चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 फेब्रुवारी 2024

Date : 15 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रोहितच कर्णधार’
  • अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केल्या जाणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी बुधवारी सांगितले. गेल्या काही काळापासून हार्दिक पंड्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची ‘आयसीसी’ जेतेपदाची दशकभरापासून प्रतीक्षा आणखी लांबली. ही प्रतीक्षा संपवण्यासाठी यंदा रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याची शक्यता बळावली होती.
  • आता राजकोट येथे झालेल्या एका समारंभात बोलताना शहा यांनी रोहित या स्पर्धेसाठी कर्णधार राहणार असल्याचे स्पष्ट केले. ‘‘एकदिवसीय विश्वचषकात पराभव पत्करावा लागला असला, तरी आता रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावून परत येईल,’’ असे शहा यांनी सांगितले.
  • भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमचे नामकरण निरंजन शहा स्टेडियम असे करण्यात आले. या सोहळ्यात शहा बोलत होते. सोहळ्यासाठी सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह रोहित, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आदी खेळाडू उपस्थित होते.
तलाठी भरतीत घोटाळ्याची व्याप्ती वाढली, लातूर येथील परीक्षा केंद्राच्या मालकाचे नातेवाईक टॉपर!
  • तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते तर सरासरी आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहे. लातुरातील अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर येत आहे.
  • तलाठी भरतीत ४,६०० पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि टीसीएस आयओएन कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर ५ जानेवारी २०२४ रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे सामान्यकरण करून जिल्हानिहाय निवड याद्या जाहीर करण्यात आली होत्या. लातूर शहरातील गुरू ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा केंद्राचा मालक यात सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
  • स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीत टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत अनेक पुरावे होते, त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत विस्तृत तक्रार दिली होती. परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या कॉम्प्युटरचा एक्सेस एनी डेस्क, टीम व्ह्युअर किंवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवर देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. तलाठी भरतीत लातूर येथील परीक्षा केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारांवर कार्यवाही झाली आहे. परंतु इतर जिल्ह्यातील टॉपर सुध्दा यात सामील असल्याने त्यांची चौकशी कधी असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे.
  • त्या शिफ्ट मधील ०.१% टॉपर उमेदवारांचे गुण सामान्यकरण प्रक्रियेत वापरले गेले होते, पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज असल्यामुळे दिलेल्या गुणांच्या आधारे तलाठ्यांना नियुक्त्या देणार तरी कशा असा सवाल उमेदवार विचारात आहेत. सदर गैरप्रकाराचा तपास न्यायालयीन चौकशी समिती व्दारे करावा म्हणून याआधीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता उच्च तंत्रज्ञानाने घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या पदभरतीचा तपास एसआयटी व्दारे करावा अशी मागणी होत आहे.
  • तलाठी भरतीत लातूर येथील एक परीक्षा केंद्र, त्या परीक्षा केंद्राच्या मालकानेच मॅनेज केले होते. वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान वापरून उमेदवारांचे पेपर सोडविल्या गेले आहेत. महाराष्ट्रातील तलाठी भरती मधील अनेक जिल्ह्यातील टॉपर लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा केंद्राशी निगडित व्यक्तीचा पुतण्या, बहीण आणि इतर नातेवाईकांना गैरप्रकार करून उत्तीर्ण करण्यात आले आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील टॉपर बद्दल खुलासा केला आहे, येत्या काळात इतर जिल्ह्यातील टॉपर बद्दल पुरावे सादर केले जातील. आमच्याकडे आता अनेक पुरावे असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिका सुध्दा दाखल केली आहे. इतका मोठा घोटाळा झाला असतानाही महसूल विभाग घोटाळेबाजांना नियुक्त्या देणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्त्या देण्यात येऊ नये, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.
जुन्या वाहनांना आता नवीन नंबर प्लेट बंधनकारक! लवकरच अंमलबजावणी सुरु होणार
  • देशभरात एप्रिल २०१९ नंतर नवीन वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बंधनकारक करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने जुन्या वाहनांनाही या क्रमांक पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला याबाबत प्रस्ताव पाठविला असून, लवकरच त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०१८ मध्ये वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांसाठी सुरू झाली. नव्या वाहनांना उत्पादकांनी किंवा वितरकांनी या पाट्या बसवून देणे बंधनकारक करण्यात आले. केंद्र सरकारने जुन्या वाहनांनीही उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बंधनकारक केल्या आहेत. प्रत्येक राज्याने याची अंमलबजावणी करावयाची आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
  • गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहन क्रमांकाच्या पाट्यांमध्ये बदल करतात. क्रमांक बदलल्यामुळे अनेकदा वाहने सापडत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारही हाती येत नाहीत. या प्रकारांना उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बंधनकारक करण्यात आल्या. या पाट्यांमध्ये बदल करणे शक्य नसल्याने एकप्रकारे वाहनांचा गुन्हेगारी वापर करण्यावर अंकुश ठेवता येईल, असा प्रयत्न होता. याला यश आल्याने जुन्या वाहनांनाही या पाट्या बंधनकारक केल्या जाणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

