चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 16, 2021 | Category : Current Affairs


काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, ‘या’ महिन्यात निवडणूक होणार :
 • दिल्लीत काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदांवर जोरदार खलबतं सुरू आहेत. अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा आरोप केला. हा मुद्दा काँग्रेसच्या आजच्या (१६ ऑक्टोबर) कार्यकारणीच्या बैठकीतही उपस्थित झाला.

 • यानंतर पक्षाने आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुका घेण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

 • अध्यक्षपदाची निवडणूक आणि सदस्यता अभियानाची अधिकृत घोषणा बाकी असली तरी ती केवळ औपचारिकता असल्याचंही सांगितलं जातंय. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी यांनीच आतापर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय.

 • देशातील काही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदी राहणार आहेत. या निवडणुकांनंतरच काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

२४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांची मन की बात; कल्पना सांगण्याचं मोदींचं आवाहन :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑक्टोबर रोजी मन की बात या रेडिओ कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग असेल. हे कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ (AIR), दूरदर्शन, AIR न्यूज आणि मोबाईल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर देखील प्रसारित केले जातील. खुद्द पंतप्रधानांनी याबाबत ट्विट करून माहिती शेअर केली.

 • पंतप्रधान मोदींनी याबद्दल एक ट्विट केले आहे. “मन की बात कार्यक्रम या महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी प्रसारित केला जाईल. या भागासाठी आपल्या कल्पना सांगण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 • आपल्या मागील मन की बात कार्यक्रमात, पंतप्रधान मोदींनी भारतीय संस्कृतीतील रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या महत्त्वावर भर दिला होता. यामध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रीय जल अभियान मोहीम कॅच द रेनची तुलना जल-जिलानी एकादशी आणि छठ उत्सवाशी केली होती.

सिंघू सीमेवर निर्घृण हत्या ; चौकशीची संयुक्त किसान मोर्चाची मागणी :
 • सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख ठिकाण बनलेल्या सिंघू सीमेवर शुक्रवारी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त असून या गटातील व्यक्ती सातत्याने आंदोलनस्थळी वावरत असल्याने शेतकरी संघटनांवरही दबाब वाढू लागला आहे. या हत्येचा संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून निहंग गटाचा आंदोलनाशी कोणताही संबंध नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

 •  आंदोलनस्थळी शुक्रवारी पहाटे पाच वाजता लखबीर सिंग ही व्यक्ती पोलिसांना मृत अवस्थेत सापडली. या व्यक्तीचा एक हात दोरखंडांनी बांधला होता, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखबीर सिंगभोवती उभ्या राहिलेल्या निहंग गटातील काही व्यक्ती त्याला जाब विचारत असल्याच्या चित्रफिती पोलिसांना मिळाल्या. या फितींच्या आधारे ही हत्या निहंग गटाने केल्याचा दावा पोलिसांनी केला.

 • ‘गुरु ग्रंथ साहिब’ची प्रत उचलून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पकडले. त्याला सिंघू सीमेवर कोणी पाठवले याची विचारणाही केली. त्यानंतर आम्ही त्याचे पाय मोडले आणि हात कापून टाकला. मग त्याला बांधून ठेवले. ज्याने या व्यक्तीला पाठवले त्यालाही आम्ही ठार मारू, असे निहंग गटातील व्यक्ती सांगत असल्याची चित्रफीतही पोलिसांनी जप्त केली. मृत लखबीर सिंग कामगार असून त्याचे वडील माजी सैनिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टी २० वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक :
 • भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविडवर भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मोठी जबाबदारी टाकली आहे. राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास सहमत झाला आहे.

 • श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत राहुल द्रविडने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -२० वर्ल्डकपनंतर संपत आहे. टी २० वर्ल्डकपनंतर द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे.

 • एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, द्रविडने प्रशिक्षक होण्यास संमती दिली आहे. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. विक्रम फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

 • भारतीय संघ आता बदलाच्या मार्गावर आहे. अनेक युवा खेळाडूंना यात सहभागी व्हायचे आहे. या सर्वांनी द्रविडसोबत काम केले आहे. भारतीय क्रिकेटसाठी हे खूप महत्त्वाचे असू शकते. राहुल द्रविड हा नेहमीच बीसीसीआयचा पर्याय होता.

संरक्षण दलाचे Ordinance Factory Board विसर्जित, ७ कंपन्यात केले रुपांतर :
 • संरक्षण दलाचा अविभाज्य भाग असलेले सर्वपरिचित आयुध निर्माण मंडळ म्हणजेच Ordinance Factory Board हे आज अखेर विसर्जित करण्यात आले. आता या मंडळाचे रुपांतर ७ कंपन्यांमध्ये करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका आभासी कार्यक्रमाद्वारे घोषित करण्यात आलं.

 • देशात १० राज्यात ४१ ठिकाणी दारुगोळा – शस्त्र निर्मितीचे कारखाने, असा Ordinance Factory Board चा पसारा होता. आता या सर्वांना ७ कंपन्यांमध्ये विभागण्यात आलं आहे. सुमारे ७५ हजार कर्मचारी या मंडळात काम करत असून कोणालाही न काढता यांना ७ कंपन्यांमध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील दोन वर्षात पुर्ण केली जाणार आहे.

 • यानिमित्ताने भाषण करतांना Ordinance Factory Board बद्दल परखड मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. “एकेकाळी जगातील शक्तिशाली संस्थापैकी एक म्हणून Ordinance Factory Board ची ओळख होती. काहींकडे चांगल्या सुविधा होत्या, कौशल्य होतं. जागतिक महायुद्धाच्या काळात या संस्थांची ताकद जगाने बघितली होती.

 • स्वातंत्र्यानंतर आधुनिकीकरण करणे आवश्यक होते, काळानुसार बदलण्याची गरज होती. मात्र लक्ष दिलं गेलं नाही, यामुळे संरक्षणात्मक गरजेसाठी विदेशावर अवलंबून रहायची वेळ आली. तेव्हा परिवर्तनासाठी आता या ७ कंपन्या मोठी भूमिका बजवणार आहेत.

 • गेल्या ७ वर्षात परिस्थिती बदलली आहे. संरक्षण विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणली आहे. स्वातंत्र्यानंतर आता खूप मोठे बदल संरक्षण क्षेत्रात होत आहेत”, असं पंतप्रधान म्हणाले. 

१६ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)