ऑस्ट्रेलियाची विजयाची प्रतीक्षा संपणार? विश्वचषकात आज श्रीलंकेशी सामना
- एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयाच्या शोधात असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ सोमवारी लखनऊ येथे आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी सुरुवातीचे दोन सामने गमावले असून त्यांचा विजयी लय मिळवण्याचा प्रयत्न असेल. विशेषत: ऑस्ट्रेलियाचा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाला अनुक्रमे भारत आणि दक्षिण आफ्रिका, तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाकडून फारशा अपेक्षा बाळगल्या जात नसल्या, तरी ऑस्ट्रेलियाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
- ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेतील त्यांची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. ऑस्ट्रेलियाची निव्वळ धावगती -१.८४६ अशी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.
- ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत निराशा केली आहे. दोन सामन्यांत मिळून त्यांनी सहा झेल सोडले आहेत. फलंदाजीत झटपट गडी गमावल्याने ऑस्ट्रेलियन संघ दोनही सामन्यांत अडचणीत सापडला, तर गोलंदाजांना भारताविरुद्धची सुरुवातीची षटके सोडता लय सापडलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्वच विभागांत आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.
चांद्रयान- ३ च्या वेळी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना नासाने दिली होती ‘ही’ ऑफर! उत्तर वाचून वाटेल अभिमान
- चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी सुरु असताना नासाच्या शास्त्रज्ञांचे एक शिष्टमंडळ, इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली होती. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून ते सुरुवातीला थक्क झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी इतके स्वस्त किमतीतील तंत्रज्ञान पाहून नासाच्या शास्त्रज्ञांनी इस्रोने हे तंत्रज्ञान अमेरिकेला विकावे असाही प्रस्ताव मांडला होता. याविषयी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना माहिती दिली आहे.
- माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रामेश्वरममध्ये डॉ. ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमनाथ यांनी भेट दिली होती. सुरुवातीला नुकत्याच झालेल्या एका स्पेस कॉन्फरन्समध्ये आलेल्या अनुभवाचा संदर्भ देत सोमनाथ म्हणाले की, नासा आणि युरोप आणि चीनच्या अंतराळ संस्थांमधील प्रत्येकजण चांद्रयान -3 मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहे. “त्यांना एवढं कौतुक वाटण्याची गरज काय? तर त्यांना जाणीव आहे की भारत एक शक्तिशाली राष्ट्र होणार आहे.”
- विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सोमनाथ म्हणाले, “काळ बदलला आहे. आपण सर्वोत्कृष्ट उपकरणे आणि सर्वोत्तम रॉकेट तयार करण्यास सक्षम आहोत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश संशोधन क्षेत्राला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आपल्या ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची पातळी जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. भारत भविष्यात अत्यंत शक्तिशाली राष्ट्र असेल. आपण तंत्रज्ञानातही सर्वात पुढे असू.”
डॉ. आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळय़ाचे अमेरिकेत अनावरण
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच (१९ फूट) पुतळय़ाचे अनावरण अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील मेरीलँड उपनगरात करण्यात आले. ‘समतेचा पुतळा’(स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी) असे त्यांचे नामकरण करण्यात आले.
- हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. ‘आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर’चे (एआयसी) अध्यक्ष राम कुमार यांनी या सोहळय़ानंतर सांगितले, की विषमतेची समस्या केवळ भारतातच नाही तर ती जगभरात सर्वत्र विविध रुपात अस्तित्वात आहे. ‘दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे राष्ट्रीय अध्यक्ष रवीकुमार नर्रा यांनी सांगितले, की आंबेडकरांचा हा अमेरिकेतील सर्वात उंच पुतळा आहे.
- मोदी यांच्याकडून संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आंबेडकरवाद्यांनी अमेरिकेसह जागतिक स्तरावर एकात्म भारताचा पाया घातल्याबद्दल अभिनंदनाचा संदेश पाठवल्याचे अमेरिकेतील आंबेडकरी चळवळीचे नेते दिलीप म्हस्के यांनी सांगितले.
‘अल कायदा’पेक्षा ‘हमास’ भयंकर : जो बायडेन
- ‘‘इस्रायलवर ‘हमास’ने चढवलेल्या अनपेक्षित हल्ल्याचा तपशील जसजसा आम्हाला समजत आहे. तसतसे त्यातील भयावहता स्पष्ट होत आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ‘हमास’ ही ‘अल कायदा’या दहशतवादी संघटनेपेक्षाही भयंकर असल्याचे त्यावरून दिसत आहे,’’ असे मत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. फिलाडेल्फियातील ‘हायड्रोजन हब्ज’ येथे ते बोलत होते.
