चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ मार्च २०२१

Date : 15 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुप्रियो, दासगुप्ता, लाहिरी,  ई. श्रीधरन भाजपचे उमेदवार :
  • पश्चिम बंगाल, केरळ, आसाम व तमिळनाडू या राज्यांतील आगामी विधानभा निवडणुकांसाठी एक केंद्रीय मंत्री आणि अनेक खासदार यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवारांचा समावेश असलेली यादी भारतीय जनता पक्षाने रविवारी जाहीर केली.

  • केरळसाठी पक्षाने ११२ उमेदवारांची नावे घोषित केली. या ठिकाणी पक्ष विधानसभेच्या १४० पैकी ११५ जागा लढवणार आहे. आसाम विधानसभेसाठी पक्षाने १७ उमेदवारांची नावे जाहीर केली, तर पश्चिम बंगालमधील तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील निवडणुकासाठी ६३ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

  • पश्चिम बंगालमध्ये भाजपने सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांना अलीपूरद्वार येथून, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना टॉलीगंजमधून, तर राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांना तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

  • अभिनयाचे क्षेत्र सोडून राजकारणात आलेल्या विद्यमान खासदार लॉकेट चॅटर्जी यांना चुंचुडा येथून, तर दुसरे खासदार निसिथ प्रामाणिक यांना दिनहाटा येथून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या चुरशीच्या ठरलेल्या निवडणूक संग्रामात पक्षाने अनेक चित्रपट तारे- तारकांना उमेदवार बनवले आहे.

 ‘सार्वजनिक बँका विकणे मोठी चूक’ :
  • देशाची अर्थव्यवस्था सध्या करोनाच्या अवकळेतून बाहेर पडण्याच्या स्थितीत असताना पतधोरण व्यवस्थेच्या चौकटीत धोकादायक बदल केल्यास रोखे बाजारात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक बँका खासगी उद्योगसमूहांना विकणे ही मोठी चूक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. चालू पतधोरण व्यवस्थेत चलनवाढ रोखून आर्थिक वाढ साकार करण्याचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

  • त्यांनी असे मत व्यक्त केले, की भारताने २०२४-२५ पर्यंत पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था साकार करण्याचे ठेवलेले उद्दिष्ट फार महत्त्वाकांक्षी असून करोना काळाच्या आधीही हे लक्ष्य ठरवताना काळजीपूर्वक आकडेमोड केलेली दिसत नाही. पतधोरण हे चलनवाढ खाली आणू शकते यावर आपला विश्वास आहे. रिझर्व्ह बँकेला काही प्रमाणात लवचीकता दिल्यास त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नसताना जर आपण वित्तीय तूट हाताळण्याचा प्रयत्न केला असता तर काय झाले असते याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

  • पतधोरणाचा भाग म्हणून चलनवाढ २ ते ६ टक्के या दरम्यान ठेवण्याच्या मुद्द्यावर फेरविचाराची आवश्यकता आहे का, या प्रश्नावर उपरोल्लेखित स्पष्टीकरण केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला किरकोळ क्षेत्रातील चलनवाढ ४ टक्क््यांपर्यंत ठेवण्यास मुभा आहे, त्यात अलीकडे २ टक्के व पलीकडे २ टक्क््यांपर्यंत मुभा आहे. याचाच अर्थ ती ४ ते ६ टक्के ठेवण्यास हरकत नाही असे सध्याचे धोरण आहे.

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने ही परिस्थिती लक्षात घेऊनच व्याज  दर ठरवून दिले आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये  मध्यावधी मुदतीसाठी चलनवाढीची ठरवून दिलेली मर्यादा ३१ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानंतरच्या पाच वर्षांसाठी म्हणजे १ एप्रिलपासून पुढे पाच वर्षांसाठी चलनवाढीची मर्यादा ठरवण्यात येत आहे.

२० वर्षांपूर्वी कोणी लिहिला भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अंक :
  • २० वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकत्ता येथील ईडन गार्डनवर झालेल्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम भागिदाराची नोंद झाली. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या भारताच्या दोन सर्वोत्कृष्ट फलंदाजांनी याची नोंद केली.

  • नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४४ धावांची मजल मारली. भारताच्या हरभजनसिंगने या डावात हॅट्रिक घेतली होती . प्रत्युत्तरादाखल सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताचा डाव १७१ धावांत संपुष्टात आला आणि त्यामुळे फॉलो ऑनची नामुष्की भारताला पत्करावी लागली.

