चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जुलै २०२०

Date : 16 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रिलायन्सच्या ‘एजीएम’मध्ये निता अंबानींनी सांगितलं स्वतःचं स्वप्न, म्हणाल्या : 
  • भारताने ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करावं हे माझं स्वप्न आहे, असं रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी म्हणाल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेला रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी यांनी पहिल्यांदाच संबोधित केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा यावर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली.

  • यावेळी बोलताना निता अंबानी यांनी, भारतात ऑलिम्पिक गेम्स व्हावेत हे माझं स्वप्न आहे असं म्हटलं. निता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्याही (आयओसी) सदस्य आहेत. “भारतात ऑलिम्पिक गेम्स व्हावेत हे माझं स्वप्न आहे. भारतातील एथलिट्सना जागतिक स्तरावर चांगलं प्रदर्शन करताना मला बघायचं आहे”, असं निता अंबानी म्हणाल्या.

  • याशिवाय, वार्षिक सर्वसाधारण सभेला पहिल्यांदाच संबोधित करताना निता अंबानी यांनी, करोनाचं व्हॅक्सिन उपलब्ध होताच ते देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी रिलायन्स काम करणार असल्याचंही सांगितलं. “करोनाविरोधातील लढाई अजून बाकी आहे. जिओच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने, संपूर्ण देशभरात मेगा-स्केल कोविड टेस्टिंगसाठी सरकार आणि स्थानिक नगरपालिकांशी भागीदारी करणार आहे.

  • देशभरात जास्तीत जास्त कोविड चाचण्या करता याव्यात यासाठी जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची मदत घेतली जाईल आणि मी तुम्हाला आश्वासन देते की जसं करोनाचं व्हॅक्सिन उपलब्ध होईल ते डिजिटल डिस्ट्रिब्यूशन आणि सप्लाय चेनद्वारे (डिजिटल वितरण आणि पुरवठा साखळीचा वापर करून) देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचेल हे आम्ही सुनिश्चित करू”, असं त्या म्हणाल्या.

आता मास्क, सॅनिटायझरचे दरही निश्चित होणार; राज्य शासन नेमणार समिती :
  • करोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला असून याच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

  • आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. करोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटाजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे.

  • राज्य शासनाने यापूर्वी करोना रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे आकारणी करण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर करोना चाचण्यांचे तसेच रुग्णवाहिकांसाठीही दर निश्चित करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

करोनाचा उद्रेक… अमेरिकेत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ :
  • अमेरिकेत दिवसागणिक करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जगात सर्वात जास्त मृत्यू आणि करोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत अमेरिकेत ६७ हजार ६३२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढून आले आहेत.

  • मागील दहा दिवसांपासून अमेरिकेत दररोज ५५ ते ६५ हजार नवीन रुग्ण आढळून येत होते. आता गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांने एका दिवसांतील सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांचा विक्रम मोडीत काढला आहे.

  • वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत ३६ लाख १६ हजार ७४७ जण करोनाबाधित झाले आहेत. एक लाख ४० हजार अमेरिकन नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १६ लाख ४५ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. अमेरिकेतील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे.

परदेशी विद्यार्थ्यांना परतपाठवणीच्या निर्णयावरून ट्रम्प प्रशासनाची माघार :
  • ऑनलाइन वर्गात शिकणाऱ्या अमेरिकी विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे.

  • हार्वर्ड, एमआयटी यासह अनेक विद्यापीठांनी या निर्णयाविरोधात स्थलांतर व अंतर्गत सुरक्षा विभागाविरोधात न्यायालयात दावे दाखल केले होते. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता. उन्हाळी शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गासाठी हजेरी लावणार असतील त्यांना देशातून परत पाठवण्याचा निर्णय अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने ६ जुलै रोजी घेतला होता.

  • सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या शैक्षणिक सत्रात करोना संसर्गाच्या भीतीने अनेक विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असताना ट्रम्प प्रशासनाने जे परदेशी विद्यार्थी ऑनलाइन वर्गास हजेरी लावणार असतील त्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन आठवडय़ांनी या निर्णयावर मंगळवारी माघार घेण्यात आली असून एमआयटी, हार्वर्ड विद्यापीठ यांच्यासह एकूण दोनशे शिक्षण संस्थांनी याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते, तसेच या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. या निर्णयाला विरोध करण्यात १७ राज्ये, गुगल, मायक्रोसॉप्ट, फेसबुक यासारख्या कंपन्याही सहभागी होत्या.

बदलत्या परिस्थितीत कौशल्यांना महत्त्व - मोदी :
  • उद्योग व बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीत कौशल्य, फेरकौशल्य, सुधारित कौशल्य हाच मूलमंत्र आहे त्यामुळेच तुम्ही टिकून राहू शकाल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी युवकांना उद्देशून सांगितले. कोविड १९ मुळे कार्यसंस्कृती बदलत असून त्यात कौशल्यांना महत्त्व राहणार  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • कौशल्यपूर्ण भारत योजनेची पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित आभासी कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, कौशल्ये ही काळाबरोबर बदलत जातात व ती तुमच्याकडे असतील तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. आजच्या बदलत्या जगात लाखो कौशल्य संपन्न लोकांची गरज आहे. आरोग्य क्षेत्रात त्याची सध्या खूप गरज आहे.

  • र्मचट नेव्ही क्षेत्रात अनेक संधी आहेत. आपण या क्षेत्रात लाखो तज्ज्ञ खलाशी जगाला देऊ शकतो. त्यातून सागरी अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. करोना पेच प्रसंगाने कार्यसंस्कृती व कामाचे स्वरूप बदलले आहे. सतत बदलत्या तंत्रज्ञानाचाही त्यावर प्रभाव आहे. बाजारपेठा व उद्योग इतके झटपट बदलत आहेत की, त्याच्याशी सुसंगत कसे रहायचे हे समजत नाही असे लोक विचारतात.

१६ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.