चालू घडामोडी आणि दिनविशेष - 16 जानेवारी 2024

Date : 16 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मिशन लक्ष्यवेध! ऑलिम्पिक वीर घडविणारा ‘हा’ उपक्रम कोणत्या खेळांसाठी वाचा…
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेत राज्याची चांगली कामगिरी दिसावी, म्हणून विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना राज्य शासनाची झाली आहे. त्यासाठी आठ मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहे. खेळ व खेळाडू, पायाभूत सुविधा, क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षण, स्पर्धा आयोजन, क्रीडा विज्ञान व वैद्यकशास्त्र, प्रोत्साहन व पुरस्कार, करिअर मार्गदर्शन, देशी विदेशी संस्थांच्या सहयोगाने विकास उपक्रम या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यावर भर देत खेळाडू केंद्रित प्रशिक्षण कार्यक्रम तयार होणार आहे.
  • या कार्यक्रमासाठी बारा ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. अँथेलाटिक्स , बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टींग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य पातळीवर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय पातळीवर स्पोर्ट्स एक्सेलेन्स सेंटर तर जिल्हा पातळीवर क्रीडा प्रतिभा विकास अशी क्रीडा विकासाची त्रीस्तरीय यंत्रणा उभारण्याचे ठरले. हेच मिशन लक्ष्यवेध होय. त्यासाठी सोळा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून दहा टक्के रक्कम मिळणार. ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय पदके मिळविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
  • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या २४० खेळाडूंसाठी सहा ठिकाणी, राष्ट्रीय दर्जाच्या ७४० खेळाडूंसाठी ३७ ठिकाणी तर राज्य दर्जाच्या २७६० खेळाडूंसाठी १३८ ठिकाणी विविध क्षमतेची विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक सेवा आयुक्त हे या अनुषंगाने विविध करार, निविदा, आर्थिक सहाय्य, कंत्राटी मनुष्यबळ आदी बाबत नियंत्रण ठेवतील. कार्यक्रम, खेळाडू, प्रशिक्षक,झालेली कामगिरी, खर्च याबाबत शासन दर तीन महिन्यांनी आढावा घेणार.
अजित आगरकरला निवड समितीत मिळणार नवा जोडीदार! सिलेक्टर पदासाठी मागवले अर्ज
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्य निवड समितीमध्ये आगामी काळात बदल दिसू शकतात. बीसीसीआयने राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज मागवले आहेत. अजित आगर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये एकूण पाच सदस्य आहेत. सध्या एकही जागा रिक्त नाही. त्याचबरोबर एकाही सदस्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. अशा स्थितीत सध्याच्या निवड समितीतील कोणाला तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.
  • बीसीसीआयने या पदासाठी काही अटीशर्ती ठेवल्या आहेत. बोर्डाने म्हटले आहे की, निवडकर्ता पदासाठी सात कसोटी आणि ३० प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येतील. इच्छुकांनी २५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करावेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, बीसीसीआय शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावेल. आत्तापर्यंत, मुलाखतीची तारीख निश्चित केलेली नाही.

निवड समितीमध्ये कोण आहेत?

  • सध्याच्या निवड समितीमध्ये अजित आगरकर मुख्य निवडकर्ता आहेत. त्याच्याबरोबर माजी सलामीवीर फलंदाज शिव सुंदर दास, माजी वेगवान गोलंदाज सुबार्तो बॅनर्जी, सलील अंकोला आणि माजी फलंदाज श्रीधरन शरथ आहेत. आगरकर वगळता कोणत्याही एका व्यक्तीला नारळ दिला जाऊ शकतो. यात काही सदस्यांना या निवड समितीत खूप कालावधी झाला आहे.

