चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ सप्टेंबर २०२०

Date : 16 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा :
  • सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे.

  • शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी पुरी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. एकीकडे कंपनी बंद करण्याचे वक्तव्य करतानाच दुसरीकडे पुरी यांनी या कंपनीला लवकरच नवा मालक मिळेल आणि त्याचे उड्डाण यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

  • पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये ३० हजार ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी विकल्यानंतरही सरकारला फारसा फायदा होणार नाही. हवाई क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ कपिल कौल यांनी लाइव्ह मिंटला दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या विक्रीतून सरकारला फार काही मिळण्याची अपेक्षा नाहीय. सध्या उपलब्ध निधी आरोग्य, शिक्षण, बांधकाम यासारख्या इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वापरण्याचा सरकारचा विचार आहे.

भारतात तिसऱ्या स्वदेशी लशीवर काम सुरु; CSIR आणि अरबिंदो फार्मा आले एकत्र :
  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात CSIR आणि अरबिंदो फार्मा लिमिटेड हे संयुक्तरित्या कोविड-१९ आजारावर लस तयार करणार आहेत. भारतातील ही तिसरी स्वदेशी लसणार आहे. मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची घोषणा करण्यात आली.

  • सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मोलेक्युलर बायोलॉजीने (CCMB) प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सीएसआयआर-सीसीएमबी आणि अरबिंदो फार्मा यांच्यामध्ये कोविड-१९ची लस तयार करण्याबाबत करार करण्यात आला आहे. दोन्हींच्या भागीदारीतून ही लस तयार करण्यात येणार आहे.

  • CCMB हैदराबाद, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल टेक्नॉलॉजी (IMTECH) चंदीगड आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (IICB) कोलकाता या तीन CSIRच्या प्रयोगशाळांमध्ये विविध तांत्रिक व्यासपीठावर ही लस तयार केली जाणार आहे. तर अरबिंदो फार्मा या लसीच्या वैद्यकीय विकास आणि व्यावसायिकीकरणावर काम करणार आहे, असंही प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

  • CSIR आणि अरबिंदो फार्मा यांच्या भागिदारीबाबत बोलताना सीएआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले, “लस तयार करण्यासाठी सीएसआयआरच्या अव्वल दर्जाच्या प्रयोगशाळा फार्मा इंडस्ट्री सोबत एकत्र आल्यामुळे भारताच्या स्वदेशी लस निर्मिती आणि भविष्यातील महामारींविरोधात काम करण्यासाठी मदत होणार आहे.”

संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड :
  • संयुक्त राष्ट्रांच्या महिला स्थिती आयोगावर (विमेन स्टेट कमीशन) सदस्यपदी भारताची निवड झाली आहे. भारतासाठी हा विजय महत्त्वाचा आहे, कारण यात चीनवर मात करण्यात यश आले आहे. चीनने ही निवडणूक गांभीर्याने लढवूनही त्यात त्यांना यश आले नाही.

  • महिला स्थिती आयोग हा लिंगभाव समानता व महिला सक्षमीकरण या मुद्दय़ांना महत्त्व देतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक मंडळा अंतर्गत या महिला आयोगाचा समावेश होतो. मंडळाची २०२१ या वर्षांतील पहिली सभा आमसभेच्या सभागृहात सोमवारी झाली. त्यात आशिया-पॅसिफिक भागात सदस्यपदाच्या दोन जागांकरिता निवडणूक घेण्यात आली. या दोन जागांकरिता अफगाणिस्तान, भारत व चीन रिंगणात होते.

  • अफगाणिस्तानचे नेतृत्व संयुक्त राष्ट्रातील राजदूत अ‍ॅडेला राझ यांनी केले, त्यांना ३९ मते मिळाली. भारताला ३८ मते मिळाली. चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असूनही त्या  देशाला केवळ २७ मतांवर समाधान मानावे लागले. याचा अर्थ चीनला निम्मी मतेही मिळाली नाहीत. बहुमतासाठी २८ मतांची गरज होती.

  • संयुक्त राष्ट्रांच्या महिला स्थिती आयोगावर भारताची सदस्यपदी निवड झाली असून ही आनंदाची बाब आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी दूत टी.एस.तिरुमूर्ती  यांनी म्हटले आहे.

थॉमस आणि उबर चषक लांबणीवर :
  • करोना साथीमुळे मातब्बर संघांनी माघार घेतल्यामुळे ३ ऑक्टोबरपासून डेन्मार्क येथे होणारी थॉमस आणि उबर चषक बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) घेतला आहे.

  • करोनाची साथ जगभरात नियंत्रणात येत नसल्यामुळे मार्चनंतर एकही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे थॉमस आणि उबर चषक या स्पर्धेनेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पुन्हा सुरू होणार होते. या स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची निवडही घोषित करण्यात आली होती. मात्र इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया या बलाढय़ संघांनी करोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे माघार घेतल्यानंतर थायलंड, ऑस्ट्रेलिया, चायनीज तैपेई आणि अल्जेरिया या देशांनीही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.

  • ‘बीडब्ल्यूएफ’ने माघार घेतलेल्यांची जागा भरून काढण्यासाठी सिंगापूर आणि हॉँगकॉँग यांना आमंत्रित केले होते. मात्र या दोन्ही देशांनी करोनामुळे सहभाग घेण्यास नकार दिला. जपानही खेळण्याबाबत साशंक होता, तर चीन सरकारच्या परवानगीची वाट पाहत होते. या परिस्थितीमुळे महासंघाला स्पर्धा पुढे ढकलावी लागली.

  • ‘‘माघार घेणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होत असल्याने महासंघाला थॉमस आणि उबर चषक लांबणीवर टाकण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. यावर्षी स्पर्धेचे आयोजन शक्य नसल्याने थेट पुढील वर्षीच स्पर्धा घेता येईल. सध्या पहिल्यासारखे उच्च दर्जाचे आयोजन शक्य नाही. त्यातच करोनामुळे प्रेक्षकांनाही प्रवेश देणे अशक्य आहे. करोनाच्या साथीमुळे प्रवास करण्यास अनेक जण घाबरत आहेत. परंतु सध्या आरोग्य हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याने माघार घेणाऱ्या संघांचाही आम्ही आदर करतो,’’ असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केले.

१६ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.