उच्च सुरक्षा क्रमांक पाटीची वैशिष्ट्ये

  • उच्च सुरक्षा क्रमांक पाटी ही थ्रीडी होलोग्राम स्टीकर असते. त्यावर वाहनाच्या इंजिनाचा क्रमांक आणि वाहनाचा सांगाडा क्रमांक असतो. या पाट्यांमध्ये बदल करता येत नाही आणि त्यांचा आकारही बदलता येत नाही. या पाटीवर बारकोड असून, आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांनी स्कॅन केल्यास वाहनाबाबतची संपूर्ण माहिती मिळते. पाटीवर एक इलेक्ट्रॉनिक चिप आणि गोपनीय क्रमांक असतो, तो वाहनाशी जोडलेला असतो. हा गोपनीय क्रमांक एकदा वाहन पाटीशी जोडला गेल्यानंतर दोन्ही बाजूने लॉक होतो. त्यानंतर कोणीही ते लॉक उघडू शकत नाही. या पाट्या ॲल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनवलेल्या असतात.
कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर! आरोग्य तपासणीसाठी केवळ १४० अधिकृत डॉक्टर
  • औद्योगिक कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अधिकृत प्रमाणित शल्यचिकित्सक म्हणून परवाना दिला जातो. सध्या राज्यात केवळ अधिकृत १४० डॉक्टर औद्योगिक कामगारांच्या तपासणीचे काम करीत आहेत. मात्र, असे शंभरहून अधिक प्रस्ताव सध्या राज्य सरकारसमोर प्रलंबित आहेत. अधिकृत डॉक्टरांची कमतरता निर्माण झाली असून, औद्योगिक कंपन्यांतील कामगारांच्या तपासणीला त्याचा फटका बसत आहे.
  • औद्योगिक कामगारांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या अधिकृत प्रमाणित शल्यचिकित्सकांचे (एसीएस) शंभरहून अधिक प्रस्ताव राज्य सरकारकडे सध्या प्रलंबित आहेत. हे प्रस्ताव मागील तीन वर्षांतील आहेत. राज्य सरकारने यावर निर्णय न घेतल्याने या डॉक्टरांनी थेट पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र पाठवले आहे. तातडीने त्यांच्या प्रस्तावांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे. वैद्यकीय कामगारांच्या तपासणीसाठी अधिकृत डॉक्टर कमी असल्याने त्याचा परिणाम कामगारांच्या आरोग्यावर होत असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
  • याबाबत कराडमधील अधिकृत प्रमाणित शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश कुलकर्णी म्हणाले की, मागील तीन वर्षांतील आमचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. एक डॉक्टर एका अथवा एकापेक्षा अधिक जिल्ह्यातून प्रस्ताव पाठवू शकतो. असे शंभरहून अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. अधिकृत डॉक्टर कमी असल्यामुळे साहजिकच कंपन्यांकडून कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे कामगारांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • राज्यातील औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे आहे. औद्योगिक कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी संचालनालय एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांना अधिकृत प्रमाणित शल्यचिकित्सक म्हणून परवाना देते. एका डॉक्टरला एकाहून अधिक जिल्ह्यातून यासाठी प्रस्ताव पाठवता येतात. हे प्रस्ताव तपासून संचालनालय कामगार मंत्रालयाकडे पाठविते. कामगार मंत्रालय त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करते. परवानाधारकाला कामगार मंत्रालयाला १० हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते आणि हा परवाना दोन वर्षांसाठी असतो. परवान्याची मुदत संपल्यानंतर संबंधित डॉक्टरांना औद्योगिक कामगारांची तपासणी करता येत नाही. त्यांना यासाठी पुन्हा परवाना घ्यावा लागतो.
निवडणूक रोखे योजनेविरोधातील याचिकांवर आज निर्णय, सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार!
  • राजकीय पक्षांना निवडणूक निधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडणूक रोखे योजनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज (१५ फेब्रुवारी) निकाल देणार आहे. सरन्यायाधीश डी . वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने २ नोव्हेंबर २०२४ रोजी या याचिकांवरील आपला निकाल राखून ठेवला होता. रोख स्वरुपात दिला जाणारा निधी कमी व्हावा तसेच राजकीय पक्षांना दिला जाणारा निधी यात पारदर्शकता यावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती.

