चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जुलै २०२१
Updated On : Jul 16, 2021 | Category : Current Affairs
-
मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावी अशी एक बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्व मधील संजल गावंडे या तरूणीने अमेरिकेच्या स्पेस टुरिझम मध्ये मराठी झेंडा फडकवला आहे. अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीने अंतराळ सफारीची घोषणा केली असून, २० जुलै रोजी कंपनीमार्फत न्यु शेफर्ड हे खासगी यान अॅमेझॉनचे संस्थापक व ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस याच्यासह काही निवडक जणांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. तर, हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये कल्याणच्या संजल गावंडे हिचा समावेश आहे.
-
कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या संजलची आई सुरेखा गावंडे एमटीएनएलमधील व वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध परीक्षा देत संजलने ही भरारी घेतली आहे.
-
मुंबई विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले व त्यासोबतच जीआरई, टोफेलसारख्या इंजिनिअरिंग विषयातील परीक्षांमध्येही यश मिळत, तिने अमेरिकेतील मिशगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला. तिथे देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत मॅकॅनिकलमध्ये मास्टर पदवी मिळवली. यानंतर २०१३ मध्ये तिने विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन कंपनीत जॉब सुरू केला.
-
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली.
-
राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
-
यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.
-
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. तसेच मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या संकेतस्थळावर शाळाना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
-
प्रवेश सत्र २०२१ साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज(गुरूवार) प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला.
-
यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकुण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
-
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.
-
भारताचा पाच वेळचा जगज्जेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने रशियाचा ग्रँडमास्टर व्लादिमिर क्रॅमनिक याचा पराभव करत स्पार्कास्सेन करंडक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.
-
पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने ६६ चालींमध्ये क्रॅमनिकला मात दिली. चार डावांच्या या सामन्यातील आनंदने १-० अशी आघाडी घेतली आहे.
-
आता दुसरा डाव गुरुवारी रात्री खेळवण्यात येईल. आनंदने नुकताच क्रोएशिया बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरीची नोंद करताना जलद (रॅपिड), अतिजलद (ब्लिट्झ ) प्रकारात दुसरे स्थान पटकावले होते.