चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 जून 2023

Date : 15 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतास ड्रोनविक्रीसाठी अमेरिकेचे प्रयत्न, मोदी यांच्या आगामी दौऱ्याची पार्श्वभूमी
  • अमेरिकेकडून शस्त्रसज्ज ड्रोन खरेदी करण्याचा भारताचा प्रस्ताव दीर्घकाळ लाल फितीत अडकला असून हा खरेदी करार मार्गी लावण्यासाठी बायडेन प्रशासनाने भारत सरकारकडे आग्रह धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी अमेरिका दौरा लक्षात घेता ड्रोन विक्रीसाठी अमेरिकेचे सरकार सक्रिय झाल्याचे या घडामोडींशी संबंधित दोन जणांनी सांगितले.
  • भारताने दीर्घकाळपासून अमेरिकेकडून मोठे शस्त्रसज्ज ड्रोन विकत घेण्यात स्वारस्य दाखविले आहे, पण नोकरशाहीतील अडथळय़ांमुळे सी गार्डियन ड्रोन खरेदीचा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला आहे. या ड्रोनची किंमत २०० ते ३०० कोटी डॉलरच्या घरात जाऊ शकते. ही विक्री मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २२ जूनच्या नियोजित व्हाईट हाऊस भेटीची प्रतीक्षा संबंधितांना आहे. मोदी यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यापासूनच अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार खाते, पेंटागॉन आणि व्हाईट हाऊस यांनी भारताकडे ड्रोनखरेदी व्यवहाराला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
  • एमक्यू-९बी सी गार्डियन या शस्त्र वापराची क्षमता असलेल्या तीस ड्रोनच्या खरेदी व्यवहाराला भारताकडून अग्रक्रम मिळावा, असे सांगितले जात आहे. या ड्रोनची निर्मिती जनरल अ‍ॅटोमिक्स या कंपनीने केली आहे. मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे शस्त्रास्त्र आणि लष्करी वाहने यांच्या एकत्रित निर्मितीबाबतही चर्चा करण्याची शक्यता आहे. याबाबत  व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला. सध्या भारत आणि अमेरिका यांची अधिकृत अशी संरक्षणात्मक आघाडी नसली तरी, चीनला शह देण्यासाठी बायडेन यांनी भारताशी संरक्षण सहकार्य वाढविण्यास प्राधान्य दिले आहे.
जर्मनीनंतर आता न्यूझीलंडमध्येही आर्थिक मंदी; नेमकं घडतंय काय?
  • अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी युरोपमधली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगभरात ओळख असणाऱ्या आणि युरोपच्या आर्थिक गणितांमध्ये अग्रस्थान असणाऱ्या जर्मनीमध्ये आर्थिक मंदीला सुरुवात झाली. त्यामुळे जागतिक पटलावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. तसेच, या वर्षी शेवटच्या सहा महिन्यांमध्ये आर्थिक मंदीचं संकट जगावर घोंघावत असल्याच्या भाकितावर जोरदार चर्चा सुरू झाली. आता जर्मनीप्रमाणेच न्यूझीलंडचीही पहिल्या तिमाहीत आर्थिक मंदीमध्ये घसरण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर अर्थजगतामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकांच्या आधी आर्थिक मंदी, सरकार पेचात!

  • गुरुवारी न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातली माहिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये देशात पहिल्या तिमाहीत आर्थिक मंदी आल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या रिझर्व्ह बँकेला तातडीने व्याजदर वाढवण्यासंदर्भात पावलं उचलण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, दुसरीकडे अवघ्या काही महिन्यांमध्ये न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने, सरकार या निर्णयासाठी कितपत राजी होईल, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

न्यूझीलंडचा GDP घसरला!

  • न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेचा उलटा प्रवास यासंदर्भातल्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंडच्या जीडीपीमध्ये तब्बल ०.७ टक्क्यांची घट झाल्यातं दिसून आलं. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेची घसरण चालूच राहिली. त्यामुळे पहिल्या तिमाहीत न्यूझीलंडचा जीडीपी ०.१ टक्के इतका खाली आला. याआधी न्यूझीलंडमध्ये २०२०मध्ये करोनाच्या काळात आर्थिक मंदी आल्याची नोंद आहे.