निवडणूक रोखे योजना काय आहे?

  • राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत अधिक स्पष्टता यावी यासाठी ठोस उपायांची गरज व्यक्त केली जाऊ लागली. याच गरजेपोटी मोदी सरकारने २०१७ च्या वित्त विधेयकाद्वारे निवडणूक रोख्यांची (Electoral Bond Scheme) संकल्पना मांडली आणि मार्च २०१८ मध्ये ही योजना प्रत्यक्षात आणली. या योजनेच्या माध्यमातून नाव गुप्त ठेवून कोणत्याही राजकीय पक्षांना आर्थिक मदत करण्याची सोय करण्यात आली. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणालाही राजकीय पक्षांना निधी देण्याची या योजनेच्या माध्यमातून मुभा देण्यात आली. ही देणगी दिल्यानंतर देणगीदाराचे नाव गुप्त ठेवले जाते.

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी कसा देता येतो?

  • राजकीय पक्षांना देणगी देण्याचे माध्यम म्हणजे निवडणूक रोखे. कोणत्याही भारतीय व्यक्तीला, व्यक्तिसमूहाला किंवा कंपनीला निवडणूक रोखे विकत घेण्याची परवानगी आहे. केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत शाखांमध्ये वर्षातील पूर्वनिर्धारित दिवसांमध्ये हे रोखे जारी केले जातात. त्यांचे स्वरूप वचनपत्रांप्रमाणे (प्रॉमिसरी नोट) असते. या रोख्यांचे मूल्य एक हजार, दहा हजार, एक लाख, दहा लाख, एक कोटी अशा स्वरूपात असते. हे रोखे संबंधित व्यक्ती किंवा उद्योगसमूह विकत घेऊन त्यांच्या पसंतीच्या राजकीय पक्षाला देणगीदाखल देऊ शकतात. हे रोखे १५ दिवसांत वटविण्याची मुभा राजकीय पक्षांना असते. या प्रक्रियेत देणगीदाराचे नाव मात्र गोपनीय राहते.

सरकारची भूमिका काय?

  • याच रोख्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. या सुनावणीवेळी अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरामणी यांनी सरकारची बाजू मांडली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी दिला जातो. या माध्यमातून निधी देणाऱ्याचे नाव जाणून घेण्याची हमी भारतीय संविधान देत नाही. निवडणूक रोखे योजनेमुळे पारदर्शकता येते. माहितीच्या अधिकारालाही काही मर्यादा आहेत. या अधिकाराच्या माध्यमातून सर्वकाही जाणून घेण्याचे अनिर्बंध अधिकार देता येणार नाहीत, असा युक्तिवाद व्यंकटरामणी यांनी केला होता.

२०१९ मध्ये निवडणूक रोखे योजनेच्या स्थगितीला नकार

  • दरम्यान एप्रिल २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजनेच्या स्थगितीला नकार दिला होता. या योजनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या घटनापीठाने गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी युक्तिवाद ऐकण्यास सुरुवात केली होती. तर काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर, कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी या निवडणूक रोखे योजनेविरोधात याचिका दाखल केली होती.

 

