चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ फेब्रुवारी २०२१

Date : 15 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार :
  • मोठ्या अंतराळ मोहिमामध्ये लोकप्रिय व्यक्तींची नावं अंतराळात पाठवण्याचा ट्रेण्ड आता भारताकडूनही फॉलो केला जाणार आहे. खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह सतीश धवन सॅटलाइटसोबत (सएडी सॅट) भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावं अंतराळात पाठवली जाणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाकडून यापूर्वी अशाप्रकारे अनेकदा लोकप्रिय व्यक्तींच्या नावांची यादी अंतराळात पाठवण्यात आली.

  • भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या २५ हजार नावांमध्ये बहुतांशी नावं ही विद्यार्थ्यांची असतील असं सांगण्यात येत आहे. इस्रो आपल्या विश्वसनीय अशा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाने म्हणजेच पीएसएलव्ही सी-५१ ने इतर दोन खासगी उपग्रहांसोबत सएडी सॅट अवकाशात सोडणार आहे.

  • एसडी सॅटची निर्मिती करणाऱ्या चेन्नईमधील स्पेसकिड्स या कंपनीने तांत्रिक विभागाचे प्रमुख असणाऱ्या रिफत शाहरुख यांनी दिलेल्या माहितीनुसार साडेतीन किलो वजनाच्या या नॅनो उपग्रहामध्ये एक अतिरिक्त चिप लावण्यात आली असून त्यामध्येच ही नावं असणार आहे.

  • या नॅनोसॅटेलाइटचे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक असणाऱ्या सतीश धवन यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची गोडी वाढावी या हेतूने हा उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार असल्याचे स्पेसकिड्सने स्पष्ट केलं आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हा उपग्रह अंतराळात पाठवण्याचे निश्चित करण्यात आलं आहे.

भारताचे तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र :
  • राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. त्यामुळे संदीप, प्रियांका आणि राहुल कुमार या भारताच्या तीन खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

  • आता टोक्यो ऑलिम्पिकसाठी चालण्याच्या शर्यतीत पात्र ठरलेल्या खेळाडूंची संख्या पाच झाली आहे. याआधी के . टी. इरफान आणि भावना जट यांनी पात्रता निकष पार केले होते. संदीपने एक तास २० मिनिटे १६ सेकंद अशी वेळ नोंदवत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले.

  • प्रियांकाने १ तास २८ मिनिटे ४५ सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदक संपादन केले. राहुल याने पुरुष गटात १ तास २० मिनिटे २६ सेकंद अशा कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे. संदीप याने ५० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

लष्करात स्वदेशी ‘अर्जुन’ :
  • स्वदेशात निर्मित अर्जुन एमके- १ ए हा लढाऊ रणगाडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लष्कराच्या सुपूर्द केला. दक्षिणेने तयार केलेला हा रणगाडा देशाच्या उत्तर सीमांचे संरक्षण करणार असून, हे भारताच्या एकतेच्या भावनेचे उदाहरण आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

  • स्वदेशात निर्मित आणि विकसित केलेल्या व संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने उत्पादित केलेल्या या अत्याधुनिक रणगाड्याची मानवंदनाही चेन्नईत झालेल्या एका समारंभात मोदी यांनी स्वीकारली. पंतप्रधानांनी नंतर या रणगाड्याची एक प्रतिकृती लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना सोपवली.

  • ‘‘या रणगाड्यात स्वदेशी दारूगोळ्याचा वापर केला जातो. तमिळनाडू हा यापूर्वीच देशाचा ऑटो उत्पादन हब बनला आहे. आता हे राज्य देशाचा रणगाडा उत्पादन हब म्हणून आकाराला येत असल्याचे मला दिसते,’’ असे त्यांनी नमूद केले.

महाभियोगातून ट्रम्प मुक्त :
  • सत्तांतराच्या वेळी त्यांच्या समर्थकांना कॅपिटॉल हिल येथे हिंसाचारास उत्तेजन दिल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या महाभियोगाच्या आरोपातून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सेनेटमधील मतदानात मुक्तता झाली आहे. त्यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज होती, पण तेवेढे बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाला गोळा करता आले नाही.

  • माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सात सदस्य फुटले होते, पण त्यामुळे बहुमताचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्यामुळे ट्रम्प यांची मुक्तता झाली. सात सदस्यांनी या ऐतिहासिक महाभियोगात ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. ट्रम्प यांच्यावरचा हा दुसरा महाभियोग होता. यापूर्वी यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याच्या प्रकरणी ट्रम्प यांच्यावर पहिला महाभियोग दाखल करण्यात आला होता पण तोही यशस्वी झाला नव्हता. ट्रम्प यांच्यावर या वेळी ६ जानेवारीला यूएस कॅपिटॉल येथे दंगलीस उत्तेजन दिल्याचा आरोप होता.

  • या दंगलीत एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच जण ठार झाले होते. ५७  विरुद्ध ४३ मतांनी ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग या वेळी फेटाळला गेला. सात रिपब्लिकनांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले होते. दोन तृतीयांश बहुमताला १० मते कमी पडली. एकूण ६७ मतांची गरज बहुमतासाठी होती पण तेवढी मते डेमोक्रॅट पक्षाला गोळा करता आली नाहीत.

“निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असं म्हणू नका” :
  • राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलनजीवी निर्माण झाल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. उमटत आहेत. शेतकरी आंदोलनाविषयी पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

  • “काश्मिरातून ३७० कलम हटवणे हे भाजपाच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले,” अशी खंत व्यक्त करत राऊत यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

  • संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या आंदोलनजीवी शब्दावरून टीका केली आहे. “ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा.

  • आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

१५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.