“आश्चर्य वाटलं नाही”, न्यूझीलंड सरकारची भूमिका

  • दरम्यान, एकीकडे न्यूझीलंडमधल्या आर्थिक मंदीमुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत असताना न्यूझीलंडच्या अर्थमंत्र्यांनी मात्र यावर आपल्याला आश्चर्य वाटलं नसल्याचं विधान केलं आहे. “आपल्याला माहिती आहे की २०२३ हे वर्ष आव्हानात्मक आहे. जागतिक विकासाचा वेग प्रचंड खालावला आहे. प्रदीर्घ काळासाठी महागाईचा दर उच्च राहिला आहे. हवामानातील बदलांचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या आर्थिक मंदीचं कोणतंही आश्चर्य वाटलं नाही”, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे अर्थमंत्री ग्रँट रॉबर्ट्सन यांनी दिली आहे.

आर्थिक मंदी फक्त काही घटकांपुरती मर्यादित?

  • न्यूझीलंडमधल्या आर्थिक मंदीचा तिथल्या रोजगारावर परिणाम झाला नसल्याचं रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर याचा थेट परिणाम झाल्याचं दिसत नाही. मात्र, अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे देशात आर्थिक मंदी हा निवडणुकीचा मोठा मुद्दा ठरला आहे.
‘एमपीएससी’ची उत्तरतालिका जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत हरकती नोंदवता येणार
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्यास व सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट-अ करीता अर्ज सादर करण्यास १४ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीत हरकती नोंदवाव्यात अशा सूचना केल्या आहेत.
  • एमपीएससीच्या वतीने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ व सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट-अ करीता परीक्षा घेण्यात आली होती. याची उत्तरतालिका आयोगाने जाहीर केली आहे. यावर कुणाला आक्षेप नोंदवायचा असेल तर त्यांना तसा अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
सचिनच्या मुलाला BCCIचे खास आमंत्रण! तीन आठवड्यांच्या स्पेशल ट्रेनिंगनंतर अर्जुन करणार टीम इंडियात प्रवेश?
  • सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन याला मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिली होती. लवकरच सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी तयार होत असलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २० आश्वासक अष्टपैलू खेळाडूंना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे तीन आठवड्यांच्या शिबिरासाठी बोलावले आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे, जो गोव्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला होता, ज्याने इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स साठी पदार्पण केले होते.
  • बोर्डाच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला सांगितले की, “इमर्जिंग आशिया कप (२३ वर्षांखालील) या वर्षाच्या शेवटी होणार आहे आणि बीसीसीआय तरुण खेळाडूंचा शोध घेत आहे. अष्टपैलू खेळाडूंचे शिबिर NCA चे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुचवले होते, जेणेकरून आम्हाला सर्व प्रकारातील अष्टपैलू क्रिकेटपटू शोधता येतील.

चेतन साकारिया आणि अभिषेक शर्मा या खेळाडूंचा देखील समावेश

  • पीटीआयच्या म्हणण्यानुसार, शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने कामगिरी आणि क्षमतेच्या आधारे खेळाडूंची निवड केली. सूत्राने सांगितले की, “शिबिरात सहभागी प्रत्येक खेळाडू पूर्ण अष्टपैलू नाही. काही गोलंदाजी अष्टपैलू असतात तर काही फलंदाजी अष्टपैलू असतात. त्यांचा उद्देश त्यांच्यातील प्रतिभा वाढवणे आणि त्यांना टीम इंडियात खेळण्यासाठी तयार करणे हा आहे.” यामध्ये चेतन साकारिया, अभिषेक शर्मा, मोहित रेडकर, मानव सुतार, हर्षित राणा, दिविज मेहरा या खेळाडूंचा समावेश आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

  • अर्जुन तेंडुलकरने तीन आयपीएल सामने खेळले असले तरी तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याच्या निवडीमागील कारणाबद्दल विचारले असता, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “अर्जुनने यापूर्वीच रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावले आहे. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा निवड समिती शोध घेत आहे. अर्जुन १३० ते १३५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो आणि चांगली सहाव्या क्रमांकावर चांगली फलंदाजीही करतो. त्याच्याकडे वैविध्य आहे, पण देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी लक्षात घेऊन त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईल?”

 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालनाचे उद्घाटन :
  • जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे आले आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

  • मंगळवारी मुंबई भेटीत पंतप्रधान दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल.