एअर इंडियाचा ४७० विमाने खरेदी करण्याचा सर्वात मोठा करार

  • टाटा समूहाच्या एअर इंडियाने हवाई वाहतूक क्षेत्रातला सर्वात मोठा करार केला आहे. अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस या कंपन्यांकडून ४७० विमाने खरेदी करण्याचा मोठा करार केला आहे. यापैकी एअरबसकडून २५० नवीन एअरक्राफ्ट आणि बोईंगकडून २२० मोठी विमाने घेण्यात येणार आहेत. टाटा समूहाने एअर इंडियाला ताब्यात घेतल्यानंतर व्यवस्थापनात खूप व्यापक बदल केले आहेत. एअर इंडिया आणि एअरबस यांच्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रोन यांच्यात व्हर्चुअल बैठक झाल्यानंतर २५० विमान खरेदी करण्याचा करार झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा करार असून भारत-फ्रांस यांच्यामधील भागीदारीचा ही महत्त्वाची उपलब्धी आहे. तर जो बायडेन यांनी बोईंग – एअर इंडिया यांच्यामध्ये २२० विमानांच्या खरेदीचा करार झाला असल्याची घोषणा केली.
  • टाटा समूहाला एअर इंडियाची पुन्हा मालकी मिळाल्यानंतर कंपनीमध्ये खूप मोठे बदल दिसत आहेत. त्यामुळेच एअर इंडियाच्या ताफ्यात नवीन विमानांचा भरणा केलेला दिसून येत आहे. एअरबस – एअर इंडिया करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रतन टाटा, फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन आणि एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुइलाम फाउरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी फाउरी यांनी या कराराला ऐतिहासिक करार असल्याचे सांगितले.
  • त्यानंतर एअर इंडिया आणि अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या दरम्यानही मोठा करार झाला. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी मोदी आणि बायडेन यांच्यात फोनवरुन यासंदर्भात चर्चा झाली. दोघांनीही या कराराबाबत आनंद व्यक्त केला. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने उचलले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे जो बायडेन यांनी सांगितले.

निकी हॅले अध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या शर्यतीत

  • रिपब्लिकन पक्षाच्या निकी हॅले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये उतरण्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यांनी त्यासंबंधी घोषणा केली. उमेदवारीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या रिपब्लिकन नेत्या ठरल्या आहेत. अमेरिकेत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जानेवारी २०२४ मध्ये निवडणूक होईल. 
  • आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी, सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी, आपला देश आणि आपला अभिमान यांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेला आता नवीन पिढीतील नेतृत्वाची गरज आहे, असा दावा ५१ वर्षांच्या हॅले यांनी या व्हिडीओ संदेशामध्ये केला. हॅले या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या दोन वेळा गव्हर्नर होत्या तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. निकी हॅले यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत. 
  • दुसरीकडे विवेक रामस्वामी या भारतीय वंशाच्या अमेरिकी उद्योजकाकडे निकी हॅले यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. बायोटेकचे संस्थापक असलेले विवेक रामस्वामी गेल्या काही काळापासून अमेरिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. हवामान बदल आणि वर्णभेदासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ावर त्यांनी अनेकदा वृत्तवाहिन्यांवर रिपब्लिकन पक्षाची बाजू मांडली आहे. हॅले यांच्याप्रमाणेच रामस्वामी यांचेही आई-वडील भारतातून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. त्यांचा जन्म सिनसिनाटी येथे झाला आहे. हार्वर्ड आणि येल या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून त्यांचे शिक्षण झाले आहे आणि त्यांची संपत्ती ५० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे.

महिला आयपीएलचं वेळापत्रक जाहीर! ४ मार्चपासून रंगणार थरार; पहिल्याच सामन्यात ‘हे’ दोन संघ भिडणार

  • महिला प्रीमिअर लीगसाठी (WPL Auction 2023) लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार WPL मध्ये एकूण २० सामन असतील. तर ही स्पर्धा एकूम २३ दिवस चालणार आहे.
  • अंतिम सामना २६ मार्च रोजी - या वर्षी महिला आयपीएल अर्थात WPL 2023 ला येत्या चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिली लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. चार मार्चापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. हा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
  • एकूण २० साखळी सामने खेळवले जातील - WPL च्या या पहिल्या हंगामात एकूण २० साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर २ प्लेऑफसामने होतील. या स्पर्धेत एकूण चार दिवस दोन सामने खेळवले जातील. या चार दिवसांत पहिला सामना दुपारी तीन वाजता खेळवला जणार आहे. तर अन्य सर्व सामने रात्री साडे सात वाजता खेळवले जातील. एलिमिनेटर सामना २४ मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.
  • हिला आयपीएलसाठी सोमवारी (१४ फेब्रुवारी) लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सर्वाधिक रक्कम मोजली आहे. बंगळुरु संघाने मंधानाला संघात घेण्यासाठी तब्बल तीन कोटी ४० लाख रुपये मोजले आहेत. मंधानाची बेस प्राईज ५० लाख रुपये होती.