  • यावेळी भारताने चांगली सुरुवात केली आणि चार गडी गमावून २३२ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्मण आणि द्रविड यांच्यात भागीदारीला सुरूवात झाली ज्यामुळे मॅचचं वारंच पलटलं. ग्लेन मॅकग्राने बाद केले त्याआधी लक्ष्मणने २८१ धावा फटकावल्या होत्या. द्रविड १८० धावा काढून बाद झाला. भारताने ६५७ वर ७ आपला डाव घोषित केला आणि पाहुण्या संघाला ३८४ धावांचे आव्हान दिले.

  • कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावांमध्ये आटोपला. भारताने १७१ धावांनी ही कसोटी जिंकली

  • या भागिदारीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, #२००१ मध्ये, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडने कोलकाताच्या ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार भागिदारीचे प्रदर्शन केले.

सरकारी ताफ्यातील प्रदूषणकारी वाहने लवकरच बाद :
  • देशात पंधरा वर्षे जुन्या सरकारी वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणास १ एप्रिल २०२२ नंतर परवानगी न देण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. त्यामुळे प्रदूषण करणारी अनेक वाहने वापरातून बाद होणार आहेत.

  • सरकारने या प्रस्तावावर संबंधितांची मते मागवली असून ही अधिसूचना मंजूर झाल्यास वाहन उद्योगाला उत्तेजन मिळणार आहे तसेच प्रदूषणालाही आळा बसेल. पण त्याचबरोबर सरकारला नवीन वाहने खरेदी करावी लागणार आहेत. सरकारने स्वेच्छेने जुनी वाहने निकाली काढण्याचे धोरण २०२१-२२ पासून जाहीर केले असून वीस वर्षे जुन्या व्यक्तिगत व १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांची चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • ही अधिसूचना १२ मार्चला जारी केली असून केंद्र सरकारने संबंधितांची मते त्यावर मागवली आहेत. सरकारी वाहने जर पंधरा वर्षे जुनी असतील तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण १ एप्रिल २०२२ पर्यंतच करता येईल असा हा प्रस्ताव आहे.

स्थानिकांना ७५ टक्के नोकऱ्यांचे द्रमुकचे आश्वासन :
  • तमिळनाडूतील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. विद्याथ्र्यांना डेटाकार्डसह विनामूल्य संगणक टॅब्लेट देण्याचे आणि राज्यात स्थानिकांना ७५ टक्के नोकऱ्या देण्यासाठी कायदा करण्याचे आश्वासन द्रमुकने दिले आहे.

  • हिंदूंच्या मंदिरात तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या एक लाख लोकांना २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य, प्रसूती रजेत वाढ आणि आर्थिक साहाय्य, इंधनाच्या दरात कपात आणि ‘नीट’वर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासनही द्रमुकने दिले आहे.

  • आपले सरकार सत्तेवर आल्यास ज्या कुटुंबात पहिलाच पदवीधर झाला असेल तर अशांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल, लहान शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येईल आणि खासगी क्षेत्रात आरक्षणाचा आग्रह धरला जाईल, असेही द्रमुकचे अध्यक्ष स्टालिन यांनी जाहीरनामा जाहीर करताना सांगितले.

काळजी घ्या! देशातील प्रत्येक ५ करोना रुग्णांमध्ये ३ महाराष्ट्रातील :
  • महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग वेगानं फोफावत चालला आहे. मागील काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये राज्यात दररोज २० हजारांपर्यंत रुग्ण आढळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या देशात आढळून येणाऱ्या प्रत्येक ५ रुग्णांपैकी ३ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

  • निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर लोकांकडून करोना प्रतिबंधात्मक उपायांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, मास्क वापराकडेही लोकांकडून काणाडोळा केला जात आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पुन्हा करोना संसर्गाने डोके वर काढले.

  • राज्यातील रुग्णसख्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. गुरुवारी देशभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी पहिल्यांदाच ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. देशभरात २३ हजार २८५ रुग्ण आढळून आले. तर महाराष्ट्रात १४ हजार ३१७ रुग्ण आढळू आले होते.

  • शुक्रवारी ही संख्या आणखी वाढली. शुक्रवारी राज्यात १५,८१७ इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यात मुंबईत १६४७, ठाणे जिल्हा १,१५३, नागपूरमधील १७२९ आणि पुण्यातील १८४५ रुग्णांचा समावेश आहे. कठोर निर्बंध लागू असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ४१६ करोना रुग्ण आढळले आहेत.

१५ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.