चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 15, 2021 | Category : Current Affairs


दिव्या देशमुख महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’ :
 • महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने भारताची २२वी ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरण्याचा मान पटकावला. १६ वर्षीय दिव्याने महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरतानाच आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकषही (नॉर्म) प्राप्त केला आहे.

 • हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली. तब्बल १९ महिन्यांनंतर प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या पटावर खेळणाऱ्या दिव्याने (एलो २३०५ गुण) ‘महिला ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण केले.

 • १० दिवस चाललेल्या स्पर्धेत दिव्याने तिच्यापेक्षा वरचे किताब मिळवलेल्या चार खेळाडूंना बरोबरीत रोखले. तसेच तिने तीन लढती जिंकल्या आणि दोन लढतींत तिला पराभव पत्करावा लागला. शेवटून दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या सिद्धार्थ जगदीशला बरोबरीत रोखल्याने दिव्याचा ‘महिला ग्रँडमास्टर’साठी आवश्यक तिसरा निकष पूर्ण झाला.

 • ‘महिला ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने एलो २३०० गुण आणि तीन निकष पूर्ण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, अखेरच्या फेरीत हंगेरीच्या पाप लेव्हेंटेला बरोबरीत रोखत दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकष पूर्ण केला. हा किताब मिळवण्यासाठी तिला एलो २४०० गुण आणि तीन निकषांचा टप्पा पूर्ण करावा लागेल. दिव्याला या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १७.७ आंतरराष्ट्रीय गुण मिळाले.

‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धा : छेत्रीच्या गोल धडाक्यामुळे भारताचा अंतिम फेरीत प्रवेश :
 • कर्णधार सुनील छेत्रीच्या दुहेरी गोल धडाक्यामुळे भारताने यजमान मालदीववर ३-१ असा विजय मिळवत ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यातील दोन गोलसह छेत्रीने (७९ गोल) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (७७) यांना मागे टाकले.

 • भारताला या स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी मालदीवविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य होते. भारताने सुरुवातीपासून मालदीवच्या बचावफळीवर दडपण टाकले. त्यांनी चेंडूवर ताबा मिळवला. ३३व्या मिनिटाला मनवीर सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी काही मिनिटेच टिकली.

 • मध्यंतरापूर्वी अली अश्फाकने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे मालदीवने सामन्यात बरोबरी साधली. मात्र प्रेरणादायी छेत्रीने पुन्हा एकदा विजयवीरची भूमिका बजावताना नऊ मिनिटांत (६२ आणि ७१वे मिनिट) दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिला. यानंतर बचावफळीने उत्कृष्ट खेळ केल्याने भारताने हा सामना जिंकला. आता शनिवारी (१६ ऑक्टोबर) होणाऱ्या ‘सॅफ’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतापुढे नेपाळचे आव्हान असेल.

करोना विषाणूला पेशीतून प्रवेश करण्यास रोखणाऱ्या संयुगाचा शोध :
 • करोना विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखणारे संयुग वैज्ञानिकांनी तयार केले असून संसर्गाच्या आधीच्या टप्प्यात ते दिल्यास करोनाचा संसर्ग होत नाही.

 • एमएम ३१२२ हे संयुग विषाणूच्या अनेक वैशिष्टय़ांमध्ये बदल करते. हे संयुग वापरल्यानंतर विषाणूत असे बदल होतात की, जे त्याला पेशीत प्रवेश करू देत नाहीत, असे ‘वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात म्हटले आहे की, विषाणूतील जे प्रथिन मानवी पेशीवर आघात करते त्याला ट्रान्समेम्ब्रेन सेरीन प्रोटिएज २ असे म्हणतात.

 • वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ लेखक जेम्स डब्ल्यू जॅनेटका यांनी म्हटले आहे की, आता सार्स सीओव्ही २ वर अनेक लशी उपलब्ध आहेत. असे असले तरी विषाणूविरोधी औषधांची गरज आहे. कारण करोनाची जगातील स्थिती फारशी सुधारलेली नाही. आता जे संयुग शोधून काढण्यात आले आहे ते विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखते. जॅनेट यांनी पुढे म्हटले आहे की, तोंडावाटे घेतले जाणारे इनहिबिटर्स असतात त्यातून हे संयुग देण्याची गरज आहे. त्यातून करोनावर परिणामकारक पद्धतीने मात करता येईल.

 • सार्स सीओव्ही २ सारखे अनेक विषाणू आहेत. त्यात करोना विषाणूंचा समावेश होतो. इन्फ्लुएंझासारखेही विषाणू आहेत. ते प्रथिनांच्या मदतीने मानवाला संसर्ग करीत असतात. नंतर ते फुफ्फुसात पसरतात. विषाणू पेशीत शिरल्यानंतर एपिथेलिया पेशींवर हल्ला करतो. नंतर मानवी पेशीतील टीएमपीआरएसएस २ हे प्रथिन विषाणूच्या प्रथिनाला तोडते. त्यामुळे करोनापासून बचाव होतो.

इंदिरा गांधींनीही केले होते वीर सावरकरांचे कौतुक; केंद्रीय मंत्र्यांचं जुनं ट्वीट व्हायरल :
 • मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून अंदमान तुरुंगात असलेल्या वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली होती असे म्हटले होते. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद उफाळून आला आहे. या विधानाबाबत काँग्रेस पक्षाकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

 • यापुर्वी अनेकवेळा कॉंग्रेसने सावरकरांवर ब्रिटिशांची माफी मागण्याचा आरोप करत आला आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा वाद समोर आला आहे. या पार्श्वभूमीर एक जुनं पत्र चांगलच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचे कौतुक केले आहे.

 • “सावरकरांविरोधात खोटे बोलले गेले. त्यांनी वारंवार ब्रिटिशांची माफी मागितली असे सांगितले गेले, पण सत्य हे आहे की त्यांनी स्वतःला क्षमा करण्यासाठी दया याचिका दिली नाही. महात्मा गांधींनी त्यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते.

 • महात्मा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी ही याचिका दिली होती. महात्मा गांधींनी सावरकरांना सोडून द्यावे असे आवाहन केले होते. पण त्यांना बदनाम करण्यासाठी, त्यांनी माफी मागितली असे सांगितले जाते, जे पूर्णपणे निराधार आहे,” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला.

१५ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)