100 व्या कसोटीपूर्वी पंतप्रधान मोदींनी चेतेश्वर पुजाराला दिला विजयाचा मंत्र

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडिया १-०ने पुढे आहे. शुक्रवारपासून दिल्लीत दुसरी कसोटी खेळली जाणार असून कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारासाठी हा सामना खूप खास आहे. ही त्याची १००वी कसोटी असेल आणि या विक्रमाला स्पर्श करण्यापूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या बैठकीची छायाचित्रेही बीसीसीआयने शेअर केली आहेत. विशेष सामन्यापूर्वी पीएम मोदींनी पुजाराला शुभेच्छाही दिल्या. या भेटीत क्रिकेटपटूची पत्नी पूजाही त्याच्यासोबत होती.
  • ३५ वर्षीय मिस्टर डिपेंडंट पुजारा म्हणाला की, “त्याने निवृत्तीची तारीख निश्चित केलेली नाही आणि त्याला एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. अजून माझ्यात खूप क्रिकेट बाकी आहे.” कसोटी सामन्यापूर्वी पुजारा आणि त्याची पत्नी पूजा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पुजाराने ट्विट केले की, “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटणे हा एक सन्मान होता. माझ्या १००व्या कसोटीपूर्वी मी तुमच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आभारी आहे. धन्यवाद PMOIndia!” ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, “आज पूजा आणि तुला भेटून आनंद झाला. तुझ्या १००व्या कसोटीसाठी आणि तुझ्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजाही त्यांच्यासोबत होती. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा १०वा वाढदिवस साजरा केला. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर पुजाराने ट्विट केले की, “पंतप्रधानांना भेटून मला खूप आनंद झाला. त्याच्याशी छान गप्पा झाल्या.” पीएम मोदींनीही ट्विटला उत्तर दिले आणि भविष्यासाठी आणि १००व्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयनेही हे ट्विट पुन्हा शेअर केले आहे.

भारतात ‘या’ दिवशी लॉन्च होणार Xiaomi 13 Pro, DSLR ला टक्कर देणार ५० मेगापिक्सलचा कॅमेरा

  • Xiaomi ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. Xiaomi कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपला आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे . शाओमी कंपनीने Xiaomi 13 Pro बद्दल माहिती दिली आहे. कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार असून त्यापूर्वीच याचे फीचर्स समोर आले आहेत.
  • Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन - सध्या Xiaomi कडून Xiaomi 13 Pro च्या स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे फीचर्स लॉन्च झाले आहेत. कंपनीने आपल्या स्थानिक बाजारात हा फोन लॉन्च केला असून भारतात देखील त्याच फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसोबत लॉन्च होणार आहे. आपण याच्या चायना व्हेरिएंटमध्ये बोलायचे झाल्यास त्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 हा प्रोसेसर असणार आहे. यामध्ये ६.७३ इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले मिळतो. त्यामध्ये 12 GB LPDDR5X RAM दिली जाईल आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असणार आहे.
  • कसा असणार कॅमेरा - Xiaomi 13 Pro मध्ये कंपनी तुम्हाला DSLR कमरेच्या लेव्हलचा कॅमेरा देणार आहे. भारतात येणाऱ्या फोनचा कॅमेरा Leica ब्रॅंडिंगसह येणार आहे. त्यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असतील. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये OIS फिचर देखील मिळेल ज्यामुळे तुम्ही यामधून स्मूथ व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणार तसेच या फोनला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येणार आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माती नेणार

शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 फेब्रुवारी 2023

 

‘इस्रो’तर्फे तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी ईओएस-०४ या भूनिरीक्षण उपग्रहासह दोन लहान उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी ५२ क्षेपणास्त्राच्या साहाय्याने अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. २०२२ सालातील या पहिल्याच प्रक्षेपण मोहिमेचे वर्णन इस्रोने ‘अद्भुत पूर्तता’ असे केले.

  • पहाटेच्या अंधारातच ५ वाजून ५९ मिनिटांनी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे १९ मिनिटांच्या उड्डाणानंतर पीएसएलव्ही या प्रक्षेपण यानाने तिन्ही उपग्रहांना निर्धारित कक्षेत प्रस्थापित केले, त्यावेळी या मोहिमेचे बारकाईने निरीक्षण करत असलेल्या शास्त्रज्ञांनी टाळय़ा वाजवून आनंद व्यक्त केला.

  • सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी सर्वप्रथम ईओएस-०४ प्रक्षेपण यानापासून वेगळे झाल्यानंतर इन्स्पायरसॅट-१ व आयएनएस-२ टीडी या लहान उपग्रहांनाही त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. मोहिमेचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या यशस्वी प्रक्षेपणानंतर सांगितले. अंतरिक्ष खात्याचे सचिव आणि अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच सूत्रे स्वीकाल्यानंतर आजही ही पहिलीच मोहीम होती.