  • त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’!; संरक्षण दलांच्या सेवेत कंत्राटी पद्धत, ‘अग्निवीरां’ची चार वर्षांसाठी नियुक्ती :
  • लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने मंगळवारी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली. या सैनिकांना अल्पकाळासाठी भरती केले जाईल. संरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

  •  देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेची घोषणा केली़  ‘‘अग्निपथ भरती योजना हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. त्यामुळे संरक्षण दलांना आणखी तरुण चेहरा प्राप्त होईल. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, असे सिंह यांनी सांगितल़े  या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील, असा विश्वास नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरिकुमार यांनी व्यक्त केला़ 

  • लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, की संरक्षण दलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करणे, हे अग्निपथ योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे संरक्षण दलांमध्ये तरुणाईची शक्ती आणि अनुभव यांचे संतुलन राखण्यास साहाय्य होईल. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लष्कराची आधीची कार्यशैली कायम राखली जाईल. या योजनेंतर्गत भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल होतील. त्या अंतर्गत सैनिकांची भरती सुरुवातीला चार वर्षांच्या कालावधीसाठी असेल, परंतु त्यापैकी काही कायम ठेवण्यात येतील.

  • गेले दोन वर्षे या योजनेबाबत व्यापक विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर ही योजना जाहीर करण्यात आली. त्याचे आधीचे नाव ‘टूर ऑफ डय़ूटी’ होते. आधी ‘शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन’अंतर्गत दहा वर्षांसाठी भरती करण्यात येत होती. त्यात १४ वर्षांपर्यंत मुदतवाढ करण्यात येत होती. या योजनेमागे वेतन व निवृत्तिवेतनावर वाढलेला खर्च कमी करण्याचा हेतू आहे. २०२२-२३ मध्ये ५,२५,१६६ कोटींच्या संरक्षण दलासाठीच्या निधीच्या तरतुदींपैकी १,१९, ६९६ कोटी निवृत्तिवेतनापोटी खर्च झाले. महसुली खर्चासाठी २,३३००० कोटींची तरतूद केली होती. त्यात वेतनावरील खर्च व विविध आस्थापानांसाठीचा खर्च अंतर्भूत आहे.

रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल तर महाराष्ट्रात मुंबई सर्वप्रथम :
  • मुंबई स्वैच्छिक रक्तदानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र जवळपास दशकभराहून अधिककाळ अव्वल राहिला आहे, तर महाराष्ट्रात मुंबई अग्रेसर ठरली आहे. करोनाच्या मागील दोन वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राने ३१ लाखाहून अधिक रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले असून एकूण एकूण जमा झालेल्या रक्तापैकी ९९ टक्के रक्तदान हे स्वैच्छिक रक्तदानाद्वारे जमा झाले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर गुजरातचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात करोनाकाळात मुंबईने सर्वाधिक रक्तदान शिबीरांचे आयोजन करून सर्वाधिक रक्तसंकलन केले आहे.

  • रक्तदानाच्या क्षेत्रात गेल्या दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राने बजावलेल्या उत्तुंग कामगिरीच्या आसपासही देशातील एकही राज्य येऊ शकलेले नाही. देशभरात २०२१ मध्ये सुमारे ८५ हजार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन सुमारे सव्वा कोटी रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्राने २८,९२६ रक्तदान शिबीरांचे आयोजन केले असून १६ लाख ७३ हजार ९४७ रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या आहेत. याकाळात जमा करण्यात आलेल्या एकूण रक्तापैकी केवळ ०.१५ टक्के रक्त हे बदली रक्तदानाद्वारे घेण्यात आले असून स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण हे ९९.१० टक्के एवढे असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

  • २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या टप्प्यातही महाराष्ट्रात २६,१०४ रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येऊन त्यामाध्यमातून १५ लाख २८ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. २०२२ जानेवारी ते एप्रिल या कालावधित मुंबईत ११३७ रक्तदान शिबीराच्या माध्यमातून ९१,३९३ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. त्या पाठोपाठ पुण्यामध्ये १२७९ रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून ९१,३७७ रक्ताच्य पिशव्या जमा करण्यात आल्या असून सोलापूर जिल्ह्यात ४७,१३१ रक्ताच्या पिशव्या, ठाणे ३७,६४२ तर नागपूर येथे ३७,०२६ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्याचे डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

केंद्राकडून दीड वर्षांत १० लाख नोकऱ्या; पंतप्रधान मोदी यांची सूचना; युद्धपातळीवर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध केंद्र सरकारी विभाग आणि मंत्रालयांना आगामी दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती करण्याची सूचना दिली आहे. मोहिमेप्रमाणे ही भरतीप्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  पंतप्रधान कार्यालयातर्फे मंगळवारी ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने सर्व सरकारी विभाग व मंत्रालयातील मनुष्यबळाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी या सूचना दिल्या.