उत्तर विभागातील सदस्य नाही

  • बीसीसीआय निवड समितीमध्ये सलील अंकोला यांना काढले जाऊ शकते, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. माध्यमांमध्ये अंकोला यांचे नाव पुढे आले आहे. तो निवड समितीमध्ये पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतो. समितीत या भागातील दोन सदस्य आहेत. आगरकरही पश्चिमेकडील प्रदेशातून येतात. अशा स्थितीत अंकोला यांना पदावरून पायउतार व्हावे लागू शकते. सध्या उत्तर विभागातून निवड समितीमध्ये कोणीही नाही. अशा परिस्थितीत या क्षेत्रातून कोणाची तरी निवड समितीत वर्णी लागू शकते. अजित आगरकरपूर्वी चेतन शर्मा मुख्य निवडकर्ता होते. स्टिंग ऑपरेशननंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार आता अंडा बिर्याणी, शिक्षण खात्याचा निर्णय
  • शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांना सकस आहार देऊन त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित करण्याचा हेतू आहे. आता नवा हेतू ठेवण्यात आला आहे. सध्या या आहारात तांदळापासून बनलेल्या पाककृतीच्या स्वरूपात लाभ मिळतो. आता नाविन्यपूर्ण उपक्रम आला. नियमित आहार देतानाच अतिरिक्त पूरक पौष्टिक आहार मुलांना द्यावा, असे प्राथमिक शिक्षण विभागास वाटते. कृषी विभागानेही तशी विनंती केली आहे.
  • अंडी उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ मिळण्यासाठी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेत अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषी खात्याने केली. उच्च प्रथिने, उष्मांक, जीवनसत्वे, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट अंड्यात असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांची वाढ चांगली होईल. रोगप्रतिकार शक्ती वाढेल. या भावनेने नियमित आहार देतानाच अंडी, केळी पोषण आहारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
  • आठवड्यातून एक दिवस अंडी मिळतील. अग्रिम अनुदान म्हणून या जानेवारीत प्रतिविद्यार्थी प्रतिआठवडा एका अंड्यामागे पाच रुपये लागू झाले आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करावी. बुधवार किंवा शुक्रवारी उकळलेले अंडे, अंडा पुलाव किंवा अंडा बिर्याणी या स्वरूपात द्यावे. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत त्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून द्यायचे आहे. याची अंमलबजावणी पात्र शाळेतून नियमित होईल, याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना घ्यायची आहे. या उपक्रमाची जनजागृती विविध माध्यमातून करण्याची सूचना आहे. विद्यार्थ्यांना लाभ दिला मात्र त्याची नोंद पोर्टलवर केली नसल्यास त्याचे अनुदान मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित वाटप होत आहे अथवा नाही, याची खातरजमा वारंवार भेट देऊन करायची आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नियमित पौष्टिक आहार व सोबतच अंडा बिर्याणीही मिळणार आहे.
थंडीबाबत काय म्हणाले हवामान खाते? काय आहे नेमका अंदाज?
  • अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण केली. शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरणारा हा पाऊस आता थांबला आहे. मात्र, पाऊस परतताच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने थंडीच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. उत्तर भारतात अजूनही थंडीची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी कारणीभूत ठरणार आहेत. मध्य आणि पूर्व भारतात येत्या ४८ तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.
  • राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात येत्या १९ जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल तापमान देखील कमी होण्याची शक्यता असून २५ जानेवारीपर्यंत थंडी अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात उशिराने थंडीची सुरुवात झाली. मात्र, गुलाबी थंडीचा आनंद फार काळ टिकला नाही आणि अवकाळी पावसाने ठाण मांडले. या पावसाने शेतकऱ्याचेही मोठे नुकसान केले. अवकाळी पावसाचे सावट सध्या दूर झाले आहे आणि पुन्हा एकदा थंडीची आनंदवार्ता मिळाली आहे.
  • राज्यातील हवामानात सध्या कोणताही बदल नसून हवामान कोरडे राहणार आहे. थंडीचा परिणाम विदर्भात देखील जाणवणार आहे आणि विदर्भातील थंडीसाठी मध्यप्रदेशकडून येणारे थंड वारे कारणीभूत आहेत. त्यामुळे येथेही येत्या दोन-तीन दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी येथेही थंडीची चाहूल जाणवेल. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरातच थंडीचा पारा घसरणार आहे. पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट दिसून येणार आहे. मध्य आणि पूर्व भारतात येत्या ४८ तासात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट दिसून येईल. दरम्यान मंगळवारपर्यंत पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होऊ शकतो आणि त्यानंतर देशातील हवामानात बदल घडून येऊ शकतो, असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘दावोस’साठी ३४ कोटींची तजवीज
  • दावोसमधील ‘जागतिक आर्थिक परिषदे’त महाराष्ट्राच्या सहभागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३४ कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
  • आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतील जागेचे आरक्षण, दालनाची उभारणी यासह शिष्टमंडळात सहभागी होणाऱ्या सदस्यांचा व्हिजा, विमान प्रवास, निवास, स्थानिक प्रवास खर्च व सुरक्षेसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी या दौऱ्यावर एमआयडीसीने ३२ कोटी ३१ लाख रुपये खर्च केला होता. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळातील काही सदस्यांच्या चार्टर्ड विमान प्रवासासाठी एक कोटी ८९ लाख रुपये मोजण्यात आले होते.
  • १५ ते १९ जानेवारी दरम्यान दावोस येथे या जागतिक आर्थिक परिषदेची वार्षिक बैठक होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळाच्या खर्चाचा मोठा भार हा महाराष्ट्र अैाद्याोगिक विकास महामंडळाकडून उचलला जातो. परिषदेत महाराष्ट्र सरकारकडून जागेचे आरक्षण, दालनाची उभारणी, डिझाइन, सजावट, भोजन व्यवस्था तसेच आनुषंगिक बाबींसाठी भारतीय उद्योग परिसंघाची (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेत महाराष्ट्र सरकारचे पॅव्हेलियन आरक्षित करण्यासाठी यापूर्वीच चार कोटी रुपयांची मान्यता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. याशिवाय दालनाची उभारणी तसेच सजावट, डिझाइन, भोजन व्यवस्थेसाठी यंदा १५ कोटी ९३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. यात पॅव्हेलियनमधील खानपान व्यवस्थेसाठी सव्वाकोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