  • १७१० किलोग्रॅम वजनाचा आणि दहा वर्षांचे आयुष्य असलेला ईओएस-४ हा सर्व प्रकारच्या वातावरणात शेती, वनीकरण व वृक्षलागवड, जलविज्ञान आणि पूर आरेखन यांसारख्या कामांसाठी उच्च दर्जाच्या प्रतिमा मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेला रडार इमेजिंग उपग्रह आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल देशातील अंतरिक्ष शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

युक्रेनचे अध्यक्ष रशियाबाबत निर्धास्त, पण अमेरिकेचे इशारे सुरूच :
  • युक्रेनवर रशिया हल्ला करण्याची शक्यता आहे, असे इशारे अमेरिका आदी मित्रराष्ट्रांकडून वारंवार दिले जात असले तरी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांनी ते गांभीर्याने घेतलेले नाही. रशियाचे आणखी काही सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आल्याचे रविवारी अमेरिकेने म्हटले असले तरी, रशियाच्या अशा हेतूबाबत अद्याप ठोस पुरावा दिसून येत नाही, असे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. 

  • दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांनी त्यांची युक्रेनच्या सीमाभागातून होणारी उड्डाणे रद्द केली आहेत, किंवा त्यांचा मार्ग बदलला आहे. 

  • रशियाच्या फौजांनी युक्रेनभोवती तीन बाजूंनी जमवाजमव केली असून हा एका लष्करी सरावाचा भाग आहे, असे रशियाचे म्हणणे आहे. या स्थितीत युक्रेनच्या नागरिकांनी शांत राहावे, असे झेलेन्सकी सातत्याने सांगत आहेत.  गेल्या आठवडाभरापासून रशियाच्या या हालचालींबाबत अमेरिकेचे अधिकारी युक्रेनला सावधगिरीचा इशारा देत आहेत. येत्या आठवडय़ाच्या आतच रशियाचे युक्रेनवर आक्रमण होईल, असा त्यांचा दावा आहे. पण तो मानण्यास झेलेन्सकी उघडपणे तयार नाहीत.

  • गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, युक्रेनवर बुधवारी रशिया चाल करणे अपेक्षित आहे.

५४ चिनी अ‍ॅपवर केंद्र सरकारची बंदी :
  • भारतीय सुरक्षेला बाधक ठरणाऱ्या ५४ चिनी मोबाइल अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोमवारी घेतला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाने या अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्याची औपचारिक अधिसूचना जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  •  बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा, म्युझिक प्लेअर, म्युझिक प्लस, व्हॉल्यूम बूस्टर, व्हिडीओ प्लेअर मीडिया, विवा व्हिडीओ एडिटर, नाइस व्हिडीओ बायडू, अ‍ॅपलॉक, अ‍ॅस्ट्राक्राफ्ट यासंह विविध अ‍ॅपचा समावेश आहे.

  • चिनी मोबाइल अ‍ॅपवर दुसऱ्यांदा कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जून २०२१मध्ये सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. टिकटॉक, यूसी ब्राऊझर, वुईचॅट, बिगो लाइव्ह यांसह विविध अ‍ॅपचा यामध्ये समावेश होता. हे अ‍ॅप देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व यांस प्रतिकुल असल्याचे त्यावेळी सरकारने सांगितले होते.

राज्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आली दोन हजारांपेक्षा खाली ; रिकव्हरी रेट ९७.६६ टक्के :
  • राज्यातील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या आता कमी झाली आहे. आज (सोमवार) दिवसभरात राज्यात १ हजार ९६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६६ टक्के एवढे झाले आहे.

  • आज ११ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६१,०७७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यात आज १२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे.

  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६५,२७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४४,९१५ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४८,४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

विंडीज, आफ्रिकेचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध :
  • वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील.

  • यंदा २७ मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे ‘आयपीएल’चा १५वा हंगाम खेळवण्यात येण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे काही नामांकित खेळाडू विविध दौरे तसेच वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना संपूर्ण ‘आयपीएल’ खेळण्याची मुभा दिली आहे. यंदाच्या हंगामात विंडीजचे १७, तर आफ्रिकेचे ११ खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • शिखर धवनकडे पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ३६ वर्षीय धवनला पंजाबने लिलावादरम्यान ८.२५ कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील केले. ‘‘धवनच्या रूपात अनुभवी खेळाडूचा संघात समावेश केल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्हाला आमचा कर्णधार मिळाला आहे. पुढील आठवडय़ाभरात याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल,’’ असे पंजाबच्या संघ व्यवस्थापनातील सदस्याने सांगितले.

१५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.