करण्याचे प्रयत्न अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ करीत आहे. या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने भारतात कोविशिल्ड म्हणून केली होती. या लशीचे १० लाख डोस दक्षिण आफ्रिकेला गेल्या आठवडय़ाच पाठवले होते. पुढील काही आठवडय़ात पाच लाख डोस येणे अपेक्षित होते. पण त्याआधीच दक्षिण आफ्रिकेने ही लस नाकारली आहे. कंपनीने यावर रॉयटर्स वृत्तसंस्थेला कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

१७ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.