गतवर्षीचा खर्च…

  • महाराष्ट्र पॅव्हेलियन – १६,३०,४१,८२० रु.
  • मुख्यमंत्री शिष्टमंडळाचा प्रवास – ७,२७,३२,४०१ रु.
  • स्टेट डिनर – १,९२,६७,३३० रु.
  • भेटवस्तू, प्रसिद्धी साहित्य इत्यादी – ६,३०,४३६ रु.
  • सुरक्षा – ६०,४१,६३१ रु.
  • स्थानिक वृत्तपत्रांमधील प्रसिद्धी – १,६२,९२,६३० रु.
  • आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी – २,००,५०,००० रु.
  • चार्टर्ड विमान – १,८९,८७१३५ रु.
  • फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी – ६१,२३,००० रु.
  • एकूण खर्च – ३२,३१,७६,४६३ रु

 

अमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना :
  • अमेरिकेत करोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायजेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सची मदत योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून थेट आर्थिक लाभ देण्यात येणार असून राष्ट्रीय लस योजनेला पाठबळ व उद्योगांना मदत हेही या योजनेचे उद्देश आहेत.

  • गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या मदत  योजनेत कोविड १९चा सामना करण्यासाठी ४१५ अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली असून १ लाख कोटी डॉलर्स हे लोक व कुटुंबे यांना थेट मदत हस्तांतरासाठी ठेवण्यात आले आहेत, तर उद्योगांना मदतीसाठी ४४० अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त चौदाशे डॉलर्स हे अमेरिकी लोकांना बेरोजगारी कार्यक्रमाअंतर्गत मार्च मध्यापासून सप्टेंबर अखेरीपर्यंत मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या कालावधीची व्याप्ती वाढवण्यात आली असून आर्थिक मदत ही ३०० डॉलर्सवरून ४०० डॉलर्स करण्यात आली आहे.

  • संघराज्य किमान वेतन तासाला १५ डॉलर्स करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी २० अब्ज डॉलर्स बाजूला काढण्यात आले असून शतकांमधील एका मोठय़ा आर्थिक पेचास आपण तोंड देत आहोत. त्यात अनेक लोकांना फटका बसला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, असे विलमिंग्टन येथून बोलताना नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी सांगितले.