- बायडेन म्हणाले, की २७ अमेरिकन नागरिकांसह हजारांहून अधिक निष्पाप नागरिक ‘हमास’च्या हल्ल्यात मारले गेले आहेत. हा क्रूर हिंसाचार पाहता. त्यांच्या तुलनेत ‘अल कायदा’ काही प्रमाणात ठीक आहे, असे म्हणावेसे वाटते. हे सैतान आहेत. यासंदर्भात मी वारंवार सांगितले आहे, की, या संदर्भात अमेरिकेचे धोरण अजिबात चुकीचे नाही. आम्ही इस्रायलसोबत आहोत.
- परराष्ट्र मंत्री अॅंटनी िब्लकन हे काल इस्रायलमध्ये होते आणि आज संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन तेथे गेले आहेत. इस्रायलकडे स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी असल्याची शहानिशा आम्ही करत आहोत. गाझा परिसरात मानवतेवरील संकट हटवण्याला माझे प्राधान्य आहे. आपली पथके सूचनेनुसार या प्रदेशात काम करत आहेत. इजिप्त, जॉर्डन आणि इतर अरब देशांनी इस्रायलला अनुकूल धोरण घ्यावे, मदत करावी यासाठी संबंधित सरकार आणि संयुक्त राष्ट्रांशी आम्ही थेट संवाद साधत आहोत.
- बहुसंख्य पॅलेस्टिनी जनतेचा ‘हमास’ आणि त्याच्या हल्ल्याशी काहीही संबंध नाही, याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही या वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी एका तासाहून अधिक काळ ‘झूम कॉल’द्वारे या हल्ल्यात सर्व बेपत्ता झालेल्या अमेरिकन नागरिकांच्या कुटुंबांशी संवाद साधला. आपली बेपत्ता मुले, बालके, पत्नी, पत्नी कोणत्या स्थितीत आहे, याची त्यांना काहीच कल्पना नाही. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे, असे ते म्हणाले.
इस्त्रायलच्या घराघरातील नागरिक युध्दासाठी रवाना, देश शोकसागरात मात्र शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार
- इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक इस्त्रायली ज्यू नागरिक पेटून उठला आहे. प्रत्येक घरातून सरासरी एक तरुण या युध्दासाठी रवाना झाला आहे. या नरसंहारामुळे आम्ही दु:खात आहोत, हे आमच्या प्रत्येकावरील संकट आहे. पण आम्ही शेवटपर्यंत लढू आणि जिंकू असा निर्धार इस्त्रायली नागरिकांनी व्यक्त केला आहे.
- इस्त्रायलच्या गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यामुळे जग हादरलं आहे. दोन्ही बाजूने प्रतिहल्ले होत आहे. संपूर्ण देशात भीषण परिस्थिती उद्भवली आहे. आता सावरलेला प्रत्येक इस्त्रायली ज्यू या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज झाला आहे. आम्हाला कुणाची मदत नको आम्ही एकटे लढण्यासाठी समर्थ आहोत, असे इस्त्रायली राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक इस्त्रायली कुटुंबातील एक जण युध्दासाठी रवाना झाला आहे. काही कुटुंबातील २ ते ३ जण युध्दासाठी गेले आहेत. या हल्ल्यामुळे आम्ही बिथरणार नाही. आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ असे इस्त्राएलच्या डिमोरा शहरात राहणार्या अवराहम या ज्यू इस्त्रायली नागरिकाने लोकसत्ताला दूरध्वनीद्वारे सांगितले. अवराहम हे सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांना युध्दात जाता आले नाही. पण त्यांचा तरुण मुलगा लिओ लष्करात आहे. त्यांच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले असून जावई आदिराम आणि पुतण्या एरल हे युध्दासाठी रवाना झाले आहेत.
- डिमोरा शहर हे गाझा पट्टीपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील लोकसंख्या ३० हजारांहून अधिक आहे. युध्दामुळे शहरातील जनजीवन ठप्प झाले आहे. रस्त्यावर शुकशुकाट असून गाड्यांच्या लांबच लांब रागा आहेत. शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. आवश्यकता असेल तर घराच्या बाहेर पडा असे नागरिकांना सांगण्यात आले आहे. इस्त्रायली ज्यू नागरिक लढणार्या सैनिकांसाठी प्रार्थना करत आहेत.