  • देशातील वाढत्या बेरोजगारीसंदर्भात विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या अनेक विभागांत रिक्त असलेल्या पदांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. आगामी दीड वर्षांत म्हणजे १८ महिन्यांत केंद्र सरकारने दहा लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यास, २०२४ मधील आगामी निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्यावर भाजपकडे प्रचारासाठी चोख प्रत्युत्तर तयार असेल.

  • यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले आहे, की पंतप्रधान मोदींनी सर्व सरकारी विभाग व मंत्रालयांमधील मनुष्यबळाचा साकल्याने आढावा घेतला. त्यानंतर आगामी दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती करण्याची सूचना दिली. हे काम एका मोहिमेप्रमाणे राबवण्यासही सांगण्यात आले आहे.

  •  केंद्रशासित प्रदेश, परदेशांतील दूतावासासह केंद्र सरकारच्या नियमित नागरी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांवर (बोनस, मानधन, हक्काच्या रजांचे पैसे किंवा प्रवास भत्ता सोडून) २०१९-२० मध्ये २,२५,७४४.७ कोटी रुपये खर्च झाले. मार्च २०१८-१९ मध्ये हाच खर्च २.०८,९६०.१७ कोटी होता. या अहवालानुसार केंद्रीय सुरक्षा दलात एकूण मंजूर पदांपैकी मार्च २०२० मध्ये ९.०५ लाख कर्मचारी होते.

एकूण मूल्य = ४८,३९० कोटी रु.; ‘बीसीसीआय’चा ‘आयपीएल’ प्रसारण हक्काद्वारे महसुलाचा उच्चांक :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२३पासून पुढील पाच वर्षांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) प्रसारण हक्क कराराद्वारे ४८,३९० कोटी रुपयांपर्यंत आर्थिक झेप घेतली आहे. क्रीडाक्षेत्राच्या प्रक्षेपण करारांमध्ये ‘आयपीएल’ने उच्चांक गाठत लक्ष वेधले आहे. डिझ्नी-स्टारने अ-विभागाचे भारतीय उपखंडातील दूरचित्रवाणी प्रक्षेपणाचे हक्क २३,५७५ कोटी रुपयांना (प्रति सामन्यांसाठी ५७.५० कोटी रु.) मिळवले. परंतु ब-विभागाचे भारतीय उपखंडासाठीचे डिजिटल माध्यमांचे हक्क रिलायन्सच्या मालकीच्या व्हायाकॉम१८ समूहाने २०,५०० कोटी रुपयांना (प्रति सामन्यांसाठी ५० कोटी रु.) मिळवले. क-विभागाचे डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक हंगामातील निवडक सामन्यांचे (सलामीचा व अंतिम सामना, बाद फेरीचे सामने, शनिवार-रविवार) हक्कसुद्धा व्हायाकॉम१८नेच ३२५७.५ कोटी रुपयांना (प्रति सामन्यांसाठी ३३.२३ कोटी रु.) प्राप्त केले.

  • याचप्रमाणे ड-विभागाचे परदेशातील टीव्ही-डिजिटल हक्क व्हायाकॉम१८ आणि टाइम्स इंटरनेट यांनी १०५८ कोटी रुपये रकमेला मिळवले. स्टार इंडियाचे माजी प्रमुख उदय शंकर आणि जेम्स मरडॉच यांनी व्हायाकॉम१८साठी प्रसारण हक्क ई-लिलाव प्रक्रियेत रणनीती आखली.

  • ‘अ’ व ‘ब’ विभागात एकूण ४१० सामन्यांचा प्रसारण हक्क करारात समावेश आहे. यापैकी २०२३, २०२४मध्ये प्रत्येकी ७४ सामने आणि २०२५ ते २०२७ या तीन वर्षांत प्रत्येकी ९४ सामन्यांचा समावेश आहे.

  • स्टार इंडियाने ‘आयपीएल’ प्रसारणाचे भारतात प्रक्षेपणाचे हक्क २३,५७५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे जाहीर करताना मला अत्यानंद होत आहे. दोन वर्षांच्या करोना साथीनंतर सावरत या ई-लिलाव प्रक्रियेत ‘आयपीएल’ने एकूण ४८,३९० कोटी रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. प्रति सामन्यांचे मूल्यांकन केल्यास ‘आयपीएल’ ही दुसऱ्या क्रमांकाची क्रीडा स्पर्धा ठरली आहे.

१५ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.