  • एका वर्षांत चार लाख अमेरिकी लोकांनी करोनामुळे प्राण गमावले असून अनेकांच्या नोक ऱ्या गेल्या. १८ दशलक्ष अमेरिकी लोक बेरोजगार विम्यावर जगत असून चार लाख लहान उद्योग कायमचे बंद झाले आहेत. बायडेन हे सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात मदत योजना जाहीर करणार आहेत. भाडय़ाने राहणाऱ्या १४ दशलक्ष लोकांना भाडे थकल्याने घराबाहेर हाकलले जाण्याची भीती आहे, त्यांना मदत केली जाणार आहे.

‘या’ तारखेपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार, शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती :
  • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउन करण्यात आला. त्यावेळी राज्यातील शाळा देखील बंद झाल्या. आता हळूहळू शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

  • “मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते” असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

  • शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी स्नेसारेव्ह :
  • बेलारूसच्या निकोलाय स्नेसारेव्ह यांची भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) नियुक्ती केली आहे. दोन वर्षेआधी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्नेसारेव्ह यांची सप्टेंबपर्यंत पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.

  • मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंना ते मार्गदर्शन करतील. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ३००० मीटर स्टिपलचेस धावपटू अविनाश साबळेला ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच ऑलिम्पिककरिता पात्र ठरण्यासाठी उत्सुक असलेल्यांनाही ते मार्गदर्शन करतील.

  • भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी स्नेसारेव्ह यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. ‘‘स्नेसारेव्ह यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची साबळेची इच्छा होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साबळेची कामगिरी उंचावण्याची आशा आहे,’’ असे सुमारीवाला म्हणाले.

  • ‘‘भारतासोबत याआधी स्नेसारेव्ह यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळे ललिता बाबर हिला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अव्वल १० जणांमध्ये धडक मारता आली. त्याचबरोबर सुधा सिंह हिनेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम कामगिरी केली आहे,’’ असेही सुमारीवाला यांनी सांगितले. २००५पासून स्नेसारेव्ह भारतीय अ‍ॅथलेटिक्सशी जोडले गेले आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकबाबत काहीही घडू शकते :
  • लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिकबाबत काहीही घडू शकते. आता अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत स्पर्धेच्या आयोजनाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे, असे मत जपानचे संसदीय मंत्री तारो कोनो यांनी मांडले आहे.

  • कोणत्याही परिस्थिती सुरक्षितपणे आणि सर्वाची काळजी घेऊन टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येईल, असे संयोजन समिती आणि जपान सरकारद्वारे ठामपणे सांगितले जात असताना कोनो यांच्या वक्तव्याने मात्र ऑलिम्पिकबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

  • ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याला कोनो यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जपानमधील ८० टक्के जनतेला ऑलिम्पिक स्पर्धा नको, असे एका मतदान चाचणीनंतर समोर आले होते. ‘‘ऑलिम्पिकबाबत काहीही घडू शकते,’’ असे सूचक वक्तव्य कोनो यांनी केले आहे. कोनो हे जपानचे माजी सुरक्षामंत्री आणि विद्यमान प्रशासकीय आणि नियामक सुधारणा मंत्री आहेत.

  • जपानमध्ये सध्या करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे तिथे टाळेबंदी होण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत जपानने करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण राखले आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत संयोजन समितीकडे प्रतिक्रियेसाठी विचारणा केली जात आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या :
  • अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामासाठी शुक्रवारपासून देणग्या गोळा करण्याच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यापोटी पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम देणगी म्हणून दिली.

  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबीयांकडून यापूर्वीच पाच लाखांहून अधिक रक्कम देणगी म्हणून देण्यात आली आहे. त्यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत वाल्मीकी मंदिरात पूजा केली. राय बरेलीच्या बैसवारा जिल्ह्य़ातील तेजगावचे माजी आमदार सुरेंद्र बहादूर सिंह यांनी सर्वाधिक म्हणजे एक कोटी, ११ लाख, ११ हजार १११ रुपयांच्या देणगीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला.

  • विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देणगी गोळा करण्याची मोहीम शुक्रवारपासून सुरू करण्यात आली असून रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने पाच लाख १०० रुपयांची देणगी दिली, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी सांगितले.

16 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.