चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ नोव्हेंबर २०१९

Date : 15 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘शबरीमला’चा वाद सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे :
  • शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय आता सात न्यायमूर्तीचे खंडपीठ घेणार आहे. या संदर्भातील फेरविचार याचिकेवर तीन विरुद्ध दोन अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. तर धर्माशी निगडित प्रथा-परंपरांचा सखोल आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मांडले.

  • शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी असल्याच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील समान हक्कांचा आधार घेत सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशास मुभा दिली. २८ सप्टेंबर २०१८ रोजी बहुमताने दिलेला हा निकाल घटनापीठाच्या पुढील निकालापर्यंत कायम राहणार आहे. शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ निकालाविरोधात ६० फेरयाचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी दिलेल्या निकालात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय खानविलकर आणि न्या. इंदू मल्होत्रा यांनी धर्मप्रथांचा सखोल विचार करून अर्थ लावला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यापूर्वीच्या निकालामध्ये नोंदवलेले मत न्या. मल्होत्रा यांनी कायम ठेवले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांनी संविधान सर्वोच्च असून तोच ‘पवित्र ग्रंथ’ असल्याचे मत मांडून सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास अनुकूलता दर्शवली होती.

भारत-चीन संबंधांना नवी दिशा, नवी ऊर्जा : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची चेन्नईमध्ये दुसऱ्यांदा अनौपचारिक चर्चा झाली त्यानंतर द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. व्यापारासह विविध क्षेत्रांमध्ये बारत-चीन संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

  • चेन्नईमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर जवळपास एका महिन्याच्या कालावधीनंतर दोन्ही नेत्यांची ब्रिक्स परिषदेत भेट झाली. जिनपिंग यांना पुन्हा एकदा भेटून आनंद झाल्याचे मोदी यांनी ट्वीट केले आहे. ब्राझीलमध्येच आपण प्रथम भेटलो होतो, तेव्हा आपण अपरिचित होतो, मात्र अपरिचितांच्या प्रवासाचे आता घनिष्ठ मैत्रीत रूपान्तर झाले आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

  • चेन्नईतील आपल्या भेटीमुळे आपल्या प्रवासाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे, आपण एकमेकांच्या आणि जागतिक प्रश्नांवर चर्चा केली आणि ती यशस्वी झाली, असे मोदी यांनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय प्रश्नांवर व्यापक चर्चा केली. दहशतवादाचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचे, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक आदींबाबत चर्चा केली.

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे : 
  • पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निमंत्रण ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी स्वीकारले आहे.

  • ब्रिक्स परिषदेत मोदी आणि बोल्सोनारो यांची भेट झाली त्या वेळी मोदी यांनी बोल्सोनारो यांना निमंत्रण दिले. द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये फलदायी चर्चा झाली. ब्राझीलच्या अध्यक्षांनी मोठय़ा व्यापारी शिष्टमंडळासह भारतामध्ये येण्याची तयारी दर्शविली आहे.

आदर्श सोसायटी नियमित करणे शक्य आहे का ते पाहा : 
  • पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून बांधलेली ‘आदर्श सोसायटी’ची इमारत नियमित करण्याच्या सोसायटीच्या अर्जावर विचार करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला दिले आहेत. सागरी किनारा नियंत्रण क्षेत्रातील (सीआरझेड) बांधकामांबाबत २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या अधिसूचनेअंतर्गत सोसायटीच्या या अर्जाचा विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश देताना प्रामुख्याने स्पष्ट केले आहे.

  • ‘आदर्श’ची इमारत ही पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून उभी करण्यात आल्याचा निर्वाळा देत एप्रिल २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने ती पाडण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर केंद्र सरकारने ही इमारत आपल्या ताब्यात घेतली होती.

  • दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात असलेल्या या इमारतीतील सदनिका बहाल करण्याचा, इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या पर्यावरणीय परवानग्या यांमुळे ‘आदर्श’ सोसायटीचा घोटाळा बरीच वर्षे चर्चेत राहिला. इमारत पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचे उघड झाल्यावर जानेवारी २०११मध्ये पर्यावरण मंत्रालयाने ती पाडण्याचे आदेश दिले होते. एप्रिल २०१४मध्ये उच्च न्यायालयाने पर्यावरण मंत्रालयाचा हा निर्णय योग्य ठरवला होता.

बदलत्या जगात वेगवान परराष्ट्र धोरण आवश्यक : 
  • जागतिक व्यासपीठावर भारताने खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित असताना  भारतीय परराष्ट्र धोरणाला सिद्धातांशी बांधून ठेवणे शक्य नाही. वेगाने बदलणाऱ्या जगात हे धोरण वेगवानच असले पाहिजे, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

  • ‘बियाँड द दिल्ली डोगमा : इंडियन फॉरेन पॉलिसी इन चेंजिंग वर्ल्ड’ या विषयावर दी इंडियन एक्स्प्रेस समूहाने आयोजित केलेल्या चौथ्या रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. सध्या आपण बदलाच्या एका टोकावर आहोत. अधिक आत्मविश्वासाने ध्येयांचा पाठलाग करावा लागतो आणि विरोधाभासांनाही तोंड द्यावे लागते. जोखीम पत्करल्यानेच महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात, असेही जयशंकर यांनी सांगितले.

  • जगातील अग्रगण्य शक्ती होण्याची इच्छा असलेला देश सीमावाद, अंतर्गत वादामुळे तशी अपेक्षा करू शकत नाही. त्याचबरोबर बदलत्या जगात तो सिद्धान्तांनाही चिकटून राहू शकत नाही, असे जयशंकर म्हणाले. बदलत्या जगानुसार आपल्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये बदल  करणे आवश्यक आहे. भूतकाळात रमलो तर त्याचा भविष्यात लाभ होणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

पुतिन यांचं पंतप्रधान मोदींना रशिया भेटीचं निमंत्रण : 
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा अमृतमहोत्सव दिन साजरा करण्यासाठी रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची येथे बैठक पार पडली त्यावेळी उभयतांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला व विशेष धोरणात्मक सहभागाबाबत चर्चा केली.

  • दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारण्याबाबत सहकार्य करणे आणि जगातील पाच मोठय़ा अर्थव्यवस्थांसमवेत असलेले संबंध अधिक बळकट करणे यावर ब्रिक्स परिषदेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मोदी ११ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने येथे आले असून त्यांनी बुधवारी पुतिन यांच्याशी चर्चा केली आणि भारत-रशिया संबंधांचा व्यापक आढावा घेतला.

  • पुतिन यांच्यासमवेत चांगली चर्चा झाली, आम्ही दोन्ही देशांमधील संबंधांचा आढावा घेतला. व्यापार, सुरक्षा आणि संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना उत्तम सहकार्य करीत आहेत, दोन्ही देशांमध्ये असलेल्या उत्तम संबंधांचा दोन्ही देशांना लाभ होईल, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे. मोदी आणि पुतिन यांची या वर्षी चौथ्यांदा भेट झाली. सततच्या भेटींमुळे आमच्यातील संबंध दृढ झाले आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.

  • १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.

  • १९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

  • १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.

  • १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.

  • २०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

जन्म 

  • १७३८: जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)

  • १८७५: झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९००)

  • १८८५: आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)

  • १९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९)

  • १९१७: संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)

  • १९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)

  • १९२७: आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)

  • १९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)

  • १९४८: कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००३)

मृत्यू 

  • १६३०: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १५७१)

  • १७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)

  • १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१०)

  • १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.

  • १९८२: भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)

  • १९९६: कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.

  • २०१२: केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.