चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ ऑक्टोबर २०२२

Date : 15 October, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चॅम्पियन्स लीग फुटबॉल - बार्सिलोना-इंटर सामना बरोबरीत :
  • आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने ‘युएफा’ चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या लढतीत पिछाडीवरून इंटर मिलानला ३-३ अशा बरोबरीत रोखले. मात्र, या निकालानंतरही बार्सिलोनाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपले आव्हान कायम राखण्यासाठी बार्सिलोनाने उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आणि इंटरने गुण गमावणे गरजेचे आहे.

  • इंटरविरुद्ध उस्मान डेम्बेलेने (४०व्या मिनिटाला) गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात निकोलो बारेला (५०व्या मि.) आणि लॉटारो मार्टिनेझ (६३व्या मि.) यांनी गोल केल्यामुळे इंटरने २-१ अशी आघाडी मिळवली.

  • ८२व्या मिनिटाला लेवांडोवस्कीने बार्सिलोनाकडून बरोबरीचा गोल झळकावला. यानंतर रॉबिन गोसेन्सने (८९व्या मि.) गोल करत इंटरला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, भरपाई वेळेत लेवांडोवस्कीने पुन्हा गोल केल्यामुळे बार्सिलोनाने हा सामना बरोबरीत सोडवला.

५० ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड :
  • इतर बहुजन कल्याण खात्याकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी ५० इतर मागास वर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे यावर्षीपासून १० ऐवजी ५० विद्यार्थ्यांचा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

  • महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील लोकसंख्याचे प्रमाण लक्षात घेता गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विजाभज, इतर मागास वर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी संख्येत १० वरून ५० इतकी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या २७ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार १३ ऑक्टोबरला ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

  • राज्य सरकारने विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय तातडीने लागू केल्याने ओबीसी, विद्यार्थी संघटनांनी त्याचे स्वागत केले. या निर्णयासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे आदींनी राज्य शासनाचे आभार मानले. 

  • ‘महाज्योती’ने शिष्यवृत्ती निर्णय लागू करावा - ‘स्टुडंट राईटस असोसिएशन’चे अध्यक्ष उमेश कोराम यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून ‘महाज्योती’नेसुद्धा त्यांची योजना लागू करण्याची मागणी केली आहे. ‘महाज्योती’ने  १०० विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा ठराव केला आहे.

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले क्षेपणास्र; १७० तोफगोळ्यांचा मारा, दोन्ही देशांमधील तणाव वाढला :
  • समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तर कोरियाने क्षेपणास्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे. या परिसरात उत्तर कोरियाने लढाऊ विमानं उडवल्याचा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे. शुक्रवारी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी उत्तर कोरियाच्या राजधानीतून क्षेपणास्र डागले, असे दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे.

  • सीमाभागातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागातून १७० तोफगोळ्यांचा मारा करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी केला आहे. २०१८ मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियामधील लष्करी कराराद्वारे तणाव निवळल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या सागरी बफर झोनमध्ये हे तोफगोळे पडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. हे दोन्ही देशांमधील लष्करी कराराचे उल्लंघन असल्याचे दक्षिण कोरियाचे संयुक्त दलाचे प्रमुख म्हणाले आहेत.

  • ४ ऑक्टोबरला उत्तर कोरियाने मध्यम तीव्रतेचे बॅलिस्टिक क्षेपणास्र डागले होते. त्याआधी या देशाकडून लष्करी कवायती करण्यात आल्या होत्या. उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्र चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अलिकडेच उत्तर कोरियाने जपानवर क्षेपणास्र डागले होते. त्याच्या प्रत्युत्तरात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियानेही क्षेपणास्राच्या चाचण्या केल्या आहेत. या देशांनी संयुक्त लष्करी सरावही केला आहे.

  • उत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्राचा भारताकडून निषेध नोंदवण्यात आला होता. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले होते. या घटनेचा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतासह ११ देशांनी संयुक्त निवेदन जारी करत निषेध नोंदवला होता.

तापमान वाढीमुळे कोणत्या पाच देशांचे भविष्य अंधःकारमय? उर्वरित जगासाठी कोणता इशारा :
  • जागतिक तापमान वाढीला आळा घालण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत असले तरीही ते अपुरे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जगासमोरच नवे आव्हान निर्माण झाले आहे.

  • प्रामुख्याने या तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांची जमीन आणि ओळख गमावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मालदीव, तुवालू, मार्शल आयलँड्स, नाउरू आणि किरिबाती या पाच देशांसाठी ही भीती सर्वाधिक आहे. यांतकील मालदीव हिंद महासागरातील असून, उर्वरित चार देश प्रशांत महासागरात आहेत.

  • मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी अलीकडेच ही भीती बोलून दाखवली आहे. असे झाल्यास ही मोठी शोकांतिका ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही भीती प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी जगभरातून कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

१५ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.